Friday, June 10, 2022

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

 



गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

गुंतवणूक हा आर्थिक नियोजनाचा महत्वाचा भाग आहे. परंतु, दुर्दैवाने फार कमी लोकांना गुंतवणुकीचे महत्व कळते. आजच्या लेखात आपण गुंतवणुकीची प्रमुख कारणे कोणती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 


आपण या लेखात गुंतवणुकीची प्रमुख कारणे पाहणार आहोत. 

१. आपली आर्थिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी:

  • आपण ठरवलेली आर्थिक उद्दीष्ट्येच  गुंतवणुकीची प्रेरणा देत असतात. मग ती उद्दिष्टये स्वतःच घर विकत घेण्याचं असो,मुलांच्या उच्च शिक्षणाचं असो,आलिशान गाडी घ्यायचं असो किंवा सेवानिवृत्ती नंतर आरामदायी क्षणांचं असो.
  • आपल्या आर्थिक उद्दिष्टांची यादी करा आणि  ही उद्दिष्टये साध्य करण्यासाठी त्यानुसार आवश्यक जमापुंजी बाळगणे आवश्यक आहे. म्हणूनच गुंतवणूक करताना अल्प-मुदत किंवा दीर्घ-मुदतीचे पर्याय निवडून योग्य परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा प्रारंभ करावा. 

२. कर वाचवण्यासाठी 

  • कर वाचविण्यासाठी १९६१ च्या आयकरकायद्याच्या कलम ८० सी नुसार पगारधारकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 
  • आपलं करपात्र उत्त्पन्न कमी व्हावे म्हणून वेगवेगळे गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करायला हवा. 
  • वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकता. 

३. दीर्घकाळासाठी आर्थिक संपत्ती तयार करणे:

  • संपत्ती निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी गुंतवणूकीची योजना तयार करणे पूर्णपणे आवश्यक आहे.
  • दीर्घकाळासाठी संपत्ती तयार करण्याच्या हेतूने गुंतवणुकीचा विचार करताना आकर्षक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी अशा पर्यायांचा विचार करावा.

४. सेवानिवृत्तीची सोय म्हणून:

  • आजची पिढी चांगली म्हणजे पाश्चात्य  जीवनशैलीच्या आहारी जाऊन सगळ्या गोष्टींसाठी खर्च करत असते. 
  • निवृत्तीनंतर निवांत आणि चिंतामुक्त आयुष्य घालवायचे असेल, तर हाताशी पुरेशी गुंतवणूक असायला हवी. 
  • कुठलीही वेळ सांगून येत नसते म्हणून अचानक येणारं आजारपण तसेच इतर काही पारिवारिक बऱ्याचदा ही उंचावलेली जीवनशैली राखण्यासाठी निवृत्तीनंतरच्या नियोजनाचा विसर पडतो. पण जर अडचणींवर मात करण्यासाठी योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 


५. भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास:

  • व्यवसाय सुरु करायचं म्हटलं की पुरेसं भांडवल असणं आवश्यक आहे. 
  • आर्थिक गुंतवणूक ही व्यवसाय निर्मिती आणि वाढीचा महत्वाचा भाग आहे. 
  • भांडवल निर्मितीच्या उद्देश्याने गुंतवणूक करण्यासाठी जोरदार परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करायला हवा.
  • अनेक मोठे गुंतवणूकदार व्यवसाय वाढीसाठी किंवा नवीन स्टार्टअपसाठी वित्त पुरवठा करतात. ते नवीन व्यावसायिकांना उद्योग स्थापन करण्यासाठी हातभार लावतात. पण असे गुंतवणूकदार शोधणे सोपं नाही, म्हणून वैयक्तिक गुंतवणूक असणे आवश्यक आहे.  
  • व्यवसाय सुरु करणे व वाढविणे ही फारशी सोपी गोष्ट नव्हे म्हणून आपली प्रारंभिक आर्थिक योजना तयार असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करू शकाल.      


 ६. आपली जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी:

  • असं म्हणतात कोणतीही वेळ सांगून येत नसते. अर्थात उद्या काय होईल याचा तर्क आपण कोणीही काढू  शकत नाही. 
  • प्रत्येकाचे आयुष्य अनिश्चित प्रसंगांनी भरलेलं असते. कधी एखादी दुर्दैवी घटना घडू शकते ज्यामुळे तुम्हाला अचानक अनेक आर्थिक संकटाना तोंड देणं भाग पडू शकतं.  
  • अशा आर्थिक बदलांना सामोरे जाण्यासाठी उशाशी थोडा पैसे बाळगून असणं केव्हाही चांगलंच.
  • आपल्या गुंतवणुकीच्या काही भागाची गुंतवणूक आपण कधीही तात्काळ काढू शकतो अशा पर्यायांमध्ये करावी ज्याला ‘तरल गुंतवणुक’ असं म्हणतात. 
  • यामुळे काही भीषण परिस्थितीत नोकरी करणे शक्य नसले तरी या गुंतवणुकीची मदत घेऊन तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवू शकता तसेच रोजची जीवनपद्धती देखील विस्कळीत होणार नाही.

७. वायफळ खर्च कमी करण्यासाठी:

  • तुमच्याकडे किती नवनवीन कपडे किंवा किती लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आहेत यामुळे तुमच्या भविष्यावर फारसा फरक पडत नाही. मात्र तुम्ही किती गुंतवणूक केली आहे याचा संबंध तुमच्या भविष्याशी येतो. म्हणूनच योग्य वयात आपल्या काही वायफळ सवयींवर नियंत्रण ठेऊन अनावश्यक खर्च कमी करायला हवे. 
  • बचत खात्यात पैसे गुंतवणे, स्टॉक मार्केट, बँकेची मुदत ठेव योजना (एफडी), बॉण्ड्स अशा काही पर्यायांचा विचार करून गुंतवणुकीची सुरुवात करायला हवी. यामुळे ठराविक आर्थिक शिस्त राखली जाईल . 
  • गुंतवणूक ही एखाद्या झाडाप्रमाणे आहे, आज ते झाड लावलं, नियमित लक्ष दिलं तरच त्याची फळे उद्या खायला मिळतील. त्याप्रमाणे आज योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा भविष्यात दिसेल. 


८. भविष्याचं आर्थिक नियोजन आणि आर्थिक सुरक्षितता 

  • भविष्याच्या दृष्टीने वित्त व्यवस्थापनाचा विचार करत असाल तर मासिक खर्चाच सुद्धा योग्य नियोजन व आर्थिक शिस्त हवी. गुंतवणुकीची सुरुवात लवकर केल्यास आपली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आपण अधिक सक्षम होऊ शकतो. 
  • अतिरिक्त पैसा जवळ असणे हे गुंतवणुकीचे मुख्य धोरण आहे.भविष्यात येणाऱ्या अचानक अडचणी उदाहरणार्थ, घरात कुणाचं एखादं मोठं आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अशा अनेक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आवश्यक आहे. 
  • आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे संतुलन राखणे आवश्यक आहे. 

थोडक्यात,गुंतवणुकीमुळे आपल्या पैश्याची वाढ होण्यास मदत होते,आपली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करता येतात. तसेच भविष्यातील आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी योग्य जमापुंजी तयार करता येते. त्यामुळे योग्य आर्थिक नियोजन करून गुंतवणुकीस प्रारंभ करा व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याचा आनंद घ्या.  


-- साभार : अर्थसाक्षर