Friday, October 2, 2020

मनो-Money: भाग १४ ब्लू बुक !! - डॉ. रुपाली कुलकर्णी

 

राधा आणि बाबा दोघेही कॅरम खेळता खेळता गप्पा मारत असतात.

राधा: बाबा, आज एक गंमत झाली ! मी या शाळेत डबा न्यायची विसरले आणि माझ्याकडे पैसे असतानादेखील मी सारा कडून पैसे घेऊन कॅन्टीनमध्ये जाऊन जेवले !!

बाबा: अरेच्चा !  असे कसे काय झाले आज ?

राधा: अहो, आईने माझ्या दप्तरात “इमर्जन्सी फंड” म्हणून कायम पन्नास रुपये ठेवलेले असतात म्हणे... पण ती हे मला सांगायचे विसरूनच गेली बाबा !!

बाबा: अरे खरंच गंमत झाली की ! पण राधा पैशांच्या बाबतीत अशा चुका बरीच मोठी मंडळीही करत असतात बर का !

राधा: ते हो कसे काय बाबा?

बाबा:  अगं,  बऱ्याच घरांमध्ये कुटुंबासाठी घेतलेले आर्थिक निर्णय, केलेली गुंतवणूक किंवा बचत ही कुटुंबातील सदस्यांना सांगितलीच जात नाही आणि मग अडचणीच्या काळामध्ये, कर्त्या व्यक्तीच्या अभावी, पैसे असूनही, कुटुंबीयांना त्याचा योग्य प्रकारे लाभ घेता येत नाही.

राधा: खरेच हो बाबा, आज आईने माझ्याचसाठी पैसे ठेवलेले असताना देखील मला केवळ माहिती न दिल्याने ते मला वापरता आले नाही.

बाबा: राधा, अगं ही किरकोळ रक्कमेबाबतची गोष्ट आई विसरली तर ठीक आहे. परंतु बऱ्याच घरांमध्ये सगळ्यांसाठी घेतलेले आर्थिक निर्णयही घरात शेअर होत नाहीत. परिणामतः कुटुंबातील सदस्यांना घरातील आर्थिक चित्राची जाणीवच होत नाही. आपल्या शिंदेकाकांच्या घरातीलच किस्सा बघ ना ! काकांनी घरासाठी, मुलांसाठी, काकुंसाठी, आजी -आजोबांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारे पैसा जमेस ठेवला होता. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर मात्र असा पैसा त्यांच्या कुटुंबियांनाच माहीत होण्यास किती अडचणी आल्या.

राधा: मग तर घरातील प्रत्येक कर्त्या-कमवित्या व्यक्तींनी आपले आर्थिक निर्णय, कुटुंबियांना वेळीच कळविले पाहिजेत.

बाबा: अग घरातील अशा आर्थिक निर्णयांचा लेखाजोखा असणारे पुस्तक किंवा नोंदवहीस आम्ही ब्लू-बुक म्हणतो. यात कुटुंबा संबंधित असलेल्या सर्व आर्थिक नोंदी केलेल्या असतात. म्हणजे घरातील सर्व बचत खाती, गुंतवणूक, विमा, स्थावर मालमत्ता, आयकर, दिलेली आणि घेतलेली कर्जे अशासंबंधी सर्व माहिती या ब्लू-बुक मध्ये नोंद केलेली असावी. तसेच हे ब्लू-बुक कर्त्या व्यक्तीने घरातील सर्वांनी दाखवायला, समजवायला हवे.  म्हणजे मग अडचणीतल्या काळात, दुर्दैवी घटनेच्या वेळी, कुटुंबाला आपल्यासाठी असणारी आर्थिक सुविधा लक्षात येते. आणि केलेल्या बचत, विमा, गुंतवणुकीचा त्यांना आवश्यकता असताना लाभ घेता येतो.

राधा: बाबा, खरंच किती महत्त्वाचे आहे हे ब्लू-बुक !  

बाबा: हो अशा नोंदी ठेवणे किवा करणे हे “आर्थिक साक्षर” असल्याचे प्रतीक आहे.

राधा: मला तर फारच आवडली ही सुज्ञता ! ब्लू-बुकमुळे घरातील सगळ्यांनाच आपल्या आर्थिक परिस्थितीचे नेमके ज्ञान होते. आपल्यासाठी घरातील व्यक्ती किती करतात याची जाणीव असणे, ही सुरक्षिततेची भावना वाढवणारी बाब आहे बाबा !!

बाबा: बरोबर राधा ! लागणार का मग कामाला !! तुझ्या जवळचा मित्रवर्गालाही यासंबंधी सांग सांगशील ना?

राधा: हो बाबा ! नक्कीच !!

-   डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड