Showing posts with label रुजवात आर्थिक साक्षरतेची. Show all posts
Showing posts with label रुजवात आर्थिक साक्षरतेची. Show all posts

Friday, April 30, 2021

कोविड आणि आर्थिक व्यवहार



 कोविड आणि आर्थिक  व्यवहार


मागचा lockdown आपण कसे कपडे धुतो, भांडी घासतो, चारी ठाव वेगेवेगळे पदार्थ करतो आणि फेसबुकवर लाईव्ह येतो हे दाखवण्यात गेला आहे. सध्या यावर भागणार तर नाहीच पण आपल्याला स्वतःला कुठल्याही प्रसंगासाठी तयार ठेवावं लागणार आहे.  आपण सगळेच अस्थिर वातावरणातून जात आहोत. घरच्या घर covid पॉझिटिव्ह निघतंय, एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीसाठी हॉस्पिटल शोधावं लागतंय, बेड मिळत नाहीय, औषधे कमी पडतायत अशा नाना अडचणी समोर उभ्या ठाकतात आणि गांगरून जायला होतं. नात्यातल्या व्यक्ती, शेजार-पाजार, मित्र-मैत्रिणी सगळीकडेच ही परिस्थिती असल्यामुळे ऐनवेळी मदतीचे हात लगेच पोचू शकत नाहीत. कितीही शांत राहायचं ठरवलं तरी जवळची व्यक्ती अशा अवस्थेत बघून पॅनिक मोडमध्ये जायला होतं. विशेष करून घरातला कर्ता, कमावता हात असेल आणि बाकीच्यांना व्यवहाराची फार माहिती नसेल तर आणखीनच (इथे कर्ता बाई/ पुरुष/दोघे हा मुद्दा गौण आहे).  या सगळ्यात एका गोष्टीसाठी फार धावपळ होते आणि गोंधळून जायला होतं ते म्हणजे कागदपत्र आणि बँकेचे व्यवहार.


बऱ्याच वेळा बायकांना आर्थिक व्यवहार माहिती नसतात किंवा अर्धवट माहिती असते पण कंट्रोल नवर्याकडे असतो. 'आमचे हे सगळं बघतात', 'हा'च करतो अगं सगळं, माझ्यावर वेळच आली नाही कधी', 'मला त्यातलं काही कळत नाही, देव काय ते बघून घेईल' या आणि अशा excuses अगदी शिकल्या सवरल्या, उच्चशिक्षित बायकांच्या बाबतीत सुद्धा ऐकलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी बायकोला इच्छा असते पण नवरेच 'तू कशाला, मी बघतोय सगळं', 'तुला काही कळणार नाही' असे शिक्के मारून स्वतःकडे कंट्रोल ठेवतात आणि बायकाही ऐकून घेतात. असेच,  नवऱ्यांच्या बाबतीत सांगायचे तर घरातले बेसिक सामान आणणे, मदतनिसांना मॅनेज करणे आणि एकूणच  किचन मॅनेजमेंटच्या बाबतीत अनभिज्ञता /आळशीपणा असू शकतो. अर्थात, याला अपवाद सापडतील, पण सद्य परिस्थितीत दोघानाही रोल रिव्हर्सल जमायला हवे आणि 'कमी तिथे आम्ही' अशी भूमिका घेऊन जबाबदारी खंबीरपणे पेलता यायलाच हवी; हे खरे.  त्या दृष्टीने आधीच काही तयारी करून ठेवली तर? 


हे काही पॉइंटर्स -


१. नवरा-बायको दोघांनीही आपसात ठरवून मोबाईल बँकिंग पिन, नेट बँकिंग पिन/ पासवर्ड, एकमेकांच्या फोनला फिंगर प्रिंट ऍक्सेस या गोष्टी शेयर कराव्यात. जेणेकरून हॉस्पिटल किंवा टेस्ट्स, बाकी खर्च करणे दुसऱ्याला सोपे जाईल. इथे प्रायव्हसी हा इतर वेळी अतिजास्त अधोरेखित केलेला मुद्दा आणू नये, फिंगर प्रिंट रजिस्टर केले म्हणजे लगेच एकमेकांचे फोन चेक करून पाळतच ठेवली जाणार असा अर्थ होत नाही. ह्याला क्रायसिस मॅनेजमेंटसाठीची पूर्वतयारी म्हणतात. 


२. हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ आल्यास आणि मोठी रकम उभारायची वेळ आल्यास कुठले फिक्स्ड डिपॉझिट मोडावे, कुठले सेविंग्स खाते प्रामुख्याने वापरावे याबाबत एकमत करून घ्यावे. जे खाते ठरले असेल त्याचे २ ते ३ चेक्स आधीच सही करून ठेवावे. तसेच म्युच्यअल फंड मोडावा लागला / शेयर्स विकावे लागले तर कुठले, काय  हे आपल्या advisor शी बोलून त्याचे लेटेस्ट स्टेटमेंट काढून ठेवावे, डिलिव्हरी स्लिप्स सही करून ठेवाव्यात. यावरून नंतर वाद झालेले बघितले आहेत.  ऍडमिट असलेल्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती स्वतःची तब्येत, इतरांचे स्वास्थ्य सांभाळून धावपळ करणार आहे, तिचा विचार इथे होणे अभिप्रेत आहे.


३. एका फाईलमध्ये सगळ्या कुटुंबियांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, फोटो, चालू असलेली औषधे लिहिलेला कागद, नुकत्याच केलेल्या टेस्ट्स असतील तर त्याचे स्कॅन / रिपोर्ट्स, साधारण हिस्ट्री, फॅमिली डॉक्टर, स्पेशालिस्ट यांचे कॉन्टॅक्ट नंबर, मेडिक्लेम पॉलिसीज हे लिहून/ लावून  ठेवावे. 


४. एका एक्सेल फाईलमध्ये आवश्यक बिले - प्रॉपर्टी टॅक्स, वीजबिल, फोनबिल, गॅस नोंदणी, घराचे हफ्ते, भाजी/किराणा/लॉंड्री, मेडिकल, पेपर, दूध, सुतार, प्लम्बर, इतर मशीन रिपेअर, ओटीटी सब्स्क्रिप्शन, वगैरे साठीचे कॉन्टॅक्ट लिस्ट करून ती फाईल दोघांनाही मिळेल अशा ठिकाणी ठेवावी किंवा सरळ प्रिंट काढून वरच्या फाईलमध्ये लावावी. 


५. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिथे जॉईंट अकॉउंट नाही, तिथे जॉईंट करून घ्यावे किंवा किमानपक्षी नॉमिनेशन तरी करावे. आजकाल सगळे व्यवहार डिजिटल असतात त्यामुळे चेकबुक, (असल्यास) पासबुक कुठे ठेवले आहे ऐनवेळी आठवत नाही. नेमकं बँकेचे पोर्टल डाउन असते. त्यामुळे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग बरोबरच, चेकबुक, पासबुक वगैरे गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. 


६. घरातल्या टीनएजर मुलांशी सुद्धा काही प्रमाणात आर्थिक बाबी माहिती असणे, हॉस्पिटलला जावे लागल्यास त्याला/तिला  घरी काय बघावे लागेल याबाबत चर्चा करावी. मुले अतिशय उत्तमरीत्या जबाबदारी सांभाळतात, त्यांच्यावर विश्वास दाखवावा. अगदी १०-११ वर्षाच्या मुलाला सुद्धा घरात अशी परिस्थिती आहे  तर आज आपण कपडे घडी करू, भांडी लावू आणि कामाला हातभार लावू हे कळते आणि जमते, त्यात गैर काहीच नाही, मुले जितकी स्वयंपूर्ण , स्वावलंबी असतील तितकी कठीण प्रसंगात पटकन उभी राहतील आणि निर्णयक्षम होतात.  


७. आवश्यकता भासत असेल तर 'विल' करणे हा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आता प्रायॉरिटीवर आणायला हरकत नाही, त्या दृष्टीने सगळ्या नोंदी एके ठिकाणी राहतात आणि त्यांचे वाटप आधीच क्लिअर राहते. माझे आहे ते  सगळे तुझेच आहे हा रोमँटिक (??) सेन्स बाजूला ठेवून याचा अतिशय ऑब्जेक्टिव्हली विचार करावा.  आपण गेल्यावर पुढच्याला निदान कागदपत्रांचा कमीत कमी त्रास व्हावा  ही प्राथमिकता आता प्रत्येकाने जपलीच पाहिजे. 


८. पूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह झाल्यास डबे कुठे लावायचे, कुठल्या खोलीत कुणी आयसोलेट व्हायचे, भांडी-कपडे वगैरे कामांची वाटणी कशी असावी याचा एक ढोबळ प्लॅन असावा. दोन्ही वेळा वेगळे जेवण लागते, सकाळचे संध्याकाळी नको, अमुकच भाजी तमुकच प्रकाराने लागते हे करायला कोरोना काळात आपण 'ग्रेट इंडियन किचन' नाही, हे लक्षात ठेवायचे आहे. :)


९. ही अतिशयोक्ती  वाटेल, परंतु अजूनही काही लोकांना डिजिटल व्यवहार सुरक्षित वाटत नाहीत आणि त्यामुळे बव्हंशी फिजिकल व्यवहारांवर भर दिला जातो. आता बाहेर कमीत कमी पडायचे आहे, जीव वाचवायचा आहे तर डिजिटल साक्षरता फार फार महत्वाची आहे. गुगल पे/ पेटीएम/ भीम यु पी आय वापरता येणे, ऑनलाइन फंड ट्रान्स्फर जमणे, बिले ऑनलाईन भरता येणे, कॅब बुकिंग, फूड किंवा पार्सल डिलिव्हरी ऍप्स , ग्रोसरी ऍप्स  हे सगळे नीट जमणे अत्यावश्यक झाले आहे.त्यादृष्टीने स्वतःला अपडेट ठेवलेच पाहिजे. 


१०. हे सगळे आधी बोलून, चर्चा करून ठरले असेल तरी आयत्यावेळी काही घोळ, गडबड, उशीर होणार आहेच. हे गृहीत धरून चालायचे आहे. आपण माणूस आहोत आणि आपल्याला सगळे सदासर्वदा आलेच पाहिजे असे नाही. परंतु आपण आधी तयारी केलेली असेल तर आपण स्वतःला आणि जवळच्या व्यक्तींना यातून निभावून नेणार आहोत, हा आत्मविश्वास नक्की येतो ! 🌷

काळजी घ्या आणि सुरक्षित राहा !! 🙏


(संग्रहित  लेख,

स्रोत: अज्ञात  )

Friday, March 19, 2021

मनो-Money: भाग २७ : काय असतो डिमांड ड्राफ्ट? ?डॉ. रुपाली कुलकर्णी

 


राधा बाबांकडे एक फॉर्म घेऊन येते.

राधा: बाबा, मला गणित परीक्षेचा फॉर्म आणि त्यासाठी  फी भरायची आहे. ती डिमांड ड्राफ्टद्वारे, विद्यापीठात भरायला सांगितली आहे.  बाबा, तुम्ही मला चेकविषयी मागे एकदा  माहिती दिली होती.  पण हे डिमांड ड्राफ्ट काय असते?

बाबा: सांगतो राधा ! डिमांड ड्राफ्ट हा एक चेक सारखाच दिसणारा परंतु पैसे भरण्याचा अधिक सुरक्षित मार्ग आहे.  हा जुना मार्ग आजकालच्या  ऑनलाईन पेमेंटच्या  जमान्यातही  बऱ्यापैकी वापरला जातो. 

राधा: बाबा, मग चेक आणि डिमांड ड्राफ्ट मध्ये फरक तो काय?

बाबा: सांगतो.  समजा तुला विद्यापीठामध्ये १००० रु. इतकी  फी भरायची आहे तर तू तुझ्या बँकेत जाऊन तिथे डिमांड ड्राफ्ट फॉर्म मागायचा आणि तो भरायचा, या फॉर्ममध्ये विद्यापीठाच्या अकाउंटचे डिटेल्स भरायचे असतात ज्यांना तुला १००० रु. फी भरायची आहे तसेच तिथे तुझ्या बँक अकाउंट डिटेल्स ही भरायच्या असतात जिथून हा डिमांड ड्राफ्ट प्रोसेस केला जाणार आहे.  मग तू तुझ्या बँक अकाउंट मध्ये रोख १००० रु. किंवा त्याच रकमेचा चेक द्यायचास.   आणि मग काही वेळात बँक तुला विद्यापीठाच्या नावाने डिमांड ड्राफ्ट प्रिंट करून देते. 

राधा: बाबापण मग हा मार्ग चेक पेक्षा सुरक्षित कसा काय ?

बाबा: अगं मी तुला मागच्या वेळेस चेक बाउन्स होण्याविषयी सांगितले होते.  समजा तुझ्या अकाउंटला १००० रु. नाहीत आणि तू विद्यापीठाला १००० रु.चा चेक दिला तर विद्यापीठाला ते पैसे  मिळणार कसेम्हणून डिमांड ड्राफ्ट, जिथे आधी पैसे-भरणा  बँकेमध्ये केला जातो  तिथे ही बाउंस होण्याची भीती नाही ना?

राधा: समजले बाबा ! मग मी हा डिमांड ड्राफ्ट विद्यापीठात जाऊन भरायचा का ?

बाबा: हो.  राधा, विद्यापीठात जेव्हा तू परीक्षेचा फॉर्म भरशील तेव्हा त्याला जोडून हा डिमांड तिथे  द्यायचा आहे.  याचा अजून एक फायदा आहे.  डिमांड ड्राफ्ट वापरामुळे प्रवासात अधिक रोख रक्कम जवळ बाळगण्याची आणि आणि ती चोरीला जाऊ नये म्हणून सतत काळजी  करित राहण्याची गरज नाही.  कारण तुमच्याजवळ तितक्याच रकमेचा डिमांड ड्राफ्ट असतो ना !

राधा: पण बाबाहा डिमांड ड्राफ्टच  चोरीला गेला तर?

बाबा: छान प्रश्न विचारलास ! अगं सरकारच्या नवीन नियमानुसार डिमांड ड्राफ्ट काढणाऱ्या व्यक्तीचे नावही डिमांड ड्राफ्ट वरती प्रिंट केलेले असते त्यामुळे विद्यापीठ कोणाकडूनही  फी स्वीकारत आहे याची शहानिशा तिथे होईलच ना !  शिवाय असे झाल्यास  तू तुझ्या बँकेत जाऊन तो डिमांड ड्राफ्ट कॅन्सल करण्यासाठी विनंती करू शकते.  डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी तसेच कॅन्सल करण्यासाठी बँक तुमच्याकडून काही शुल्क आकारत असते.

राधा: समजले बाबा.  म्हणजे डिमांड ड्राफ्ट चे फायदे हे अधिक सुरक्षित पेमेंट करण्यासाठी आहे तर.

बाबा: हो.  आजकाल ऑनलाईन पेमेंट आणि तत्काळ प्रोसेसिंगचा जमाना आहे.  परंतु त्यातील सायबर फ्राड्स लक्षात घेता डिमांड ड्राफ्ट आजही वापरात आहे.  परगावातील विद्यार्थ्यांना प्रवास करताना जवळ रोख रक्कम बाळगण्याची गरजही नाही तसेच यात चेक बाउन्स सारखी भितीही नाही त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित समजला जातो आणि आजही वापरात आहे. 

राधा: समजले बाबा ! चला ना माझ्याबरोबरआपण बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट काढूयात.

बाबा: ओके राधाताई.  मात्र सगळी प्रोसेस आता तूच करायचीस.  मी फक्त तुला मदत करण्यासाठी येत आहे. 

राधा: चालेल बाबा !!

 

 दोघेही  बँकेत जाण्यासाठी निघतात. 


Friday, March 5, 2021

मनो-Money: भाग २६ : सुकन्येसाठी समृद्धी ! -डॉ. रुपाली कुलकर्णी

 सुकन्येसाठी  समृद्धी  ! 


आई आणि राधा गप्पा मारित असतांना , आईला राधाची मैत्रीण सारा हिचा फोन येतो. फोन संपल्यावर आई आणि राधाचा संवाद सुरु होतो.

आई: राधा, काल आजारपणामुळे शाळेत दांडी झाली आणि शाळेत दिलेल्या एका व्याख्यानाला तू चुकविलेस.

राधा: कसले ग व्याख्यान आई?

आई: अगं काल  शाळेत 'सुकन्या समृद्धी' योजनेची माहिती दिली आणि त्याचे माहितीपत्रक पालकांच्या वाचनासाठी घरी दिलेला आहे.

राधा: आई, नावावरून तरी ही योजना मुलींसाठी आहे असे वाटतेय. काय आहे ही योजना आई ?

आई: अगं, भारताच्या काही भागांमध्ये मुलींना शिकविण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच त्यांचे लग्नही लवकरच लावून देतात. यामुळे एका साक्षर, समृद्ध, सुखी जीवनास मुली पारख्या होतात. या सगळया बाबींवर रोख लागावी यासाठी  आपल्या केंद्र सरकारतर्फे 'सुकन्या समृद्धी' योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. 'मुलगी वाचावा , मुलगी शिकवा' हे या योजनेचे घोषवाक्य आहे !

राधा: पण आई, असे काय आहे या योजनेमध्ये ज्याद्वारे  मुलींच्या शिक्षणासाठी उपयोग होतो आहे?

आई: या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा  पोस्ट ऑफिसात 'सुकन्या समृद्धी ' खाते उघडता येते. यात किमान २५० रु.  ठेवावे लागतात . एका आर्थिक वर्षात या खात्यात जास्तीत जास्त  १.५ लाख रु.  जमा करता  येतात  आणि  खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करावयाचे असल्यास यात  जी मुदत आधी असेल, तेव्हा  व्याजासह आपली जमा रक्कम  परत मिळते अशा खात्यांना ८.६% इतका व्याजदर उपलब्ध असल्याने मुलींच्या पालकांना ही  योजना  आकर्षित करते आहे.

राधा: आई, म्हणजे साधारण बचत खात्यांपेक्षा हा व्याजदर जवळपास दुप्पट आहे तर !

आई: हो बरोबर !  शिवाय  मुलीच्या  १८ वर्षे  वयानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची  मुभा असते. यामुळे मुलीच्या उच्च शिक्षणावेळी योग्य अशी रक्कम पालकांच्या हाती उपलब्ध असते.

राधा: अरे, हे तर भारी आहे आई ! यामुळे 'बेटी पढाओ' हे घोषवाक्य सार्थ ठरते तर !

आई: या योजनेकडे, मुलींच्या पालकांनी वळावे यासाठी सरकार त्यांना, दरवर्षी दीड लाखांपर्यन्तच्या जमा-रक्कमेस आयकरातून सूट देते तसेच यातील रक्कमेवर मिळणारे व्याजही करमुक्त असते !        

राधा: पण आई, एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक मुली असल्या तर ?

आई (हसून) : अरे वा, भारीच प्रश्न विचारलास की राधा. एकापेक्षा अधिक मुली असल्यास जास्तीत जास्त दोन आणि जुळ्या मुलींच्या बाबतीत जास्तीत जास्त तीन     'सुकन्या समृद्धी ' खाती, एका कुटुंबाद्वारे उघडता येऊ शकतात.

राधा: आई, माझेआहे का ग असे  'सुकन्या समृद्धी ' खाते ?

आई (हसून) : राधा, नो चिंता ! मी आणि बाबांनी तुझ्यासाठी ही योजना घेऊन ठेवली आहे बरे ! हेच मी आता साराला सांगितले फोनवर ! तुही उद्या शाळेत जाशील तेव्हा सांग ताईंना ही माहिती !

राधा: चला ! तुमच्यामुळे या सुकन्येच्या उच्च शिक्षणाची सोय झालीय तर !

आई: हो का ! चला मग मदतीला किचन मध्ये !

राधा आणि आई पुन्हा आपापल्या कामास लागतात.         

-   डॉ. रुपाली कुलकर्णी,

-    ट्रेनिंग हेड

-   SWS Financial Solutions Pvt. Ltd.



 

Friday, January 15, 2021

मनो-Money: भाग २३ : All Eggs in One Basket ? -डॉ. रुपाली कुलकर्णी

 

 


All Eggs in One Basket ?

आज बाबा आणि प्रसाद काका गप्पा मारत असतानाराधा तिथे येते आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील होते. 

 

राधा: बाबापक्षी आपली सगळी अंडी एकाच घरट्यात घालतातबरोबर ?

बाबा: हो ! तर मग ??

राधा: मग  तुम्ही तर आताच प्रसाद काकाला "Never Put  All Eggs in One Basket" असे का म्हणालात ?

प्रसाद काका (हसून): अरे राधाबाईतुमचे फारच लक्ष आहे आमच्या गप्पांमध्ये ! ठीक आहेकाही हरकत नाही. अगमी तुझ्या बाबांशी जरा आर्थिक विषयांवर सल्ला मसलत करत होतो. त्या संदर्भातच बाबांनी हे वाक्य म्हंटले बर का ! पक्ष्यांच्या अंड्यांशी त्याचा काही संबंध नाहीय.

राधा: मग  ठीक आहे काका ! कारण ऐकतांना मला ते 'असे कसे काय ?' हा प्रश्न पडला ! 

बाबा: प्रसादआता राधाची शंका जरा दूर करूयात. राधाआपल्या संपत्तीचे आर्थिक नियोजन करित असताना आपला उद्देश हा 'पैसे सुरक्षितरित्या वाढविणेअसा असतो. बरोबर?

राधा: येस्स बाबा ! त्यासाठी उपयुक्त असणाऱ्याबऱ्याच वेगवेगळ्या पर्यायांविषयी आपण  आधी बोललो आहोत.  

बाबा: करेक्ट !  आपण आपले पैसेवेगवगेळ्या गुंतवणुक माध्यमांद्वारे गुंतवितो कारण त्या मागील आपले उद्दिष्ट्ये वेगवेगळी असतात. जसेकुठल्याही इमर्जन्सीसाठी लागणारी रक्कम आपण बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतो,  जी रक्कम आपल्याला दीर्घकाळासाठी लागणार नाहीय अशी रक्कम काहीजण मुदत ठेवीमध्ये ठेवतात तर काही जण म्युच्युअल फंडांमध्ये ठेवतात.  आणि ज्यांना शेअर बाजाराचे ज्ञान आहे असे लोक त्याही पर्यायाचा अवलंब करित असतात.

प्रसाद काका: आणि तुझ्या प्रसाद काकासारखे काही जण रिअल इस्टेट म्हणजे जमीन/जागा यामध्येही पैसे गुंतवित असतात.

बाबा: राधाया विविध गुंतवणुक माध्यमांमार्फत मिळणारा परतावा म्हणजेच रिटर्न्स हे वेगवेगळे असतात शिवाय प्रत्येक माध्यमाची जोखीम म्हणजेच  रिस्क फॅक्टरही वेगवगेळे असतात. गुंतवणुक करतांना त्यामागे असणारे आर्थिक उद्दिष्ट्यपरतावामुदत आणि जोखीम यांची व्यवस्थित सांगड घालावी लागते. यालाच 'असेट अलोकेशनम्हणजेच 'पैशांची सुयोग्य माध्यमांमध्ये विभागणीअसे म्हणतात.      

प्रसाद काका: आणि हेच तर तुझ्या बाबांसारख्या आर्थिक सल्लागारांचे काम असते. आपल्या संपत्तीचीजर अशी योग्य विभागणी केली नाही तर मात्र आपलयाला अपेक्षित असे रिटर्न्स मिळत नाहीत.

राधा: बाबामग त्याचा "Eggs" शी काय संबंध ?

बाबा: सांगतो ! समजा प्रसाद काकाने त्याच्या जवळचे सर्व पैसे हे जर एकाच गुंतवणुक माध्यमात म्हणजे समजा शेअर बाजारात गुंतविले आणि बाजार अचानक कोसळला तर मात्र काकाचे सर्व पैसे कमी होतील ! मग इमर्जन्सी फंडाचे काय भविष्यातील खर्चांचे  आणि तरतुदीचे काय मग ही रिस्क झाली ना ! म्हणून तर म्हणतात की तुमची सर्व संपत्ती एकाच गुंतवणुक माध्यमात ठेवू नका अर्थात " Never Put  All Eggs in One Basket " !! आता तुला काय समजले ते सांग बरे ?

राधा: ओह येस्स ! समजला अर्थ ! या वाक्याचा अर्थ असा लागतो की  'आपल्या पैशांचे व्यवस्थापन करतांनाआपल्या गरजापरतावाजोखीममुदत या सर्व घटकांचा योग्य विचार करूनत्यानुसार वेगवगेळ्या गुंतणवुक माध्यमांची आपण निवड केली पाहिजे. बरोबर ना  ?

बाबा आणि प्रसाद काका (एकाच वेळी) : व्वा ! एकदम बरोबर !

तिघेही एकमेकांना टाळी देतात !  

डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड, SWS


Thursday, December 10, 2020

मनो-Money: भाग २२:आयुष्यमान भव -डॉ. रुपाली कुलकर्णी

 

आयुष्यमान भव !

आज राधा,  आई आणि घरात काम करणाऱ्या संगिता मावशी यांच्यामधला संवाद ऐकत होती. मावशी गेल्यावर आई आणि  राधा यांच्यात संवाद सुरु होतो.

 राधा: आई, संगिता मावशीना डॉक्टर काकांनी, डोळ्यांचे  ऑपरेशन करायला सांगितले आहे का ग?

आई: हो राधा ! त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू आहे. तर एका महिन्याच्या अंतराने त्यांना दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायला लागणार आहे. म्हणून त्या पैशांची मदत मागत होत्या.

राधा: ओह, अच्छा   ! आई आपण त्यांना मदत करणार का ग मग ?

आई: नक्कीच राधा ! जमेल तेव्हढी करूयात. पण मी त्यांना 'आयुष्यमान भारत योजने'  बद्दलही सांगितले आहे. तेव्हा बघुयात, काय होते.

राधा: आई, बाबांनी मला मागच्यावेळी 'पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना' सांगितली होती. त्यापेक्षा  वेगळे काय आहे यात?

आई: अगं, बाबांनी सांगितलेली योजनेचे नावच बघ ना ! त्यात 'सुरक्षा' हा शब्द येतो ना ? मग आता लक्षात ठेव , की ती योजना अपघाती खर्चाची तरतूद म्हणून  आहे आणि 'सुरक्षा  विमा' म्हणून  काम करते. म्हणजे घरात किंवा बाहेर असताना आपल्याला अपघात होऊन जर काही खर्च आला, अशा खर्चासाठी  या योजनेअंतर्गत  विमा संरक्षण मिळते. परंतु 'आयुष्यमान भारत योजना' ही दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या  व्यक्तींसाठी आहे आणि त्या योजनेअंतर्गत त्यांच्या परिवारास, आजारपणासाठी ५ लाख रू. इतका  स्वास्थ्य-विमा म्हणजेच आरोग्य-खर्च  मिळण्याची तरतूद आहे.

राधा: आई, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे ! अशा सर्वांचाच विचार करणाऱ्या योजनांचे स्वागत करायला हवे.

आई: हो नक्कीच ! एका अहवालानुसार,  आरोग्य सेवा खर्च, अतिशय वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ४० दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते आहे. आणि गरीब जनतेमध्ये  आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे  प्रमाण  खूप जास्त असते. तेच लक्षात घेऊन भारत सरकार तर्फे ही योजना लागू करण्यात आली आहे. देशातील एकूण १३ हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत. त्यामुळे तेथे, योजनेअंतर्गत गरीबांना खासगी रुग्णालयातही चांगले उपचार मिळू शकतात. कचरावेचक,बांधकाम मजूर, घरकाम करणारा कष्टकरी वर्ग,फेरीवाले,भिकारी आदी तत्सम  वर्ग  आणि त्यांचे कुटुंबीय यांना ही सुविधा उपलब्ध आहे. अशा सर्व जनतेसाठी  बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे.

राधा: आई मग यात कुठल्याही आजारपणासाठी लागणारा खर्च मिळू शकतो का ग ?

आई: अगं कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी व  लिवरचे आजार, डायबिटीज यासह  सुमारे १३०० आजारांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. एकूण सुमारे ५० कोटी जनतेचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येणार आहे. 

राधा: आई, पण आता संगिता मावशीना, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल ग ?

आई: अगं, काळजी करून नकोस बेटा !  नागरिकांच्या मदतीसाठी सरकारतर्फे “आयुष्यमान मित्रांचीही” नेमणूक करण्यात येत आहे. तसेच १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मी ही माहिती स्वतः जाणून घेते आणि मग मावशींना मदत करते ! आपण  सुशिक्षित लोकांनी, असे 'आयुष्यमान' मित्रांचे काम करायला काय हरकत आहे ?  मग तर खुष  ?

राधा: आई, मग मला काही काळजी नाही. चल लगेच फोन करूयात. मात्र स्पीकर फोन लाव हं ! मलाही ही माहिती समजावून घ्यायची आहे.

आईला , राधाची मावशींप्रती असणारी तळमळ बघून आनंद वाटतो. त्या दोघी नंतर फोन वरून, योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेतात.

Friday, December 4, 2020

मनो-Money: भाग २१ :चालणारे (??) खाते -डॉ. रुपाली कुलकर्णी

 

चालणारे (??) खाते

राधा हातात एक कागद नाचवत बाबांकडे येते .

राधा: बाबा, आम्हाला शाळेतून हा फॉर्म दिला आहे. आम्हा  स्कॉलरशिप मिळालेल्या सर्व मुलांना बँकेत अकाउंट उघडायला सांगितले आहे.

बाबा: व्वा  ! आता तुझी  घरातील बचत बँक ह्या बँक अकाउंट मध्ये हलवूयात ! तू भरलास  का मग फॉर्म ? बघू मी तपासतो.

राधा: बाबा , मला फॉर्म बराचसा भरता आला. पण हे अकाउंट टाईप म्हणजे  खाते प्रकार काय भरायचा? 'सेव्हिंग अकाउंट' की 'करंट अकाउंट' ? 'सेव्हिंग' ना बाबा?

बाबा: हो . बरोबर. तुझा अकाउंटचा प्रकार  सेव्हिंग्स अकाउंटच असणार आहे. करंट अकाउंट म्हणजेच 'चालू खाते' हे तुम्हा विद्यार्थ्यांसाठी नसते.  

राधा: बाबा, मग कोणासाठी असते हे  करंट अकाउंट? आणि काय फरक आहे त्यात आणि  सेव्हिंग अकाउंट मध्ये?

बाबा: अगं,  सेव्हिंग अकाउंटचे  प्रमुख उद्देश्य हा बचत ठेवणे, त्यावर व्याज मिळविणे आणि बचत वाढविणे असे असतात. म्हणजे नोकरदार वर्ग किंवा पेन्शन मिळविणारा वर्गं किंवा नियमित पैसे मिळविणाऱ्या वर्गास या खात्याचा उपयोग होतो. महिन्यातुन जेव्हा पगार किंवा पेन्शन मिळते तेव्हा एखाद-दोनवेळेस असे खाते वापरात येते. मात्र  करंट अकाउंट हे प्रामुख्याने व्यावसायिक वर्गास उपयुक्त आहे. कारण व्यवसाय करणाऱ्या लोकांचे  दिवसाला अनेक व्यवहार चालू असतात. त्यांच्याकडे  दिवसातून अनेकदा पैसे येत-जात रहातात. तेव्हा त्यांना अनेक वेळा  पैसे भरणा म्हणजेच डिपॉझिट्स आणि पेमेंट करावे लागते. अशा अनेकवेळा होणाऱ्या, अनियमित देवाण-घेवाण व्यवहारांसाठी  करंट अकाउंट वापरले  जाते.

राधा: बाबा, माझी स्कॉलरशिप दर महिन्याला एकदाच मिळणार आहे. शिवाय मी ती लवकर , खात्यातून काढून वापरणार ही नाहीये बरं का ! म्हणजे माझ्या अकाउंटचा प्रकार 'सेव्हिंग अकाउंट' होईल. मला अकाउंट मधील बचतीवर व्याजही मिळेल. पण बाबा , करंट अकाउंटवरील रक्कमेवर व्याज का नाही मिळत? आणि मग व्याज मिळत नसेल तर असे अकाउंट काय कामाचे?

बाबा: चांगला प्रश्न विचारलास बेटा.अगं, जेव्हा एखादे बँक अकाउंट दिवसातून अनेकवेळा वापरले जाते, तेव्हा त्याच्या देखरेखीसाठी बँकेचा अधिक वेळ जातो ना. म्हणून मग अशा वेळेस व्याज देणे बँकेला कसे परवडेल? पण तरिही व्यावसायिक वर्ग हा खाते प्रकार निवडतो कारण त्यांना दिवसातून अनेकदा खाते-वापर, ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळतात.  जेव्हा खात्यातून, प्रत्यक्षात असणाऱ्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे काढता येतात तेव्हा त्याला 'ओव्हरड्राफ्ट सुविधा' असे म्हणतात. बचत खात्याच्या बाबतीत, बँका ओव्हरड्राफ्ट सुविधा देत नाहीत किंवा परवानगीही देत ​​नाहीत मात्र  करंट अकाउंटला अशी सुविधा दिली जाते. कारण व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही तात्पुरत्या कालावधीसाठी अधिक रक्कमेची आवश्यकता भासू शकते. हा कालावधी कमी असतो आणि म्हणून  कर्ज घेणे आणि ते मंजूर होणे ह्या जास्त कालावधी लागणाऱ्या प्रक्रियेपेक्षा 'ओव्हरड्राफ्ट सुविधा' उपयुक्त ठरते.  मग सांग बरे, आहे ना करंट अकाउंट कामाचे ?                                               

राधा: बाबा, ही   'ओव्हरड्राफ्ट सुविधा' तर अजबच आहे. असणाऱ्या  रक्कमेपेक्षा जास्त पैसे मिळणे म्हणजे भारीच झाले की ! मग तर सगळेच जण करंट अकाउंट उघडतील. 

बाबा(हसून): राधाबाई, बँकेने व्यवस्थित विचार करूनच अशी सुविधा तयार केलेली आहे बरे. सेव्हिंग अकाउंटमध्ये काही किरकोळ रक्कम किमान शिल्लक म्हणून कायम ठेवावी लागते. मात्र करंट अकाउंटच्या बाबतीत ही 'किमान शिल्लक रक्कम' बरीच जास्त असते आणि ती  कायम खात्यात ठेवणे आवश्यक असते. म्हणजेच बँकेकडे बरेचदा अशा अनेक खात्यांद्वारे  जास्तीची  रक्कम कायमच असते. म्हणून अशी ओव्हरड्राफ्ट ची सुविधा  बँकेला देता येते.ओव्हरड्राफ्ट म्हणून काढलेली रक्कम, बँकेस वेळेत परत न केल्यास त्यावर घसघशीत दंडही आकारला जातो. म्हणूनच व्यावसायिक लोक, अशी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ही रक्कम वेळेआधी बँकेस परत करतात. मग सांग आहे ना हे "चालणारे खाते" ?

राधा: ओके, असे आहे तर ! मग मला तर 'सेव्हिंग अकाउंट' च पाहिजे बाबा.

बाबा(हसून):  आणि उद्या तू मोठी होऊन बिझिनेस करायला लागलीस तर ? तर मात्र तुला असे चालणारे खातेच लागेल ना ?

 

राधा हसून बाबांना टाळी देते आणि शाळेतून मिळालेला बँकेचा फॉर्म, पुढे  भरू लागते.  

डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड

Friday, November 27, 2020

मनो-Money: भाग २० :महागाईचा बागुलबुवा- डॉ. रुपाली कुलकर्णी

 



महागाईचा बागुलबुवा

सुभाष आजोबा त्यांची हिशोबाची जुनी डायरी राधाला वाचायला देतात. त्यात सुभाष आजोबांचा पहिला पगार केवळ ४०० रु. होता हे वाचून राधाला खूपच आश्चर्य वाटते आणि ती आजोबांशी गप्पा मारायला लागते.

राधा:  आजोबा फक्त ४०० रु. पगार ? मग तुमचा आणि आजीचा खर्च कसा काय भागायचा ह्यात ?

आजोबा(हसून) : अरे राधाताई किती तुम्हाला आमची चिंता ? सांगतो सगळे ! अग, आमच्याकाळी महागाई पण कमी होती. त्यामुळे काही पैसे बचत करूनसुद्धा आमचे अगदी आरामात भागायचे  बर का !!  बघ ना मी महिन्याचा खर्च सुद्धा लिहून ठेवत असे. त्यात तुला काय दिसतेय ?

राधा ( आश्चर्य वाटून) : अरे बापरे आजोबा, काय चंगळ होती तुमची ! पेट्रोल फक्त २०रु. लिटर ? आणि गॅस सिलिंडर ६० रु?       

आजोबा: आणि आता  किती किंमती आहेत याच्या ? आहे का माहिती तुला ?

राधा: हो आजोबा ! आई मला जेव्हा गाडीवर शाळेत सोडते तेव्हा कधीतरी पेट्रोल भरत असताना माझ्या लक्षात आले की पेट्रोल चा भाव आता ८० रु. लीटर च्या  आसपास आहे. आणि घरी  जेव्हा गॅस सिलिंडर डिलिव्हरी द्यायला माणूस आला होता तेव्हा बाबांनीच मला पैसे मोजायला लावले होते. ते मी ३५० रु दिले होते बहुदा.   

आजोबा: म्हणजेच काय की पेट्रोल आणि गॅस सिलिंडर दर  साधारण चौपट झाला आहे !   ते ही तीस वर्षात ! ह्यालाच म्हणतात महागाईचा परिणाम ! राधा, जसे जसे कच्चा माल, दळणवळण, बांधकाम साहित्य, मनुष्यबळ आदींच्या  किमती वाढतात तसा तसा त्यावर अवलंबून असणाऱ्या वस्तूंचा दर ही  वाढत जातो. महागाईचा हा दर टाक्यांमध्ये मोजतात.  

राधा: बापरे आजोबा ! म्हणजे मग मी आई-बाबांच्या वयाची असें तेव्हा किती बरे महाग असतील या अशा वस्तू ? मग त्या कशा काय परवडतील आम्हाला ? हा महागाईचा बागुलबुवा आमच्यामागे हात धुवून लागणार आहे तर!!

आजोबा (हसून): राधा त्यासाठीच सांगितले होते ना तुला की बचत करायला हवी ! विसरलीस का ? पण आज त्यात अजून एक महत्वाची बाब लक्षात घे. आपण पैशांची बचत किंवा गुंतवणूक ज्या माध्यमात करतो त्यांनी महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा आपल्याला जर दिला तरच आपण येणाऱ्या  महागाईचा सामना करू शकतो. तसे झाले नाही तर अशी गुंतवणूक काहीच कामाची नाही बरे ! त्यासाठी खूप विचारपूर्वक आपल्या  पैशांचे  नियोजन आणि व्यवस्थापन करावे लागते. म्हणजे मग आपल्याला महागाईचा बागुलबुवा फक्त दिसतो पण तो आपल्याला त्रास देऊ शकत नाही. 

राधा: समजले आजोबा ! पण मग अशी बचत माध्यमे कोणती आहेत ?

आजोबा:  अग असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतात. जसे बचत खाते, मुच्युअल फंडस्, शेअर बाजार, सोने किंवा जागेत गुंतवणूक इ. अशा पर्यायांची आपल्या गरजेनुसार  आपण निवड करायला हवी ! त्यासाठी अशा पर्यायांची पूर्ण माहिती करून घ्यायला हवी. पण ते तुला समजावून सांगायचे काम मी तुझ्या बाबावर सोपवतो !  आता पळा, माझी  फिरायला निघायची वेळ झाली !

राधा: ठीक आहे आजोबा ! आज मला तुमच्या  डायरीमुळे "महागाईचा दर"  ही नवीन संकल्पना शिकायला मिळाली. चला, मी पण येते तुमच्या बरोबर आज फिरायला !

राधा आजोबांचा हात धरून,  आनंदाने घराबाहेर  पडते !        

 

                

डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड