Friday, June 11, 2021

करावे कर-समाधान : एचयूएफ आणि प्राप्तिकर कायदा

 



कर नियोजन करताना या बाबींचा विचार करदात्याने केला पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नावर करदात्याला वैयक्तिकरीत्या कर भरावा लागणार नाही.


भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हा एक संस्कृतीचा भाग होता. शिक्षण, नोकरी-धंदा वगैरे कारणांमुळे कुटुंब आपले गाव सोडून शहराकडे किंवा परदेशात स्थलांतरित झाली. हळूहळू ही संस्कृती लोप पावत चालली आहे. आता कुटुंब हे छोटे होत चालले आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार ‘हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ)’ हे वेगळी ‘व्यक्ती’ समजली जाते. कर नियोजनाच्या दृष्टीने ‘एचयूएफ’ हे खूप महत्त्वाचे आहे. हे एचयूएफ म्हणजे काय? हे कसे स्थापन होते? त्याचे काय फायदे आहेत? असे अनेक प्रश्न करदात्यांना पडतात.

पुरुषाला वारसा हक्काने मिळालेली संपत्ती कुटुंबाची (एचयूएफ) समजली जाते. तीन पिढय़ांकडून म्हणजे पणजोबा, आजोबा किंवा वडील याच्याकडून मिळालेली संपत्ती ही वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असते. अशा संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे कुटुंबाला करपात्र असते. स्त्रीला तिच्या माहेरच्या कुटुंबातून संपत्ती मिळाल्यास ती संपत्ती ही स्त्रीची वैयक्तिक संपत्ती समजली जाते आणि त्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे त्या स्त्रीच्या वैयक्तिक उत्पन्नात गणले जाते. प्राप्तिकर कायद्यानुसार एचयूएफ ही स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्याचे उत्पन्न करदात्याच्या वैयक्तिक उत्पन्नापेक्षा वेगळे समजले जाते. कुटुंबाच्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे कुटुंबाला करपात्र असते. अशा कुटुंबाच्या उत्पन्नासाठी एचयूएफच्या नावाने विवरणपत्र दाखल करता येते. हिंदू पुरुषाचे लग्न झाल्यानंतर एचयूएफ आपोआप स्थापन होते. मुले जन्मल्यावर ते आपोआप कुटुंबाचे सदस्य होतात. मुलीचे लग्न झाल्यावर ती वडिलांच्या ‘एचयूएफ’मध्ये सदस्य राहात नाही, परंतु ती को-पार्टनर म्हणून राहते. बौद्ध, शीख, जैन कुटुंबसुद्धा ‘एचयूएफ’ स्थापन करू शकतात. ‘एचयूएफ’चे स्वतंत्र पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) काढून वेगळे बँक खाते उघडता येते. एकटा हिंदू पुरुष एचयूएफ स्थापन करू शकत नाही.

कर नियोजन करताना या बाबींचा विचार करदात्याने केला पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नावर करदात्याला वैयक्तिकरीत्या कर भरावा लागणार नाही. उदा. करदात्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे, करदात्याचे पगारापासून १५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे आणि त्याला वडिलोपार्जित संपत्तीमधून ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न त्याने स्वत:च्या उत्पन्नात दाखविल्यास त्याला या ४ लाख रुपयांवर त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार ३० टक्के म्हणजे १,२०,००० रुपये इतका कर भरावा लागेल. हेच उत्पन्न त्याने ‘एचयूएफ’च्या नावाने दाखविल्यास प्रथम २,५०,००० रुपयांवर कर भरावा लागणार नाही आणि बाकी १,५०,००० रुपयांवर ५ टक्के इतका कर भरावा लागेल. ‘एचयूएफ’मध्ये ‘कलम ८० सी’ नुसार १,५०,००० रुपयांपर्यंतची गुंतवणूक केल्यास ‘एचयूएफ’ला कर भरावा लागणार नाही (विवरणपत्र मात्र भरावे लागेल).

एचयूएफ ‘कलम ८० सी’नुसार गुंतवणूक करू शकतो. कुटुंबाच्या सदस्याचा विमा हप्ता भरू शकतो, इक्विटी लिंक्ड बचत योजना, मुदत ठेव वगैरेमध्ये या कलमानुसार गुंतवणूक करू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये मात्र एचयूएफ गुंतवणूक करू शकत नाही.

एचयूएफमध्ये उत्पन्न दाखविताना करदात्याने विशेष काळजी घेतली पाहिजे. सल्ल्याचे उत्पन्न, पगाराचे उत्पन्न एचयूएफमध्ये दाखवता येत नाही, ते वैयक्तिक उत्पन्न म्हणून समजले जाते आणि करदात्याच्या वैयक्तिक उत्पन्नात गणले जाते. एचयूएफच्या व्यवहारांचे नियोजन करताना या तरतुदींचा विचार करणे गरजेचे आहे. करदात्याने असे व्यवहार करताना कर सल्लागाराची मदत घेणे हितावह आहे.

- प्रवीण देशपांडे 

साभार, लोकसत्ता ,अर्थवृत्तांत