Friday, February 24, 2023

अनुभव : आर्थिक नियोजनाचे महत्त्व :

 

रेडिओवर रोज सकाळी मी 'आरोग्यंम् धन संपदा' हे सदर ऐकते. खुप छान माहिती सांगतात. आजही नेहेमी प्रमाणे मी हे सदर ऐकत होते. मनात आलं, 'खरंच आहे.आपले आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. पैसा, संपत्ती महत्त्वाची आहेतच.पण आपले आरोग्य चांगले नसेल तर ती संपत्ती काय कामाची ? '


     माझ्या मनात हे विचार येण्याचे कारण म्हणजे,  मी काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधे ऍडमिट होते. अचानक माझ्या डाव्या पायावर सूज आली होती. पाच-सहा दिवस इंजेक्शनचा मारा आणि बाकी ट्रीटमेंट मुळे सूज कमी झाली .हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा आम्हाला बिल भरण्यासाठी काहीच अडचण आली नाही. याचे कारण म्हणजे माझे यजमान 'न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी' मध्ये आहे. त्यामुळे Mediclaim Policy अर्थात आरोग्य विमा घेण्याबद्दल आम्ही जागरूक होतोच आणि आम्ही तो योग्य रकमेचा घेतलाही होता. या उलट माझ्या शेजारच्या कॉटवर जी व्यक्ती  ऍडमिट होती त्यांना आधीच डिस्चार्ज मिळाला होता. पण त्यांची पत्नी मात्र, बिलाच्या रक्कमेची जमवाजमव करणेसाठी  धावपळ करत होती !,मी विचारल्यावर समजले की तिने पूर्वी आरोग्य विमा पॉलिसी  घेतली होती पण नंतर त्याचे हप्ते भरले गेले नव्हते. म्हणून नंतर परत दुसऱ्या कंपनीची पॉलिसी घेतली गेली आणि  तीही  ऑनलाईन !  त्याबद्दल तिला व्यवस्थित माहिती नव्हती. ती खुप गोंधळली होती. एखाद्या माहितगार आणि चांगल्या संस्थेकडे जाऊन आर्थिक नियोजन करून घेणे  किती महत्वाचे आहे, हे तेव्हाच मी तिला समजावले. 

आयुष्यात कधीही, कोणावरही असे संकट अचानक येऊ शकते. त्यासाठी विश्वासू, मदतीस तत्पर आणि ओळखीतला  आर्थिक सल्लागार असणे खूप महत्वाचे आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थीती उद्भवण्यापूर्वीच आर्थिक नियोजन करून घेणेही महत्त्वाचे आहे.  इतरांच्या अनुभवातून आपणही शहाणे होऊयात !

-सौ. विद्या शुक्ल 

नाशिक