Friday, December 9, 2022

लाडक्या कुटुंबियांसाठी...


माझी दोन वर्षाची नात खेळ खेळत माझ्याजवळ आली. मी तिला प्रेमाने उचलून घेतले आणि  तिला एक चॉकलेट दिले. लगेच  तिने दुसरा गाल पुढे केला आणि दुसरा हातही !! तिच्या नजरेत या हुशारीची चमक दिसत होती. मग मीही तिला दुसरे चॉकलेट दिले !! त्यानंतर तिने दोन्ही चॉकलेट बराच वेळ घट्ट धरून ठेवले. थोड्या वेळाने हळूच एक चॉकलेट खाल्ले.आणि दुसरे नंतर खाण्यासाठी सांभाळून ठेवले.तिची ही कृती बरेच काही सांगून गेली.

हे तिचे नियोजन किती अर्थपूर्ण होते? एवढीशी चिमुरडीसुद्धा तिच्या आवडत्या वस्तूचे नियोजन करू शकते. मग असे नियोजन सर्वांनाच किती आवश्यक आहे असे वाटत नाही का? आर्थिक नियोजन, व्यवस्थापन याबाबतीत आपण असे विचार करू शकतो. भविष्याची तरतूद कशी करावी? का करावी? कोणासाठी करावी? कुठे  करावी? इ. अनेक प्रश्नांची उकल वेळीच करायला हवी. प्रत्येक व्यक्तीसाठी असे नियोजन आवश्यक आहे. ही गोष्ट न चुकवता येणारी आहे. भविष्याची तरतूद कशी करावी हे ज्ञान, योग्य सल्लागाराकडून, मार्गदर्शकांकडून घेतल्यास आयुष्य नक्कीच सुलभ होते. वानगीदाखल एक प्रसंग सांगते. 

माझी सर्वात धाकटी नणंद अनिता हिच्या यजमानांवर, ध्यानीमनी नसताना, किरकोळ आजाराचे कारण होऊन काळाने घाव घातला. सुखाचा संसार क्षणात दु: खाच्या काळोखात झाकोळून गेला.तिचे सासूबाई - सासरे किंबहुना सर्वच कुटुंब सैरभैर झाले. कोणालाही काहीच सुचेना. मानसिक धक्कयाबरोबरच झालेला आर्थिक आघातही मोठा होता.  तो कसा सहन कसा करायचा? मुलांचे शिक्षण पुढे कसे होणार? घरखर्च कसा भागणार? वयस्कर सासू सासरे यांची आजारपणे किंवा बाकीचा खर्च कसा निभावणार? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. यावर तोडगा काढण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करित होता. अचानकच अनिताच्या सासूबाईंनी फर्मान काढले, 'पेपर बंद करा, दूध कमी घेऊ, कामवाली मावशी बंद करू ' इ. त्यांच्यापरिने त्या विचार करत होत्या की काटकसरीने राहू. परंतु नेहेमीच्या जीवनशैलीची सवय झालेल्या मुलांना, अनिताला हे सगळे जमविणे खूपच कठीण जात होते.  

तेव्हा विचार आला कि घरातील कर्ती व्यक्ती या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी, आर्थिक नियोजन  का करत नाही ? आपल्याजवळ किती पैसा आहे, तो कशा पद्धतीने वापरला किंवा गुंतविला पाहिजे म्हणजे कुटुंबाचे भावी आयुष्यमान व्यावस्थित राहील, यासाठी वेळीच नियोजन करणे गरजेचे असते. परंतु बरेचजण हे नियोजन करत नाहीत किंवा केलेल्या नियोजनाबद्दल घरात कल्पना देत नाहीत. त्याबाबत  आपल्या कुटुंबीयांशी कधी चर्चा करत नाही. अगदी मोठमोठ्या नामांकित ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आणि शिकलेल्या व्यक्तीही अशा चुका करताना दिसतात आपल्या कुटुंबावर आपले निस्सीम प्रेम असते. त्यांच्यासाठी आपण अविरत कष्ट करत असतो. मग त्यांच्याचसाठी कमाविलेल्या संपत्तीचे नियोजन करावे, त्यांना विश्वासात घेऊन ते समजावून सांगावे ही आवश्यक बाब दुर्लक्षित का होते?  घरातील सर्वानाच,  प्रत्येक वयात आपण आर्थिक नियोजनाचे योग्य ते धडे देऊ शकतो. कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात त्यांनाही समाविष्ट करून घेऊ शकतो.   

तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. मित्रांनो, आर्थिक नियोजन करा व त्याचे व्यवस्थापन या विषयात साक्षरतेचे धडे घ्या !! तुमच्यासाठी आणि तुमच्या लाडक्या कुटुंबियांसाठी !!

                                                                                                            - लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी.