Friday, October 30, 2020

मनो-Money: भाग १७ :भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! .... - डॉ. रुपाली कुलकर्णी

 



भरल्यापोटी पुढचा घास नकोच !

राधा आज आई बाबांबरोबर एका रेस्तराँ मध्ये आलेली आहे. हे एका प्रख्यात महाविद्यालया जवळचे रेस्तराँ असल्याने तिथे तरुणवर्गाची खूपच वर्दळ दिसते आहे.

राधा : आई, इथे किती झकास वातावरण आहे. संगीतही किती छान वाजतेय इथे !

आई: हो खरंय, मस्तच आहे सगळे ! पण लक्ष देऊन ऐकले तरच. बघ ना, बहुतांश सगळ्यांच्या माना खाली आणि हातात महागडे मोबाईल्स ! हे सगळे एकमेकाना  विसरून गॅझेट्स मध्ये दंग झालेले दिसताहेत.

राधा: हे ग काय आई ? तू तर सारखीच टीका करत असते या मोबाईल युजर्सवर. बाबा, आपण आपल्या आवडीचे  डोसे मागवूयात हं.

बाबा : ते तर मी मागविलेत राधाताई ! पण आई म्हणतेय ते खरे आहे की नाही सांग बरे ? आपण अधिक वेळ एकत्र घालविण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी असे बाहेर पडतो. मग तो सगळा वेळ, जर  मी आणि आई मोबाईल उघडून बसलो तर तू कंटाळशीलच की नाही ?

राधा: हो बाबा, खरे आहे आईचे सुद्धा. पण आता मोबाईल्स इतके प्रगत तंत्रज्ञानाचे येतात. शिवाय दादाने सांगितले की  ते शून्य टक्के व्याजदराने E. M. I.  वरही  मिळतात. मग ही कमाविती मंडळी, का नाही  घेणार असे मोबाईल्स?

बाबा: राधा ही  शून्य टक्के व्याजदराची कर्जे तशी फसवी असतात बरं का !  अशी कर्जे घेताना, केवळ व्याज द्यावे लागणार नाही म्हणून खूप लोक अनावश्यक कर्जे घेत सुटतात आणि मग आपलाच आर्थिक बोजा वाढवित रहातात.

आई: हो. अशा सुविधा गरजू लोकांसाठी असतील तर खरेच चांगले आहे. त्यातून अत्यावश्यक असेल तर घर, गाडी घेणे आपण समजू शकतो आपण. पण  असे शून्य टक्के व्याजदर बघून लोक अगदी  अनावश्यक खरेदी करताना दिसतात. ते मात्र चुकीचे आहे.

राधा: (डोस्यावर ताव मारता मारता) : म्हणजे मग असे नवनवीन सुविधा घेउन येणारी गॅझेट्स घ्यायचीच नाही का बाबा ? मग आपण प्रगत तंत्रज्ञान शिकणार कसे ?

बाबा: असे नाही राधा. मोबाईल असणे ही आज बहुतेकांची गरज झालेली आहे. आणि  गरज असल्यास खरेदी जरूर करावी. पण आज आपण कित्येक मंडळी अशी बघतो की  जी मोबाईल किंवा गॅझेट्स ची पुढची व्हर्जन्स आली रे आली की जुनी गॅझेट्स विकून, नवीन खरेदी करतात. मग त्यातील कित्येक नवीन फीचर्सची  आपल्याला गरज  आहे की नाही हा सारासार विचार फारसा कोणी करतच नाही. गरजेसाठी खरेदी आणि वारंवार चंगळ म्हणून खरेदी हा फरक ज्याला समजतो तोच खरा समजूतदार !

राधा: हो असे होते ह बाबा. साराच्या दादाने असे कित्येक मोबाईल्स बदलले आहेत. त्याला आता मी हे सगळे सांगणार आहे. आणि हो माझे पोट भरले बर का !

आई: नाही नाही, फ्री मिळतेय म्हणून एक पावभाजी अजून खा आता !

राधा (हसून दाद देत ) : नाही आई , पोटाची गरज संपली आहे तेव्हा पावभाजीची चंगळ नको ग . भरल्यापोटी पुढचा घास नकोच आता !

तिघेही हास्यकल्लोळात सामील होतात.  राधाला आजचा पाठ समजला म्हणून आई-बाबा एकमेकांना टाळी देतात !          

                       

-                 डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड