Friday, April 30, 2021

कोविड आणि आर्थिक व्यवहार



 कोविड आणि आर्थिक  व्यवहार


मागचा lockdown आपण कसे कपडे धुतो, भांडी घासतो, चारी ठाव वेगेवेगळे पदार्थ करतो आणि फेसबुकवर लाईव्ह येतो हे दाखवण्यात गेला आहे. सध्या यावर भागणार तर नाहीच पण आपल्याला स्वतःला कुठल्याही प्रसंगासाठी तयार ठेवावं लागणार आहे.  आपण सगळेच अस्थिर वातावरणातून जात आहोत. घरच्या घर covid पॉझिटिव्ह निघतंय, एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीसाठी हॉस्पिटल शोधावं लागतंय, बेड मिळत नाहीय, औषधे कमी पडतायत अशा नाना अडचणी समोर उभ्या ठाकतात आणि गांगरून जायला होतं. नात्यातल्या व्यक्ती, शेजार-पाजार, मित्र-मैत्रिणी सगळीकडेच ही परिस्थिती असल्यामुळे ऐनवेळी मदतीचे हात लगेच पोचू शकत नाहीत. कितीही शांत राहायचं ठरवलं तरी जवळची व्यक्ती अशा अवस्थेत बघून पॅनिक मोडमध्ये जायला होतं. विशेष करून घरातला कर्ता, कमावता हात असेल आणि बाकीच्यांना व्यवहाराची फार माहिती नसेल तर आणखीनच (इथे कर्ता बाई/ पुरुष/दोघे हा मुद्दा गौण आहे).  या सगळ्यात एका गोष्टीसाठी फार धावपळ होते आणि गोंधळून जायला होतं ते म्हणजे कागदपत्र आणि बँकेचे व्यवहार.


बऱ्याच वेळा बायकांना आर्थिक व्यवहार माहिती नसतात किंवा अर्धवट माहिती असते पण कंट्रोल नवर्याकडे असतो. 'आमचे हे सगळं बघतात', 'हा'च करतो अगं सगळं, माझ्यावर वेळच आली नाही कधी', 'मला त्यातलं काही कळत नाही, देव काय ते बघून घेईल' या आणि अशा excuses अगदी शिकल्या सवरल्या, उच्चशिक्षित बायकांच्या बाबतीत सुद्धा ऐकलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी बायकोला इच्छा असते पण नवरेच 'तू कशाला, मी बघतोय सगळं', 'तुला काही कळणार नाही' असे शिक्के मारून स्वतःकडे कंट्रोल ठेवतात आणि बायकाही ऐकून घेतात. असेच,  नवऱ्यांच्या बाबतीत सांगायचे तर घरातले बेसिक सामान आणणे, मदतनिसांना मॅनेज करणे आणि एकूणच  किचन मॅनेजमेंटच्या बाबतीत अनभिज्ञता /आळशीपणा असू शकतो. अर्थात, याला अपवाद सापडतील, पण सद्य परिस्थितीत दोघानाही रोल रिव्हर्सल जमायला हवे आणि 'कमी तिथे आम्ही' अशी भूमिका घेऊन जबाबदारी खंबीरपणे पेलता यायलाच हवी; हे खरे.  त्या दृष्टीने आधीच काही तयारी करून ठेवली तर? 


हे काही पॉइंटर्स -


१. नवरा-बायको दोघांनीही आपसात ठरवून मोबाईल बँकिंग पिन, नेट बँकिंग पिन/ पासवर्ड, एकमेकांच्या फोनला फिंगर प्रिंट ऍक्सेस या गोष्टी शेयर कराव्यात. जेणेकरून हॉस्पिटल किंवा टेस्ट्स, बाकी खर्च करणे दुसऱ्याला सोपे जाईल. इथे प्रायव्हसी हा इतर वेळी अतिजास्त अधोरेखित केलेला मुद्दा आणू नये, फिंगर प्रिंट रजिस्टर केले म्हणजे लगेच एकमेकांचे फोन चेक करून पाळतच ठेवली जाणार असा अर्थ होत नाही. ह्याला क्रायसिस मॅनेजमेंटसाठीची पूर्वतयारी म्हणतात. 


२. हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ आल्यास आणि मोठी रकम उभारायची वेळ आल्यास कुठले फिक्स्ड डिपॉझिट मोडावे, कुठले सेविंग्स खाते प्रामुख्याने वापरावे याबाबत एकमत करून घ्यावे. जे खाते ठरले असेल त्याचे २ ते ३ चेक्स आधीच सही करून ठेवावे. तसेच म्युच्यअल फंड मोडावा लागला / शेयर्स विकावे लागले तर कुठले, काय  हे आपल्या advisor शी बोलून त्याचे लेटेस्ट स्टेटमेंट काढून ठेवावे, डिलिव्हरी स्लिप्स सही करून ठेवाव्यात. यावरून नंतर वाद झालेले बघितले आहेत.  ऍडमिट असलेल्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती स्वतःची तब्येत, इतरांचे स्वास्थ्य सांभाळून धावपळ करणार आहे, तिचा विचार इथे होणे अभिप्रेत आहे.


३. एका फाईलमध्ये सगळ्या कुटुंबियांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, फोटो, चालू असलेली औषधे लिहिलेला कागद, नुकत्याच केलेल्या टेस्ट्स असतील तर त्याचे स्कॅन / रिपोर्ट्स, साधारण हिस्ट्री, फॅमिली डॉक्टर, स्पेशालिस्ट यांचे कॉन्टॅक्ट नंबर, मेडिक्लेम पॉलिसीज हे लिहून/ लावून  ठेवावे. 


४. एका एक्सेल फाईलमध्ये आवश्यक बिले - प्रॉपर्टी टॅक्स, वीजबिल, फोनबिल, गॅस नोंदणी, घराचे हफ्ते, भाजी/किराणा/लॉंड्री, मेडिकल, पेपर, दूध, सुतार, प्लम्बर, इतर मशीन रिपेअर, ओटीटी सब्स्क्रिप्शन, वगैरे साठीचे कॉन्टॅक्ट लिस्ट करून ती फाईल दोघांनाही मिळेल अशा ठिकाणी ठेवावी किंवा सरळ प्रिंट काढून वरच्या फाईलमध्ये लावावी. 


५. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिथे जॉईंट अकॉउंट नाही, तिथे जॉईंट करून घ्यावे किंवा किमानपक्षी नॉमिनेशन तरी करावे. आजकाल सगळे व्यवहार डिजिटल असतात त्यामुळे चेकबुक, (असल्यास) पासबुक कुठे ठेवले आहे ऐनवेळी आठवत नाही. नेमकं बँकेचे पोर्टल डाउन असते. त्यामुळे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग बरोबरच, चेकबुक, पासबुक वगैरे गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. 


६. घरातल्या टीनएजर मुलांशी सुद्धा काही प्रमाणात आर्थिक बाबी माहिती असणे, हॉस्पिटलला जावे लागल्यास त्याला/तिला  घरी काय बघावे लागेल याबाबत चर्चा करावी. मुले अतिशय उत्तमरीत्या जबाबदारी सांभाळतात, त्यांच्यावर विश्वास दाखवावा. अगदी १०-११ वर्षाच्या मुलाला सुद्धा घरात अशी परिस्थिती आहे  तर आज आपण कपडे घडी करू, भांडी लावू आणि कामाला हातभार लावू हे कळते आणि जमते, त्यात गैर काहीच नाही, मुले जितकी स्वयंपूर्ण , स्वावलंबी असतील तितकी कठीण प्रसंगात पटकन उभी राहतील आणि निर्णयक्षम होतात.  


७. आवश्यकता भासत असेल तर 'विल' करणे हा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आता प्रायॉरिटीवर आणायला हरकत नाही, त्या दृष्टीने सगळ्या नोंदी एके ठिकाणी राहतात आणि त्यांचे वाटप आधीच क्लिअर राहते. माझे आहे ते  सगळे तुझेच आहे हा रोमँटिक (??) सेन्स बाजूला ठेवून याचा अतिशय ऑब्जेक्टिव्हली विचार करावा.  आपण गेल्यावर पुढच्याला निदान कागदपत्रांचा कमीत कमी त्रास व्हावा  ही प्राथमिकता आता प्रत्येकाने जपलीच पाहिजे. 


८. पूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह झाल्यास डबे कुठे लावायचे, कुठल्या खोलीत कुणी आयसोलेट व्हायचे, भांडी-कपडे वगैरे कामांची वाटणी कशी असावी याचा एक ढोबळ प्लॅन असावा. दोन्ही वेळा वेगळे जेवण लागते, सकाळचे संध्याकाळी नको, अमुकच भाजी तमुकच प्रकाराने लागते हे करायला कोरोना काळात आपण 'ग्रेट इंडियन किचन' नाही, हे लक्षात ठेवायचे आहे. :)


९. ही अतिशयोक्ती  वाटेल, परंतु अजूनही काही लोकांना डिजिटल व्यवहार सुरक्षित वाटत नाहीत आणि त्यामुळे बव्हंशी फिजिकल व्यवहारांवर भर दिला जातो. आता बाहेर कमीत कमी पडायचे आहे, जीव वाचवायचा आहे तर डिजिटल साक्षरता फार फार महत्वाची आहे. गुगल पे/ पेटीएम/ भीम यु पी आय वापरता येणे, ऑनलाइन फंड ट्रान्स्फर जमणे, बिले ऑनलाईन भरता येणे, कॅब बुकिंग, फूड किंवा पार्सल डिलिव्हरी ऍप्स , ग्रोसरी ऍप्स  हे सगळे नीट जमणे अत्यावश्यक झाले आहे.त्यादृष्टीने स्वतःला अपडेट ठेवलेच पाहिजे. 


१०. हे सगळे आधी बोलून, चर्चा करून ठरले असेल तरी आयत्यावेळी काही घोळ, गडबड, उशीर होणार आहेच. हे गृहीत धरून चालायचे आहे. आपण माणूस आहोत आणि आपल्याला सगळे सदासर्वदा आलेच पाहिजे असे नाही. परंतु आपण आधी तयारी केलेली असेल तर आपण स्वतःला आणि जवळच्या व्यक्तींना यातून निभावून नेणार आहोत, हा आत्मविश्वास नक्की येतो ! 🌷

काळजी घ्या आणि सुरक्षित राहा !! 🙏


(संग्रहित  लेख,

स्रोत: अज्ञात  )

Friday, April 9, 2021

१ एप्रिल २०२१ पासून आयकराच्या नियमांमध्ये बदल !

 


१ एप्रिल २०२१ पासून आयकराच्या नियमांमध्ये  बदल !

1 एप्रिलपासून म्हणजेच नव्या आर्थिक वर्षापासून बँकेच्या अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. या दिवसापासून केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक घोषणांची अंमलबजावणी होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्न आणि बचतीवर होणार आहे. म्हणूनच 1 एप्रिलपासून बँक, पीएफ आणि आयकराच्या नियमांमध्ये कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे (Know 6 Changes in Bank PF TDS and ITR rules from 1 April 2021).

1. ITR भरणं सोपं होणार

1 एप्रिलपासून आयकर रिटर्न भरणं सोपं होणार आहे. कारण सरकारने करदात्यांच्या पगाराशिवायच्या डिविडंड इनकम, कॅपिटल गेन इनकम, बँक डिपॉजिट इंट्रेस्ट इनकम, पोस्ट ऑफिस इंट्रेस्ट इनकम इत्यादी उत्पन्नाची माहिती आधीच अर्जात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतालय.

2. ‘या’ बँकांचे चेकचा कोणताही उपयोग राहणार नाही

1 एप्रिलपासून देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि इलाहाबाद बँकेचे चेक कोणत्याही कामाचे राहणार नाहीत. यंदाच्या अर्थसंकल्पात या सर्व बँकांच्या विलगीकरण करण्याची घोषणा करण्यात आलीय.

3. 75 वर्षांवरील नागरिकांना आयटीआर भरावा लागणार नाही

अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे 1 एप्रिलपासून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यापुढे आयटीआर भरावा लागणार नाहीये. हा लाभ पेन्शन आणि बँकेतील पैशांवरील व्याजावर अवलंबून असणाऱ्या नागारिकांनाच मिळणार आहे.

4. टीडीएसच्या आयकर नियमांमध्ये बदल

जर एखाद्या व्यक्तीने आयटीआर फाईल केले नाही तर त्याच्या बँकेतील पैशांवर दुप्पट दराने टीडीएस लागेल. म्हणजेच तुम्हाला आयकर बसत नसला म्हणून तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुमच्या बँकेतील पैशांमधून दुप्पट दराने टीडीएस कपात होईल.

5. पेंशन फंड मॅनेजरला अधिक दर वसूल करण्याची परवानगी

परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या उद्देशाने पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने पेंशन फंड मॅनेजरला ग्राहकांकडून अधिक दराने वसुली करण्याची परवानगी दिलीय.

6. पीएफवरील आयकराच्या नियमांमध्ये बदल

एका आर्थिक वर्षात पीएफमध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांची गुंतवणूक केल्यास 2.5 लाखांपेक्षा अधिकच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजासाठी कर द्यावा लागणार आहे. वॉलंटरी प्रोविडंट फंड (व्हीपीएफ) आणि पब्लिक प्रोविडंट फंडात (पीपीएफ) गुंतवणूक केल्यास 5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

Source: tv9marathi.com

Friday, April 2, 2021

डोअरस्टेप बँकिंग सुविधा


 

सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर आहे. त्यांना आता घरबसल्या बँकांच्या सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना आता घरबसल्या पैसे आणि काढता येणार आहेत. याचाच अर्थ सरकारी बँकेत ज्यांची खाती आहेत, त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही.


कोट्यवधी बँक ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळं ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. सरकारी बँकांद्वारे 'डोअरस्टेप डिलिव्हरी' सुविधा देण्यात येत असून, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं बँकेत जाण्याचा त्यांचा त्रास वाचणार आहे. रिझर्व्ह बँकेने काही वर्षांआधीच डोअरस्टेप बँकिंग सुविधा सुरू करण्याचा सल्ला बँकांना दिला होता. सार्वजनिक बँकांनी हा सल्ला गांभीर्यानं घेतला आहे. आता ही सुविधा ग्राहकांना देण्यासाठी संयुक्तरित्या एखादी यंत्रणा नियुक्त करण्याची तयारी बँकांनी सुरू केली असून, त्यामार्फत ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

युको बँकेनं सर्व सरकारी बँकांच्या वतीनं 'रिक्वेस्ट ऑफ प्रपोझल' (आरपीएफ) प्रसिद्ध केलं असून, कॉल सेंटर, वेबसाइट आणि मोबाइल अपची सुविधा देणाऱ्या खासगी कंपन्यांना आवाहन केलं आहे. बँकांद्वारे नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत एजंटची नेमणूक करण्यात येईल आणि ते दुसऱ्या टप्प्यात ठेवी जमा आणि पैसे काढण्याच्या सुविधेसह विविध डिव्हाइसच्या माध्यमातून सेवा ग्राहकांना देतील. सुरुवातीला डोअरस्टेप बँकिंग सुविधा केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांना देण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या अन्य ग्राहकांनाही सुविधा पुरवण्यात येईल. मात्र, त्यासाठी किमान शुल्क द्यावे लागणार आहे. ही डोअरस्टेप बँकिंग सुविधा सरकारच्या Enhanced Access and Service Excellence  (EASE) उपक्रमाचा भाग आहे.

डोअरस्टेप बँकिंग सुविधेद्वारे वित्तीय आणि गैरवित्तीय अशा सेवा पुरवण्यात येणार आहेत. वित्तीय सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेत पैसे जमा करणे आणि पैसे काढता येणार आहेत. तर गैरवित्तीय सेवांमध्ये धनादेश आणि ड्राफ्ट्स पुरवण्याचे काम केले जाईल. याशिवाय खात्याची माहिती दिली जाईल. चेकबुक, ड्राफ्ट्स, टर्म-डिपॉझिट रिसिप्ट आदी ग्राहकांना देण्यात येतील.