Friday, January 29, 2021

जामीन राहणे : एक धर्म (आणि) संकट : श्री. उदय कर्वे


महान नाटककार शेक्सपिअर पासून ते भारतीय संतांपर्यंत सर्वानीच कर्जव्यवहार
, जामीन राहणे इ. बद्दल खूप छान व महत्त्वाचे काही सांगून ठेवले आहे. मराठीत ”फटका” या काव्यप्रकारातील प्रसिद‍्ध कवीने तर ”स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन कोणा राहू नको” असा उपदेशच केला आहे. परंतु आपला एखादा नातलग, मित्र वा परिचित काही कारणांनी, काही गोष्टींसाठी कर्ज काढत असतो व त्या कर्जासाठी आपल्याला जामीन राहण्यास सांगतो. अशा वेळी तो आपला जवळचा मित्र, नातलग असेल (व त्याच्या बद्दल आपले मतही चांगले असेल ) तर त्याला जामीन (गॅरेेंटर) राहणे हे आपले कर्तव्य ठरते. पण त्याच वेळी, काही कारणांनी तो ते कर्ज भविष्यात फेडू शकला नाही तर …? या शक्यतेमध्ये एक संकटही दडलेले असते.

कर्ज रक्कम  जेवढी मोठी तेवढे हे संभाव्य संकट ही मोठे असते. अशा अनेक प्रसंगांत आपले मन सांगते की ”जामीन राहायला पाहिजे” पण बुद्धी सांगत असते ”नको राहूस जामीन” किंवा  ”जरा सांभाळून ”! आणि मग या बाबतीत कधीकधी दोन टोकांच्या भूमिका घेणारी माणसे दिसतात. माझा सी. ए. चा व्यवसाय करताना व बँकेच्या संचालकपदी काम करताना मला अशा अनेक व्यक्ती माहीत झाल्या की ”आम्ही कोणासही, जामीन राहत नाही” हे त्यांचे जाहीर धोरण असते. तर याउलट अशा काही व्यक्ती बघितल्या की त्या ”येथे कोणाहीसाठी जामीन मिळतील” असा जणू जाहिरात फलकच लावून असतात. त्या कोणालाही, कशाहीसाठी बिनधास्त जामीन राहत असतात.

पण ही झाली दोन अजब टोके! यातला योग्य व मध्यम मार्ग काय असावा? जामीन राहताना प्रामुख्याने कुठल्या गोष्टी बघाव्यात, कुठली काळजी घ्यावी याचा अत्यंत थोडक्यात ऊहापोह या लेखात करू या.

1) सगळ्यांत महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्याला जामीन राहणार आहोत त्याची खरोखरच बर्‍यापैकी पूर्ण माहिती (कौटुंबिक स्थिती, व्यवसाय, नोकरी, सवयी, आर्थिक स्थिती इ.) आपल्याला आहे कातसे नसल्यास, अंधारात उडी मारण्यापेक्षा, सुरुवातीलाच ”जामीन राहणे शक्य होणार नाही ” हे स्पष्टपणे सांगावे

(जमल्यास, गोड भाषेत सांगावे).’द बेस्ट टाइम फॉर सेइंग ”नो” इज द फर्स्ट टाइम’ हे अतिमहत्त्वाचे वाक्य लक्षात ठेवावे. एकदा जामीन राहिल्यानंतर कर्जदाराची माहिती मिळवत बसणे म्हणजे ”कन्या देऊनिया मग, कूळ काय विचारावे” अशासारखा प्रकार होतो.

2) ज्याला आपण जामीन राहणार आहोत तो कर्जदार, किती रकमेचे कर्ज घेतो आहे, त्याचा मासिक हप्ता किती असणार व तो भरण्याएवढे त्याचे सध्या उत्पन्न आहे का व भविष्यातही राहील ना, याची अत्यंत नि:संकोचपणे खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.

 

3) कर्ज कुठल्या कारणासाठी आहे हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. ज्या कर्जातून कर्जदाराची एखादी मालमत्ता तयार होणार आहे अशी कर्जे जामीनदारांसाठी तुलनेने बरी! मालमत्ता स्थावर असेल तर अजूनच चांगले. तिचे मूल्य सहसा वाढत जाते. कर्ज थकले तर ती मालमत्ता विकण्याचा पहिला पर्याय उपलब्ध असतो. साधी कर्जे, लग्न कार्य वा सणासुदीसाठी काढलेली कर्जे, परदेश प्रवासासाठी काढलेली कर्जे इ. मध्ये कर्जदाराकडे नवीन मालमत्ता तयार होत नसते.

4) कर्जासाठी, कर्जदाराची काय काय मालमत्ता तारण म्हणून ठेवण्यात येणार आहे व तिचे मूल्य काय ते बघावे. प्राथमिक तारण व दुय्यम तारणे यांचे एकत्रित मूल्य कर्ज रकमेहून बर्‍यापैकी जास्त असेल तर भविष्यात कर्जवसुली जामीनदाराकडून होण्याचा धोका कमी.

5) आपण एकटेच जामीनदार आहोत का अजूनही कोणी जामीनदार आहेत ते बघावे, नसल्यास अजूनही कोणाच्या  जामीनदार होण्यासंबंधी आग्रहाने सुचवावे. बाकीचे जामीनदारही तोलामोलाचे आहेत ना, कर्ज थकले तर तेही फेडण्यास मदत करू शकतील ना? ह्याची खात्री करावी. सर्व जामीनदारांकडे एकमेकांची माहिती व ओळख असण्याचे अनेक फायदे असतात.

6) ज्या कर्जासाठी आपण जामीन राहत आहोत त्याचे कर्जमंजुरीपत्र बघावेच. कर्जासाठी कुठल्या शर्ती व अटी आहेत, त्यांची पूर्तता होते आहे ना, हे बघावे व त्या मंजुरीपत्राची एक प्रत आपल्याकडे ठेवावी.

7) जामीनकीच्या कागदपत्रांवर कधीही,”डोळे झाकून”या प्रकारात मोडेल अशा प्रकारे सह्या करू नयेत. ती कागदपत्रे पूर्णपणे वाचून व समजून घेऊन मगच (योग्य वाटल्यास) सह्या कराव्यात. कोर्‍या फॉर्म्सवर सह्या करू नयेत. सर्व मजकूर संपूर्ण भरलेला आहे व तो योग्य आणि बिनचूक आहे हे तपासावे. शक्यतो त्या कागदपत्रांची (व एकूणच त्या कर्जप्रकरणासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची) एकेक प्रत आपल्याकडे ठेवणे चांगले.

8) अनेक जामीनदार हे कर्जदाराला कर्ज दिले गेले, की त्याविषयी विसरूनच जातात. असे ”ऋणानुबंध” विसरू नयेत. कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेवर भरतोय ना हे  वर्षातून किमान एकदा प्रत्यक्ष तपासून बघावे. कर्जदार टाळाटाळ करतोय असे वाटल्यास थेट कर्ज देणार्‍या संस्थेकडून माहिती घ्यावी व कर्ज खात्याच्या उतार्‍यांची एक प्रत मागावी. कर्ज थकत चाललंय, कर्जदार ते  फेडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नच करत नाहीये असे वाटल्यास, कर्जवसुलीची प्रक्रिया लगेच सुरू करण्याचा आग्रह करावा.

9) कर्जासाठी तारण सांगितलेल्या मालमत्तांची देखभाल, त्यांचा विमा याबाबत कर्जदार जागरूक व नियमित आहे ना हे बघावे आणि मुळात त्यांच्या तारणाबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ना? ह्याची खात्री करून घ्यावी. 

10) दुर्दैवाने, कर्ज थकलेच व कर्जवसुली प्रक्रिया सुरू झाली तर त्यात स्वत: जातीने लक्ष घालावे. कर्जदार, अन्य जामीनदार, कर्ज देणारी संस्था या सर्वांना एकत्र आणून सामोपचाराने, एक रकमी परतफेडीने, का अन्य सुयोग्य मार्गाने कर्जफेड होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कार्यवाहीच्या तारखांना हजर राहावे. आवश्यकतेप्रमाणे चांगल्या व अनुभवी वकिलाकडून सल्ला घ्यावा. (असे”कॉम्बिनेशन” न मिळाल्यास नुसता अनुभवी वकील चालेल!)

11) प्रत्येक जामीनदार हा वैयक्तिकरीत्या, स्वतंत्रपणे, पूर्ण कर्ज रकमेसाठी बांधील असतो हे जाणून घ्यावे. उदा. रू. 02 लाखांचे कर्ज थकून, त्यावर व्याज लागून 03 लाखापर्यंत गेले आहे व एकूण तीन जामीनदार आहेत तर ते प्रत्येकी एक एक लाखासाठीच जबाबदार आहेत… असे नसते. कर्ज देणारी संस्था, कायद्याने, कोणा एकाकडूनही पूर्ण रक्कम वसूल करू शकते अशी सर्वसाधारण कायदेशीर तरतूद असते व आहे.

 

जाता जाता :— माझ्या ओळखीतील एक बाई त्यांच्या नवर्‍याच्या खूप जवळच्या मित्राला जामीन राहत होत्या. जामीनकीचे कोरे फॉर्मस् समोर ठेवून तो मित्र (त्याचे नाव गणेश) तिला (तिचे नाव वीणा) म्हणाला ”हां, वीणा, ह्यावर जरा पटपट सह्या कर” ते बघून ती म्हणाली,”अरे गणेश, कर्जाची रक्कम तर भर फॉर्ममध्ये” त्यावर गणेशने शांतपणे सांगितले ”वीणा, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी तेवढेच कर्ज घेतो की जेवढे माझ्या जामीनदाराला फेडता येईल”!

घटना सत्य आहे व नावे पण न बदलता लिहिली आहेत. त्या कर्जप्रकरणात पुढे बर्‍याच गमती, ताणतणाव झाले तो सर्व तपशील मात्र इथे लिहू शकत नाही.

- श्री.  उदय कर्वे

डोंबिवली नागरी बँकेचे अध्यक्ष आणि सीए,

साभार: पुनश्च : मराठी सशुल्क डिजिटल नियतकालिक