Followers

Wednesday, April 10, 2019


मनो-Money: भाग ८: नको तो काळा पैसा : रुपाली दीपक कुलकर्णी,


बालदोस्तांनो, आत्ता नुकत्याच देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. तेव्हापासून घरात, टीव्हीवर, वर्तमानपत्रात सगळीकडे निवडणुकीच्याच चर्चा सुरू आहेत. कुठला पक्ष काय उद्देश ठेवून निवडणूक लढविणार, कुठून कोणता उमदेवार उभा राहणार वगैरे, वगैरे ! या सगळ्या गदारोळात तुम्ही काळा पैसा हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल.  हा शब्द ऐकून तुम्ही कधी विचार केला आहे का, की काय असतो काळा पैसा ? सांगते, ऐका का किस्सा !

एकदा माधुरी काकूने घरात काम करणाऱ्या संगीता मावशींना शंभर रुपये देऊन, दोन किलो गहू आणून ठेवायला सांगितले. मावशींनी 40 रुपये किलो दराने दोन किलो गहू आणून ठेवले आणि माधुरी काकूला मात्र पन्नास रुपये किलो असा दर सांगूनसगळेच पैसे वापरल्याचे खोटेच सांगितलेम्हणजेच  संगीता मावशींनी वरचे वीस रुपये फुकटच लाटले ! संगीता मावशींनी हे पैसे गैरमार्गाने मिळविले.  असा अनधिकृत मार्गाने आलेला पैसा,  ज्या पैशावर आपला हक्क नाही, जो पैसा कमविण्यामागे असणारा उद्देश्य योग्य नाही, असा पैसा कुठून, कोणाकडून, केव्हा, कसा आला याची कुठेही नोंद नाही तो सर्व झाला काळा पैसा ! असा पैसा, संगीता मावशींच्या वीस रुपयाप्रमाणे , अयोग्य मार्गाने उपलब्ध झाल्याने रोकड स्वरूपात असतो.

दोस्तांनो, आपल्या सर्वांनाच देशात चांगल्या सुविधा असाव्यात, देश आर्थिक आणि तांत्रिक बाबतीत सशक्त असावा असे वाटत असते. ह्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सरकारला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा काळा पैसा, ज्याची कुठेही नोंदच नाही आणि म्हणून जो सरकारला वापरताच येणार नाही, देशाच्या प्रगतीसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक ठरत असतो. कारण, अशा पैशाच्या माध्यमातून लोकहिताची कुठलीही कामे करणे सरकारला शक्य नसते. आपल्या देशात जवळपास दोन तृतीयांश पैशाची ही अवस्था आहे !! आहे ना चक्रावून सोडणारी करणारी गोष्ट?  म्हणून काळा पैशाचा उद्गम आणि वापर रोखण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी म्हणून तुम्ही पुढील काही गोष्टी नक्कीच करू शकता. १) आपल्या घरातील जास्तीतजास्त व्यवहार हे बँक खात्याच्या मार्फत किंवा चेक/ क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड यामार्फत करू शकतो. यामुळे पैशाच्या आवक-जावकाचे कारण सुस्पष्ट राहते. 2) आपल्या आजूबाजूच्या, घरी कामे करण्यास येणाऱ्या सर्वजणांना आपण बँक खाते उघडण्यासाठी आणि त्याद्वारेच व्यवहार करण्यासाठी प्रेरित करू शकतो. 3) आपल्या घरी कामे करण्यास येणाऱ्या सर्वजणांचा पगार, आई-बाबांनी बँक खात्यातच जमा करावा असा आग्रह आपण धरू शकतो. ४) आपले किंवा इतरांचे कुठलेही काम चटकन किंवा प्रलोभने दाखवून करून देण्याऱ्या आणि त्यासाठी  पैसे मागणाऱ्या व्यक्तीला आपण स्पष्टपणे नाही म्हणू शकतो.     ५) इंटरनेट चा वापर करून, आपण नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, भीम किंवा तत्सम सुरक्षित पेमेंट अँप्लिकेशन्सच्या , कुशलतापूर्वक वापरासाठी, पालकांची / विश्वासू तज्ज्ञांची मदत घेऊन आवश्यक ते ज्ञान मिळवू शकतो.

