आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून Mentoring अथवा समुपदेशन / सल्ला यांचे महत्व आहे. हे महत्व पौराणिक कालावधीत असणाऱ्या कृष्ण-अर्जुन समुपदेशनापासून ते अलीकडच्या कालावधीत असणाऱ्या संतवाणी पर्यत दिसून येते. यातील समान सूत्राचा विचार करता, समाजाच्या कल्याणासाठी जे जे योग्य आणि पालन करण्यास ईष्ट, अशा वर्तनाचे, गुणांचे वर्णन दिसते. 'आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक' क्षेत्राचा विचार केल्यास, तज्ञ्,आर्थिक सल्लागाराची भूमिकाही Mentoring शी समरूप दिसते.
तुमच्या आर्थिक सल्लागाराला तुमच्याविषयी सर्व आर्थिक माहिती असते जसे की तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या, एकूण मिळकत, गरजा, तुमचे दायित्व (कर्जे आणि कर), अडचणी, तुमची स्वप्ने, तुमच्या बचत अथवा गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये ! जसे एखादा मनोविकास मार्गदर्शक, तुमच्या आणि तुमच्या भोवतालच्या परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास करतो त्याचप्रमाणे तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे आणि जवळ असलेल्या ज्ञान आणि अनुभव यांच्यासाह्याने आवश्यक ती माहिती, आर्थिक सल्लागारही विदित करून घेत असतो. त्यामुळेच तो तुम्हाला सर्वमावेषक असा सल्ला देऊ शकतो. एखाद्याला यथोचित सल्ला देण्यापुर्वी, दोघांमधील नाते जसे सुस्पष्ट असावे लागते त्याचप्रमाणे तुमच्याशी भावनिक जोड ठेवून, तुमचा आर्थिक सल्लागार तुमचा एक कौटुंबिक,सहृदय मित्र बनलेला असणेही आवश्यक ठरते. तुमच्या गरजेनुसार विविध आर्थिक योजनांमधून, तुमच्यासाठी योग्य असणारी आर्थिक योजना किंवा आराखडा तुम्हाला देणे असे त्याचे काम असते. तसे करतांना बाजारातील इतर कमिशन आदि आकर्षणांपासून तो स्वतःला दूर ठेवत असतो. आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तो तुमची सोबत करणारा मार्गदर्शक असतो. बदलते कायदे, नियम, मिळकती, बाजारातील चढ उतार असे आर्थिक मुद्दे असोत किंवा घरातील बदलती परिस्थिती जसे नवीन सदस्याचा घरात प्रवेश किंवा घरातील कोणाचे लग्न, शिक्षण किंवा मृत्यू आदी कारणाने निर्गमन अशा कौटुंबिक बाबी असोत, आर्थिक सल्लागार अशा बदलत्या आयामांनुसार, तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये सक्रियतेने बदल करित असतो (Active Management). एखाद्या विश्वासू मित्राप्रमाणे, एक विश्वासाहार्य आर्थिक सल्लागार, तुमच्या बाबतीतली सर्व आर्थिक,कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली माहिती त्याच्याच पुरती मर्यादित ठेवीत असतो. यात तुमची एकमेकांप्रती असलेली निष्ठा आणि संवेदना (Sensitivity) यांची भावनिक जोड कारणीभूत असते.
वरील सर्व मुद्द्यांचा उहापोह झाल्यावर, या स्मार्ट गेझेटच्या युगातही , तज्ञ् , आर्थिक सल्लागाराची Mentor म्हणून भूमिका महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल.