Friday, November 27, 2020

मनो-Money: भाग २० :महागाईचा बागुलबुवा- डॉ. रुपाली कुलकर्णी

 



महागाईचा बागुलबुवा

सुभाष आजोबा त्यांची हिशोबाची जुनी डायरी राधाला वाचायला देतात. त्यात सुभाष आजोबांचा पहिला पगार केवळ ४०० रु. होता हे वाचून राधाला खूपच आश्चर्य वाटते आणि ती आजोबांशी गप्पा मारायला लागते.

राधा:  आजोबा फक्त ४०० रु. पगार ? मग तुमचा आणि आजीचा खर्च कसा काय भागायचा ह्यात ?

आजोबा(हसून) : अरे राधाताई किती तुम्हाला आमची चिंता ? सांगतो सगळे ! अग, आमच्याकाळी महागाई पण कमी होती. त्यामुळे काही पैसे बचत करूनसुद्धा आमचे अगदी आरामात भागायचे  बर का !!  बघ ना मी महिन्याचा खर्च सुद्धा लिहून ठेवत असे. त्यात तुला काय दिसतेय ?

राधा ( आश्चर्य वाटून) : अरे बापरे आजोबा, काय चंगळ होती तुमची ! पेट्रोल फक्त २०रु. लिटर ? आणि गॅस सिलिंडर ६० रु?       

आजोबा: आणि आता  किती किंमती आहेत याच्या ? आहे का माहिती तुला ?

राधा: हो आजोबा ! आई मला जेव्हा गाडीवर शाळेत सोडते तेव्हा कधीतरी पेट्रोल भरत असताना माझ्या लक्षात आले की पेट्रोल चा भाव आता ८० रु. लीटर च्या  आसपास आहे. आणि घरी  जेव्हा गॅस सिलिंडर डिलिव्हरी द्यायला माणूस आला होता तेव्हा बाबांनीच मला पैसे मोजायला लावले होते. ते मी ३५० रु दिले होते बहुदा.   

आजोबा: म्हणजेच काय की पेट्रोल आणि गॅस सिलिंडर दर  साधारण चौपट झाला आहे !   ते ही तीस वर्षात ! ह्यालाच म्हणतात महागाईचा परिणाम ! राधा, जसे जसे कच्चा माल, दळणवळण, बांधकाम साहित्य, मनुष्यबळ आदींच्या  किमती वाढतात तसा तसा त्यावर अवलंबून असणाऱ्या वस्तूंचा दर ही  वाढत जातो. महागाईचा हा दर टाक्यांमध्ये मोजतात.  

राधा: बापरे आजोबा ! म्हणजे मग मी आई-बाबांच्या वयाची असें तेव्हा किती बरे महाग असतील या अशा वस्तू ? मग त्या कशा काय परवडतील आम्हाला ? हा महागाईचा बागुलबुवा आमच्यामागे हात धुवून लागणार आहे तर!!

आजोबा (हसून): राधा त्यासाठीच सांगितले होते ना तुला की बचत करायला हवी ! विसरलीस का ? पण आज त्यात अजून एक महत्वाची बाब लक्षात घे. आपण पैशांची बचत किंवा गुंतवणूक ज्या माध्यमात करतो त्यांनी महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा आपल्याला जर दिला तरच आपण येणाऱ्या  महागाईचा सामना करू शकतो. तसे झाले नाही तर अशी गुंतवणूक काहीच कामाची नाही बरे ! त्यासाठी खूप विचारपूर्वक आपल्या  पैशांचे  नियोजन आणि व्यवस्थापन करावे लागते. म्हणजे मग आपल्याला महागाईचा बागुलबुवा फक्त दिसतो पण तो आपल्याला त्रास देऊ शकत नाही. 

राधा: समजले आजोबा ! पण मग अशी बचत माध्यमे कोणती आहेत ?

आजोबा:  अग असे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतात. जसे बचत खाते, मुच्युअल फंडस्, शेअर बाजार, सोने किंवा जागेत गुंतवणूक इ. अशा पर्यायांची आपल्या गरजेनुसार  आपण निवड करायला हवी ! त्यासाठी अशा पर्यायांची पूर्ण माहिती करून घ्यायला हवी. पण ते तुला समजावून सांगायचे काम मी तुझ्या बाबावर सोपवतो !  आता पळा, माझी  फिरायला निघायची वेळ झाली !

राधा: ठीक आहे आजोबा ! आज मला तुमच्या  डायरीमुळे "महागाईचा दर"  ही नवीन संकल्पना शिकायला मिळाली. चला, मी पण येते तुमच्या बरोबर आज फिरायला !

राधा आजोबांचा हात धरून,  आनंदाने घराबाहेर  पडते !        

 

                

डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड

Friday, November 20, 2020

मनो-Money: भाग १९ :बचत फॉर्म्युला.- डॉ. रुपाली कुलकर्णी

 


बचत फॉर्म्युला

आज राधा आजोबांना त्यांचे कपाट आवरण्यासाठी मदत करते आहे. तिच्या हाती सुभाष आजोबांची जुनी डायरी लागते आणि त्यांच्या गप्पा  सुरु होतात.

 

राधा: आजोबा ही कसली डायरी ? इतकी जुनी ? लागणार आहे का तुम्हाला आता ?

 

आजोबा: अरे वा राधाबाई ! सापडली का तुम्हाला ? ही माझी जुनी हिशोबाची डायरी आहे. अग, मी नवीन नवीन नोकरीला लागलो ना तेव्हा आजकाल सारखे मोबाईल अँप्लिकेशन किंवा कॉम्प्युटर नव्हते ना. मग आम्ही लोक , अशा डायरीमध्ये घरखर्च लिहून ठेवायचो.

 

राधा : आजोबा, बघू का मी उघडून ? बघू तरी तुमचे खर्च काय काय होते ?

 

आजोबा : हा हा हा ! जरूर बघ राधा आणि सांग मला तुला काय काय लक्षात येतेय ते.

 

राधा: हे काय आजोबा , तुमचा पहिल्या  महिन्याचा पगार फक्त ४०० रु. होता ? त्यातले सुद्धा तुम्ही २०० रु. च घरखर्चासाठी लिहिले आहेत. बाकीचे  २०० रु. बँकेत टाकले अशी नोंद दिसतेय. 

 

आजोबा: हो. आमच्याकाळी आजसारखे गलेलठ्ठ  पगार नव्हते बरे ! आणि महागाई  पण फारशी नव्हती  म्हणूनच  ते ४०० रु. सुद्धा आरामात पुरायचे आम्हाला ! पण, तुला यातून हे लक्षात आले का की आम्ही  केवळ बचत केल्यानंतरचेच  पैसे  घरखर्चाला घ्यायचो. वापरायचो. म्हणजे आमचा फॉर्म्युला  होता "आधी बचत आणि नंतर खर्च" . तुम्हा  मुलांनाही आई बाबांकडून पॉकेटमनी मिळतो ना ? तुम्ही कसा खर्च करता बरे ?

 

राधा : आजोबा , आमचा खर्चाचा फॉर्म्युला तुमच्या अगदी विरुद्ध आहे आणि तो आहे "आधी खर्च आणि मग बचत" ! आहो  आजोबा, आम्हा मुलांना बचतीची काय गरज ?

 

आजोबा: अग, असा कसा तुमचा बचत फॉर्म्युला ? आणि तुम्हाला बचतीची गरज नाही कशी काय ? मागे तूच सांगितले होते ना, तुझ्या वर्गातील योगिताला, तिची आजी  आजारी पडली तेव्हा  फी भरण्यास अडचण होती म्हणून ? जर तिच्या आजीने  किंवा तिने आपले काही पैसे, दरमहा  बाजूला काढून  बचतीसाठी वापरले असते तर आपत्काळीं त्यांना ते उपयोगी नसते का पडले? आणि तूही जर असे केले असतेस तर तुझ्या मैत्रिणीची मदत, तुझ्या बचतीमधून तूच करू शकली असतीस. तू ते आई बाबांना सांगितले नसतेस !

 राधा: हो आजोबा , खरे आहे. मी फक्त माझ्या पुरताच विचार करीत होते ना म्हणून मला वाटत होते की पैसे कमी पडले तर आई-बाबा आहेतच की.

आजोबा: राधा, आई-बाबा तर तुमच्यामागे कायम असतातच. तुम्हाला काही कमी पडू नये, म्हणून कष्टाने पैसा कमवीतच असतात. पण म्हणून, पॉकेटमनी सगळाच खर्च करून पुन्हा  गरज पडल्यास त्यांच्याकडे हात पसरणे बरे वाटते का ? आई-बाबा सुद्धा त्यांच्या काही चैनी / हौसमौज बाजूला ठेवून तुमच्यासाठी जर इतके कष्ट करित असतात तर तुम्ही मिळालेला पैसा जपून वापरायला नको का ? बघ तुला पटतंय का ?

 राधा : हो आजोबा ! पटले मला !! तुमचाच फॉर्म्युला करेक्ट आहे... "आधी बचत मग खर्च !" . म्हणजे मग गरज पडताच  मी माझी किंवा इतरांची जमेल तशी मदत नक्की करू शकेन !

राधाला योग्य ती  शिकवण मिळाली म्हणून आजोबा समाधान पावतात.     

 

डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड


Thursday, November 12, 2020

सुखान्त जीवनाचा : श्री. अविनाश भिडे

   

अर्थ साक्षरतेचाच एक भाग म्हणजे 'Sucession/Estate Planning' किंवा 'इच्छापत्र करणे'. याच विषयांतर्गत 'वैद्यकिय इच्छापत्र' याचा देखील समावेश होतो.  आता 'ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस' म्हणजेच 'लिविंग विल' किंवा 'वैद्यकीय इच्छापत्र' लिहून/ करून ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याविषयी कायदेशीर मार्गदर्शन, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ् श्री. अविनाश भिडे , यांच्या लेखणीतून !

सुखान्त जीवनाचा 

जन्माला आलेला प्रत्येक जण क्षणा-क्षणा ने मृत्यू च्या समीप जात असतो . मृत्यू हे जीवनाचे शाश्वत सत्य आहे. परंतु अशा आज ना उद्या नक्की होणाऱ्या घटने बाबत म्हणजेच मृत्यू बाबत समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. त्याउलट साऱ्यांच्याच मनात त्याबद्दल भीती असते. माणसाचा मृत्यू होणार हे जरी निश्चित असले तरी तो कधी येणार हे मात्र निश्चित नसते. तसेच तो कश्या प्रकारे येणार हे देखील निश्चित नसते. अपघाती किंवा एखाद्या दुर्दैवी घटनेने मृत्यू येतो, ती एक खूप अचानक ओढवलेली घटना असते. त्यावेळी ती व्यक्ती तसेच त्या व्यक्तीचे नातेवाईक हे हतबल असतात. परंतु एखाद्या व्यक्तीस गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास व सर्वतोपरी औषधोपचार  करूनही तो आजार बारा होणार नसल्यास, त्या व्यक्तीस किंवा त्यांच्या आप्त स्वकीयांना त्या व्यक्तीच्या मृत्यूची चाहूल लागू शकते. अशा गंभीर स्वरूपाच्या आजारामुळे व त्यावरील औषधोपचारामुळे आजारी व्यक्तीस अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात. अशा परिस्थितीत आजारी असलेल्या व्यक्तीचे नातलग व मित्र परिवार त्या व्यक्तीच्या वेदना जरी वाटून घेऊ शकत नसले, तरी आपल्या जिवा- भावाच्या माणसाला असे मृत्यूशी झुंज देतांना बघून त्यांनाही  खूप मानसिक त्रास होत असतो. अशा गंभीर स्वरूपाच्या आजारावरील औषध उपचाराचा खर्च देखील बराच असतो. अश्या वेळी आर्थिक परिस्थिती जर कमकुवत असेल तर आपल्या जिवा-भावाच्या  व्यक्तीस वाचवण्यासाठी किंवा सामाजिक दबावामुळे  कर्ज काढून आर्थिक नड भागवणे हा एकाच उपाय शिल्लक राहतो. सर्व प्रयत्न पणाला लावूनही काही आजार मात्र बळावतच जातात व कितीही प्रयत्न केले तरी पूर्ण बरे होऊ शकणार नाही अश्या स्थितीत येऊन पोचतात. त्याला 'टर्मिनल इलनेस' असे संबोधले जाते. अशा स्थितीत देखील रुग्णावर उपचार चालूच ठेवले जातात किंवा तसा नातेवाईक आग्रह धरतात. अशाने त्या रुग्णाचा मृत्यू हा फक्त लांबवला जातो व खरे तर त्याच्या शरीराची प्रयोगशाळा होते. रुग्ण शुद्धीत असेल तर रुग्णाच्या यातना बघवत नाहीत.

