Monday, September 28, 2020

मनो-Money: भाग १३ : तुमच्या, आमच्या,..... सर्वांसाठी !! - डॉ. रुपाली कुलकर्णी

 


राधा धावत येऊन बाबांना  वृत्तपत्रातील बातमी दाखविते .

राधा : बाबा, आर्थिक क्षेत्रातील भरीव  कामगिरीसाठी दिले जाणारे २०१९ साठीचे  "नोबेल" पारितोषिक ,  भारतीय वंशाचे श्री. अभिजीत बॅनर्जी याना जाहीर झालेय !!

बाबा : येस  राधाताई ! वाचलीय मी बातमी ! भारतीयांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी भारतातील गरिबी दूर करण्यासाठी, सरकारला काही उपायही सुचविले आहेत.

राधा: किती छान आहे बाबा हे !

बाबा: आपल्या  सरकारने   गरिब, ग्रामीण भागातील जनतेला, आर्थिकरित्या  साक्षर करून, त्यांनांही विकासपथावर आणण्यासाठी कित्येक कल्याणकारी योजनांची सुरुवात केलेली आहेच. त्यातील कित्येक योजना ह्या अत्यल्प शुल्कात सर्वांसाठी उपलब्ध आहेत. पण जिथे भारतीय शहरी भागात देखील, अशा योजनांविषयी अज्ञान, अनास्था  दिसून येते, तेथे ग्रामीण भागातील जनतेची काय कथा असणार ?

राधा : बाबा, त्यांनाही अशा योजनांची माहिती करून दिली पाहिजे.

बाबा : हो राधा, आपल्या देशात आर्थिक निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे. तेव्हा   "पूर्ण आर्थिक साक्षरता ", हे  देखील देशसेवेचे एक क्षेत्र मानून प्रत्येक जबाबदार, साक्षर नागरिकाने, आर्थिक साक्षरतेशी निगडीत असणाऱ्या काही मूलभूत बाबींचा प्रचार आणि प्रसार करणे, आपले कर्तव्य समजले पाहिजे.  

राधा : बाबा, मला काय करता येईल ते तुम्ही सांगा. मी आणि माझे मित्रमैत्रिणी मिळून यासाठी नक्केच प्रयत्न करू !

बाबा : अरे वा ! तुला आर्थिक साक्षरता क्षेत्रात काम करण्यासाठी  काही सोप्या योजना सांगतो. मागील वेळी मी तुला जीवन विम्याविषयी माहिती दिलेली आहेच. आता पुढचे सांगतो.   "प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना"  ही  भारत सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतात फक्त २०% लोकांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा जीवन विमा आहे. या योजनेचा उद्देश हा आकडा वाढविणे असा आहे. जीवन विमा न नोंदवलेले  नागरिक, ज्यांचे वय १८ ते ५० वर्षे आहे आणि त्यांचे बँकेत खाते आहे, असे सर्वजण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेद्वारे लाभार्थ्याचा कोणत्याही प्रकारे (नैसगिक किंवा अपघाती ) मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु. अर्थसाहाय्य मिळते. या योजनेसाठी वार्षिक ३३० रु. इतका अत्यल्प हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होतो. आणि ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. 

राधा: बाबा, ही नक्कीच चांगली योजना आहे. अजूनअशीच दुसरी कुठलीयोजना आहे का ?

बाबा: आहे ना !! प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ! ही देखील सरकार पुरस्कृत अपघात विमा योजना आहे ज्यात विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु . अर्थसाहाय्य मिळते. याही योजनेसाठी वार्षिक हफ्ता केवळ १२ रु. इतका अत्यल्प आहे.

राधा : बाबा, नक्कीच या योजना सर्वसमावेशक आहेत. फक्त त्या सगळ्यांपर्यत पोहोचणार तरी कशा ?       

बाबा : हेच तर काम तुम्ही करायचे आहे राधा. आपल्या घराच्या आसपासच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही या योजनांसंबंधी तिथून माहितीपर कागदपत्रे मिळवा. त्यांचा अभ्यास करा आणि मग आपापल्या घरापासूनच तुम्ही सुरुवात करू शकता. प्रत्येकाच्या बँकखात्याला या योजनेशी जोडणे, हेच तुमचे काम असेल.     

राधा: म्हणजे घरातील सर्व सदस्य, घरी तसेच शाळेत, ऑफिसात येणारा सर्वच विशेष करुन कष्टकरी वर्ग यांना या योजनेची माहिती द्यायची आणि मग ते प्रत्यक्ष योजनेत सहभागी होत नाही तोपर्यंत त्याना मदत करत राहायचे , असेच ना बाबा ?     

बाबा : बरोबर राधा !! कधी लागताय कामाला ?

राधा : हे काय ! आत्ताच !!  आधी  जाऊन सर्व मित्रवर्गाशी  बोलते पहा !

 

आणि राधा खुषीतच तेथून पळ काढते !!

 

डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड

SWS Financial Solutions Pvt. Ltd.

muktangan@swsfspl.com

९०११८९६६८१