Tuesday, March 19, 2019

मनो-Money: भाग ७: काय असते GST ? डॉ. रुपाली कुलकर्णी


   

दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक कर, तमुक कर असे  असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखीन एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून  समजावून  घेऊयात. ही संकल्पना आहे GST  (Goods and Service Tax) अर्थात  वस्तू आणि सेवा कर !!
आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन बालमैत्रिणी, राधा आणि तिच्याच शेजारी राहणारी, तिची वर्गमैत्रीण सारा !! तर झाले काय की, राधाचा वाढदिवस उद्यावर आल्याने, तिच्यासाठी बाबांनी, शाळेत वाटण्यासाठी चॉकलेटचा डबा घरात आणून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाची स्वारी, तयार होऊन शाळेत निघाली ! बाहेर आल्यावर, सारा आणि तिच्या आईने राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ! मग राधाने त्या दोघीना, हसून धन्यवाद दिले आणि  त्यांना एक-एक चॉकलेट काढून दिले. दोघी शाळेच्या व्हॅनमध्ये बसून, शाळेच्या गेटवर पोहोचल्या. गेटवर उभ्या असलेल्या  वॉचमन काकांनी, राधाच्या हातातील चॉकलेटचा डबा पाहिला आणि तिचा वाढदिवस असेल असे समजून त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. आता राधाने त्यांनाही चॉकलेट दिले. मग  राधा आणि सारा आता वर्गात आल्या. पहिला तास सुरू होताचसगळ्या मुलांनी राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग राधाने सगळ्यांना चॉकलेटस वाटले.  वर्गात असलेल्या साराला पुन्हा चॉकलेट मिळाले म्हणून ती खूप खुश झाली.
मित्रांनो आता असे समजा की वाढदिवस म्हणजे आहे तुमचा व्यवसाय आणि चॉकलेट म्हणजे आहे त्यावर द्यावा लागणारा कर !! शेजारीच राहणाऱ्या सारा आणि तिच्या आईला चॉकलेट स्वरूपात जो  मिळाला  तो झाला स्थानिक कर (लोकल टॅक्स) आणि गेटवरच्या वॉचमन काकांना जो मिळाला तो झाला प्रवेश कर (एन्ट्री टॅक्स) ! वर्गातील सर्व  मुलांना जो  मिळाला त्याला म्हणूयात  सेवा कर (सर्व्हिस टॅक्स) आणि साराला दुसऱ्यांदा मिळालेले चॉकलेट हा झाला  अतिरिक्त कर (सरचार्ज) !! एकाच वस्तुवरच्या, अशा सगळ्या वेगवेगळ्या करांमुळे, व्यापारी, सामान्य नागरिक यांची कर भरताना दमछाक होत होती.  जसे राधाला लक्षपूर्वक सगळ्यांना, पण वेगवेगळ्या वेळी चॉकलेट द्यावे लागत होते.  याऐवजी जर तिने चॉकलेटचा डबा शाळेच्या ताईंकडे दिला असता तर त्यांनी सर्वच मुलांना, एकाच वेळी समानतेने चॉकलेट्स वाटली असती.  त्यात कोणी चुकून राहूनही  गेले नसते आणि कोणाला पुन्हा पुन्हा चॉकलेट मिळालेही नसते.  हिच जी एकछत्री, सोपी वाटपपद्धती झाली, त्याचप्रमाणेच काम करते  GST !! 1 जुलै 2017 रोजी, आपल्या देशात हा GST लागू करण्यात आला.  त्यामुळे देशांतर्गत सर्वत्र, एका वस्तूवर, एकच कर लागू झाला.  केंद्र सरकारला मिळणारे उत्पादन कर, सेवाकर हे रद्द झाले तसेच राज्य सरकारला मिळणारे  मूल्यवर्धन टॅक्स (व्हॅट)प्रवेश कर हे रद्द झाले.  याचा फायदा असा झाला की, देशात प्रत्येक वस्तूचा, एकच भाव  झाला.  त्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जाण्याची आवश्यकता उरली नाही आणि सर्व उद्योग हे एकाच करप्रणाली अंतर्गत समाविष्ट झाले. यामुळे कर भरण्याची पद्धतीही सुलभ झाली.  सारासारख्या अतिरिक्त लाभास मुकलेल्या व्यक्तींचा, या प्रणालीस  विरोध होणे स्वाभाविकच होते ! 

आहे ना सोपे मित्रांनो !! मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, यांनी हीच संकल्पना एका व्हीडीओ मार्फत विशद करुन सांगितलेली आहे. बघायचं का तुम्हाला ? मग उघडा युट्युब आणि टाईप करा "जीएसटी पल्लवी जोशी". तुम्ही समजावून घ्या आणि इतरांनाही समजावून सांगा !!

मनो-Money : भाग ६ : अर्थाचा अर्थ !! डॉ. रुपाली कुलकर्णी




हॅलो बालदोस्तांनो ! या लेखमालेतील मागील सर्व लेखांमधून, आपण “अर्थ” म्हणजेच पैसा यासंबंधी बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना, गोष्टीरुपांतून समजून घेतल्या. आता यावेळी त्यातून थोडा ब्रेक घेउया !! यावेळी मी तुम्हाला मराठी साहित्या मधील सुपरिचित लेखक श्री. आचार्य अत्रे यांच्या एका कथेचा संदर्भ घेऊन, आजच्या काळाशी सुसंगत अशी गोष्ट सांगणार आहे. तिही अर्थातच “अर्था”विषयी म्हणजेच पैश्याविषयी !

तर आपल्या गोष्टीत आहे एक छोटासा मुलगा नंदू !! नंदू आपल्या आई-बाबा आणि आजी-आजोबांसोबत रहात असतो. एकदा शेजारील अक्षयदादाकडे आलेली नवीन, महागडी सायकल बघून “मला सुद्धा अशीच सायकल हवी”, असा हट्ट नंदू करतो. तेव्हा बाबा त्याला समजाऊन सांगतात, “अरे अक्षय दादा कॉलेज सांभाळून एके ठिकाणी काम करतो आणि पैसे कमावितो. असे करून त्याने जमविलेल्या पैशामधून आपली सायकल विकत घेतली आहे”. आजोबापण नंदूला सांगतात, “नंदू, पैसे कमविण्यासाठी काम करणे गरजेचे असते पण त्यासाठी अजून तू लहान आहेस. शिवाय तुला तशा सायकलची आत्ता आवश्यकताही नाहीये.” मग नंदू विचारात पडतो की ‘मीही खरे म्हणजे घरातील किती कामे करतो मग मीही पैसे कमवू शकतोच की !! लहान असलो म्हणून काय झालं ? घरातील व्यक्तींनी सांगितलेल्या प्रत्येक कामाचा मी मोबदला मागू शकतो आणि पैसे कमावू शकतो’. झालं, तेव्हापासून नंदू त्यालासांगितलेल्या कामांची यादीच लिहायला सुरू करतो. एकदा आई त्याला दळण आणून द्यायला सांगते तेव्हा नंदू आपल्या यादीमध्ये लिहितो “दळण आणले- पाच रुपये”. एकदा आजोबा त्याला चष्म्याच्या दुकानातून त्यांचा चष्मा आणून द्यायला सांगतात. तेव्हा नंदू यादीमध्ये लिहितो, “चष्मा आणला, दहा रुपये”. असे होता होता, नंदूच्या मनातील मदतीची भावना कमी होत जाते आणि तो कोण आपल्याला कधी काम सांगतो, याचीच वाट बघायला लागतो. असाच महिना उलटल्यानंतर, नंदू त्याच्या कामांच्या यादीतल्या सर्व मोबदल्याची बेरीज करतो आणि ती यादी, आईला दिसेल अशी, साखरेच्या डब्यात ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी चहा करताना आईला ती यादी सापडते. घर कामासाठी केलेल्या मदतीचा, नंदूला मोबदला हवा आहे, हे समजल्यावर तिला वाईट वाटते. पण नंदूला न दुखवता त्याला मदतीचे महत्व समजावून द्यायला पाहिजे म्हणून ती एक युक्ती करते. नंदूप्रमाणे तीही एका कागदावर नंदूसारखीच यादी बनविते. त्यात लिहिलेले असते “नंदूची लहानपणापासून सर्व आजारपणे केली, शून्य रुपये ! नंदूला रोज शाळेसाठी डबा बनवून देते, शून्य रुपये ! बाबा नंदूला रोज शाळेत सोडतो, शून्य रुपये !, आजी नंदूला रोज गोष्ट सांगते, शून्य रुपये !”. आईने केलेली ही लांबलचक यादी, ती नंदूला दिसेल अशी त्याच्या दप्तरात ठेवून देते. नंदू जेव्हा गृहपाठ करायला दप्तर उघडतो तेव्हा त्याला ती यादी मिळते आणि ती वाचल्यानंतर  नंदूला जाणीव होते की ‘आई आणि घरातील प्रत्येकजण, खरोखरच आपल्यासाठी किती काम करतात आणि त्याचा तर काहीसुद्धा मोबदला घेत नाहीत. असे असूनसुद्धा ती सगळी आपल्यावर किती प्रेम करतात’. तो धावत जाऊन आईला मिठी मारतो आणि म्हणतो “आई, मला समजले !! कुठ्ल्याही मदतीचा मोबदला पैशात होऊ शकत नाही !! तुम्ही सगळेचजण माझ्यासाठी खरे म्हणजे किती किती करता!! त्याचा मोबदला मी असा पैशात करायला नको हवा होता !”  नंदूला आपली चूक उमगली याचे आईला समाधान वाटते आणि ती नंदूला जवळ घेते.

समजले का बालदोस्तांनो? घरकामात केलेली मदत किंवा कुणाला अडचणीत केलेली मदत याचा मोबदला पैशात कधीच होऊ शकत नाही. प्रेम, करूणा, दयाभावना हे पैशापेक्षा कितीतरी मोठे सद्गुण आहेत !! पैशाचे जीवनात महत्त्व तर आहेच पण ते केव्हा आणि किती द्यायचे हे ठरविता आले पाहिजे. प्रेमाचा मोबदला पैशात होऊ शकत नाही आणि पैशासंबंधी निर्णय हे कोणत्याही भावनेपोटी घ्यायचे नाहीत हाच काय तो “अर्था”चा अर्थ !! आणि हेच आजच्या मनोमनी लेखाचे फलित !!  भेटूच पुन्हा !! तुमची रूपालीताई.

मनो Money: भाग ४ :थेंबे थेंबे तळे साचे : डॉ. रुपाली कुलकर्णी



बालदोस्तांनो Hi  !! आतापर्यंत , मनो Money च्या सदरातून, आपण पॉकेटमनी चे SMART प्लांनिंग , चक्रवाढ व्याजाचा महिमा आणि "Sooner The Better " या संकल्पनांना, धनसंचया संदर्भात कसे वापरावे , ते  पहिले.     यावेळी  मी तुम्हाला , "थेंबे थेंबे  तळे साचे " हा  फॉर्म्युला, धनाच्यासंबंधात कसे काम करतो , ते समजावून सांगणार  आहे !!

   हा  फॉर्म्युला झटपट समजावून घेण्यासाठी मी तुम्हाला छोटू ची गोष्ट सांगते. नोकरी करणारे आई वडील  आणि कॉलेजात जाणारा दादा अशा    चौकोनी कुटुंबात , आपला हा शाळकरी छोटू रहात असतो. छोटू बिल्डिंगमधल्या भार्गव काकांच्या अधिक जवळ असतो. काका त्याला बऱ्याच छान छान गोष्टी सांगायचे, शिकवायचे. एकदा हा छोटू भार्गवकाकांना , आपल्या दादाच्या मित्रमंडळींची कशी धमाल चालते ते सांगतो. पॉकेटमनी मिळाल्यावर दादा , मॉल मध्ये खरेदी करतो , सिनेमाला  जातो  आणि मोबाईल आदी गॅझेट्स मध्ये सतत पैसे संपवून तर टाकतोच  शिवाय महिनाभर पैसे लागले की माझ्या पॉकेटमनीतून मागतो  अशी छोटूची तक्रार असते. तेव्हा काका त्याला सांगतात "आवश्यकता नसताना केलेली खरेदी म्हणजे पैशांचा अपव्यय  !! असेच सुरु राहिले , तर मग आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याकडे पैसेच शिल्लक रहात नाही, तेव्हा थोडी थोडी बचत करत रहाणे केव्हाही चांगले. पैसे खर्च करून मजा जरूर करावी परंतु आपल्या भावी गरजा लक्षात ठेवूनच !! ".  छोटूला काकांचे म्हणणे पटते.  तो दर महिन्याच्या पॉकेट्मनीतून, नियमितपणे थोडी फार बचत करू लागतो . लहानशी रक्कम असली तरीही !! शेवटी अशा लहान-सहान बचती मधून आणि तीवर  जादू करणाऱ्या चक्रवाढ  व्याजाच्या किमयेमुळे छोटुकडे इतके पैसे जमतात , की  एकदा  कुटुंबाकरिता लागणाऱ्या मोठ्या खर्चासाठी , छोटूही मदत देऊ करतो.  दर महिन्याचा खर्चाचा समतोल सांभाळण्यात दमछाक अनुभवणारे आई-बाबा आणि दादा ही , अशा अनपेक्षित मिळालेल्या आधाराने  आश्चर्यचकीत होतात आणि सुखावतात   !!  छोटूला मिळते शाबासकी तर दादा ला मिळतो छानसा धडा !!
      दोस्तांनो, आपणही बरेचदा छोटूच्या दादासारखे वागतो  का, याचा  जरा विचार करता का ? गरज नसताना आपण कितीदा खरेदी करतो !! जवळ असणारी रक्कम इतकी लहान आहे की "त्यात काय खर्च केले तर " अशी  "चलता हे " धारणा आपण बनवून टाकली आहे. इथेच तर खरा प्रॉब्लेम आहे! रक्कम लहान असो व मोठी , पैशाचे मूल्य तर असतेच ना. मग अनावश्यक बाबींच्या खरेदीमध्ये ते मूल्य का दवडावे? एक एक थेंब जमा होऊन जसे मोठे, चवदार तळे बनते तसेच तुमच्या जवळ असणारी कमी-अधिक शिल्लक बचत करून तुम्ही तूमच्या गरजा भागविण्यास शिकले पाहिजे. छोटूच्या गोष्टीतून आपल्याला अजून एक धडा मिळतो तो म्हणजे बचतीमधील शिस्तीचा भाग. छोटूने नियमितपणे बचत चालू ठेवली. आपणही बरेचदा काही चांगल्या गोष्टी, संकल्प ठरवितो पण  त्यात धरसोड वृत्ती मध्ये येते. अशाने आपलेच नुकसान होते. आपले आर्थिक ध्येय ठरवून आपण बचतेमध्ये सातत्य ठेवले तर ध्येय निश्चितच साध्य होईल आणि तेही लवकर !! तेव्हा "थेंबे थेंबे  तळे साचे " हा  फॉर्म्युला किती उपयुक्त ठरतो ते समजले ना ? ध्येय आर्थिक असो वा इतर कुठलेही ,  "Be  Steady,  To Win  The  Race ". करायची का मग नवी सुरुवात ? माझ्याकडून तुम्हाला  ध्येय प्राप्तीसाठी, खूप खूप शुभेच्छा !!