                          मृत्यू कधी येणार हे निश्चित नसते परंतु तो येई पर्यंत कसे जगावे हे मात्र प्रत्येकाच्या हातात असते. वर नमूद केल्या  प्रमाणे एखादी  ‘टर्मिनल इलनेस’ असलेली व्यक्ती जेव्हा आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचते, तेव्हा एक एक करत त्या व्यक्तीच्या शरीराचे सर्व अवयव निकामी होऊ लागतात. अशा वेळी जर आजार बरे करण्यासाठीचे सर्व औषधोपचार चालूच ठेवले तर ते केवळ रुग्णाचा मृत्यू लांबवण्यासारखे होते. त्याउलट ही परिस्थिती लक्ष्यात घेत रुग्णास कमीत कमी वेदना होतील एवढेच उपचार चालू ठेऊन त्या व्यक्तीचे शेवटचे दिवस सुखकर होतील हा प्रयत्न केला पाहिजे. रुग्ण शुद्धीत असल्यास व आजार संसर्गजन्य  नसल्यास ती व्यक्ती आप्तस्वकीयांच्या सहवासात घरी राहील अशी व्यवस्था करणे संयुक्तिक ठरेल. ‘इच्छामरण’  किंवा ‘दयामरण’ यासंबंधी कायदा भारतात अस्तित्वात नाही व त्यामुळे त्यास मान्यता देखील नाही. त्यामूळे वैद्यकीय व्यावसायिक त्यांच्यावर असलेल्या बंधनामुळे रुग्णाची अवस्था बघूनही त्यावर औषधोपचार थांबवण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत.

                          याबाबत सर्वांनाच माहित असलेले नर्स- अरुणा शानबाग यांच्या केसचे उदाहरण आपल्या समोर आहे. बऱ्याच वर्षा पूर्वी कर्तव्य बजावत असतांना नर्स अरुणा शानबाग यांना दुर्दैवी प्रसंगास सामोरे जावे लागले व त्याच घटनेत त्या कोमामध्ये गेल्या. अनेक वर्ष त्या त्याच अवस्थेत, रुग्णालयाच्या  देखरेखी खाली औषधोपचार घेत होत्या. त्यांचा दया मरणाचा अर्ज हा केवळ कायदा नसल्याने फेटाळण्यात आला. अखेर अनेक वर्षांनी त्यांचा कोमाच्याच अवस्थेत  मृत्यू  झाला.

                         परंतु आता 'ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस' म्हणजेच 'लिविंग विल' किंवा 'वैद्यकीय इच्छापत्र' लिहून/ करून ठेवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठाने २०१८ मध्ये एक अतिशय महत्वपूर्ण व सर्व समाजाच्या हिताचा असा निर्णय घेतला. त्यामध्ये 'ऍडव्हान्स मेडिकल डिरॅक्टिव्हस' म्हणजेच 'लिविंग विल' किव्वा 'वैद्यकीय इच्छापत्र’  लिहून/ करून ठेवण्याची तरतूद केलेली आहे व ते कधी कोणी करावे, कसे करावे व ते कोणावर बंधनकारक राहील ह्या संबंधीचे सर्व निर्देश दिले आहेत. हा निर्णय देतांना मनुष्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसेच ते कसे जगावे हे ठरवण्याचाही अधिकार आहे हे तत्व लक्षात घेतलेले आहे.

आता प्रत्येकाला आपले 'वैद्यकीय इच्छापत्र' कसे लिहून ठेवता येईल? हा प्रश्न पडला असेल, त्याबद्दल थोडे सविस्तर बोलू.

१. वैद्यकीय इच्छापत्र हे कोणत्याही सज्ञान व्यक्तीस करता येईल. एखाद्या गंभीर  आजाराने ग्रासलेली/ टर्मिनल इलनेस असलेली व्यक्ती देखील शुद्धीत व मानसिक दृष्ट्या सक्षम असतांना वैद्यकीय इच्छापत्र हे बनवू शकते.

२. वैद्यकीय इच्छापत्रातील मजकूर/ स्वतः ची इच्छा ही सोप्या व स्पष्ट भाषेत असावी.                                                             

३. ‘आपण व्यक्त केलेल्या मजकुराचे होणारे सर्व परिणाम लक्ष्यात घेऊन इच्छापत्र बनविले आहे’, ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात असावा.

(जसे, मला कधी बरा होऊ न शकणारा आजार ओढवल्यास, अथवा आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास अथवा माझी ‘वेजिटेटिव्ह स्टेज’ झाली असता माझ्यावर होणारे औषधोपचार थांबवण्यात यावे, व्हेंटिलेटर इत्यादी यंत्रणा बंद करण्यात याव्या.  मी शुद्धीत असल्यास व झालेला आजार संसर्गजन्य नसल्यास मला रुग्णालयात न ठेवता घरी नातेवाईकांत राहण्यास मिळावे, कमीत कमी वेदना सहन कराव्या लागतील एवढेच उपचार चालू ठेवावे व नैसर्गिक मृत्यू येऊ द्यावा इत्यादी.)

४. पत्रात फॅमिली डॉक्टरचे , जवळच्या नातेवाईकांचे व शक्य झाल्यास व्यवस्थापकाचे नाव व फोन  नंबर नमूद करावा.

५. त्यावर २ साक्षीदारांच्या साह्या असाव्यात.

६. असे वैद्यकीय इच्छापत्र स्थानिक न्यायाधीश साहेबांसमोर सही करून घ्यावे.

७. वैद्यकीय इच्छापत्राच्या ६ प्रति असाव्या. ह्या प्रति स्थानिक न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, स्वराज्य संस्था ( जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका), पंचायत समिती, फॅमिली डॉक्टर , व्यवस्थापक यांच्या कडे असाव्या. जेणेकरून तुम्ही रुग्णालयात हतबल स्थितीत असल्यास कोणाला त्याचा गैरवापर करता येऊ नये.

८. वैद्यकीय इच्छापत्र अंमलात आणण्याची वेळ आल्यास कोणती कार्यपद्धती अंमलात आणली जावी हे स्पष्ट नमूद असावे . जसे की, व्हेंटिलेटर लावावा लागल्यास २४ तासाहून जास्त वेळ ठेवूनही परिणाम न झाल्यास तो थांबविण्यात यावा/ वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधोपचार करून ही बरे न होण्याचे व्यक्त केल्यास औषधोपचार थांबविण्यात यावे इत्यादी.

९. इच्छापत्र कधीही रद्द करण्याची अथवा बदलण्याची देखील तरतूद निर्देशात केलेली आहे.

ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी याबाबत मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत.

ही मार्गदर्शक तत्वे सर्व सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावी  व त्याचा सर्वांना फायदा व्हावा ह्या जाणिवेतून, समाजसेवा ह्या हेतूने मी ' सुखान्त जीवनाचा' हे पुस्तक लिहिले आहे  व ते विना मूल्य उपलब्ध केले आहे. पुस्तकाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे हिंदी व इंग्रजी भाषांतर देखील पूर्ण झाले आहे व अनुवादित प्रती देखील लवकरच वाचकांना विनामूल्य  उपलब्ध करून दिल्या जातील हे सांगतांना मला खूप आनंद होतो. धन्यवाद.

लेखकाचा संपर्क: ९४२२२५६२११ / avinash.bhide@yahoo.com



Friday, November 6, 2020

मनो-Money: भाग १८ :आहे भविष्यकाळ अटळ म्हणून...- डॉ. रुपाली कुलकर्णी

 



आहे भविष्यकाळ अटळ म्हणून...

 

आज राधा खूप उदास मूडमध्ये दिसते आहे. आई – बाबा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करतात.

आई: आज इतका कसा चेहरा उतरलाय राधा ? काय झाले?

राधा: आई, तुला माझ्या वर्गातील योगिता माहिती आहे ना ? तिचा सांभाळ लहानपणापासून तिच्या आजीनेच केला आहे, ती योगिता?

आई: हो ग. तिची आजी चार घरी कामे करुन योगिताला शिकवित आहे. तीच ना? तिचे काय ?

राधा: अग तिच्या आजीला अपघात झाला आणि आता ती ४ महिने तरी कामे करू शकणार नाही. योगिताला तर दुसरे कोणीही नाही. आता त्यांचा घरखर्च, शाळेचा खर्च कसा चालणार म्हणून योगिता खूप काळजीत होती आज.

बाबा: अच्छा, असे आहे तर. आपण त्यांना भेटायला जाऊ. शाळेतही जाऊ. तिथे बोलून काहीतरी मार्ग नक्की काढू. तू चिंता करू नकोस.

राधा: हो बाबा, शाळेत ताई तिला, आजीला पेन्शन मिळते का असे विचारित होत्या. बाबा, काय असते हे पेन्शन?

बाबा: अग पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन. कुठल्याही व्यक्तीचा नोकरीतील कार्यकाळ संपला की तिचे वेतन थांबते. मग तिचा वृद्धापकाळाचा खर्च कसा चालणार सांग बरे ? यासाठी, कर्मचाऱ्याच्या कार्यकाळात त्याची कंपनी किवा संस्था, दरमहा त्याच्या वेतनातील काही भाग बाजूला काढते आणि त्यात स्वतःतर्फेही काही योगदान जमा करते. म्हणजे मग निवृत्तीनंतरही त्या व्यक्तीस, या  जमा राशीतून ठराविक रक्कम, निवृत्ती नंतरचे वेतन अर्थात पेन्शन म्हणून दरमहा मिळू शकते. या अशा सोयीमुळे वृद्धापकाळातही त्या व्यक्तीचा घरखर्च चालू शकतो.

राधा: पण बाबा, योगीताच्या आजीला असेल का असे पेन्शन?

बाबा: अग मी सांगितलेली सुविधा ही बहुतांश करुन सरकारी कर्मचारी किंवा इतर संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. पण असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना किंवा असे लोक ज्यांचे पोट हातावर असते त्यांना मात्र पेन्शन मिळत नाही.

आई: अग पण भारत सरकारला गरीब लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या बाबतीत चिंता वाटते. तसेच असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांच्या, दीर्घायुषी आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून भारत सरकार त्यांना निवृतीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्यासाठी उद्युक्त करते आहे. त्यासाठी सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे.

बाबा: हो राधा. हि योजना सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे. १८ ते ४० या वयोगटातील ज्या व्यक्ती आपले योगदान बॅंकेत ठेवतात त्यांना त्यांच्या योगदानाच्या प्रमाणात, कायमस्वरूपी, दरमहा रु १००० ते रु ५००० असे पेन्शन मिळू शकते. जितक्या लवकर वर्गणीदार योजनेत सामील होईल तेव्हढे त्याचे  योगदान कमी असते आणि वयानुसार ते वाढत जाते. योगदान जमा करण्याचा कालावधी कमीत कमी २० वर्षाचा हवा असतो आणि वयाच्या  ६० व्या वर्षी पेन्शन मिळणे लागू होते.

राधा: आई, बाबा, गरिब जनतेसाठी ही तर खूपच चांगली सुविधा आहे. योगीताच्या आजीला मात्र आता याचा उपयोग होणार नाही असे दिसते.

आई: हो राधा. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांशी बोलून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. पण आजच्या ह्या बोलण्यातून तुला काय समजले ते तरी सांग.

राधा: येस आई ! मला समजलेले हेच की वृद्धापकाळ हा अटळ आहे. तेव्हा तो सुखाने व्यतित करता येण्यासाठी प्रत्येकाने लवकरात लकवर त्यासाठी बचत किंवा गुंतवणूक केली पाहिजे. राईट बाबा?

बाबा: येस ! करेक्ट ! चला आता, आपण योगीताच्या घरी जाऊन येऊ !   

-   डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड