Friday, March 19, 2021

मनो-Money: भाग २७ : काय असतो डिमांड ड्राफ्ट? ?डॉ. रुपाली कुलकर्णी

 


राधा बाबांकडे एक फॉर्म घेऊन येते.

राधा: बाबा, मला गणित परीक्षेचा फॉर्म आणि त्यासाठी  फी भरायची आहे. ती डिमांड ड्राफ्टद्वारे, विद्यापीठात भरायला सांगितली आहे.  बाबा, तुम्ही मला चेकविषयी मागे एकदा  माहिती दिली होती.  पण हे डिमांड ड्राफ्ट काय असते?

बाबा: सांगतो राधा ! डिमांड ड्राफ्ट हा एक चेक सारखाच दिसणारा परंतु पैसे भरण्याचा अधिक सुरक्षित मार्ग आहे.  हा जुना मार्ग आजकालच्या  ऑनलाईन पेमेंटच्या  जमान्यातही  बऱ्यापैकी वापरला जातो. 

राधा: बाबा, मग चेक आणि डिमांड ड्राफ्ट मध्ये फरक तो काय?

बाबा: सांगतो.  समजा तुला विद्यापीठामध्ये १००० रु. इतकी  फी भरायची आहे तर तू तुझ्या बँकेत जाऊन तिथे डिमांड ड्राफ्ट फॉर्म मागायचा आणि तो भरायचा, या फॉर्ममध्ये विद्यापीठाच्या अकाउंटचे डिटेल्स भरायचे असतात ज्यांना तुला १००० रु. फी भरायची आहे तसेच तिथे तुझ्या बँक अकाउंट डिटेल्स ही भरायच्या असतात जिथून हा डिमांड ड्राफ्ट प्रोसेस केला जाणार आहे.  मग तू तुझ्या बँक अकाउंट मध्ये रोख १००० रु. किंवा त्याच रकमेचा चेक द्यायचास.   आणि मग काही वेळात बँक तुला विद्यापीठाच्या नावाने डिमांड ड्राफ्ट प्रिंट करून देते. 

राधा: बाबापण मग हा मार्ग चेक पेक्षा सुरक्षित कसा काय ?

बाबा: अगं मी तुला मागच्या वेळेस चेक बाउन्स होण्याविषयी सांगितले होते.  समजा तुझ्या अकाउंटला १००० रु. नाहीत आणि तू विद्यापीठाला १००० रु.चा चेक दिला तर विद्यापीठाला ते पैसे  मिळणार कसेम्हणून डिमांड ड्राफ्ट, जिथे आधी पैसे-भरणा  बँकेमध्ये केला जातो  तिथे ही बाउंस होण्याची भीती नाही ना?

राधा: समजले बाबा ! मग मी हा डिमांड ड्राफ्ट विद्यापीठात जाऊन भरायचा का ?

बाबा: हो.  राधा, विद्यापीठात जेव्हा तू परीक्षेचा फॉर्म भरशील तेव्हा त्याला जोडून हा डिमांड तिथे  द्यायचा आहे.  याचा अजून एक फायदा आहे.  डिमांड ड्राफ्ट वापरामुळे प्रवासात अधिक रोख रक्कम जवळ बाळगण्याची आणि आणि ती चोरीला जाऊ नये म्हणून सतत काळजी  करित राहण्याची गरज नाही.  कारण तुमच्याजवळ तितक्याच रकमेचा डिमांड ड्राफ्ट असतो ना !

राधा: पण बाबाहा डिमांड ड्राफ्टच  चोरीला गेला तर?

बाबा: छान प्रश्न विचारलास ! अगं सरकारच्या नवीन नियमानुसार डिमांड ड्राफ्ट काढणाऱ्या व्यक्तीचे नावही डिमांड ड्राफ्ट वरती प्रिंट केलेले असते त्यामुळे विद्यापीठ कोणाकडूनही  फी स्वीकारत आहे याची शहानिशा तिथे होईलच ना !  शिवाय असे झाल्यास  तू तुझ्या बँकेत जाऊन तो डिमांड ड्राफ्ट कॅन्सल करण्यासाठी विनंती करू शकते.  डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी तसेच कॅन्सल करण्यासाठी बँक तुमच्याकडून काही शुल्क आकारत असते.

राधा: समजले बाबा.  म्हणजे डिमांड ड्राफ्ट चे फायदे हे अधिक सुरक्षित पेमेंट करण्यासाठी आहे तर.

बाबा: हो.  आजकाल ऑनलाईन पेमेंट आणि तत्काळ प्रोसेसिंगचा जमाना आहे.  परंतु त्यातील सायबर फ्राड्स लक्षात घेता डिमांड ड्राफ्ट आजही वापरात आहे.  परगावातील विद्यार्थ्यांना प्रवास करताना जवळ रोख रक्कम बाळगण्याची गरजही नाही तसेच यात चेक बाउन्स सारखी भितीही नाही त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित समजला जातो आणि आजही वापरात आहे. 

राधा: समजले बाबा ! चला ना माझ्याबरोबरआपण बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट काढूयात.

बाबा: ओके राधाताई.  मात्र सगळी प्रोसेस आता तूच करायचीस.  मी फक्त तुला मदत करण्यासाठी येत आहे. 

राधा: चालेल बाबा !!

 

 दोघेही  बँकेत जाण्यासाठी निघतात.