Friday, January 7, 2022

आर्थिक साक्षरता महत्त्वाची

 



आपण आर्थिक साक्षर होणे म्हणजे अगदी सोप्या शब्दात "आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि कुवतीनुसार जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवणे' होय. येणाऱ्या काळात आर्थिक साक्षरता ही सर्वांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट होणार आहे.

 आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालणे आणि चांगला परतावा मिळवणे हे आर्थिक साक्षरतेचे निकष म्हणता येतील. आपल्याला वाटते तेवढे ते अवघड नाही. अत्यंत सोपे ठोकताळे वापरून आपण ते बऱ्याच अंशी साध्य करू शकतो.

 "आपल्याला त्या आकडेमोडीतील काही कळत नाही बुवा!' किंवा "माझ्या इन्शुरन्सच्या पॉलिसीचं आमचा एजंटच बघतो, मला वेळच नसतो' ही किंवा अशा अर्थाची वाक्ये आपण आजूबाजूला ऐकत असतो. आपल्या स्वतःच्या आर्थिक व्यवहाराचे निर्णय अनेक जण अशा प्रकारे इतरांवर सोपवतात. काही अपवाद वगळता यापैकी अनेकांना आपल्या पैशांची गुंतवणूक नक्की कशा प्रकारे होत आहे, याची पुसटशी कल्पनादेखील नसते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक साक्षरतेचा अभाव! एका बाजूला आपली आर्थिक सुबत्ता तर वाढवायची आहे; परंतु दुसरीकडे त्यासाठी लागणारे अगदी मूलभूत ज्ञान घ्यायचे नाही, अशा कात्रीत सापडल्याने अनेक जण आर्थिक आघाडीवर चुकीचे निर्णय घेताना दिसतात.

 आपल्या आजूबाजूला ज्या झपाट्याने बदल होत आहेत ते तर आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ, वाढती महागाई, वस्तूंची टंचाई, दवाखान्याचे वाढते खर्च, नोकरीतील अस्थिरता आदी. अगदी सोप्या उदाहरणाने आपण हे समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीचे आजचे वय ३५ वर्षे आहे आणि ज्याचा सध्याचा दरमहा घरखर्च अंदाजे पंधरा हजार रुपये आहे, अशा व्यक्तीला त्याच्या निवृत्तीच्या वेळी म्हणजेच साधारणतः त्याच्या साठाव्या वर्षी त्याच घरखर्चासाठी अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपये लागतील. या ठिकाणी महागाईचा दर आठ टक्के प्रतिवर्ष एवढा राहील, असे मानले आहे. प्रत्यक्षातील महागाई यापेक्षा खूप जास्त आहे, हे आपल्याला माहीतच आहे. यावरून वैयक्तिक आर्थिक साक्षरतेची गरज आपल्याला कळू शकेल.