Thursday, December 10, 2020

मनो-Money: भाग २२:आयुष्यमान भव -डॉ. रुपाली कुलकर्णी

 

आयुष्यमान भव !

आज राधा,  आई आणि घरात काम करणाऱ्या संगिता मावशी यांच्यामधला संवाद ऐकत होती. मावशी गेल्यावर आई आणि  राधा यांच्यात संवाद सुरु होतो.

 राधा: आई, संगिता मावशीना डॉक्टर काकांनी, डोळ्यांचे  ऑपरेशन करायला सांगितले आहे का ग?

आई: हो राधा ! त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू आहे. तर एका महिन्याच्या अंतराने त्यांना दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायला लागणार आहे. म्हणून त्या पैशांची मदत मागत होत्या.

राधा: ओह, अच्छा   ! आई आपण त्यांना मदत करणार का ग मग ?

आई: नक्कीच राधा ! जमेल तेव्हढी करूयात. पण मी त्यांना 'आयुष्यमान भारत योजने'  बद्दलही सांगितले आहे. तेव्हा बघुयात, काय होते.

राधा: आई, बाबांनी मला मागच्यावेळी 'पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना' सांगितली होती. त्यापेक्षा  वेगळे काय आहे यात?

आई: अगं, बाबांनी सांगितलेली योजनेचे नावच बघ ना ! त्यात 'सुरक्षा' हा शब्द येतो ना ? मग आता लक्षात ठेव , की ती योजना अपघाती खर्चाची तरतूद म्हणून  आहे आणि 'सुरक्षा  विमा' म्हणून  काम करते. म्हणजे घरात किंवा बाहेर असताना आपल्याला अपघात होऊन जर काही खर्च आला, अशा खर्चासाठी  या योजनेअंतर्गत  विमा संरक्षण मिळते. परंतु 'आयुष्यमान भारत योजना' ही दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या  व्यक्तींसाठी आहे आणि त्या योजनेअंतर्गत त्यांच्या परिवारास, आजारपणासाठी ५ लाख रू. इतका  स्वास्थ्य-विमा म्हणजेच आरोग्य-खर्च  मिळण्याची तरतूद आहे.

राधा: आई, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे ! अशा सर्वांचाच विचार करणाऱ्या योजनांचे स्वागत करायला हवे.

आई: हो नक्कीच ! एका अहवालानुसार,  आरोग्य सेवा खर्च, अतिशय वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ४० दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते आहे. आणि गरीब जनतेमध्ये  आरोग्य सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूचे  प्रमाण  खूप जास्त असते. तेच लक्षात घेऊन भारत सरकार तर्फे ही योजना लागू करण्यात आली आहे. देशातील एकूण १३ हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत. त्यामुळे तेथे, योजनेअंतर्गत गरीबांना खासगी रुग्णालयातही चांगले उपचार मिळू शकतात. कचरावेचक,बांधकाम मजूर, घरकाम करणारा कष्टकरी वर्ग,फेरीवाले,भिकारी आदी तत्सम  वर्ग  आणि त्यांचे कुटुंबीय यांना ही सुविधा उपलब्ध आहे. अशा सर्व जनतेसाठी  बारकोड असलेले कार्ड दिले जाणार आहे.

राधा: आई मग यात कुठल्याही आजारपणासाठी लागणारा खर्च मिळू शकतो का ग ?

आई: अगं कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी व  लिवरचे आजार, डायबिटीज यासह  सुमारे १३०० आजारांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. एकूण सुमारे ५० कोटी जनतेचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येणार आहे. 

राधा: आई, पण आता संगिता मावशीना, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल ग ?

आई: अगं, काळजी करून नकोस बेटा !  नागरिकांच्या मदतीसाठी सरकारतर्फे “आयुष्यमान मित्रांचीही” नेमणूक करण्यात येत आहे. तसेच १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मी ही माहिती स्वतः जाणून घेते आणि मग मावशींना मदत करते ! आपण  सुशिक्षित लोकांनी, असे 'आयुष्यमान' मित्रांचे काम करायला काय हरकत आहे ?  मग तर खुष  ?

राधा: आई, मग मला काही काळजी नाही. चल लगेच फोन करूयात. मात्र स्पीकर फोन लाव हं ! मलाही ही माहिती समजावून घ्यायची आहे.

आईला , राधाची मावशींप्रती असणारी तळमळ बघून आनंद वाटतो. त्या दोघी नंतर फोन वरून, योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेतात.