Thursday, May 30, 2019

मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान !!


मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान  :      रुपाली दीपक कुलकर्णी,

मित्रानो, धमाल चाललीय का मग सुट्टीची ? खुप दिवसांपासून तुम्ही या सुट्टीची वाट पाहिली असेल ! पण या सुट्टीततुम्ही  उन्हाळी शिबीरे, वेगवेगळे छंदवर्ग , खेळ यांच्यापलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करू शकता का ? चला विचार करू या ! समजाऊन घेऊयात एक नवीन संकल्पना “अनुदान“ अर्थात “सबसिडी” ची राधाच्या गोष्टीतून !!

राधाला सुट्टी लागली ! शाळेच्या शेवटच्या दिवशी , घरी आल्या आल्या म्हणाली, "आई , मी आता 2 महिने या वह्या पुस्तकांकडे अजिबात बघणार नाही बरे !!" आणि मग राधा खेळ, बालनाट्ये, शिबिरे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त झाली. पण काहीच दिवसात, हे सर्व करुन  झाल्यावर  राधाला आला कंटाळा !! आणि आता काय करायचे असा तिला प्रश्न पडला.  तेव्हा आईने तिच्या दप्तरातील सर्व वह्या बाहेर काढल्या आणि तिच्यासमोर ठेवल्या.  आईने बिल्डिंगमधल्या राधाच्या  सगळ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या जुन्या वह्यांसोबत एकत्र बोलाविले. त्यांना वहीतले सर्व कोरे कागद व्यवस्थीत  बाजूला करण्यास सांगितले. बघता बघता कोऱ्या पानांचा ठीग जमा झाला. त्या मोठ्या ठिगातून, काही पाने उचलून आईने त्यांना वही शिवायला शिकवले । सगळ्यांना ही “बेस्ट फ्रॉम वेस्ट” संकल्पना जाम आवडली.  मुले ,खुष झाली आणि उत्साहाने कामाला लागली. दिवसभरात आपली कल्पकता लढवून मुलांनी सुंदर , सुबक वह्या तयार केल्या. कागदांचा पुनर्वापर केला असल्याने आईने त्यांना सवलतीच्या दरात या वह्यांचा स्टॉल लावण्याची आयडिया सांगितली. मुलांनी बिल्डिंगखाली ह्या सवलतीच्या दरातील वह्यांचा स्टॉल लावला.  त्या बिल्डिंग मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कामगारवर्गाला यामुळे कमी दरात वह्या विकत घेता आल्या. त्यांना मदतही झाली आणि मुलांनी  स्वकमाईचा आनंदही घेतला !!

बालदोस्तानो, आपल्या देशातील बहुसंख्य लोक गरीब आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तू विकत घेता याव्या म्हणून आपले सरकारही अशा वस्तूंच्या मूळ किमतीत सूट देऊन, त्या सवलतीच्या दरात त्यांना उपलब्ध करून देते. ह्यालाच म्हणतात अनुदान / सबसिडी. जसे शेतकरी वर्ग खूप मेहनत करून शेतात उत्पादन घेत असतो. परंतु खराब हवामानामुळे त्यांची पूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. असे झाले तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. परंतु अन्न ही जीवनावश्यक वस्तू असल्याने सरकार बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे आणि वीज या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणजेच सवलत देते. खेडेगावांमधील शाळा, जेथे शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे, तेथेही सरकारी अनुदानित शाळा असतात.  दुष्काळग्रस्त भागात, टंचाईमुळे वस्तूंचे दर खूपच वाढले तर सामान्य जनतेला त्या खरेदी करता याव्या, म्हणून जीवनावश्यक वस्तू अनुदानित करण्यात येतात. हे सर्व करताना सरकारला जो पैसा लागतो, तो आपण भरत असलेल्या कराद्वारे सरकारला उपलब्ध होत असतो. तेव्हा कर भरणे म्हणजे एकप्रकारे आपल्या देशातील गोरगरीब जनतेला मदत केल्यासारखेच आहे.

मित्रानो, या सुट्टीत राधाप्रमाणे तुम्हीही  काही स्वकमाई सारखे काही वेगळे उपक्रम करून, गरजु-वर्गासाठी अनुदानित वस्तू उपलब्ध करून देऊ शकता किंवा त्या दान करुन मदतही करू शकता. जसे वर्षभर तुम्ही वापरलेल्या पुस्तकांना नवीन कव्हर्स लावता येतील, नवीन गणवेश, दप्तरे यांची खरेदी होणार असल्यास, तुमच्या या वस्तू व्यवस्थीत स्वच्छ करुन शाळेत गरजू मुलांसाठी जमा करता येतील, उन्हाळ्याची सरबते, पन्हे किंवा तुम्ही केलेली भेटकार्डे यांचा स्टॉल लावून निधी जमा करता येईल व त्यातून गरीब विद्यर्थ्याना मदत करता येईल. आहे न भारी? करणार का तुम्ही  सुट्टीत  “दान / अनुदान” संकल्पनेवर काम ? माझ्या कडून धमाल सुट्टीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !! Happy Vacations !!

-          रुपाली दीपक कुलकर्णी,
SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक,
ईमेल:  muktangan@swsfspl.com  
मोबाईल क्रमांक: ९८२२०००८८३, ९८२२४०८०९३.