Friday, January 15, 2021

मनो-Money: भाग २३ : All Eggs in One Basket ? -डॉ. रुपाली कुलकर्णी

 

 


All Eggs in One Basket ?

आज बाबा आणि प्रसाद काका गप्पा मारत असताना, राधा तिथे येते आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील होते. 

 

राधा: बाबा, पक्षी आपली सगळी अंडी एकाच घरट्यात घालतात, बरोबर ?

बाबा: हो ! तर मग ??

राधा: मग  तुम्ही तर आताच प्रसाद काकाला "Never Put  All Eggs in One Basket" असे का म्हणालात ?

प्रसाद काका (हसून): अरे राधाबाई, तुमचे फारच लक्ष आहे आमच्या गप्पांमध्ये ! ठीक आहे, काही हरकत नाही. अग, मी तुझ्या बाबांशी जरा आर्थिक विषयांवर सल्ला मसलत करत होतो. त्या संदर्भातच बाबांनी हे वाक्य म्हंटले बर का ! पक्ष्यांच्या अंड्यांशी त्याचा काही संबंध नाहीय.

राधा: मग  ठीक आहे काका ! कारण ऐकतांना मला ते 'असे कसे काय ?' हा प्रश्न पडला ! 

बाबा: प्रसाद, आता राधाची शंका जरा दूर करूयात. राधा, आपल्या संपत्तीचे आर्थिक नियोजन करित असताना आपला उद्देश हा 'पैसे सुरक्षितरित्या वाढविणे' असा असतो. बरोबर?

राधा: येस्स बाबा ! त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या, बऱ्याच वेगवेगळ्या पर्यायांविषयी आपण  आधी बोललो आहोत.  

बाबा: करेक्ट !  आपण आपले पैसे, वेगवगेळ्या गुंतवणुक माध्यमांद्वारे गुंतवितो कारण त्या मागील आपले उद्दिष्ट्ये वेगवेगळी असतात. जसे, कुठल्याही इमर्जन्सीसाठी लागणारी रक्कम आपण बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतो,  जी रक्कम आपल्याला दीर्घकाळासाठी लागणार नाहीय अशी रक्कम काहीजण मुदत ठेवीमध्ये ठेवतात तर काही जण म्युच्युअल फंडांमध्ये ठेवतात.  आणि ज्यांना शेअर बाजाराचे ज्ञान आहे असे लोक त्याही पर्यायाचा अवलंब करित असतात.

प्रसाद काका: आणि तुझ्या प्रसाद काकासारखे काही जण रिअल इस्टेट म्हणजे जमीन/जागा यामध्येही पैसे गुंतवित असतात.

बाबा: राधा, या विविध गुंतवणुक माध्यमांमार्फत मिळणारा परतावा म्हणजेच रिटर्न्स हे वेगवेगळे असतात.  शिवाय प्रत्येक माध्यमाची जोखीम म्हणजेच  रिस्क फॅक्टरही वेगवगेळे असतात. गुंतवणुक करतांना त्यामागे असणारे आर्थिक उद्दिष्ट्य, परतावा, मुदत आणि जोखीम यांची व्यवस्थित सांगड घालावी लागते. यालाच 'असेट अलोकेशन' म्हणजेच 'पैशांची सुयोग्य माध्यमांमध्ये विभागणी' असे म्हणतात.      

प्रसाद काका: आणि हेच तर तुझ्या बाबांसारख्या आर्थिक सल्लागारांचे काम असते. आपल्या संपत्तीची, जर अशी योग्य विभागणी केली नाही तर मात्र आपलयाला अपेक्षित असे रिटर्न्स मिळत नाहीत.

राधा: बाबा, मग त्याचा "Eggs" शी काय संबंध ?

बाबा: सांगतो ! समजा प्रसाद काकाने त्याच्या जवळचे सर्व पैसे हे जर एकाच गुंतवणुक माध्यमात म्हणजे समजा शेअर बाजारात गुंतविले आणि बाजार अचानक कोसळला तर मात्र काकाचे सर्व पैसे कमी होतील ! मग इमर्जन्सी फंडाचे काय ? भविष्यातील खर्चांचे  आणि तरतुदीचे काय ? मग ही रिस्क झाली ना ! म्हणून तर म्हणतात की तुमची सर्व संपत्ती एकाच गुंतवणुक माध्यमात ठेवू नका , अर्थात " Never Put  All Eggs in One Basket " !! आता तुला काय समजले ते सांग बरे ?

राधा: ओह येस्स ! समजला अर्थ ! या वाक्याचा अर्थ असा लागतो की  'आपल्या पैशांचे व्यवस्थापन करतांना, आपल्या गरजा, परतावा, जोखीम, मुदत या सर्व घटकांचा योग्य विचार करून, त्यानुसार वेगवगेळ्या गुंतणवुक माध्यमांची आपण निवड केली पाहिजे.’ बरोबर ना  ?

बाबा आणि प्रसाद काका (एकाच वेळी) : व्वा ! एकदम बरोबर !

तिघेही एकमेकांना टाळी देतात !  

डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड, SWS