Monday, September 28, 2020

मनो-Money: भाग १३ : तुमच्या, आमच्या,..... सर्वांसाठी !! - डॉ. रुपाली कुलकर्णी

 


राधा धावत येऊन बाबांना  वृत्तपत्रातील बातमी दाखविते .

राधा : बाबा, आर्थिक क्षेत्रातील भरीव  कामगिरीसाठी दिले जाणारे २०१९ साठीचे  "नोबेल" पारितोषिक ,  भारतीय वंशाचे श्री. अभिजीत बॅनर्जी याना जाहीर झालेय !!

बाबा : येस  राधाताई ! वाचलीय मी बातमी ! भारतीयांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी भारतातील गरिबी दूर करण्यासाठी, सरकारला काही उपायही सुचविले आहेत.

राधा: किती छान आहे बाबा हे !

बाबा: आपल्या  सरकारने   गरिब, ग्रामीण भागातील जनतेला, आर्थिकरित्या  साक्षर करून, त्यांनांही विकासपथावर आणण्यासाठी कित्येक कल्याणकारी योजनांची सुरुवात केलेली आहेच. त्यातील कित्येक योजना ह्या अत्यल्प शुल्कात सर्वांसाठी उपलब्ध आहेत. पण जिथे भारतीय शहरी भागात देखील, अशा योजनांविषयी अज्ञान, अनास्था  दिसून येते, तेथे ग्रामीण भागातील जनतेची काय कथा असणार ?

राधा : बाबा, त्यांनाही अशा योजनांची माहिती करून दिली पाहिजे.

बाबा : हो राधा, आपल्या देशात आर्थिक निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे. तेव्हा   "पूर्ण आर्थिक साक्षरता ", हे  देखील देशसेवेचे एक क्षेत्र मानून प्रत्येक जबाबदार, साक्षर नागरिकाने, आर्थिक साक्षरतेशी निगडीत असणाऱ्या काही मूलभूत बाबींचा प्रचार आणि प्रसार करणे, आपले कर्तव्य समजले पाहिजे.  

राधा : बाबा, मला काय करता येईल ते तुम्ही सांगा. मी आणि माझे मित्रमैत्रिणी मिळून यासाठी नक्केच प्रयत्न करू !

बाबा : अरे वा ! तुला आर्थिक साक्षरता क्षेत्रात काम करण्यासाठी  काही सोप्या योजना सांगतो. मागील वेळी मी तुला जीवन विम्याविषयी माहिती दिलेली आहेच. आता पुढचे सांगतो.   "प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना"  ही  भारत सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतात फक्त २०% लोकांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा जीवन विमा आहे. या योजनेचा उद्देश हा आकडा वाढविणे असा आहे. जीवन विमा न नोंदवलेले  नागरिक, ज्यांचे वय १८ ते ५० वर्षे आहे आणि त्यांचे बँकेत खाते आहे, असे सर्वजण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेद्वारे लाभार्थ्याचा कोणत्याही प्रकारे (नैसगिक किंवा अपघाती ) मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु. अर्थसाहाय्य मिळते. या योजनेसाठी वार्षिक ३३० रु. इतका अत्यल्प हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होतो. आणि ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. 

राधा: बाबा, ही नक्कीच चांगली योजना आहे. अजूनअशीच दुसरी कुठलीयोजना आहे का ?

बाबा: आहे ना !! प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ! ही देखील सरकार पुरस्कृत अपघात विमा योजना आहे ज्यात विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु . अर्थसाहाय्य मिळते. याही योजनेसाठी वार्षिक हफ्ता केवळ १२ रु. इतका अत्यल्प आहे.

राधा : बाबा, नक्कीच या योजना सर्वसमावेशक आहेत. फक्त त्या सगळ्यांपर्यत पोहोचणार तरी कशा ?       

बाबा : हेच तर काम तुम्ही करायचे आहे राधा. आपल्या घराच्या आसपासच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही या योजनांसंबंधी तिथून माहितीपर कागदपत्रे मिळवा. त्यांचा अभ्यास करा आणि मग आपापल्या घरापासूनच तुम्ही सुरुवात करू शकता. प्रत्येकाच्या बँकखात्याला या योजनेशी जोडणे, हेच तुमचे काम असेल.     

राधा: म्हणजे घरातील सर्व सदस्य, घरी तसेच शाळेत, ऑफिसात येणारा सर्वच विशेष करुन कष्टकरी वर्ग यांना या योजनेची माहिती द्यायची आणि मग ते प्रत्यक्ष योजनेत सहभागी होत नाही तोपर्यंत त्याना मदत करत राहायचे , असेच ना बाबा ?     

बाबा : बरोबर राधा !! कधी लागताय कामाला ?

राधा : हे काय ! आत्ताच !!  आधी  जाऊन सर्व मित्रवर्गाशी  बोलते पहा !

 

आणि राधा खुषीतच तेथून पळ काढते !!

 

डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड

SWS Financial Solutions Pvt. Ltd.

muktangan@swsfspl.com

९०११८९६६८१

Friday, September 18, 2020

मनो-Money: भाग १२ : जीवनात ही हमी .. अशीच राहू दे !! - डॉ. रुपाली कुलकर्णी

जीवनात ही हमी ..  अशीच राहू दे

आज सकाळी घरात रेडिओ चालू असताना  "जीवनात ही घडी, अशीच राहू दे " गाणे सुरु झाले. अभ्यासात गुंग असणाऱ्या राधाला ह्या  गाण्याच्या ओळी परिचयाच्या वाटल्या  आणि मग तिचा आणि बाबांचा संवाद सुरु झाला !

राधा : बाबा हेच शब्द आपल्या शाळेसमोरील मोठ्या जाहिरात फलकावर मी पहिले ! फक्त "घडी च्या ऐवजी  "हमी" शब्द आहे तिथे !

बाबा (विचारात पडून ) : अच्छा ? कसला जाहिरात फलक आहे तो ?

राधा: ते विमा -बिमा  की काय असते ते ! ते काही मला समजत नाही. त्यात "वेळेवर हफ्ते भरा " असेही काही बाही लिहिलेले आहे. बाबा, काय असते हे विमा प्रकरण ?

बाबा: अच्छा, असे आहे तर ! राधाबाई, तो तर जीवन विमा योजनेचा जाहिरात फलक असला पाहिजे मग ! जीवन विमा म्हणजेच "लाईफ इंशुरन्स" हे एक कौटुंबिक सुरक्षेचे साधन आहे बरका ! "मृत्यू" हे प्रत्येक  जीविताचे अंतिम सत्य असते, हे तर तुला माहितीच आहे. पण समज, घरातील कर्त्या-कमवित्या  व्यकतीस हा मृत्यू जर अकाली आला, तर  त्या  व्यक्तीद्वारे, घरास दरमहा मिळणारे उत्पन्न बंद होते  आणि मग  त्याची  झळ,  आर्थिकदृष्ट्या, त्याच्या पूर्ण कुटुंबाला बसू लागते. विमा म्हणजे अशा संभाव्य, आर्थिक  नुकसानीची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा उपाय असतो बरका !

राधा: बाबा, थोडेफारच समजले ! अजून काही माहिती सांगा ना, म्हणजे मला नीट समजेल.

बाबा (खुशीत येऊन) : अरे वा राधा, तुला बराच इंटरेस्ट दिसतोय या विषयात ! ऐक तर मग, घरातील कमविती   व्यक्ती जर आर्थिक दृष्ट्या साक्षर असेल, आपल्या कुटुंबीयांची खऱ्या अर्थाने काळजी घेणारी असेल तर ती स्वतः चा काही  चांगल्या रक्कमेचा जीवन विमा, अशा विमा  विक्रेत्या कंपनीमार्फत, योग्य कालावधीसाठी  काढून घेते. आणि त्या बदल्यात विमा कंपनीला दरमहा  किंवा  दरवर्षी  काही  पैसे हफ्ता म्हणजेच "प्रीमियम" म्हणून देते ! आणि जर विमा कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना या विम्याची रक्कम मिळते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीने , वीस वर्षांसाठी पन्नास लाखाचा जीवन विमा काढला तर  ती व्यक्ती, प्रतिवर्षाला साधारणेपणे दहा हजार रुपये इतका हफ्ता, विमा कंपनीत  भरणा करते. आणि या वीस वर्षांच्या कालावधीत जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना विम्याची  पन्नास लाख रु. इतकी रक्कम मिळते.

राधा: बाबा, म्हणजेच  विमा हा   कुटुंबियांना  आर्थिक सुरक्षितता प्रदान करतो  तर  ! मग तर सगळ्याच कमवित्या व्यक्तींनी आपला दणकट म्हणजेच लाखो-करोडोंचा जीवन विमा काढून ठेवण्यास हवा !

बाबा (जोरात हसून): हा  हा , थांबा जरा राधाताई ! कोणाला किती रक्कमेचा विमा, किती कालावधीसाठी द्यायचा, हे विमा कंपनी ठरविते आणि विमा रक्कम ही  सर्वस्वी त्या व्यक्तीच्या उत्पन्न क्षमतेवर आणि आरोग्य लक्षणांवर अवलंबून असते. गंभीर आजारांनी त्रस्त व्यक्ती ह्या सुरक्षा कवचाचा अधिक लाभ घेऊ शकत नाही !     

राधा : आणि बाबा समजा, विमा कालावधीत त्या व्यक्तीस मृत्यू आला नाहीतर ? तर मग, त्याने भरलेले सगळे हफ्ते वाया जाणार आणि विमा कंपनीचा मात्र लाभच होणार , असेच ना ?

बाबा : अरे वा, चांगला प्रश्न विचारलास ह राधा ! अग ह्या जीवन विम्याचेही काही प्रकार असतात. विमा कालावधीनंतर विमाधारक हयात असल्यास काही  विमा कंपनी, ही रक्कम परताव्यासहित ग्राहकाला परत करतात. विमा कालावधीसाठी हे पैसे कंपनीला वापरायला मिळतात ,त्यासाठी असा  परतावा असतो.  असे विमा प्रकार जास्त रकमेच्या हफ्त्याचे म्हणजेच  महाग असतात.  काही विमा प्रकारात मात्र असा  कोणत्याही स्वरूपात परतावा मिळत नाही आणि हे विमा प्रकार स्वस्तही असतात. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्यास विमा हप्त्याची रक्कम वाया जाणे हे एका अर्थी चांगलेच ना, राधा ?

राधा:   येस्स ! समजले बाबा ! म्हणूनच त्या जाहिरात फलकावर  "जीवनात ही हमी ..  अशीच राहू दे " .. असे वाक्य लिहिले आहे तर !

बाबा : अरे वा ! हुशार राधाबाळाला समजले की नीट !                                   


- डॉ.  रुपाली दीपक कुलकर्णी,

 muktangan@swsfspl.com  

मोबाईल क्रमांक: ९०११८९६६८१


Tuesday, September 1, 2020

लॉकडाऊननंतर अर्थचक्राला लवकरच गती: श्री. गुणवंत राठी (C.A.) , नासिक

 


कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल.

संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकऱ्या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे, व्यवसायांमध्ये मंदी येणे अशा परिणामांमुळे सामान्य माणूस अतिशय त्रस्त झाला आहे. परंतु ही तात्पुरती स्थिती आहे. कारण कोविडची साथ लवकरच संपणार आहे आणि भारतीय माणसाची जीवनशैली आणि प्रगती करत राहण्याची सवय पाहता, येत्या काही वर्षांत आपला देश नक्कीच चांगली प्रगती करेल असा मला विश्वास आहे.

दोन प्रकारच्या देशांची प्रगती वेगाने होत असते. एक म्हणजे जे मोठ्या प्रमाणात निर्यात करत असतात आणि दुसरे, जे मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. आज आपला भारत हा जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेतही आपल्याकडील तरुणांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची मानसिकताही मोकळ्या हाताने खर्च करणारी आहे. शिवाय या २०२० सालात ९०% जनतेला कोविडच्या साथीचा फटका बसल्यामुळे सर्वांचेच डोळे उघडले आहेत.

विविधमार्गी उत्पन्नाची गरज

काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या लोकांचे शेवटचे मासिक वेतन पन्नास ते साठ हजार रुपये होते, तरीही ते अतिशय समाधानी आयुष्य जगले. याउलट आजच्या तरुणांना पहिलाच पगार ३५ ते ५० हजार रुपये मिळत असूनही किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करतानाही त्यांची तारांबळ उडताना दिसते. कारण आतापर्यंत लोक उत्पन्नाच्या कोणत्यातरी एकाच स्त्रोतावर अवलंबून निश्चिंतपणे जगत होते. आता नवीन युगाची सुरूवात विविधतापूर्ण असेल. आता कमाईचे अनेक स्त्रोत असलेले आणि हुशारीने खर्च करणारे लोकच खंबीरपणे पाय रोवून उभे राहू शकतील.

येत्या दोन दशकांत सर्व्हिस सेक्टर म्हणजेच विविध प्रकारच्या सेवा पुरवणारे व्यवसाय सर्वाधिक प्रगती करतील. या क्षेत्रात काम करणारे लोक मोठी झेप घेऊन प्रगत स्थानी स्थिरावतील. व्यवहारांचा वेग वाढेल आणि त्यात मोठ्या प्रमाणात पारदर्शकताही येईल.  हे नवे तंत्र स्वीकारून जगणारेच टिकून राहून प्रगती करतील. त्याच्याशी जुळवून घेऊ न शकणारे मागे पडतील.

व्याज व करात सुधारणा

यापुढे कर रचनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होतील. प्रत्यक्ष करसंकलनातही बदल होतील. त्याची पूर्वतयारी म्हणूनच सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांचे मोठ्या प्रमाणात विलीनकरण सुरू केले आहे. देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले आहे, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. देशात इतकी वर्षे २५ हून अधिक राष्ट्रीयकृत बँका कार्यरत होत्या, विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर मोजक्याच राष्ट्रीयीकृत बँका संपूर्ण देशात कार्यरत असतील. 

बँकांतील मुदत ठेवींवरील व्याजदर आत्ताच ५% ते ६% पर्यंत घसरले असून यापुढेही ते कमी होत जाणार आहेत. त्यामुळे फिक्स डिपॉझिटमध्ये दीर्घकाळ पैसे अडकवून ठेवण्याचे प्रमाण खूप कमी होत जाईल. त्याच वेळी पूर्वीच्या तुलनेत कर्जही स्वस्त दराने उपलब्ध होईल.

येत्या चार वर्षांत म्हणजे २०२४ पर्यंत सोन्याचा दर प्रतितोळा (दहा ग्रॅम) एक लाखाच्या वर, तर चांदीचा दर येत्या वर्षभरातच म्हणजे २०२१ पर्यंत प्रति किलो एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

काही महत्त्वाच्या सूचना:

१. दरमहा एक ग्रॅम सोन्याची खरेदी करा.

२. इंडियन इक्विटी मार्केटमध्ये मजबूत मूल्य असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा.

३. सध्या नकारात्मक परतावा दिसत असला तरीही एसआयपीमधील गुंतवणूक सुरू ठेवा.

४. कोणत्या शहरात कोणत्या परिसरातील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल याचा दूरदर्शीपणे विचार करा.


-श्री. गुणवंत राठी (C.A.)  , नासिक

gunavantrathi@gmail.com,

9730877800.