Wednesday, January 27, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग २: लॉकडाऊनमध्ये असाही संयम !श्री. रघुवीर अधिकारी

 
नमस्कार ! एस.डब्ल्यू.एस. च्या वतीने आपल्या सर्वांना अक्षय तृतियेच्या शुभेच्छा !! अशी आशा करतो  की आपण सर्व आपल्या कुटुंबासह सुरक्षित आहात आणि घरीच आहात.
 
जागतिक स्तरावरील लॉकडाऊनमुळे, सर्व जगच आर्थिक मंदीच्या छायेमध्ये लोटले जात आहे. अशातच ‘फ्रँकलिन टेम्पलटन ऍसेट  मॅनेजमेंट कंपनी’ मार्फत , भारतातील त्यांच्या सहा म्युच्युअल फ़ंड- डेट स्किम्स बंद करण्यात आल्या आहेत. फ्रँकलिन टेम्पलटनच्या बंद झालेल्या या योजनांविषयी पेपर व टेलिव्हिजनच्या माध्यमातुन लगोलग बातम्या प्रसारित  झाल्या आणि गुंतवणूकदारांच्या मनामध्ये अनेक प्रश्न तसेच चिंतेचे सावट उभे ठाकले. याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी हा लॉकडाऊन गप्पांचा दुसरा भाग ! 
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाच्या इतिहासात ही परिस्थिती प्रथमच निर्माण झालेली आहे आणि सर्वांनाच ती अनपेक्षित आहे. देशभरातील अनेक जाणकार, अभ्यासू  गुंतवणूकदारांची तसेच आमच्याही  अधिकतर ग्राहकांची गुंतवणूक, यातीलच काही उत्तम परतावा देणाऱ्या स्किम्स मध्ये होती.  माझ्यामते, फ्रँकलिन टेम्पलटनचा हा निर्णय गुंतवणुकदारांच्या हिताचा आहे कारण त्यांनी कंपनीचे होणारे नुकसान सहन करून ग्राहकहिताला प्राधान्य दिले आहे असे दिसते आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार इतर अनेक म्युच्यअल फंडांकडे अद्यापही भरपूर तरलता (Liquidity) आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आपले पैसे परत मिळतील याची खात्री बाळगावी.  माध्यमातल्या बातम्यामुळे काही गैरसमज निर्माण झालेले दिसत आहेत – उदा. ‘योजना बंद झाल्या म्हणजे माझे पैसे बुडाले, या योजना बंद झाल्या ह्याचा अर्थ इतर म्युच्युअल फंडांच्या योजनाही बंद होतील’ इ. परंतु असे वाटणे हे भितीपोटी आहेअनाठायी आहे. अर्थात, हे समजण्यासाठी काही काळ जावा लागेल. या घटनेवरून संपुर्ण Debt Market अडचणीत आले आहे असा टोकाचा निष्कर्षही काढू नये, कारण ही समस्या प्रामुख्याने फ्रँकलिन टेम्पलटनच्या काही विशिष्ठ बॉन्ड्सच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उद्भवलेली आहे. फ्रँकलिन टेम्पलटन कंपनी, खालील दोन मार्गांनी त्यांनी गुंतवणुक केलेले पैसे वसूल करतील:
 
१) जमा होणारी व्याजाची रक्कम आणि परिपक्वता (Maturity).
२) कोरोना-साथीच्या रोगाची स्थिती सुधारल्यानंतर Secondary Market मध्ये, त्यांच्या बॉन्ड्सची विक्री करून.  
 
याचाच अर्थ गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील.. परंतु टप्प्याटप्प्याने. (ज्या टप्प्यामध्ये कंपनीचे बॉन्ड्स परिपक्व होतील किंवा विकले जातील.)  योजना बंद केल्यामुळे, ग्राहकांद्वारे पैसे काढले जाण्याचा दबाव आता फंड मॅनेजरवर रहाणार नाही ज्यामुळेच कंपनीला जास्त परतावा देणारा बॉन्ड् हा कमी किंमतीत विकावा लागणार नाही. याद्वारे  गुंतवणुकदारांचे होणारे संभाव्य नुकसान टाळले गेलेले आहे.
 
 
याही परिस्थितीत मला सुचलेले काही सकारात्मक मुद्दे असे:
 
१)  गुंतवणूकदारांच्या मुद्दलाच्या रकमेत कोणतीही कपात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी फ्रँकलिन टेम्पलटनने उचललेले हे प्रतिबंधात्मक पाऊल आहे.
२)  फ्रँकलिन टेम्पलटनकडून कोणतीही फंड मॅनेजमेंट फी आकारली जाणार नाही.
३)  स्कीम्सच्या NAV मध्ये चढ-उतार दिसतील. म्हणजेच गुंतवणूक जिवंत आहे, फक्त ती एकरकमी काढता येणार नाही, तर आधी सांगितल्याप्रमाणे ती टप्प्याटप्प्याने मिळेल. 
४)  फ्रँकलिन टेम्पलटन गेली २५ वर्षे भारतामध्ये कार्यरत आहे. हे Debt Market मधील  एक उत्तम फंड हाऊस आहे. पूर्वीच्या अनुभवानुसार  अशा आकस्मिक परिस्थितीनंतर त्यांचे फंड वेगाने परतले आहेत आणि गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी सध्या त्यांनी अवलंब केलेला हा  एक कृतीशील उपाय आहे.
५)  AMFI (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड, इंडिया) ने आश्वासन दिले आहे की म्युच्युअल फंडाचा ७०% हून अधिक पोर्टफोलिओ हा चांगल्या गुणवत्तेचा आणि जोखीम कमी करणारा आहे.
 
अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करायला हवे?
 
सर्व प्रथम, केवळ आणि केवळ आपल्या सर्वांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने मी हे नमुद करू इच्छितो की , एस.डब्ल्यू.एस. चे सर्व संचालक आणि कर्मचारी देखील या योजनेचे गुंतवणूकदार आहेत म्हणजेच आम्हीही तुमच्याबरोबरच आहोत.  गुंतवणूकदारांनी अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि या संदर्भात काही महत्वाची माहिती देण्याची किंवा कृती करण्याची गरज असल्यास आम्ही तसे आपल्याला कळवुच.
 
जाता जाता:
 
एकाच दिवशी देशांतील नामांकित बॅंकेमधील सगळ्या ग्राहकांनी पैसे काढायचे ठरवले तर कोणतीच नामांकित बँकही सर्वांनाच पैसे देऊ शकणार नाही ह्याचा अनुभव आपण २००८ मध्ये घेतलेला आहे. त्यावेळेला, त्या बॅंकेस ट्रकमध्ये भरून पैसे आणावे लागले होते आणि अभूतपुर्व पाऊल म्हणून देशातील  बँकिंग नियामक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेला पुढे येउन हे सांगावे लागले होते की या नामांकित बॅंकेकडे पुरेशी तरलता आहे तसेच रिझर्व्ह बॅंकेने या बँकेला रोख रक्कम उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केलेली आहे. हे उदाहरण पुरेसे बोलके आहे आणि या परिस्थितीत आपण सर्वांनीच संयम बाळगणे किती महत्वाचे आहे, हेच अधोरेखित करणारे आहे. 
 
कोरोनाच्या पार्श्वभुमीमुळे उद्भवलेली आर्थिक परिस्थिती निवळेपर्यन्त संयम बाळगा ! घरीच रहा , सुरक्षित रहा  !!
 
- श्री. रघुवीर अधिकारी,
मुख्य कार्यकारी संचालक.