Friday, January 21, 2022

घोटाळे आणि आर्थिक साक्षरता


'फटे स्कॅम' , 'तीस-तीस' घोटाळा  ह्या चालू घडामोडी भारतामध्ये आर्थिक साक्षरता किती  कमी आहे, याचे द्योतक आहेत  

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'ची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु होती. आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवासांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फटे स्कॅम चर्चेत असताना औरंगाबादसह मराठवाड्यात 'तीस-तीस स्कॅम'ची चर्चा जोरात आहे.'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा नंतर फिर्यादीनं मागे घेतला.


'तीस-तीस' घोटाळा काय आहे ?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं.

 काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 10 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.  त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतेय.  

 हे सर्व प्रकार बघता भारतामध्ये  "आर्थिक साक्षरता" या क्षेत्रात कार्य करण्याची किती गरज आहे हे लक्षात येते.    

Friday, January 14, 2022

आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक अपडेट

 


आधार कार्ड, भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे, सध्याच्या काळात आपल्या सर्वांसाठी (Aadhar Card Updates) खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड (Aadhaar card) नसल्यास आपली अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात. आधार कार्डाशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. भारतात (India) आधार कार्ड केवळ प्रौढ आणि वृद्धांसाठीच नाही तर लहान मुलांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. मुलांच्या शाळा प्रवेशासाठी आणि अनेक प्रकारच्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. गरज भासल्यास आधार कार्डमध्येही बदल करता येतील. देशात आधार कार्ड जारी करणाऱ्या UIDAI ने वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत.

UIDAI नुसार, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही डेमोग्राफिक अपडेट करायची असेल, तर त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जातात. याशिवायच बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आहे. तर, मुलांसाठी आवश्यक असलेली आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत आहेत. मात्र, लोकांकडून ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचे अनेकवेळा दिसून येते. UIDAI विहित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क आकारण्याच्या विरोधात आहे.


Friday, January 7, 2022

आर्थिक साक्षरता महत्त्वाची

 



आपण आर्थिक साक्षर होणे म्हणजे अगदी सोप्या शब्दात "आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि कुवतीनुसार जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवणे' होय. येणाऱ्या काळात आर्थिक साक्षरता ही सर्वांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट होणार आहे.

 आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ घालणे आणि चांगला परतावा मिळवणे हे आर्थिक साक्षरतेचे निकष म्हणता येतील. आपल्याला वाटते तेवढे ते अवघड नाही. अत्यंत सोपे ठोकताळे वापरून आपण ते बऱ्याच अंशी साध्य करू शकतो.

 "आपल्याला त्या आकडेमोडीतील काही कळत नाही बुवा!' किंवा "माझ्या इन्शुरन्सच्या पॉलिसीचं आमचा एजंटच बघतो, मला वेळच नसतो' ही किंवा अशा अर्थाची वाक्ये आपण आजूबाजूला ऐकत असतो. आपल्या स्वतःच्या आर्थिक व्यवहाराचे निर्णय अनेक जण अशा प्रकारे इतरांवर सोपवतात. काही अपवाद वगळता यापैकी अनेकांना आपल्या पैशांची गुंतवणूक नक्की कशा प्रकारे होत आहे, याची पुसटशी कल्पनादेखील नसते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक साक्षरतेचा अभाव! एका बाजूला आपली आर्थिक सुबत्ता तर वाढवायची आहे; परंतु दुसरीकडे त्यासाठी लागणारे अगदी मूलभूत ज्ञान घ्यायचे नाही, अशा कात्रीत सापडल्याने अनेक जण आर्थिक आघाडीवर चुकीचे निर्णय घेताना दिसतात.

 आपल्या आजूबाजूला ज्या झपाट्याने बदल होत आहेत ते तर आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ, वाढती महागाई, वस्तूंची टंचाई, दवाखान्याचे वाढते खर्च, नोकरीतील अस्थिरता आदी. अगदी सोप्या उदाहरणाने आपण हे समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीचे आजचे वय ३५ वर्षे आहे आणि ज्याचा सध्याचा दरमहा घरखर्च अंदाजे पंधरा हजार रुपये आहे, अशा व्यक्तीला त्याच्या निवृत्तीच्या वेळी म्हणजेच साधारणतः त्याच्या साठाव्या वर्षी त्याच घरखर्चासाठी अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपये लागतील. या ठिकाणी महागाईचा दर आठ टक्के प्रतिवर्ष एवढा राहील, असे मानले आहे. प्रत्यक्षातील महागाई यापेक्षा खूप जास्त आहे, हे आपल्याला माहीतच आहे. यावरून वैयक्तिक आर्थिक साक्षरतेची गरज आपल्याला कळू शकेल.