अल्पारंभा फाऊंडेशन आणि आयाम,
नाशिक यांच्या वतीने, २३ सप्टेंबर २०२२ रोजी, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ् डॉ.श्री.विनायक गोविलकर, यांचे "श्री सूक्त" या विषयावर व्याख्यान आयोजित
करण्यात आले होते. यांनी आपल्या ओघवत्या विवेचनातून
"श्रीसुक्ताचे" अनेकविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. त्यांच्या "श्री
सूक्त" या पुस्तकातील काही विवेचन पुढे देत आहोत.
आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मी
हे ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले गेले आहे. लक्ष्मी ही देवता आहे, ती विष्णूची
पत्नी आहे. तिची कृपा आपल्यावर असावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. तिला प्रसन्न करून
घेण्यासाठी अनेक जण अनेक मार्गांनी प्रयत्न करत असतात. श्री सूक्ताचे पठण हा त्यातीलच
एक मार्ग. श्री सूक्ताचा केवळ पाठ करून लक्ष्मी प्रसन्न होईल अशी भाबडी समजूत काहींची
असते. अनेकांना ‘लक्ष्मी’ म्हणजे केवळ ‘पैसा’ असे वाटते. लक्ष्मी प्रसन्न झाली की भरपूर
पैसा मिळेल आणि पैसा मिळाला की सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन जगता येईल अशी समजूत असते.
खरं तर आपल्या कोणालाच केवळ पैसा नको आहे, त्यासोबत अनेक गोष्टी हव्या आहेत. त्यासाठी
पैसा लागणारच आहे. पण तो पैसा आपलं साध्य नाही, ते केवळ साधन आहे. प्राचीन काळापासून
चालत आलेल्या ‘श्री सूक्तात’ लक्ष्मीचे स्तवन आहे, वर्णन आहे, तिच्याकडे मागणे आहे.
आजच्या जगातील पैसा आणि जीवनातील लक्ष्मी या बाबत आपली दृष्टी स्पष्ट करणारे हे सूक्त,
स्तोत्र आहे. पैसा आणि श्री किंवा लक्ष्मी
यातील भेद समजणे आणि पैशासाठी पळापळ की लक्ष्मीची उपासना याचा विचार आपल्या मनात यायला
हवा. म्हणून श्रीसूक्तात मागणे मागितले आहे
- "हे देवी लक्ष्मी माते, भगवान विष्णूंसह तुझा अखंड निवास माझ्या घरात,
वास्तूत असावा. तुझ्या कृपेने अनारोग्य, कर्ज, दारिद्र्य, अपयश यांचा कायमचा नाश व्हावा.माझ्या
समस्त कुटुंबीयांना आरोग्य संपन्न, दीर्घायुष्य, धन संपत्ती, ऐश्वर्य, सुयश, ज्ञान
आणि सौख्ययुक्त शांतीचा चिरकाल लाभ होवो."
माणूस आणि समाज यांच्या अस्तित्वासाठी,
विस्तार आणि विकासासाठी आवश्यक असणा-या संपत्तीस लक्ष्मी म्हणायला हवे.
व्यक्ती स्तरावर लक्ष्मी म्हणजे काय ?
श्री सुक्ता मध्ये म्हटले आहे
-
पुत्र पौत्रम् धनं धान्यं हस्त्यश्वादि गवेरथम् I
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे II२०II
हे देवी तू सर्व प्रजेची माता
आहेस. मला मुले, नातवंडे, धन, धान्य, हत्ती,
घोडे आणि रथ दे. थोडक्यात काय तर शेतीवाडी,
पशुधन, धान्य, पुत्र, पौत्र, सेवक, आप्तेष्ट, राज्य अशी सर्व प्रकारची इहलोकीची लौकिक
समृद्धी आणि तिचा मनसोक्त उपभोग घेता यावा म्हणून आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य हे सारे
‘श्री’ मध्ये अनुस्यूत आहे. केवळ लौकिक संपत्ती
असावी असे नाही तर तिचा उपभोग घेण्यासाठी निरामय आणि दीर्घ आयुष्यही हवे.
समाज स्तरावर लक्ष्मी म्हणजे काय ?
धनं अग्निः धनं वायुः धनं सूर्यो धनं वसुः I I
धनं इन्द्रो बृहस्पतिः वरुणं धनमस्तु मे II २१II
अग्नी धन आहे, वायू धन आहे,
सूर्य धन आहे, पृथ्वी ( जमीन) धन आहे, इंद्र आणि बृहस्पती धन आहेत आणि वरूण ( पर्जन्य) धन आहे. ही सर्व धनरूपे म्हणजे श्री
रूपे आहेत. ते धन प्राप्त होण्यासाठी या सूक्तात प्रार्थना आहे. मुळात ‘श्री’ म्हणजे माणसाचेच नव्हे तर चराचराचे जगणे शक्य आणि सुकर करणारे सर्व काही आहे. ? या
चराचराच्या अस्तित्वासाठी अग्नी, वायू, सूर्य,पृथ्वी, पर्जन्य आवश्यक नाहीत का ? या
पाच गोष्टींना आपण पंचमहाभूते म्हणतो. . सुखी संपन्न आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी ही
पंचमहाभूते ‘लक्ष्मी’ स्वरूप आहेत, तेच खरे धन आहे.
थोडक्यात ऐहिक जीवनाचे सुख केवळ
सोन्या नाण्याच्या रूपात न बघता सुख साधनांच्या स्वरूपात व सर्व परिवार आणि पर्यावरण
यात पाहून विशाल दृष्टीचा प्रत्यय, श्री सूक्ताने दिलेला आहे.
डॉ.श्री.विनायक गोविलकर