Wednesday, January 27, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग ३: लॉकडाऊन आणि लिक्विडीटी : श्री. रघुवीर अधिकारी

 सध्या कोरोनाच्या साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा प्रभाव, समाजातील  विविध आर्थिक स्तरांतील जनतेवर  वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत आहे.  या लॉकडाऊनमुळे  सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर  तो हातावर पोट भागविणाऱ्या कष्टकरी वर्गास ! सरकारतर्फे, विविध  सामाजिक संस्थांतर्फे कष्टकरी वर्गासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे. तो सर्व गरजूंपर्यंत पोहोचत असावा अशी आशा करूयात. त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय आणि त्यावरील जीवनशैली असणाऱ्या जनतेच्या मात्र  ‘लॉकडाऊन-समस्या’ काही  वेगळ्याच आहेत.  त्यांना ‘आर्थिक नियोजन’ या विषयावर  वेगळा विचार करता यावा म्हणून हा लेखन  प्रपंच ! पुढील मुद्यांवर जरा  विचार करूयात.

1) लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक मंदीमध्ये कदाचित काही जणांच्या नोकरीवर गंडातर आले असेल. या कालावधी दरम्यान काही घरात, कमी अथवा निम्माच पगार आला असेल. अशावेळी  ‘Emergency Fund’ / ‘Liquid Money’ / रोख रकमेची उपलब्धता ही संकल्पना अधिक सुस्पष्ट झाली असेल. कधीही उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला ( जसे लॉकडाऊन, संप, आजारपण, अपघात इ. ज्याद्वारे तुमच्या मासिक उत्पनावर गदा येते.) सामोरे जाण्यासाठी, तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये अशा अनाकलनीय बाबींसाठी काही तरतूद  ठेवणे आवश्यक असते. ठोबळमानाने पुढच्या सहा मासिक वेतनाइतकी रक्कम / घरखर्चासाठी लागणारी रक्कम-   अशा अकल्पित घटनांसाठी उपलब्ध असणे आवश्यक ठरते.    
                                    .
2. वरील आर्थिक उद्दिष्ट्य लक्षात घेऊनगुंतवणुकदारांनी Overnight Funds आणि Liquid Funds या योजनांचा वापर करावयास हवा.  याचे प्रमुख कारण म्हणजे या फंडातून मिळणारा परतावा हा बचत खात्यावरील व्याजाहून अधिक असतो. शिवाय, अत्यल्प जोखीम व गरजेनुसार पैसे काढून घेण्याची सोय (अर्ज केल्यापासून कामकाजाच्या एक दिवसात पैसे मिळतात) ही या फंडाची अन्य वैशिष्ट्ये आहेत. बहुतेक योजनांमध्ये रूपये ५०,०००/- प्रतिदिनी तत्काळ काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ( Instant Redemption Facility ).                                                                            .
3. आपले अतिरिक्त पैसे, कमी कालावधीसाठी म्हणजे एक दिवसापासून पुढच्या कालावधीसाठी गुंतवायचे असतील तर या फंडांचा पर्याय योग्य ठरतो. एवढ्याच कालावधीत बचत खाते अथवा मुदत ठेवीमधून जेवढा परतावा मिळेल, त्याहून कितीतरी अधिक परतावा हे फंड देतात. लक्ष्यपूर्वक गुंतवणुक केल्यास ‘Friday Investing’  , ‘Systematic Transfer to Equity Mutual Funds’ इ. स्मार्ट पर्याय वापरून आपण आपल्या ‘Liquid Money’ पासून अधिक परतावा देखील मिळवू शकतो.

आर्थिक शिस्त, जमा खर्चाचा अचूक अंदाज आणि निर्णय घेण्याची क्षमता यांचा वापर करून गुंतवणुकदार बॅंकेच्या  बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जवळजवळ दुप्पट उत्पन्न   लिक्विंड फंडांचा वापर करून कमाउ शकतात. हा खरतर खूपच सुरक्षित असा मार्ग आहे पण लोकप्रिय नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे शिस्तीचा अभाव आणि निर्णय घेण्यात होत असलेली दिरंगाई !

येणारी संकटे आपल्याला बरेच काही शिकवून जात असतात. त्यापासून शिकवण घेऊन, आपण आपल्यामध्ये बदल करण्यास शिकले पाहिजे. कोरोनाच्या संकटामुळे आपण आर्थिक शिस्तीबाबत सजग झालो तर हा बदल स्वागतार्हच ठरेल.   आपल्या आर्थिक नियोजनामध्ये, कोरोना- लॉकडाऊनमुळे उदधृत झालेला हा बदल, आपण यथायोग्य स्वीकारालच ! तोपर्यंत,  आर्थिक शिस्त पाळण्याचा निर्धार करा. घरीच रहा , सुरक्षित रहा !               
                                             .
- श्री. रघुवीर अधिकारी,
मुख्य कार्यकारी संचालक.