Wednesday, January 27, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग १: लॉकडाऊन नंतरचे आर्थिक बदल: श्री. रघुवीर अधिकारी

सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे होत असलेल्या बदलांना सकारात्मक रितीने सामोरे कसे जावे यासाठी मी सुविख्यात मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. आनंद नाडकर्णीं यांचे याच कलावधीत प्रकाशित झालेले काही लेख वाचले व व्याख्याने ऐकली. त्यातील काही महत्वाचे, मला समजलेले विचार, एका आर्थिक सल्लागाराच्या भुमिकेतून मी आपल्यासमोर मांडीत आहे.

१.  लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विविध क्षेत्रांमधील कार्यपध्दती आर्थिकदृष्ट्या एक तर थंडावल्या आहेत किंवा बदललेल्या आहेत. प्रत्येकच क्षेत्रावर यामुळे प्रभाव जाणवणार आहे. अशा बदललेल्या आर्थिक परिस्थितीशी  आपण जितक्या लवकर जुळवून घेऊ तितके चांगले. यामुळे आपण आपले मानसिक आरोग्य सांभाळू शकू, पर्यायाने आपले कौटुंबिक, सामाजिक जीवनही फुलवू शकू. या साथीच्या, लॉकडाऊनच्या प्रभावामुळे आता समोर असलेली मंदीची आर्थिक परिस्थती आपण बदलू तर शकत नाहीये. तेव्हा उगीचच टोकाची भुमिका घेण्यापेक्षा, या झालेल्या बदलांकडे “मंदीतही संधी” अशा सकारत्मक दृष्टीकोनातून पाहता येईल का,  असा प्रयत्न करुन बघुयात.

 

२. या महा-आरिष्टानंतरचे जग आर्थिक-सामाजिकदृष्ट्या यापूर्वीच्या जगापेक्षा अत्यंत निराळे असेल. आर्थिक मंदीचा काळ सर्वांच्याच आयुष्यात येईल. अशा परिस्थितीत जीवनशैलीकडे नव्याने पहावे लागेल. मागच्या पिढ्यांनी जसा टुकीचा, निगुतीचा संसार केला तसा यापुढे कदाचित करावा लागेल. स्वत:चे आर्थिक नियोजन करतांना जसे तुम्हाला याचे भान ठेवावे लागेल तसेच तुमचे आर्थिक नियोजन करताना आम्हालाही हा दृष्टीकोन अंगीकारावा लागेल. 

 

३. ज्या गोष्टींना आजवर गरजा समजले गेले त्या खरोखरच गरजा होत्या का ? याचा विचार करावा लागेल. कदाचित काही काळापुरती का होईंना, कुटुंबाची जीवनशैली नव्याने आरेखित करावी लागेल जेणेकरून कुटुंबाचा आर्थिक समतोल आपल्याला सांभाळता येईल.


ही परिस्थिती अभूतपूर्व आहे ही गोष्ट अगदी खरी. तरीही आयुष्य चालु आहे, पुढेही चालू राहणार आहे. हा काळ बदलांचा आहे. या बदलांना सकारात्मक दृष्टीकोनाने सामोरे गेलो तर हे दिवसही आपल्याला बरेच काही शिकवून जातील. यातून बाहेर पडताना आपण मनाने अधिक बळकट बनून, अधिक सक्षम बनून बाहेर पडू याची मला खात्री आहे. आपण, आपले कुटुंबिय आणि आमचे सर्व ग्राहक सुरक्षित आहेत हि महत्वाची आणि जमेची बाजू ... हे ही नसे थोडके ! घरीच रहा , सुरक्षित रहा !

-      श्री. रघुवीर अधिकारी,

मुख्य कार्यकारी संचालक.