Friday, January 21, 2022

घोटाळे आणि आर्थिक साक्षरता


'फटे स्कॅम' , 'तीस-तीस' घोटाळा  ह्या चालू घडामोडी भारतामध्ये आर्थिक साक्षरता किती  कमी आहे, याचे द्योतक आहेत  

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'ची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु होती. आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवासांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फटे स्कॅम चर्चेत असताना औरंगाबादसह मराठवाड्यात 'तीस-तीस स्कॅम'ची चर्चा जोरात आहे.'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा नंतर फिर्यादीनं मागे घेतला.


'तीस-तीस' घोटाळा काय आहे ?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं.

 काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 10 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.  त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतेय.  

 हे सर्व प्रकार बघता भारतामध्ये  "आर्थिक साक्षरता" या क्षेत्रात कार्य करण्याची किती गरज आहे हे लक्षात येते.