दानाचा
अर्थ की अर्थाचे दान ....
राधा आज
एकदम खुश आहे. संध्याकाळी शाळा सुटल्यावर, अगदी धावत-पळत आई बाबांकडे येते आणि
त्यांचा संवाद सुरु होतो.
राधा: आई, बाबा, आज मला कसल भारी वाटतंय
म्हणून सांगू ! मी जाम खूष आहे बर का !!
आई: व्वा ! काय झाले असे शाळेत आज ?
राधा: अग, आमच्या शाळेत न आज, एका
संस्थेची काही दिव्यांग मुले आली होती. सगळी आमच्याच तर वयाची होती. त्या
सगळ्यांनी मिळून, एक तास भर इतका सुंदर, मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला की
आम्ही अगदी आवक झालो. त्या कार्यक्रमाचा दर्जा बघता, ती मुले दिव्यांग असतील असे
वाटत सुद्धा नव्हते.
बाबा:
अच्छा, म्हणून स्वारी इतकी खूष आहे तर !
राधा:
फक्त हेच कारण नाहीय बाबा. त्या कार्यक्रमानंतर, मी उत्स्फुर्तपणे वर्गातील सर्व
मुलांना आवाहन करुन, आपापल्या खाऊचे पैसे एकत्र करण्यास सांगितले. आणि मग त्या
संस्थेसाठी, जवळपास ५०० रु. देणगी आम्ही मदत म्हणून दिली. आणि या आमच्या
तत्परतेबद्दल, सामाजिक भान दाखविल्या बद्दल सर्व शिक्षकवृंदाने वर्गाचे आणि
वर्गप्रमुख म्हणून माझे जाहीर कौतुक केले!
आई:
अच्छा असा मामला आहे तर ! राधा, तुझे खरच कौतुक आहे. पण राधाबाई, जरा विचार करुन
सांगशील का की तुला नेमके कशामुळे आनंद झाला आहे ? दिव्यांग मुले, एक चांगला
कार्यक्रम सादर करू शकली म्हणून की तुझे कौतुक झाले म्हणून ?
राधा: हे
ग काय आई? मला अर्थातच त्या मुलांच्या कलाप्रदर्शनामुळे आनंद झालाय !
आई: अरे
वा राधा, आम्हाला विश्वास होताच, फक्त मी जरा स्पष्ट विचारून खात्री केली इतकेच!
बाबा: पण
राधा, ह्या प्रश्नाकडे जरा दुसऱ्या दृष्टीकोनातून बघुयात. कित्येक दानी व्यक्ती
विविध सामाजिक संस्थाना आर्थिक स्वरुपात मदत करित असतात. ह्या दानाचा अर्थ असा
असतो की त्यांना सामाजिक दायित्वाचे भान आहे आणि त्यासाठी ते ही दानाची कृती ते करित
आहेत. पण त्यातील काही व्यक्ती, सोशल
मिडीयाचा वापर करुन आपल्या सामाजिक कृतीचे सार्वजनिक प्रदर्शन, स्वतःच्या
कौतुकासाठी करताना दिसतात. माझ्यामते मग मात्र, अशा दानाला अर्थ न रहाता ते केवळ
‘अर्थाचे दान’ होते नाही का ?
राधा(चिडून)
: पण बाबा, मी असले काही केलेय का? तुम्ही मला का सांगताय असे? अशा सोशल मिडिया
पोस्ट वाचण्यात आल्या की आपल्यालाही काही चांगले काम करण्याची उर्मी होतेच ना?
बाबा: अग
हो, हो राधा! पण खूप कमी जणांना अशी साधक विचार करुन, व्यापक
कारणास्तव कृती करताना आपण बघतो. इतरांना प्रेरणा मिळावी, हा निव्वळ उद्देश असेल
तर चांगलीच गोष्ट आहे!
आई: आणि
राधा, आपल्या दानाला अशा “सोशल मिडिया” पद्धतीने व्यापक करण्यापेक्षा, आपले दान
अधिक व्यापक होण्यासाठी प्रयत्न करता येतात. म्हणजे तुम्ही आज जी मदत केली
तिच्याकडे एका वेळेची आर्थिक मदत म्हणून न बघता त्या मुलांबरोबर वेळ घालविणे,
त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे असे काम करायला
हवेय.
राधा:
आईं, बाबा किती चांगल्या गप्पा मारल्या आपण! आता मला दानाचा अर्थ आणि अर्थाचे दान
यातला फरक समजला बरका! मी लवकरच माझ्या वर्ग मित्रांसोबत त्या संस्थेस भेटही देऊन
येणार आहे आणि आणि त्यांच्यासाठी अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्नही करणार आहे !!
आई- बाबा
समाधान पावतात आणि राधाला शाबासकी देतात !!
-
डॉ. रुपाली कुलकर्णी,
-
ट्रेनिंग हेड