मित्रानो, जरा जास्तीच वाटतेय का हे ? पण हे शक्य करून दाखविले आहे गुजरातमधील GNFC नामक वसाहतीने. पाच हजारावर सामान्य वस्ती असणाऱ्या या वसाहतीमध्ये, दुकानात पान घेण्यापासून ते सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासारखी छोटी कामेही कॅशलेस पद्धतीने म्हणजेच डिजिटल पैशांचा वापर करून केली जातात. GNFC या खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीने, पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांना, कॅशलेस पद्धतीने खतविक्री केली आहे आणि दिवसोंदिवस ही संख्या वाढतेच आहे. आहे ना हे प्रेरणादायी ?  आपल्यालाही हे शक्य आहे ! देशहितासाठी योगदान देताना, सीमेवर जाऊन लढाईच केली पाहिजे असे गरजेचे नाही. आपापल्या ठिकाणी राहून, उत्तम नागरिक बनूनही आपण देशासाठी योगदान देऊ शकतो. त्यासाठी तयारी हवी ठाम निर्धाराची आणि त्यादिशेने शिस्तबद्ध वाटचाल करण्याची !! मग, करा ठाम निर्धार, आपल्या आवाक्यातील काळ्या पैशाची निर्मिती रोखण्याचा !!            
 - रुपाली दीपक कुलकर्णी,
SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक,

Tuesday, March 19, 2019


मनो-Money: भाग ७: काय असते GST ?    

दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक कर, तमुक कर असे  असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखीन एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून  समजावून  घेऊयात. ही संकल्पना आहे GST  (Goods and Service Tax) अर्थात  वस्तू आणि सेवा कर !!
आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन बालमैत्रिणी, राधा आणि तिच्याच शेजारी राहणारी, तिची वर्गमैत्रीण सारा !! तर झाले काय की, राधाचा वाढदिवस उद्यावर आल्याने, तिच्यासाठी बाबांनी, शाळेत वाटण्यासाठी चॉकलेटचा डबा घरात आणून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाची स्वारी, तयार होऊन शाळेत निघाली ! बाहेर आल्यावर, सारा आणि तिच्या आईने राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ! मग राधाने त्या दोघीना, हसून धन्यवाद दिले आणि  त्यांना एक-एक चॉकलेट काढून दिले. दोघी शाळेच्या व्हॅनमध्ये बसून, शाळेच्या गेटवर पोहोचल्या. गेटवर उभ्या असलेल्या  वॉचमन काकांनी, राधाच्या हातातील चॉकलेटचा डबा पाहिला आणि तिचा वाढदिवस असेल असे समजून त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. आता राधाने त्यांनाही चॉकलेट दिले. मग  राधा आणि सारा आता वर्गात आल्या. पहिला तास सुरू होताचसगळ्या मुलांनी राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग राधाने सगळ्यांना चॉकलेटस वाटले.  वर्गात असलेल्या साराला पुन्हा चॉकलेट मिळाले म्हणून ती खूप खुश झाली.
मित्रांनो आता असे समजा की वाढदिवस म्हणजे आहे तुमचा व्यवसाय आणि चॉकलेट म्हणजे आहे त्यावर द्यावा लागणारा कर !! शेजारीच राहणाऱ्या सारा आणि तिच्या आईला चॉकलेट स्वरूपात जो  मिळाला  तो झाला स्थानिक कर (लोकल टॅक्स) आणि गेटवरच्या वॉचमन काकांना जो मिळाला तो झाला प्रवेश कर (एन्ट्री टॅक्स) ! वर्गातील सर्व  मुलांना जो  मिळाला त्याला म्हणूयात  सेवा कर (सर्व्हिस टॅक्स) आणि साराला दुसऱ्यांदा मिळालेले चॉकलेट हा झाला  अतिरिक्त कर (सरचार्ज) !! एकाच वस्तुवरच्या, अशा सगळ्या वेगवेगळ्या करांमुळे, व्यापारी, सामान्य नागरिक यांची कर भरताना दमछाक होत होती.  जसे राधाला लक्षपूर्वक सगळ्यांना, पण वेगवेगळ्या वेळी चॉकलेट द्यावे लागत होते.  याऐवजी जर तिने चॉकलेटचा डबा शाळेच्या ताईंकडे दिला असता तर त्यांनी सर्वच मुलांना, एकाच वेळी समानतेने चॉकलेट्स वाटली असती.  त्यात कोणी चुकून राहूनही  गेले नसते आणि कोणाला पुन्हा पुन्हा चॉकलेट मिळालेही नसते.  हिच जी एकछत्री, सोपी वाटपपद्धती झाली, त्याचप्रमाणेच काम करते  GST !! 1 जुलै 2017 रोजी, आपल्या देशात हा GST लागू करण्यात आला.  त्यामुळे देशांतर्गत सर्वत्र, एका वस्तूवर, एकच कर लागू झाला.  केंद्र सरकारला मिळणारे उत्पादन कर, सेवाकर हे रद्द झाले तसेच राज्य सरकारला मिळणारे  मूल्यवर्धन टॅक्स (व्हॅट)प्रवेश कर हे रद्द झाले.  याचा फायदा असा झाला की, देशात प्रत्येक वस्तूचा, एकच भाव  झाला.  त्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जाण्याची आवश्यकता उरली नाही आणि सर्व उद्योग हे एकाच करप्रणाली अंतर्गत समाविष्ट झाले. यामुळे कर भरण्याची पद्धतीही सुलभ झाली.  सारासारख्या अतिरिक्त लाभास मुकलेल्या व्यक्तींचा, या प्रणालीस  विरोध होणे स्वाभाविकच होते ! 

आहे ना सोपे मित्रांनो !! मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, यांनी हीच संकल्पना एका व्हीडीओ मार्फत विशद करुन सांगितलेली आहे. बघायचं का तुम्हाला ? मग उघडा युट्युब आणि टाईप करा "जीएसटी पल्लवी जोशी". तुम्ही समजावून घ्या आणि इतरांनाही समजावून सांगा !!


मनो-Money : भाग ६ : अर्थाचा अर्थ !!

हॅलो बालदोस्तांनो ! या लेखमालेतील मागील सर्व लेखांमधून, आपण “अर्थ” म्हणजेच पैसा यासंबंधी बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना, गोष्टीरुपांतून समजून घेतल्या. आता यावेळी त्यातून थोडा ब्रेक घेउया !! यावेळी मी तुम्हाला मराठी साहित्या मधील सुपरिचित लेखक श्री. आचार्य अत्रे यांच्या एका कथेचा संदर्भ घेऊन, आजच्या काळाशी सुसंगत अशी गोष्ट सांगणार आहे. तिही अर्थातच “अर्था”विषयी म्हणजेच पैश्याविषयी !

तर आपल्या गोष्टीत आहे एक छोटासा मुलगा नंदू !! नंदू आपल्या आई-बाबा आणि आजी-आजोबांसोबत रहात असतो. एकदा शेजारील अक्षयदादाकडे आलेली नवीन, महागडी सायकल बघून “मला सुद्धा अशीच सायकल हवी”, असा हट्ट नंदू करतो. तेव्हा बाबा त्याला समजाऊन सांगतात, “अरे अक्षय दादा कॉलेज सांभाळून एके ठिकाणी काम करतो आणि पैसे कमावितो. असे करून त्याने जमविलेल्या पैशामधून आपली सायकल विकत घेतली आहे”. आजोबापण नंदूला सांगतात, “नंदू, पैसे कमविण्यासाठी काम करणे गरजेचे असते पण त्यासाठी अजून तू लहान आहेस. शिवाय तुला तशा सायकलची आत्ता आवश्यकताही नाहीये.” मग नंदू विचारात पडतो की ‘मीही खरे म्हणजे घरातील किती कामे करतो मग मीही पैसे कमवू शकतोच की !! लहान असलो म्हणून काय झालं ? घरातील व्यक्तींनी सांगितलेल्या प्रत्येक कामाचा मी मोबदला मागू शकतो आणि पैसे कमावू शकतो’. झालं, तेव्हापासून नंदू त्यालासांगितलेल्या कामांची यादीच लिहायला सुरू करतो. एकदा आई त्याला दळण आणून द्यायला सांगते तेव्हा नंदू आपल्या यादीमध्ये लिहितो “दळण आणले- पाच रुपये”. एकदा आजोबा त्याला चष्म्याच्या दुकानातून त्यांचा चष्मा आणून द्यायला सांगतात. तेव्हा नंदू यादीमध्ये लिहितो, “चष्मा आणला, दहा रुपये”. असे होता होता, नंदूच्या मनातील मदतीची भावना कमी होत जाते आणि तो कोण आपल्याला कधी काम सांगतो, याचीच वाट बघायला लागतो. असाच महिना उलटल्यानंतर, नंदू त्याच्या कामांच्या यादीतल्या सर्व मोबदल्याची बेरीज करतो आणि ती यादी, आईला दिसेल