Friday, October 16, 2020

मनो-Money: भाग १५ :सुटता संयम !! - डॉ. रुपाली कुलकर्णी

 


सुटता संयम ....

राधा एकदम ऑफ मूडमध्ये बाबांकडे येते.

बाबा : काय झालेय मॅडम ? इतका का मूड खराब ?

राधा : बाबा, मी आईचे  ऐकले नाही आणि त्याचे मलाच खूप वाईट वाटतंय आता. मी आईच्या मागे लागून ऑनलाईन शॉपिंग साईट वरून माझ्यासाठी शाळेची बॅग मागविली आणि ती इतकी वेगळीच निघाली आहे  की आता परत करावी लागणार. आई मला सांगत होती की रविवारी आपण दुकानात जाऊन, चांगली बघून आणू. पण मलाच धीर निघाला नाही तेव्हा लगेच ऑनलाईन ऑर्डर केली होती.

बाबा: अच्छा.. असा मामला आहे तर !! राधा, रविवार पर्यंत थोडा धीर धरला असतास  तर अशी मनःस्तापाची वेळ आली नसती ना !

राधा: हो ना बाबा ! आता काय करू?

बाबा : आता ह्यातून आपण योग्य तो धडा घ्यायचा आणि पुढे खरेदी करतांना संयम बाळगायचा ! ऐक , एक गोष्ट सांगतो तुला. हा अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत घडलेला प्रसंग आहे. काही मानसशास्त्रज्ञ, संशोधक यांनी एक प्रयोग करायचे ठरविले . त्यासाठी त्यांनी काही  लहान मुलाना एका वर्गात एकत्र केले. त्या वर्गात  छुपे कॅमेरे लावलेले होते. मुलांना आत बोलावले गेले. त्यांच्या समोर छानश्या प्लेट मध्ये त्यांची आवडती मिठाई.... 'मार्शमेलो' ठेवली होती. मुले एकदम खुश झाली आणि कधी  एकदा ती मिठाई खाऊ असे त्यांना वाटू लागले. मग मात्र मुलांना  प्रयोगाची एक अट सांगण्यात आली. "जी मुले ही मिठाई  20 मिनिटे न खाता तशीच ठेवतील, त्यांना बक्षीस म्हणून दोन मार्शमेलो मिळतील !" आणि मग सर्व मोठी  मंडळी वर्गाच्या बाहेर गेली. अत्यंत आवडती वस्तू समोर असूनही त्याचा आस्वाद न घेता नुसतं पहात रहायचं ही मुलांच्या संयमाची परिक्षा बघणारी गोष्ट होती.  मुलांच्या हालचालींचे, हावभावांचे पूर्ण चित्रीकरण करण्यात येत होते. बरीच मुले नाही धीर धरू शकली आणि त्यांनी त्यांच्या वाट्याची मिठाई फस्त केली.  पण काहींनी, अगदी मोजक्या मुलांनी चांगला संयम दाखवत अजून दोन मार्शमेलो मिळवले आणि ते जिंकले!  पण, मानसशास्त्रज्ञ, संशोधक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे बरीच वर्षे या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीचा मागोवा घेतला. ते या सर्व मुलांच्या संपर्कात राहिले आणि त्यांना असे आढळून आले की, जी मुले स्वतःवर संयम ठेवू शकली, धीर धरू शकली  तीच  मुले पुढील आयुष्यात बाकी मुलांपेक्षा जास्त यशस्वी झाली.

राधा : बाबा, खरे आहे हो ! मी जरा रविवार पर्यंत धीर धरला असता तर मला कदाचित अजून चांगली बॅग मिळाली असती !

बाबा : राधा, बऱ्याचदा आपल्याला जवळ असलेले पैसे, चांगली वस्तू दिसली की खर्च करायचा मोह होतो. त्यावेळी आपली विवेकबुद्धी आपण वापरायला हवी आणि विचार करायला हवा की 'खरोखरच ह्या गोष्टीची मला आवश्यकता आहे का ? असेल तर तातडीने आवश्यकता आहे की अजून चांगले पर्याय शोधण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे ?' असा विचार करायला शिकणे गरजेचे आहे. नाहीतर आपण असणाऱ्या साधनांचे, वेळेचे , पैशांचे  चांगले नियोजन करण्यात अयशस्वी होतो. आपण पेपरमध्ये अशा कित्येक बातम्या वाचतो की आमिषाला भुलून किंवा गुंतवणूक पर्यायांचा योग्य तो अभयास न करता, कित्येक जण अयोग्य ठिकाणी पैसे गुंतवतात आणि ते  गमवितात. तेव्हा मोठी मंडळीही अशा चुका करतात !! म्हणून म्हणतो राधा, संयम ठेवण्याची, अभ्यासपूर्वक आपला वेळ, साधने आणि पैसा वापरायची सवय आपण जितक्या लवकर लावू तितके चांगले ! त्या वेळेत कदाचित आपल्याला अजून उत्तम पर्याय, वस्तू, साधने मिळू शकतात . हो की नाही ?

राधा : खरे आहे बाबा , मी नक्की आता अशी सवय लावण्याचा प्रयत्न करीन.

बाबा: चलो, व्हेरी गुड !! इस बातपे हम दोनो भी दो-दो मार्शमेलो खा लेते हे !!

 

... आणि मग दोघेही हसत हसत मिठाई फस्त करतात !!    

-   डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड