Friday, June 25, 2021

ऑनलाईन शॉपिंग और वित्तीय धोकाधडी


ऑनलाईन शॉपिंग करते  वक्त  वित्तीय धोकाधडी  हो सकती  हे ! सावधानी कैसे ले, ये दर्शानेवाला ये व्हिडिओ अवश्य देखे !!  




Friday, June 18, 2021

पत्रास कारण की ... Insurance Audit

 

सप्रेम नमस्कार !  कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे ! 

पत्रास कारण की ... कोविड कालावधीमध्ये, आपल्या आजूबाजूची परिस्थिती कठीण आणि खडतर आहे. सध्या वयाचा आणि आजाराचा तितकासा काही संबंध राहिलेला नाही. कधी, कोणाला, काय होईल काही याची शाश्वती नाही.  कोविडच्या दुसऱ्या लाटेत SWS च्या  ग्राहक वर्गापैकी अनेक जण किंवा त्यांचे प्रियजन यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य आणि जीवन विम्याचे महत्व अनन्य साधारण आहे. तेव्हा विमा पॉलिसीच्या बाबतीत, आपण वेळीच सजग व्हावे म्हणून हा पत्र प्रपंच !

 

आपण सर्वांनी,  नेहेमीच आणि विशेष करून येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीत, आपल्या विमा पॉलिसीच्या हफ्त्यांच्या बाबतीत विशेष दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कोविडमुळे जे मृत्यू होत आहेत, त्या संबंधीत  मृत्यू दावा (Death Claim) मिळवतांना अडचणी येत आहेत. अनुभवाअंती असे लक्षात  येते आहे की कुटुंबियांची आर्थिक सुरक्षितता म्हणून ज्या विमा पॉलिसी काढलेल्या आहेत, त्यांचे हप्ते वेळेवर भरल्यामुळे अनेक  कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.  तेव्हा आपल्याकडील सर्व आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींची एकत्रितपणे नोंद ठेवणे  आणि  त्याची विस्तृत माहिती आपल्या कुटुंबियांना देणेही आवश्यक आहे.  तसेच या सर्व पॉलिसींचे हप्ते काळजीपूर्वक, वेळच्यावेळी भरणे अत्यावश्यक आहे जेणेकरून ज्या हेतूने आपण विमा पॉलिसी काढत असतो तशीच परिस्थिती उद्भवली तर  विमा पॉलिसीचा नियोजित उपयोग आपल्याला आपल्या कुटुंबियांना होऊ शकतो.


आपण घेतलेल्या सर्व पॉलिसींचा आढावा (Audit / Review) घेऊन वेळोवेळी आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार, आपल्या उत्पन्नाप्रमाणे देयतेनुसार (Liabilities) विमा संरक्षणात   बदल करणे अत्यावश्यक आहे. आपल्याला जर  असे Insurance Audit  करावयाचे असेल तर आपण नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही आपणास उपयुक्त, मार्गदर्शक गोष्टी सुचवू शकतो.

 

आपण आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करून त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो . त्याचाच एक भाग म्हणून आपले विमा हप्तेही वेळेत भरणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आजुबाजुला घडणारे  प्रसंग डोळसपणे पाहुयात आणि  आपल्या कुटुंबियांना आपल्या घरातील सदस्यांच्या विमा संरक्षणाची  पूर्ण माहिती देऊयात. 

 

धन्यवाद !! 

- टीम sws 

Friday, June 11, 2021

करावे कर-समाधान : एचयूएफ आणि प्राप्तिकर कायदा

 



कर नियोजन करताना या बाबींचा विचार करदात्याने केला पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नावर करदात्याला वैयक्तिकरीत्या कर भरावा लागणार नाही.


भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हा एक संस्कृतीचा भाग होता. शिक्षण, नोकरी-धंदा वगैरे कारणांमुळे कुटुंब आपले गाव सोडून शहराकडे किंवा परदेशात स्थलांतरित झाली. हळूहळू ही संस्कृती लोप पावत चालली आहे. आता कुटुंब हे छोटे होत चालले आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार ‘हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ)’ हे वेगळी ‘व्यक्ती’ समजली जाते. कर नियोजनाच्या दृष्टीने ‘एचयूएफ’ हे खूप महत्त्वाचे आहे. हे एचयूएफ म्हणजे काय? हे कसे स्थापन होते? त्याचे काय फायदे आहेत? असे अनेक प्रश्न करदात्यांना पडतात.

पुरुषाला वारसा हक्काने मिळालेली संपत्ती कुटुंबाची (एचयूएफ) समजली जाते. तीन पिढय़ांकडून म्हणजे पणजोबा, आजोबा किंवा वडील याच्याकडून मिळालेली संपत्ती ही वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असते. अशा संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे कुटुंबाला करपात्र असते. स्त्रीला तिच्या माहेरच्या कुटुंबातून संपत्ती मिळाल्यास ती संपत्ती ही स्त्रीची वैयक्तिक संपत्ती समजली जाते आणि त्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे त्या स्त्रीच्या वैयक्तिक उत्पन्नात गणले जाते. प्राप्तिकर कायद्यानुसार एचयूएफ ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्याचे उत्पन्न करदात्याच्या वैयक्तिक उत्पन्नापेक्षा वेगळे समजले जाते. कुटुंबाच्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे कुटुंबाला करपात्र असते. अशा कुटुंबाच्या उत्पन्नासाठी एचयूएफच्या नावाने विवरणपत्र दाखल करता येते. हिंदू पुरुषाचे लग्न झाल्यानंतर एचयूएफ आपोआप स्थापन होते. मुले जन्मल्यावर ते आपोआप कुटुंबाचे सदस्य होतात. मुलीचे लग्न झाल्यावर ती वडिलांच्या ‘एचयूएफ’मध्ये सदस्य राहात नाही, परंतु ती को-पार्टनर म्हणून राहते. बौद्ध, शीख, जैन कुटुंबसुद्धा ‘एचयूएफ’ स्थापन करू शकतात. ‘एचयूएफ’चे स्वतंत्र पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) काढून वेगळे बँक खाते उघडता येते. एकटा हिंदू पुरुष एचयूएफ स्थापन करू शकत नाही.

कर नियोजन करताना या बाबींचा विचार करदात्याने केला पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नावर करदात्याला वैयक्तिकरीत्या कर भरावा लागणार नाही. उदा. करदात्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे, करदात्याचे पगारापासून १५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे आणि त्याला वडिलोपार्जित संपत्तीमधून ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न त्याने स्वत:च्या उत्पन्नात दाखविल्यास त्याला या ४ लाख रुपयांवर त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार ३० टक्के म्हणजे १,२०,००० रुपये इतका कर भरावा लागेल. हेच उत्पन्न त्याने ‘एचयूएफ’च्या नावाने दाखविल्यास प्रथम २,५०,००० रुपयांवर कर भरावा लागणार नाही आणि बाकी १,५०,००० रुपयांवर ५ टक्के इतका कर भरावा लागेल. ‘एचयूएफ’मध्ये ‘कलम ८० सी’ नुसार १,५०,००० रुपयांपर्यंतची गुंतवणूक केल्यास ‘एचयूएफ’ला कर भरावा लागणार नाही (विवरणपत्र मात्र भरावे लागेल).

एचयूएफ ‘कलम ८० सी’नुसार गुंतवणूक करू शकतो. कुटुंबाच्या सदस्याचा विमा हप्ता भरू शकतो, इक्विटी लिंक्ड बचत योजना, मुदत ठेव वगैरेमध्ये या कलमानुसार गुंतवणूक करू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये मात्र एचयूएफ गुंतवणूक करू शकत नाही.

एचयूएफमध्ये उत्पन्न दाखविताना करदात्याने विशेष काळजी घेतली पाहिजे. सल्ल्याचे उत्पन्न, पगाराचे उत्पन्न एचयूएफमध्ये दाखवता येत नाही, ते वैयक्तिक उत्पन्न म्हणून समजले जाते आणि करदात्याच्या वैयक्तिक उत्पन्नात गणले जाते. एचयूएफच्या व्यवहारांचे नियोजन करताना या तरतुदींचा विचार करणे गरजेचे आहे. करदात्याने असे व्यवहार करताना कर सल्लागाराची मदत घेणे हितावह आहे.

- प्रवीण देशपांडे 

साभार, लोकसत्ता ,अर्थवृत्तांत   

Friday, June 4, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग १०: गरज अर्थ साक्षरतेची !



प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे !  या  दुसऱ्या लाटेत SWS च्या  ग्राहक वर्गापैकी अनेक जण किंवा त्यांचे प्रियजन यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.  आम्ही त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. या कठिण कालावधीत त्यांच्या कुटुंबियांना  धीर देण्यासाठी जेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवर संवाद साधला तेव्हा असे लक्षात आले की परिवारातील इतर सदस्यांना, मृत झालेल्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या मालमत्ते विषयी फारच जुजबी माहिती होती.

या कालावधीत  त्यांना मानसिक आधार देण्या व्यतिरिक्त ज्या काही व्यावहारिक गोष्टी करणे  क्रमप्राप्त  होते ते करतांना अशा समदुःखी  इतर परिवारांसाठीही उपयुक्त ठरेल अशी चेकलिस्ट बनविली आहे. SWS द्वारे आपल्या कुटुंबियांना आर्थिक निर्णयांबद्दल माहिती देण्यासाठी, त्यांना अर्थ साक्षर करणेसाठीचे  महत्व  वेळोवेळी सांगण्यात आलेले आहे !  कोरोना कालावधीत आजुबाजुला घडणारे  प्रसंग डोळसपणे पाहुयात आणि  आपल्या कुटुंबियांना आपल्या घरातील आर्थिक घडमोडींची पूर्ण माहिती, वेळेवर देऊयात.  ज्यांच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्याचा मृत्यू ओढवलेला आहे, त्यांनी पुढील काही बाबी तपासून  पाहाव्यात आणि इतरांनी त्याबाबतीत वेळीच सजग व्हावे !

जीवन तसेच आरोग्य वीमा:  सर्वप्रथम दिवंगत सदस्याचा जीवन विमा काढलेला आहे का हे पहा . जीवन विमा एक किंवा अधिक संस्थांमध्ये काढलेला असू शकतो ही  शक्यता तपासून पहा. काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा तसेच जीवन विमा काढलेला असतो.  त्याद्वारे सुद्धा  कुटुंबियांना लाभ मिळू शकतो.  तसेच या सदस्याच्या बँक अकाउंट मधून  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा  हप्ता  जर  वर्ग  झाला असेल  तर त्या योजने अंतर्गतही रुपये दोन लाख इतका लाभ कुटुंबियांना मिळू शकतो.  दिवंगत सदस्याचा मृत्यू जर उपचार घेताना इस्पितळात झालेला असेल तर आरोग्य विमा लाभ देखील उपलब्ध होऊ शकतो.  तेव्हा सदस्याच्या जीवन तसेच आरोग्य विमा पॉलीसी  पडताळून पहा. याबाबतीत योग्य वेळेत मृत्यूचा दाखला आणि लागू असल्यास इस्पितळाची सर्व  बिले सादर करावी लागतात.

कर्मचारी सुविधा:  दिवंगत व्यक्ती कार्यरत असणाऱ्या कंपनीमध्ये भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस, पेन्शन,  गेल्या महिन्याचा  पगार, जमलेल्या रजांचा पगार, ग्रुप वीमा, सोसायटी लाभ असे  अन्य काही लाभ कंपनी देत असल्यास ते पडताळून पहा.  त्यासाठी आवश्यक असणार्या कागदपत्रांची पूर्तता करा.   

बँक खाते अथवा मुदत ठेवी: दिवंगत सदस्याच्या नावाने किती ठिकाणी बँक/ मुदत ठेव  खाती होती आणि त्याची  कागदपत्रे जसे पासबुक, चेकबुक, बँकेची स्टेटमेंट तपासून पहा.  संबंधित बँकांमध्ये जाऊन मृत्यूचा दाखला तसेच नामांकन असणाऱ्या व्यक्तीचे इतर कागदपत्रे सादर करा. अशा व्यक्तीचा मोबाईल तपासून पाहिल्यास एस. एम. एस. द्वारे आलेले बँकेचे स्टेटमेंट किंवा मोबाईल मध्ये असणारे बँक ॲप्लिकेशन याद्वारेही माहिती प्राप्त करून घेता येऊ शकते.

इतर गुंतवणूक:  दिवंगत व्यक्तीच्या नावाने म्युच्युअल फंड, शेअर्स, पोस्टातील, खाती स्थावर मालमत्ता इत्यादी ठिकाणी गुंतवणूक असल्यास त्या संबंधित कागदपत्रे तपासून पाहता येतील.  परिवाराशी संबंधित अर्थ सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक कागदपत्रे/ स्टेटमेंट्स काढून  देऊ शकतात. अशा व्यक्तीच्या नावे जर कुठे लॉकर सुविधा घेतलेली  असेल तर तेथेही बचत अथवा गुंतवणुकीचा ऐवज किंवा कागदपत्रे ठेवलेली असू शकतात याचीही नोंद घ्या.

खर्च/ दायित्वे: दिवंगत सदस्यांच्या नावे काही कर्ज घेतलेले असल्यास त्याचे हप्ते कुठल्या बँक खात्यांमधून  वर्ग होत आहेत  हे तपासून घ्या. बँक खात्यांमधून वेगवेगळे हप्ते जसे गृहकर्ज, वाहनकर्ज,  विमा हफ्ते , म्युच्युअल फंडातील एस.आय.पी. इत्यादी वर्ग होऊ शकतात. त्याची वेळेवर दखल घ्या. दिवंगत सदस्य जर प्राप्तीकर भरत असेल तर प्राप्तिकराची  कागदपत्रे तपासून पहा.  काही ठिकाणी टी.डी.एस. वर्ग केलेला असू शकतो त्याविषयी  माहिती जाणून घ्या.

कोरोना कालावधीत ओढवलेल्या या  परिस्थितीत, 'अर्थ साक्षर परिवार ' असणे, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे इच्छापत्र असणे किती आवश्यक आहे हे लक्षात येते आहे. म्हणूनच कुटुंबातील  प्रत्येक सदस्याने,  आर्थिकदृष्टया सजग, साक्षर व्हावे यासाठी आम्ही  ‘ब्लू-बुक’ निर्मिले आहे. ब्लू बुक ही एक सोपी, सुलभ संकल्पना आहे जिचा वापर कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या सर्व आर्थिक बाबींचे  नोंदनीकरण करण्यासाठी करायचा आहे. असे केल्याने एखाद्या कुटुंबाची वास्तविक, आर्थिक परिस्थिती, घरातील सर्व सदस्यांना  स्पष्ट होण्यास मदत होते तसेच कुटूंबाशी संबंधित भविष्यातील कोणत्याही आर्थिक निर्णयासाठी मार्गदर्शक म्हणूनही ब्लू-बुक कार्य करते. प्रत्येकाने जीवनातील भावी अनिश्चिततेसाठी तयार असले पाहिजे आणि आपल्या प्रियजनांना त्यासाठी मदतही  केली पाहिजे. आणि म्हणूनच ब्लू-बुकचा वापर तुम्ही नक्की प्रभावीपणे करावा !! ब्लू-बुक ची प्रत मागविण्यासाठी संपर्क: muktangan@swsfspl.com.

तुमच्या आणि परिवाराच्या आरोग्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा !! भवतु सब्ब मंगलम् !

 - टीम SWS !!