अशी, साखरेच्या डब्यात ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी चहा करताना आईला ती यादी सापडते. घर कामासाठी केलेल्या मदतीचा, नंदूला मोबदला हवा आहे, हे समजल्यावर तिला वाईट वाटते. पण नंदूला न दुखवता त्याला मदतीचे महत्व समजावून द्यायला पाहिजे म्हणून ती एक युक्ती करते. नंदूप्रमाणे तीही एका कागदावर नंदूसारखीच यादी बनविते. त्यात लिहिलेले असते “नंदूची लहानपणापासून सर्व आजारपणे केली, शून्य रुपये ! नंदूला रोज शाळेसाठी डबा बनवून देते, शून्य रुपये ! बाबा नंदूला रोज शाळेत सोडतो, शून्य रुपये !, आजी नंदूला रोज गोष्ट सांगते, शून्य रुपये !”. आईने केलेली ही लांबलचक यादी, ती नंदूला दिसेल अशी त्याच्या दप्तरात ठेवून देते. नंदू जेव्हा गृहपाठ करायला दप्तर उघडतो तेव्हा त्याला ती यादी मिळते आणि ती वाचल्यानंतर  नंदूला जाणीव होते की ‘आई आणि घरातील प्रत्येकजण, खरोखरच आपल्यासाठी किती काम करतात आणि त्याचा तर काहीसुद्धा मोबदला घेत नाहीत. असे असूनसुद्धा ती सगळी आपल्यावर किती प्रेम करतात’. तो धावत जाऊन आईला मिठी मारतो आणि म्हणतो “आई, मला समजले !! कुठ्ल्याही मदतीचा मोबदला पैशात होऊ शकत नाही !! तुम्ही सगळेचजण माझ्यासाठी खरे म्हणजे किती किती करता!! त्याचा मोबदला मी असा पैशात करायला नको हवा होता !”  नंदूला आपली चूक उमगली याचे आईला समाधान वाटते आणि ती नंदूला जवळ घेते.

समजले का बालदोस्तांनो? घरकामात केलेली मदत किंवा कुणाला अडचणीत केलेली मदत याचा मोबदला पैशात कधीच होऊ शकत नाही. प्रेम, करूणा, दयाभावना हे पैशापेक्षा कितीतरी मोठे सद्गुण आहेत !! पैशाचे जीवनात महत्त्व तर आहेच पण ते केव्हा आणि किती द्यायचे हे ठरविता आले पाहिजे. प्रेमाचा मोबदला पैशात होऊ शकत नाही आणि पैशासंबंधी निर्णय हे कोणत्याही भावनेपोटी घ्यायचे नाहीत हाच काय तो “अर्था”चा अर्थ !! आणि हेच आजच्या मनोमनी लेखाचे फलित !!  भेटूच पुन्हा !! तुमची रूपालीताई.

मनो Money: भाग ४ :थेंबे थेंबे  तळे साचे. 


बालदोस्तांनो Hi  !! आतापर्यंत , मनो Money च्या सदरातून, आपण पॉकेटमनी चे SMART प्लांनिंग , चक्रवाढ व्याजाचा महिमा आणि "Sooner The Better " या संकल्पनांना, धनसंचया संदर्भात कसे वापरावे , ते  पहिले.     यावेळी  मी तुम्हाला , "थेंबे थेंबे  तळे साचे " हा  फॉर्म्युला, धनाच्यासंबंधात कसे काम करतो , ते समजावून सांगणार  आहे !!

   हा  फॉर्म्युला झटपट समजावून घेण्यासाठी मी तुम्हाला छोटू ची गोष्ट सांगते. नोकरी करणारे आई वडील  आणि कॉलेजात जाणारा दादा अशा    चौकोनी कुटुंबात , आपला हा शाळकरी छोटू रहात असतो. छोटू बिल्डिंगमधल्या भार्गव काकांच्या अधिक जवळ असतो. काका त्याला बऱ्याच छान छान गोष्टी सांगायचे, शिकवायचे. एकदा हा छोटू भार्गवकाकांना , आपल्या दादाच्या मित्रमंडळींची कशी धमाल चालते ते सांगतो. पॉकेटमनी मिळाल्यावर दादा , मॉल मध्ये खरेदी करतो , सिनेमाला  जातो  आणि मोबाईल आदी गॅझेट्स मध्ये सतत पैसे संपवून तर टाकतोच  शिवाय महिनाभर पैसे लागले की माझ्या पॉकेटमनीतून मागतो  अशी छोटूची तक्रार असते. तेव्हा काका त्याला सांगतात "आवश्यकता नसताना केलेली खरेदी म्हणजे पैशांचा अपव्यय  !! असेच सुरु राहिले , तर मग आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याकडे पैसेच शिल्लक रहात नाही, तेव्हा थोडी थोडी बचत करत रहाणे केव्हाही चांगले. पैसे खर्च करून मजा जरूर करावी परंतु आपल्या भावी गरजा लक्षात ठेवूनच !! ".  छोटूला काकांचे म्हणणे पटते.  तो दर महिन्याच्या पॉकेट्मनीतून, नियमितपणे थोडी फार बचत करू लागतो . लहानशी रक्कम असली तरीही !! शेवटी अशा लहान-सहान बचती मधून आणि तीवर  जादू करणाऱ्या चक्रवाढ  व्याजाच्या किमयेमुळे छोटुकडे इतके पैसे जमतात , की  एकदा  कुटुंबाकरिता लागणाऱ्या मोठ्या खर्चासाठी , छोटूही मदत देऊ करतो.  दर महिन्याचा खर्चाचा समतोल सांभाळण्यात दमछाक अनुभवणारे आई-बाबा आणि दादा ही , अशा अनपेक्षित मिळालेल्या आधाराने  आश्चर्यचकीत होतात आणि सुखावतात   !!  छोटूला मिळते शाबासकी तर दादा ला मिळतो छानसा धडा !!
      दोस्तांनो, आपणही बरेचदा छोटूच्या दादासारखे वागतो  का, याचा  जरा विचार करता का ? गरज नसताना आपण कितीदा खरेदी करतो !! जवळ असणारी रक्कम इतकी लहान आहे की "त्यात काय खर्च केले तर " अशी  "चलता हे " धारणा आपण बनवून टाकली आहे. इथेच तर खरा प्रॉब्लेम आहे! रक्कम लहान असो व मोठी , पैशाचे मूल्य तर असतेच ना. मग अनावश्यक बाबींच्या खरेदीमध्ये ते मूल्य का दवडावे? एक एक थेंब जमा होऊन जसे मोठे, चवदार तळे बनते तसेच तुमच्या जवळ असणारी कमी-अधिक शिल्लक बचत करून तुम्ही तूमच्या गरजा भागविण्यास शिकले पाहिजे. छोटूच्या गोष्टीतून आपल्याला अजून एक धडा मिळतो तो म्हणजे बचतीमधील शिस्तीचा भाग. छोटूने नियमितपणे बचत चालू ठेवली. आपणही बरेचदा काही चांगल्या गोष्टी, संकल्प ठरवितो पण  त्यात धरसोड वृत्ती मध्ये येते. अशाने आपलेच नुकसान होते. आपले आर्थिक ध्येय ठरवून आपण बचतेमध्ये सातत्य ठेवले तर ध्येय निश्चितच साध्य होईल आणि तेही लवकर !! तेव्हा "थेंबे थेंबे  तळे साचे " हा  फॉर्म्युला किती उपयुक्त ठरतो ते समजले ना ? ध्येय आर्थिक असो वा इतर कुठलेही ,  "Be  Steady,  To Win  The  Race ". करायची का मग नवी सुरुवात ? माझ्याकडून तुम्हाला  ध्येय प्राप्तीसाठी, खूप खूप शुभेच्छा !!Thursday, January 24, 2019


Events @ SWS, Muktangan : Dec 2018


१ डिसेम्बर २०१८: SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नासिक आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने "वयम वाचक कट्टा" हा उपक्रम सुरु करण्यात आला. नासिक मधील बहुश्रुत  मनोचिकित्सक, श्री. शंतनु गुणे या वेळी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.  "बालवयात तसेच किशोरवयीन काळात वाचनाचे महत्व" या विषयावर उपस्थितांशी  त्यांनी संवाद साधला. आपले वैयक्तिक वाचन अनुभव, त्यामुळे बहरलेली अभिव्यक्ती यावर त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या.  आनंद निकेतन या नाशिकस्थित शाळेतील, "बहुरंगी बहर" ची उपविजेती ठरलेल्या कु. आभा गोकर्ण हिचा सत्कार यावेळी गुणे सरांच्या हस्ते करण्यात आला. 8 Dec 2018: Conduction of "Wealth Creation" session by Mr. R. P. Adhikari at Mai Lele Shravan Vikas Vidyalaya, Nasik.9 Dec 2018: Team SWS Strives for skill up-gradation to provide excellency in its services to the clients. The team completed full day workshop on "Advanced MS-Excel". The training was conducted by a Microsoft Certified Trainer Mr. Ashok Sindkar. 
१५ डिसेम्बर  २०१८: मुक्तांगण येथे  "वयम  वाचक कट्टा"  पुष्प दुसरे !! विशेष अतिथी : सौ. नीलिमा कुलकर्णी . बालवाचकांनी वाचन आणि भाषिक-गणिती खेळांचा आनंद घेतला.    १६ डिसेम्बर २०१८ :पवार तबला अकादमी,नाशिक आयोजित आणि एस.डब्ल्यू.एस.फा.सोल्युशन्स प्रा.लि.प्रस्तुत पं. भानुदास पवार स्मृती समारोह १६ डिसेम्बर २०१८ रोजी प.सा. नाट्यगृह येथे संपन्न झाला. या संगीत समारोहाचे हे २१ वे वर्ष होते. ग्यानसिंग नामधारी (लुधियाना) आणि सावनी तळवलकर-गाडगीळ(पुणे)  या प्रतिभासंपन्न आणि लोकप्रिय कलाकारांचे सादरीकरण हे यंदाच्या समारोहाचे वैशिष्ट्य होते . 


20-23 December 2018: SWS and Wayam Stall were showcased during Ankur Film Festival, Nasik.27 Dec 2018: Conduction of "Wealth Creation" session by Mr. R. P. Adhikari at Jankalyan Blood Bank, Nasik.२८ डिसेम्बर २०१८ : अशी अनेक मुले आहेत, जी वाचत नाहीत, कारण चांगले साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या परिचयात अशा अनेक शाळा किंवा संस्था असतील, जेथील मुले चांगल्या साहित्यापासून वंचित रहात रहातात . अशा "वाचन-वंचित" मुलांपर्यंतही चांगले, सकस, दर्जेदार साहित्य का पोहोचू नये, असा विचार करून  “विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प , पिंपळद , तालुका त्रिंबकेश्वर , जिल्हा नासिक” येथे SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नासिक आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने "वयम वाचक  कट्टा" हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  ह्या केंद्रामध्ये,  त्रिंबकेश्वर तालुक्याच्या आसपासच्या शाळांमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींचे वसतिगृह आहे.  दिनांक २८ डिसेम्बर २०१८ रोजी ह्या वाचन कट्ट्याचे उदघाटन झाले.   
अशा प्रकारे, डिसेम्बर २०१८ मध्ये ,  व्यवसायाबरोबरच सांगितीक , साहित्यिक आणि सामाजिक क्ष्रेत्रात SWS आणि मुक्तांगण यांनी  योगदान दिले !!  

Thursday, December 27, 2018


फ्री-ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म की आर्थिक सल्लागाररुपाली कुलकर्णी 
Be Smart ! Choose Smartly !!


आजकाल सगळ्या  "स्मार्ट" गोष्टींची  चलती आहे  !! म्हणजे स्मार्टफोन , स्मार्टकार , स्मार्टस्पीकर वगैरे .म्हणजेच  इंटरनेटचा  वापर करून, आपले दैनंदिन काम सोपे करणाऱ्या गोष्टी !! मग आजकालची ही स्मार्ट पिढी , स्मार्ट गुंतवणुकीकडे  नाही वळली  तरच नवल !! स्मार्ट गुंतवणुक म्हणजे ऑनलाइन गुंतवणुक प्लॅटफॉर्मचा  वापर करून, तिथून मिळालेल्या (स्मार्ट??) सल्ल्यानुसार आपली गुंतवणुक करणे.  असा सल्ला देणाऱ्या अनेकविध फ्री वेबसाईट तसेच फ्री मोबाईल  आप्लिकेशन्स  उपलब्ध आहेत. मग काही जणांना त्यातून असे वाटू शकते की, "हे सगळे इतके सहज, सोपे आणि हातासरशी (की बोटांसरशी) उपलब्ध असताना आर्थिक सल्लागाराची आवश्यकताच  काय ? गुंतवणूकदारांना आर्थिक बाबींवर तज्ञ मार्गदर्शनाची गरज खरंच आहे  का?"  याचबद्दलच जरा मुद्देसूद बोलूयात. माझ्यामते, गुंतवणूकदारांनी  आर्थिक सल्लागाराच्या मदतीविना केलेल्या गुंतवुकीबाबत बरेचदा चुका होऊ शकतात किंबहुना होतातच !
या चर्चेदरम्यान आपण  फ्री ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मला  OIP असे  संबोधूयात. आता खालील मुद्द्यांचा विचार करू.  

