Monday, October 7, 2019

मनो-Money: भाग १०: कर नाही तर .... : डॉ. रुपाली कुलकर्णी



मनो-Money: भाग १०: कर नाही तर ....   

"आई ग , कंटाळा आलाय  हा  आयकराचा  धडा  वाचताना ! सगळे कसे ग तांत्रिक शब्द !!" , राधा तक्रारीच्या सुरात आईला सांगत होती. आईने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली "ते खूप सोप्पे असते ! मी सांगेन तुला समजावून नंतर." रात्री जेवणाच्या टेबलाभोवती, आई -बाबा, राधा , ओजस दादा , आजी -आजोबा सगळे जमले होते. ओजस म्हणाला, " बाबा, आज शाळेत आम्हाला सुट्टीत कोणी काय काय धमाल केली त्यावर दोन मिनिटे बोलण्याची संधी दिली होती. खूप मजा आली". तेव्हढयात राधाबाईंना काहीतरी आठवले आणि ती उत्साहात सगळ्यांना म्हणाली, " आई, आम्हाला पण शाळेत हे सगळे विचारले होते. तेव्हा मला समजले की मे महिन्यात येऊन गेलेला डिस्ने मुव्हीजचा "अल्लादिन" सिनेमा माझा बघायचा राहून गेलाय. मला तो सिनेमा पाहायचाय बरं  का. पण आता CD आणून पाहावा लागेल. ओरिजिनल CD ची किंमत २५० रु  आहे." यावर आजी पण म्हणाली, "हो हो, CD आणून पाहुयात , म्हणजे मला आणि आजोबांनाही बघता येईल." सगळ्यांनीच या मागणीवर जोर धरलेला पाहून, आईला राधाच्या आयकराच्या धड्याची आठवण झाली आणि ती म्हणाली, " ठीक तर मग !  आपण सगळे रविवारी, CD  आणून हा सिनेमा बघूयात. पण सगळ्यांनाच बघायचा आहे ना, मग त्यासाठी सगळ्यानी काँट्रीब्युशनही  द्यायला पाहिजे.". बाबा म्हणाले, "बरोबर आहे. मी आणि आई सगळ्यात जास्त कमावतो म्हणून आम्ही प्रत्येकी १०० रु . देतो. आजी -आजोबा ज्येष्ठ आहेत, तर त्यांना यातून पूर्ण सूट देऊयात. आणि तू आणि ओजसने,  आपल्या पॉकेटमनीमधून, प्रत्येकी २५ रु. दिले पाहिजेत. आपल्या सगळ्यांना मजा येईल,  तेव्हा आपण सगळे मिळून वर्गणी देऊ.  आहे कबूल ?"  मुलांना हे म्हणणे पटले आणि त्यानुसार घरातील  सगळ्यांनीच आर्थिक योगदान दिले आणि एकत्रित सिनेमाचा आनंद लुटला.

आईने नंतर राधाला समजावून सांगितले, "अग आयकर म्हणजे असेच आर्थिक योगदान जे  पैसे  कमाविणारा प्रत्येक नागरिकसरकारला दरवर्षी जमा करत असतो. समाजात वावरताना, नागरिकांना चांगले रस्ते, परिवहानाची चांगली साधने, सार्वजनिक उद्याने, नाट्यगृहे इ.  अशा  ज्या  काही सामायिक सुविधांची गरज लागते.  त्यासाठी प्रत्येक नागरिक आपापल्या मिळकती / वेतनामधून असे योगदान देत असतो. ह्यालाच  म्हणतात मिळकतीवरील कर किंवा आयकर ! ज्याची मिळकत ज्यास्त त्याने त्याच प्रमाणात योगदान द्यायचे !  जसे  CD आणण्यासाठी मी आणि बाबांनी सगळ्यात जास्त योगदान दिले, अगदी तसेच बरं  का ! प्रत्येकजण आपल्या उत्पन्नानुसार , सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणाइतका आयकर भरत असतो.  ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात वेळोवेळी असे कर्तव्य बजावल्याने तसेच उतारवयात त्यांच्या मिळकतीवर मर्यादा येत असल्याने, सरकार त्यांना  आयकरावर  विशेष सूट देत असते. जसे आपणही आजी -आजोबाना या CD काँट्रीब्युशनसाठी वगळले अगदी तसेच. तसेच गरीब वर्ग ज्यांचे  उत्पन्न अगदीच  मर्यदित  असते त्यांनाही आयकर भरावा लागत नाही. आपल्या देशाच्या उभारणीसाठी, सुंदर, स्वछ आणि चांगल्या सोयी-सुविधा मिळविण्यासाठी, योग्य तो आयकर भरणे, हे  प्रत्येक पैसे कमाविणाऱ्या  नागरिकाचे कर्तव्यच असते. "  राधाने हे समजल्याचा अविर्भावात मान डोलावली आणि म्हणाली , " आई , मग हे सगळे चांगले-चुंगले उपभोगायचे असेल तर मग प्रत्येकानेच आयकर भरलाच पाहिजे. बरे झाले बाई, तू आणि बाबांनी मोठ्ठे  काँट्रीब्युशन केले ! नाहीतर आपण सिनेमा कसा काय बघितला असता ?" हसून आई म्हणाली, "अगदी बरोबर !! करभरणा न चुकविता केला  तरच सगळ्यांना चांगल्या सामायिक सुविधांचा लाभ होतो. आणि कर नाही तर ....", राधा आईचे वाक्य पुर्ण करित  म्हणाली, " कर नाही तर....   तर मात्र या सगळ्यालाच घरघर " !! राधाच्या हे वाक्य ऐकून, सगळे घरच हास्यकल्लोळात बुडालें !!     
-