Friday, July 29, 2022

फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम

फेडरल रिजर्व्हचे मुद्रा धोरण : घटना आणि परीणाम




 घटना

अमेरिकेत वाढलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी,जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी ,आणि दीर्घ कालीन महागाई दर २ टक्के इतका कमी करण्याच्या उद्देशाने ,अत्यंत सुनियोजित पद्धतीने अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (फेडरल रिजर्व्ह)  फेड फंड दर हा  २-१/४ वरून २-१/२  इतका वाढविला आहे,तसेच तो यापुढेही वाढविला जाईल  असे संकेत दिलेले आहेत. तसेच फेडरल रिजर्व्ह कडे असलेले ट्रेझरी बील, इतर अल्प मुदतीचे सरकारी कर्ज रोखे, यांची संख्या कमी केली जाईल,जेणे करून फेडरल रिजर्व्हचा ताळे बंद मर्यादित आकारमानात येईल.   

परीणाम 

अमेरिकेत बहुतांशी व्यवहार हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/चेक/डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत असतात. या सर्व लोकांची विविध बँकांमध्ये खाती असतात, तर या बॅँकांची  फेडरल रिजर्व्ह मध्ये राखीव निधी आणि त्यासाठी खाती असतात. त्या मध्ये ताळमेळ राखला जातो. पण अत्यल्प काळासाठी जर एखाद्या बँकेला पैशांची गरज भासली तर बँक कर्ज घेतात आणि त्या कर्जावरील व्याज दर म्हणजे फेड फंड दर . 

व्यापारी बँकांना कर्ज म्हणून मिळणाऱ्या कर्जा  वरील व्याज दर वाढल्याने त्यांच्या  तर्फे  सर्वसामान्य ग्राहकांना वाटप होणाऱ्या  कर्जावरचा व्याज दर त्या वाढवतात. फेड फंड दराच्या वाढीमुळे कर्जावरील व्याज दरात वाढ होते.  वाढलेल्या व्याज दरांमुळे ग्राहक खरेदी कमी करतील, खरेदी कमी झाली म्हणजे मागणी कमी होईल, आणि म्हणून किंमती कमी होऊन महागाई नियंत्रणात येईल अशी अपेक्षा असते. 

कोव्हीड काळात आर्थिक मंदी चा सामना करण्यासाठी फेडरल रिजर्व्हने मोठ्या प्रमाणावर ट्रेजरी बिल्स आणि अन्य कर्ज खरेदी रोखे करून, मोठ्या प्रमाणावर रोख पैसे, रोकड सुलभता/रोखता बँकांना आणि सर्वनागरिकांना उपलब्ध  करून दिलेली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या महागाईवर उपाय म्हणून आता फेडरल रिजर्व्ह आपल्या जवळील ट्रेजरी बिल्स आणि अन्य काही अल्प मुदतीचे कर्ज रोखे बाजारात विकेल त्यामुळे बँकां जवळची जास्त रोखता, लोकां जवळील रोख रक्कम,ही पुन्हा फेडरल रिजर्व्ह कडे परत येईल, त्यामुळे लोकांजवळ खरेदी करण्यासाठी पैसे उरणार नाहीत, बँकाही कर्ज वाटप करणार नाहीत, त्यामुळे मागणी कमी होईल,आणि पर्यायाने महागाई (चलन वृद्धी) नियंत्रणात येईल. सरकारला दिलेली कर्ज कमी करण्यात येतील,पर्यायाने सरकारने  खर्च कमी करण्याचे संकेत दिले जातील.  

आर्थिक मंदी  

खरं तर आर्थिक वृद्धी आणि महागाई बरोबर चालत असतात. फेड फंड दरातील वाढी मुळे व्याजदर वाढतील, कर्ज घेऊन विकत घेतल्या जाणाऱ्या वस्तूंची मागणी कमी होईल,उद्योजक कर्ज महाग झाल्याने नवीन कर्ज घेणार नाहीत, तसेच बँक जुनी कर्ज वसूल करण्याच्या मागे लागतील,या सर्व कारणांमुळे आर्थिक वुद्धीचा दर घसरत जाईल. ही घसरण जर वाढत गेली तर आर्थिक मंदी चे संकट सुरु होइल असे व्यापार चक्राच्या सिद्धांतानुसार सांगितले जाते.  या काळात जशी मागणी कमी होते तसतशी बेरोजगारी वाढत जाते.  अमेरिकेत आर्थिक मंदी येऊ शकेल,आणि ती सर्व जगभर पसरू शकेल. (सध्या महागाई अशीच सर्व जगभर पसरत आहे.)

गेल्या तीन महिन्यापासून अमेरिकेत दर महिन्याला ३,७५,००० नवीन रोजगार निर्माण झाले, बेरोजगारीचा दर कमी झाला म्हणून फेड फंड दर वाढवता येऊ शकला. रशिया युक्रेन युद्धामुळे गॅस/पेट्रोल, घरं ,अन्नधान्य,वाहतूक यांच्या किमती प्रचंड वाढल्याने फेड फंड दर वाढवावा लागला. 

भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम  

भारतात गुंतवणूक करणाऱ्या परकीय गुंतवणूकदारांना जर  त्यांच्याच देशात अधिक व्याज दर मिळू लागले तर ते भारतात गुंतवणूक करणार नाहीत. म्हणजेच गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतात येणारे परकीय चलनाचा ओघ कमी होईल.  एव्हढेच नव्हे तर  भारतात केलेली गुंतवणूक काढून ती त्यांच्या देशात/अमेरिकेत परत नेली जाईल. 

जसजसे डॉलर्स अमेरिकेत परत जातील तसतसा भारतातील डॉलर्स चा पुरवठा कमी झाल्याने डॉलर रुपयाच्या तुलनेत महाग होईल,म्हणजेच रुपया गडगडेल. आयातीचे मूल्य वाढेल, पेट्रोल ,डिझेल,गॅस च्या तसेच आयात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या  किंमती  वाढू शकतील. तसेच  निर्यातदारांना बदललेल्या विनिमय दराचा फायदा होऊ शकतो. 


शिशीर  सिंदेकर,

नासिक. 

9890207692

shishirsindekar@gmail.com

Friday, July 15, 2022

मेडिक्लेम पॉलिसी : अपेक्षित लाभ



जर एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागलाभले कारण  आजार असो किंवा अपघात,  रुग्णालयाचा अनपेक्षित अकल्पित असा खर्च  उभा राहतोच  ! अशा खर्चाची काळजी घेण्यासाठी मेडिक्लेम अथवा आरोग्य विमा हे साधन उपलब्ध असते. परंतु त्यापापसुन अपेक्षित लाभ मिळण्यासाठीया विम्याच्या बाबतीत काही  सजगता बाळगणे जरुरी असते. आपण सर्वांनीमेडिक्लेम पॉलिसी बाबत पुढील काळजी नक्कीच घ्यावयास पाहिजे.  

मेडिक्लेम पॉलिसी मध्ये आपल्या सर्वच कुटुंबियांचा समावेश आहे किंवा नाही ते एकदा तपासून पहा. आपल्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती दाखल होताचमेडिक्लेम पॉलिसी मध्ये सुधारणा करण्यास हवी

आपल्या आर्थिक सल्लागारास, कुटुंबातील असे बदल आवर्जून सांगणे आवश्यक असते. आता ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखीलमेडिक्लेम पॉलिसी सुविधा उपलब्ध आहे. अगदी सत्तर वर्षाच्या व्यक्तीलासुद्धा मेडिक्लेम पॉलिसी मिळते. तेव्हा आपल्या आई-वडीलांच्या नावाचाही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समावेश करून घ्या. 

मेडिक्लेम पॉलिसी जुनी असली तरी बऱ्याच वेळा विमा कंपनीकडूनही चुका होऊ शकतात आणि “नो‌ क्लेम बोनस”पुढच्या नूतनीकरण झालेल्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जात नाही. पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी ही बाब देखील तपासून घेतली पाहिजे. 

बहुतेक सर्व मेडिक्लेम पॉलिसी कंपनी मार्फतदर दोन वर्षांनी किंवा चार वर्षांनी “मेडिकल टेस्ट” साठी लागणारा  सर्व खर्च दिला जातो. ह्या सुविधेचा लाभआपण वेळचेवेळी घ्यायला पाहिजे. मेडिक्लेम पॉलिसीचा लाभ मिळणेसाठीकुठल्याही आजारपणामुळे जर रुग्णालयात दाखल व्हावे लागले  तर कमीत कमी 2४ तास ऍडमिट असणे गरजेचे असते. ॲक्सिडेंट/अपघातच्या  केस मध्ये मात्र हे सक्तीचे नाही. अशावेळीतुम्ही उपचार घेऊन घरी जाऊ शकताफक्त कागदपत्रांची पूर्तता उपचारादरम्यानच करावी लागते. आपल्या 

आर्थिक सल्लागारालाआपण  "अर्था " शी  निगडीत असलेल्या आणि त्यावर परिणाम करू शकणाऱ्या सर्व बाबींची यथायोग्य, वेळेचेवेळी माहितीपूर्णपणे द्यायाला हवी.

अशी सर्व काळजी,  आपण घेतली तर मेडिक्लेम पॉलिसी  मार्फत अपेक्षित असणारे  लाभआपल्याला मनस्तापाशिवाय घेता येतील.

Friday, July 8, 2022

एस. आय. पी. आणि टर्म इन्शुरन्स - उदय पिंगळे


 

# एस. आय. पी.  बरोबर टर्म इन्शुरन्स न देण्याचेआदेश !


        म्युच्युअल फंड उद्योगाने आता चांगले बाळसे धरले आहे. वाढती महागाई घटते व्याजदर यांची कुठेतरी सांगड घालण्यासाठी गुंतवणूक करण्याचा अप्रत्यक्ष मार्ग म्हणून लोकांनी त्याचा स्वीकार केला. अनेक वर्षे लोकांना युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यावर यात खाजगी, परदेशी गुंतवणूक कंपन्या सहभागी झाल्या. या सर्वांनी म्युच्युअल फंड योजना तळागाळात पोहोचवण्याचे काम केले. थांबण्याची तयारी असेल तर यातून निश्चित फायदाच होतो. हा फायदा महागाई दराहून अधिक असल्याने आपली स्वप्ने लवकर पूर्ण होण्यास याचा हातभार लागतो हे लोकांना समजले आहे अनेक कंपन्यांनी त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी संपर्क व्यवस्था निर्माण केली. अनेक एजंट लोकांनीही भरपूर मेहनत घेतली त्याशिवाय योजनांचे मूल्यांकन करण्यास पुरेसा होईल एवढा कालावधी गेल्याने आज पारदर्शकपणे अनेक योजनांचा इतिहास उपलब्ध आहे. ज्याचा वापर करून गुंतवणूक नेमकी कुठे करावी या संबंधी निर्णय घेण्यास मदत झाली. जाहिरातीचा ही त्यात मोठा वाटा आहे. या काही वर्षात आलेल्या अनुभवातून बोध घेऊन सेबीने नियमात बदल केले. यातील महत्वाचे बदल असे-


★व्यवस्थापन खर्चावर नियंत्रण

★मध्यस्थाशिवाय योजना घेण्याची सोय 

★योजनांचे मालमत्ता प्रकारानुसार वर्गीकरण 

★फंड योजनेतील मालमत्तेचे एका योजनेकडून दुसऱ्या योजनेत हस्तांतरण करणावर नियमन

★एकाच प्रकारच्या दोन योजना आणण्यावर बंदी.

★मालमत्तेचे योजना प्रकारानुसार काटेकोर नियोजन


या सर्वांचा परिपाक म्हणजे आज या उद्योगात मे 2022 पर्यंत ₹37,37,087 कोटी मालमत्ता या व्यवसायात गुंतली आहे गेल्या 10 वर्षात या व्यवसायाची 5 पट वाढ झाली. प्रथमच 10 कोटी खाती निर्माण झाली आहेत. यात एसआयपीचा मोठा वाटा आहे सध्या पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख खातेधारकांकडून  ₹12, 286 कोटी दरमहा येत आहेत. अनेक तरुणांनी त्यांना सोईस्कर अशी गुंतवणूक अँपडाउनलोड करून त्याद्वारे ऑनलाइन गुंतवणूक म्युच्युअल फंडांकडे येत आहे.

या कालावधीत गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार अनेक योजना आल्या त्यामुळे जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार विविध पर्याय उपलब्ध झाले.

म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यापैकी अनेक  सहयोगी कंपन्या या सर्वसाधारण व जीवनविमा व्यवसायात  असल्याने  गेली अनेक वर्ष एसआयपी धारकांना त्यासोबत काही अटींवर टर्म इन्शुरन्स देत आहेत यासाठी धारकाकडून कोणताही आकार घेतला जात नसे तर इतर कंपन्या त्यांच्या योजनांची अशी सवलत न देता विक्री करत असत. जरी ही गृप इन्शुरन्स पॉलिसी असली तरी त्याची काहीतरी किंमत असे. ही किंमत जरी प्रत्यक्षात ग्राहकाकडून घेतली जात नसली तरी अप्रत्यक्षपणे योजनेचा खर्च विहित मर्यादेत ठेवून भागवला जात असणार किंवा इन्शुरन्स कंपनीच्या जाहिरातीवरील खर्च म्हणून दाखवला जात असावा असा अंदाज आहे,कारण येथे कोणी कुणालाही फुकट देण्यासाठी आलेला नाही.

फंडहाऊसकडून टर्म इन्शुरन्स देताना काही अटींची पूर्तता करावी लागत असे. त्यातील प्रमुख अटी साधारण या स्वरूपात असतात.

★युनिट होल्डरचे वय 51 वर्षांहून कमी असावे.

★पहिल्या वर्षी टर्म इन्शुरन्स एसआयपीच्या मासिक हप्त्याच्या 10 ते 20 पट असेल.

★दुसऱ्या वर्षी तो मासिक हप्त्याच्या 50 ते 75 पट असेल.

★तीन वर्षांनंतर तो मासिक हप्त्याच्या 100 ते 120 पट असेल.

★एकूण सुरक्षा कवच हे ₹ 50 लाख पेक्ष्या अधिक असणार नाही.

★चालू एसआयपी बंद केल्यास टर्म इन्शुरन्स रद्द होईल.

रस्त्यावरचा पाणीपुरीवाला शेवटी सुखी पुरी भेदभाव न करता सर्वाना फुकट देतो तर इथे एवढ्या साऱ्या अटी त्या पूर्ण केल्या तरच इन्शुरन्स कव्हर मर्यादेत मिळणार. या सर्व अटी ग्राहक या दृष्टीने एकतर्फी आहेत. वयाच्या अटीमुळे एक मोठा ग्राहक वर्ग या सुविधेपासून वंचित रहात होता. कालावधीनुसार देण्यात येणारे सुरक्षा कवच अपुरे आहे. अगदी ₹ दहा हजार मासिक एसआयपी असेल आणि तीन वर्षे होऊन गेली असली तरी मिळणारे सुरक्षा कवच ₹ बारा लाख हे सध्याच्या परिस्थितीत अपुरे आहे. तर ₹ चाळीस हजाराहून अधिक मासिक गुंतवणूक करू शकणाऱ्या व्यक्तीच्या ₹ 50 लाख ही सर्वोच्च मर्यादा खूपच कमी आहे. एसआयपी बंद केल्यानंतर ही सुविधा मिळत नाही त्यामुळे नाईलाजाने एसआयपी चालू ठेवावी लागेल. यामुळे एएमसी कंपनीस आणि तिच्या सहयोगी कंपनीस आपोआप ग्राहक मिळत होते आणि ते या अटी पाळू न शकल्यास त्यांची सवलत रद्द झाल्याने विमा कंपनीचा अप्रत्यक्ष फायदा होत असणार? या सर्वच खर्चावर योजना गुंतवणूकदारांनाचा अधिक हक्क असल्याने त्याचे लाभार्थी मर्यादित लोक ठरत असल्यास ते इतरांवर अन्याय करणारे आहे. हाच विचार करून सेबीने यापुढे म्हणजेच 1 जुलै 2022 पासून एसआयपी सोबत टर्म इन्शुरन्स देण्याच्या अनुचित व्यापारी प्रथेस बंदी घातली आहे. यापूर्वी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना करारात मान्य केलेल्या तरतुदींस अनुसरून त्यांची योजना संपेपर्यंत किंवा अन्य कारणाने बंद होईपर्यंत त्यांना यापूर्वी मान्य केलेले लाभ कायम राहातील.


©उदय पिंगळे

अर्थसाक्षर.कॉम येथे 1 जुलै 2022  रोजी पूर्वप्रकाशीत.

संदर्भ 

https://udaypingales.blogspot.com


Friday, July 1, 2022

तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता

तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता




प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच आणि प्रत्येक गोष्टींमधून पैसा कमवला जाऊ शकतो, जोपर्यंत पैशाचे महत्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावण्यापेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. आई वडील महिनाभराच्या खर्चासाठी जे पैसे देतात ते  दिवसात संपून जातात कारण प्रत्येक गोष्टीची आपण पैश्यामध्ये किंमत करत असतो पण पैश्याची किंमत कशात मोजायची हे कोणी समजावून सांगितलेले नसते! त्यामुळे पैसे कसे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे आणि का खर्च करायचे असे प्रश्न कधीच मनात उद्भवत नाहीत, सर्वांचे पैश्याबद्दलचे मत असेच आहे, बऱ्याच मुलांना हे समजत नाही की त्यांच्या पालकांनी पैशासाठी किती कठोर परिश्रम केले आहेत. जोपर्यंत आईवडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळत असतात तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्व कळत नाही.

पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही, कोणत्याही गोष्टीचे महत्व समजण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींमध्ये धक्के खावे लागतात, धक्के खाल्ल्याशिवाय आपल्या मेंदूला जाग येत नाही, आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते म्हणजेच आपला मेंदू सारासार विचार करू शकत नाही.

पैसे काय आहेत आणि पैशांच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो, पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे हि गोष्ट सुद्धा आर्थिक साक्षरतेमध्येच मोडते.

आर्थिक परिस्थिती नुसार आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे का? आपण खर्च कमी करून पैसे कसे वाचवू शकतो याची जाणीव करून देणे गरजेचे आहे का?? पैशांची बचत कशी करावी?  ह्या सर्व गोष्टी आर्थिक साक्षरतेचे ज्ञान प्राप्त केल्यावरच समजतात. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हे जाणून घेणे आवश्यक आहे. पैशांची गुंतवणूक कोठे करावी, विविध वित्तीय साधने, विविध मालमत्ता वर्ग इत्यादी बद्दलचे ज्ञान असल्यास आपण योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतो.

आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आपल्याजवळ नसणे म्हणजे आर्थिक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. जे उच्चशिक्षित श्रीमंत लोक असतात ते सहसा आर्थिक साक्षरता ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, असे लोक सहसा आर्थिक समस्यांना टाळत असतात, पैसा आणि शिक्षण हे माणसाच्या आयुष्यातील 2 मोठे पैलू आहेत, परंतु ह्या दोन्ही पैलूंचा विचार केला तरी गरीब, श्रीमंत, तरुण किंवा वृद्ध, सर्वांनाच आर्थिक साक्षरता का महत्वाची आहे ह्याची कारणे पुढील प्रमाणे –

1)     प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपण एक यादी बनवायला हवी ज्यामध्ये आपण पूर्ण महिन्याभरासाठी लागणार खर्च आणि महिनाभर आवश्यक असणाऱ्या गोष्टी लिहायला हव्यात. जसे की… महिनाभर आपल्याला अवश्य असणारी वीज, जेवण, घरभाडे, गाडीला लागणारा खर्च आणि इतर गोष्टींना लागणारे पैसे बाजूला ठेऊन बाकी पैसे बँकेत जमा करावेत जेणेकरुन आपला वायफळ खर्च होणार नाही आणि आपले पैसे सुद्धा सुरक्षित राहतील.

2)      तरुण पिढीला, कॉलेज किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना घरातून पॉकेटमनी मिळतो, अश्या मुलांनी पॉकेटमनी मधून पैसे वाचवायला शिकले पाहिजेत. लहान वयातच बचत करण्यास सुरुवात केली तर तरुण वयात बचत करण्याची सवय होऊन जाते. पालकांनी मुलांना पैसे देताना विचार करून पैसे द्यायला हवेत. पैश्याचे मूल्य काय आहे हे मुलांना पटवून द्यायला हवे. मुलांनी सुद्धा एका ठराविक वयानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरातून पॉकेटमनी घेणे बंद केले पाहिजे. स्वतःचा खर्च सुद्धा विचार करूनच करायला हवा.

3)      आजकाल पैश्यांची गुंतवणूक करण्यासाठी किंवा पैशांची बचत करण्यासाठी नवनवीन सुविधा  निघाल्या आहेत. जसे की बँक, इन्शुरन्स कंपनी , मुच्युअल फंड्स , फ़ायनान्शिअल कंपन्या, क्रेडीट युनिअन्स, मालमत्ता असेट मॅनॅजमेन्ट कंपन्या इत्यादी आपल्याला आर्थिक साक्षरते बद्दल ज्ञान असेल तर आपणाला पटकन समजते कि कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर  आपला फायदा होईल.

आजकालच्या युवकांना किंवा तरुण पिढीला आर्थिक साक्षरतेचे महत्व समजावणे खूप महत्वाचे आहे. तरुण मुलांच्या हा-तात पैसे आले की त्यांना नको त्या गोष्टी सुचतात. सिनेमापार्टी इत्यादी गोष्टींमध्ये पैसे वाया जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोजकेच पैसे द्यावेत ज्यामध्ये मुलांच्या गरजा भागातील, त्याचबरोबर मुलांना आर्थिक साक्षरतेची  शिकवण दिली तर पालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा कंट्रोल मध्ये राहणार आहे.

तरुण मुले/मुली भारताचे भविष्य आहेत. भारताची आर्थिक परिस्थिती कणखर बनवायची असेल तर तरुण मुला/मुलींना आर्थिक साक्षरतेची शिकवण देणे गरजेचे आहे. मुलांना पॉकेट मनी च्या बदल्यात कामे सांगा, मग बघा मुलांना पैशाचे महत्व सुद्धा कळेल आणि मुलांना पालक जे काम सांगतील त्या कामांची आणि काम करण्याची सवय सुद्धा होईल.

स्रोत : icats.co.in