१)  सहृदयी मित्र की  यंत्रवत सेवा तुमच्या  आर्थिक सल्लागाराला  तुमच्याविषयी सर्व आर्थिक माहिती असते. तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या. एकूण मिळकत, गरजा, तुमचे दायित्व (कर्जे आणि कर), अडचणी, तुमची स्वप्ने, तुमच्या बचत अथवा गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये  इत्यांदीबाबत, तुमच्या आर्थिक सल्लागाराला संपूर्ण माहिती असते. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे, हुशारीने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचारलेली आवश्यक ती आणि इतर पूरक माहिती, आर्थिक सल्लागाराला विदित असते, त्यामुळे तो तुम्हाला सर्वमावेशक सल्ला देऊ शकतो. तुमच्या आर्थिक उद्दिष्टयाना गवसणी घालण्याचा प्रवासाततुमचा आर्थिक सल्लागार तुमचा एक कौटुंबिक,सहृदय मित्र बनलेला असतो. तुमच्या आर्थिक ध्येयांबाबत तो सतत जागरूक असतो. याउलट  OIP ही एक यंत्रवत सेवा आहे (Mechanical Service ). इथे  तुमच्या आर्थिक तसेच  कौटुंबिक परिस्थिती बद्दल असणारी  "जाणीव", "संवेदनशीलता"  यांचा पुर्णतः आभाव असतो !! तुम्ही निवडलेली  OIP,  केवळ तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला गुंतवणुकीची योजना (Scheme) सुचविते. आर्थिक सल्ला देताना आवश्यक असणारी "सर्वसमावेशकता" याचा कोणताही विचार OIP सेवा करत नसल्या कारणाने, अशी सेवा कोठल्या दर्जाचा सल्ला तुम्हाला देते, हे उघडच आहे !!

२) हेतुशुद्धता की हेतुपुर्वकता? तुमच्या आर्थिक सल्लागाराचा एकमेव हेतू हा तुम्हाला, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबाबत  सर्वसामावेशक असा सल्ला देणे असा सरळ असतो. तुमच्या गरजेनुसार विविध आर्थिक योजनांमधून, तुमच्यासाठी योग्य असणारी आर्थिक योजना किंवा आराखडा तुम्हाला देणे असे आर्थिक सल्लागाराचे काम असते. यात कुठल्याही एकाच योजनेचा (Product or  Scheme)  विचार होत नाही .परंतु बव्हतांशी OIP सेवा मात्र केवळ विशिष्ट आर्थिक योजनांबाबतच सल्ला देताना दिसतात. या अशा योजना असतात ज्यामध्ये  मिळणारे  आकर्षक कमिशन हा  एक, तुम्हाला न दिसणारा अदृश्य घटक असतो. अशा केवळ काही संस्थाना समर्पित असणारी  OIP सेवा , तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची चिंता करत असावी का?

३) प्रक्रिया की प्रासंगिकता ?  "गुंतवणुकीबाबत आर्थिक सल्ला" ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे (Process) केवळ एक प्रासंगिकता (Event) नव्हे.    तुमचा आर्थिक सल्लागार, आर्थिक नियोजनाच्या  संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तुमची सोबत करणारा मार्गदर्शक असतो. बदलते कायदे, नियम, मिळकती, बाजारातील चढ उतार असे आर्थिक मुद्दे असोत किंवा घरातील बदलती परिस्थिती जसे नवीन सदस्याचा घरात प्रवेश किंवा घरातील कोणाचे लग्न, शिक्षण किंवा मृत्यू आदी कारणाने निर्गमन अशा कौटुंबिक बाबी असोत, आर्थिक सल्लागार अशा बदलत्या आयामांनुसार, तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये सक्रियतेने बदल करित असतो (Active Management). आता  OIP चा विचार करू. अशी सेवा वापरून केलेली गुंतवणुक ही एक प्रासंगिकता असते. त्या गुंतणवुक-प्रसंगाशी निगडीत असणाऱ्या आर्थिक बाबी सोडल्या, तर तुमच्याशी निगडीत असणाऱ्या बदललेल्या आर्थिक  किंवा कौटुंबिक बाबी, अशी सेवा लक्षात घेत नाही.  अपुऱ्या किंवा दुर्लक्षित माहितीच्या आधारे दिला जाणारा, असा OIP सल्ला कितपत योग्य असेल? हे  तर तुमच्या आर्थिक नियोजनाचे  "प्रासंगिकीकरण " (Passive Management) झाले.                       

४) माहितीची गोपनीयता की हस्तांतरण ?  एक विश्वासाहार्य आर्थिक सल्लागार, तुमच्या बाबतीतली सर्व आर्थिक,कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली माहिती त्याच्याच पुरती मर्यादित ठेवीत असतो. यात तुमची एकमेकांप्रती असलेली निष्ठा आणि संवेदना (Sensitivity) यांची भावनिक जोड कारणीभूत आहे. परंतु   OIP सेवेमार्फत केलेल्या गुंतवणुकीच्या गोपनीयतेचे काय ? अशा सेवेला तुम्ही पुरवलेली माहिती, ही  केवळ त्याच  सेवेपुरती वापरली जाते (Data Privacy) आणि इतर कोणालाही  ती पुरविली जात नाही असे तुम्ही ठामपणे म्हणू शकता का ? किंबहुना अशी  माहिती पुरविल्यानंतर तुम्हाला, इतर तत्सम  उत्पादनांबाबत अनेक जाहिरातपर (Promotional)  इमेल्स, मेसेज येणे सुरु होते.म्हणजेच तुम्ही  OIP सेवेला पुरविलेली माहिती ही इतर अनेक संस्थाना पुरवली जात असण्याची शक्यता असते. तुम्हाला तुमच्याच अशा खाजगी माहितीचे हस्तांतरण होणे आवडेल का ?                                  

५) आराखड्यावर काम की प्रलोभने ? तुमच्याशी सर्व बाबतीत चर्चा करून, योग्य असा आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करणे (Financial Plan)  आणि शिस्तबद्धरीत्या (Disciplined Active Management) तो अंमलात आणणे (Execution) , हे तुमच्या आर्थिक सल्लागाराचे काम आहे. यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची आमिषे दाखविणे, सवलती देणे अशा संबंध नसलेल्या कोठल्याही कृतीचा समावेश कधीच केला जात नाही. परंतु  OIP सेवेबाबत हे ठामपणे लागू होत नाही. अमुक एक आर्थिक योजना घेतली तर तमुक एका योजनेत सवलत (Discount) , एखादे सवलत कुपन, जोड योजना इ. आमिषे दाखवून तुम्हाला आर्थिक योजना पुरविणारी अशी   OIP सेवा, आर्थिक नियोजनाशी निगडीत नसणारे असे  सगळे उद्योग का करीत असावी ? त्यात त्यांचा काही वैयक्तिक  फायदा असल्याशिवाय अशा अनावश्यक सुविधा पुरविणारी  OIP सेवा कितपत विश्वासाहार्य वाटते ?       

वरील सर्व मुद्द्यांचा उहापोह झाल्यावर, या स्मार्ट गेझेटच्या युगातही , तज्ञ् , आर्थिक सल्लागाराची भूमिका  ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म करूच शकत नाहीत हे आपल्या लक्षात आलेच असेल. शेवटी पैसा हा भावनेशी निगडीत असतो म्हणूनच आर्थिक सल्लागार खरे पाहता तुमची पैशां मागची Emotional Management  च करीत असतो.  आणि म्हणूनच हे करण्याकरिता भावना जाणणारा, जपणारा "माणूस" तेथे आवश्यक असतो. त्याची जागा कोणतेही यंत्र अथवा यांत्रिक सेवा घेऊच शकत नाहीत.

   - रुपाली कुलकर्णी 
     SWSFSPL