Friday, April 2, 2021

डोअरस्टेप बँकिंग सुविधा


 

सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर आहे. त्यांना आता घरबसल्या बँकांच्या सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना आता घरबसल्या पैसे आणि काढता येणार आहेत. याचाच अर्थ सरकारी बँकेत ज्यांची खाती आहेत, त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही.


कोट्यवधी बँक ग्राहकांना घरबसल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळं ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही. सरकारी बँकांद्वारे 'डोअरस्टेप डिलिव्हरी' सुविधा देण्यात येत असून, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं बँकेत जाण्याचा त्यांचा त्रास वाचणार आहे. रिझर्व्ह बँकेने काही वर्षांआधीच डोअरस्टेप बँकिंग सुविधा सुरू करण्याचा सल्ला बँकांना दिला होता. सार्वजनिक बँकांनी हा सल्ला गांभीर्यानं घेतला आहे. आता ही सुविधा ग्राहकांना देण्यासाठी संयुक्तरित्या एखादी यंत्रणा नियुक्त करण्याची तयारी बँकांनी सुरू केली असून, त्यामार्फत ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

युको बँकेनं सर्व सरकारी बँकांच्या वतीनं 'रिक्वेस्ट ऑफ प्रपोझल' (आरपीएफ) प्रसिद्ध केलं असून, कॉल सेंटर, वेबसाइट आणि मोबाइल अपची सुविधा देणाऱ्या खासगी कंपन्यांना आवाहन केलं आहे. बँकांद्वारे नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत एजंटची नेमणूक करण्यात येईल आणि ते दुसऱ्या टप्प्यात ठेवी जमा आणि पैसे काढण्याच्या सुविधेसह विविध डिव्हाइसच्या माध्यमातून सेवा ग्राहकांना देतील. सुरुवातीला डोअरस्टेप बँकिंग सुविधा केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांना देण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या अन्य ग्राहकांनाही सुविधा पुरवण्यात येईल. मात्र, त्यासाठी किमान शुल्क द्यावे लागणार आहे. ही डोअरस्टेप बँकिंग सुविधा सरकारच्या Enhanced Access and Service Excellence  (EASE) उपक्रमाचा भाग आहे.

डोअरस्टेप बँकिंग सुविधेद्वारे वित्तीय आणि गैरवित्तीय अशा सेवा पुरवण्यात येणार आहेत. वित्तीय सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेत पैसे जमा करणे आणि पैसे काढता येणार आहेत. तर गैरवित्तीय सेवांमध्ये धनादेश आणि ड्राफ्ट्स पुरवण्याचे काम केले जाईल. याशिवाय खात्याची माहिती दिली जाईल. चेकबुक, ड्राफ्ट्स, टर्म-डिपॉझिट रिसिप्ट आदी ग्राहकांना देण्यात येतील.