Wednesday, January 27, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग ५: लॉकडाऊन.. मंदीतही संधी : डॉ. रुपाली कुलकर्णी

 COVID -१९ अर्थात करोना विषाणू मुळे जगभर सुरु झालेल्या महामारीला तोंड देण्यासाठी भारतात २५ मार्च २०२० रोजी, २१ दिवसांचा पहिला लॉकडाउन जाहीर झाला. प्लेग सारख्या जीवघेण्या साथीचा काळ अनुभवलेली बुजुर्ग पिढी सोडली तर सगळ्यांच्याच  जीवनात ही अभूतपूर्व स्थिती पहिल्यांदाच उभी ठाकली. जीवनावश्यक सेवा वगळता रोजगार-व्यवसायाची सर्वच क्षेत्रे ठप्प पडली.  नोकरदार वर्ग असो की व्यावसायिक, रोजंदारीवर काम करणारा कष्टकरी वर्ग असो की घरेलू कामगार, 'काम बंद' संकटामुळे प्रत्येकाचेच धाबे दणाणले.  'पण हरकत नाही, जीवावर बेतणारे संकट आहे तर तीन आठवड्यांचा कालावधी विना-काम निभावून नेऊ' अशी मनाची समजूत काढूणाऱ्या प्रत्येकालाच तेव्हा यत्किंचितही कल्पना आली नाही की आरोग्यावरचे हे संकट, असे तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेल्यावरही अजून 'जैसे थे' च आहे.

सुरुवातीच्या कालावधीसाठी काही व्यावसायिकांना आर्थिक नुकसानाची झळ सोसूनही कामगारांना पूर्ण किंवा अर्धे वेतन देता आले. परंतु जसजसा लॉकडाउनचा कालावधी वाढतो आहे प्रत्येक वर्गाच्या आर्थिक नुकसानीचा आलेख वाढतच चाललेला आहे. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच उद्योगक्षेत्रांमध्ये  कर्मचारी वर्गास  'तात्पुरता विना -वेतन ब्रेक' किंवा 'कॉस्ट कटींग' चा  भाग म्हणून नोकरीही गमविण्याची वेळ आलेली आहे. अशात ही परिस्थिती भविष्यात किती काळापुरती राहणार आहे हेही स्पष्ट नसल्याने बहुतांश  कुटुंब प्रमुखांद्वारे चरितार्थ चालविण्यासाठी,  उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतावरचे अवलंबित्व संपविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी  दुय्य्म उत्पन्नाच्या  अनेक मार्गांचा धांडोळा घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यावरच थोडासा उहापोह !  
सर्वप्रथम लॉकडाऊन मुळे कोणत्या घटकांवर किंवा त्यांच्या उप्लब्धतेवर मर्यादा आलेल्या आहेत त्याचा विचार करूयात म्हणजे मग या मर्यादा लक्षात घेऊन नवीन उद्योग क्षेत्राची / रोजगार संधीची निवड आणि त्यासाठी  नियोजन  करता येईल. यातील काही घटक म्हणजे  माल-वाहतुकीवरील अनिश्चितता  पर्यायाने मालाची अनुपलब्धतता / तुटवडा, कुशल कारागीर /मजूर यांची अनुपलब्धतता, प्रवास करण्यावर मर्यादा, सामाजिक सम्मेलन / एकत्रित येण्यावर मर्यादा, संचारबंदीच्या वेळा, परिस्थितीमुळे लोप पावलेल्या सुविधा अथवा उत्पन्न संधी इ. या बाबी लक्षात घेतल्या  तर  आपण निवड करायच्या  नवीन उद्योग क्षेत्रामध्ये  कुठले उप्त्पादन घेता येईल  किंवा कुठल्या प्रकारच्या सेवा पुरविता येतील हे  ठरविणे सोपे जाईल.  हे ठरवितांना तुमच्या  स्वतःच्या आवडी/रस (Interests), अंगभुत गुणकौश्यले (Skillsets), तुमच्याकडे उपलब्ध पायाभूत सुविधा-Infrastructure (जागा, वीज, पाणी इ.)  लक्षात घेणेही तितकेच महत्वाचे आहे.  आता  वरील घटकांचा आणि संभाव्य ग्राहकवर्गाचा ताळमेळ बसविण्यासाठीप्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे विचार करून  काही रोजगार संधी शोधता येतेय का ते बघुयात.
१)  घटक: घटक: प्रवास करण्यावर मर्यादा, सामाजिक सम्मेलन / एकत्रित येण्यावर मर्यादा : या घटकाचा विचार केल्यास, अशा सेवेचा किंवा सुविधेचा विचार करा ज्याचा लाभ  संभाव्य ग्राहकवर्ग घरबसल्या घेऊ शकेल. उदाहरणार्थ ऑनलाईन शिक्षण/मागर्दर्शन ! पहिल्या लॉकडाऊन पासून, आता तीन महिने झाले आहेत आणि    शाळा, महाविद्यालये बंद आहेत. जुलै महिन्याची सुरुवात म्हणजे पुढचे शैक्षणिक वर्षही चालू झाले आहे. तेव्हा घरी बसूनच विद्यार्थ्यांचा पुढील आभ्यास सुरु झाला आहे. जर तुमच्याकडे एखाद्या विषयाचे सुयोग्य ज्ञान असेल आणि  ऑनलाईन शिकविण्यासाठी आवश्यक ती साधने, कौश्यले असतील तर  ऑनलाईन ट्युशन्सचा या सेवेचा मार्ग उत्तम ठरतो. बैजू, अन-अकॅडेमी सारख्या स्टार्टअप्सना आज किती यश लाभले आहे ते आपल्याला विदित आहेच. या यशामागे त्यांच्या तज्ञ् शिक्षकवर्ग आणि प्रभावी प्रेझेन्टशन पद्धती काम करते. शिवाय अशा प्रकारची सेवा पुरविताना विषयाचे बंधन रहात नाही. तांत्रिक विषयांपासून ते कला क्षेत्रापर्यंत शिक्षणास ऑनलाईन घेण्यास मागणी असणार आहे. तांत्रिक विषयां अंतर्गत शैक्षणिक विषय, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, संशोधन मार्गदर्शन,  विशेष  अभ्यासक्रम जसे शेअर मार्केट, विमा/ अर्थ सल्लागार, डिजिटल मार्केटींग आदी सारख्या विषयांचा अंतर्भाव होईल. परदेशांप्रमाणेच वाद्यसंगीत, नृत्य, पाककला, हस्त/ चित्रकला या सारख्या कलांचे शिक्षणही ऑनलाईन देता येईल. तुमच्या ऑनलाईन शिक्षणक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 'सोशल मीडिया'/'डिजिटल मार्केटिंग' चा अवलंब करता येईल.    
२) घटक: परिस्थितीमुळे लोप पावलेल्या सुविधा: लॉकडाऊन मध्ये मेस, हॉटेल्स या सुविधांवर गंडांतर आले आणि  बाहेरगावी राहणारे नोकरदार, विद्यार्थी यांच्या उदरभरणावर संकट उभे राहिले. हेच कशाला गेल्या तीन महिन्यांमध्ये, घरेलू कामगार वर्गाच्या अनुपस्थितीत आणि घरात सदासर्वकाळ उपस्थित (अतिरिक्त) माणसांमुळे घरच्या अन्नपूर्णेचा स्वयंपाका-कामामुळे पिट्ट्या पडलेला आहे. अशावेळी घरगुती निगुतीने बनविलेल्या चविष्ट, सात्विक अन्नास मागणी वाढलेली आहे. जर तुमच्याकडे उत्तम पाक कौशल्य, व्हाट्ससप्प किंवा तत्सम मार्केटींग कला आणि भरपूर माणसांचे नेटवर्क असेल तर पार्सल-फूड आउटलेट चालविणे हा ही एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ओळखीच्या व्यक्तीकडे स्वयंपाका-कामामध्ये जपली जाणारी स्वच्छता आणि हातची रुची ज्ञात असल्याने अशा व्यक्तींना जर रुचीपूर्ण खाद्यपदार्थ पुरविता आले तर थोड्या कालावधीत या व्यवसायाची चांगली ओळख निर्माण होते असा अनुभव आहे. घरगुती साठवणुकीचे पदार्थ जसे मसाले, पापड,लोणची, खाकरे, बेकरीचे पदार्थ, आईसक्रीम, केक अशा एक किंवा अनेक वस्तू वस्तूंचे विशेष आउटलेट चालविता येईल.            
३) घटक: परिस्थितीजन्य उत्पन्न संधी: असे म्हणतात की खरा व्यावसायिक मंदीतही संधी शोधू शकतो. देश पुढील काही काळ हा आर्थिक मंदीतून जात असताना त्यावर मात करण्यासाठी नवनवीन उत्पादने आणि सेवा यांचा उदय होण्याचा हा काळ आहे. नोकरी व्यवसायातील अनिश्चितता, भविष्यात उभ्या असलेल्या आर्थिक विवंचना यामुळे  मानसिकरीत्या खंबीर नसलेले लोक निराशेच्या गर्तेत ढकलले जात आहेत. वाढते नैराश्य, आत्महत्यांचे प्रमाण बघता  ऑनलाइन समुपदेशन करणाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. लोकांचे मनोधैर्य वाढविणे, प्राप्त परिस्थितीतून त्यांना योग्य मार्ग दाखविणे असे समुपदेशन करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. परिस्थितीमुळे व्यायामशाळा, जॉगिंग पार्क हे बंद असल्याने ऑनलाइन योगासने वर्ग, मेडिटेशन वर्ग, मुद्रा-अभ्यास वर्ग  यांनाही चांगली प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.  ज्यांच्याकडे ही अंगभूत कौशल्ये आहेत ते  या मंदीतही त्याचे रूपांतर रोजगार संधीमध्ये करू शकतात. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये घरातून न बाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनामार्फत जाहीर होत असतात. तसेच घरातल्या सदस्यांच्या आरोग्याची चिंताही गृहिणीला भेडसावत असते. अशावेळी घरपोच भाजीपाला व किराणा-माल पोहोचवणाऱ्या सेवा सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेतला जातो. त्यात नावीन्य आणून (जसे निवडलेला भाजीपाला, पूजेसाठी फुले, स्टेशनरी वस्तू इ.) घरपोच ग्रोसरी सेवेचा संधी म्हणून विचार करता येईल. थोडा ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करुन  लॉकडाऊन मुळे घरात अडकून पडलेल्या सर्व वयोगटातील सदस्यांना काही नाविन्यपूर्ण सेवा पुरविता येवू शकते. उदाहरणार्थ  ज्येष्ठांसाठी ‘वाचनालय तुमच्या दारी’ सेवा, ‘घरपोच औषधे पुरवठा’ सेवा,  लहान मुलांसाठी ‘हस्तकला/मूर्तीकला कीट’ निर्मिती व सेवा, गृहिणींसाठी ‘घरगुती ब्युटीपार्लर सेवा’, मास्क शिलाई, सेनिटायझार निर्मिती’,  इ. संधी शोधू तितक्या सापडतील !                                      
 ४) घटक: मालाची अनुपलब्धतता / तुटवडा: हा घटक विचारात घेतला तर त्याला थोडी नियोजनाची जोड झाली द्यावी लागेल. साथीमुळे निर्बंध वाढले तर बरेचसे शेतकी उत्पादन  वाया जाऊ शकते. जसे या वर्षी आंब्यांची आवक  भरपूर होती परंतु विक्री करते वेळी संचारबंदी लागू झाल्याने हव्या त्या प्रमाणात विक्री होऊ शकली नाही.  आणि म्हणून  प्रक्रिया व शीत-साठवणूक उद्योग यांमध्ये संधी शोधता येईल. उदाहरणार्थ, आमरस हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ सर्व ऋतूत उपलब्ध व्हावा म्हणून त्यावर प्रक्रिया करुन त्याची साठवणूक करणे व मागणीनुसार पुरवठा करणे. भविष्यातील विविध वस्तूंचा मागणी व पुरवठा लक्षात घेऊन प्रक्रिया व साठवणूक उद्योगास चालना मिळू शकते.
अर्थात हे सगळे झाले मध्यमवर्गीय नोकरदार किंवा व्यावसायिक यांविषयी. पण ज्यांचे हातावर पोट आहे असे मजूर,घरेलू कामगार त्यांनाही अशा काही निश्चित वाटा शोधण्यासाठी मदत करायला पाहिजे. अशाप्रकारे ‘मंदीतही संधी’ शोधता येईल. त्यासाठी गरज आहे ती पुरेसा आत्मविश्वास, अंगभूत कौशल्यांना योग्य दिशा देण्याची इच्छाशक्ती, थोडीशी कल्पकता आणि  नाविन्याची, तंत्राज्ञानाची जोड देण्याची कला !! काय सांगता यावे, कदाचित अपरिहार्य म्हणून स्वीकारलेला रोजगार मार्ग तुमच्या जीवनाला नवीन, भक्कम  कलाटणी देवू शकेल! करा विचार, लागा कामाला !! Best Luck !!
-  डॉ. रुपाली कुलकर्णी,
  ट्रेनिंग हेड
 SWS Financial Solutions Pvt. Ltd.