Tuesday, March 19, 2019

मनो-Money : भाग ६ : अर्थाचा अर्थ !! डॉ. रुपाली कुलकर्णी




हॅलो बालदोस्तांनो ! या लेखमालेतील मागील सर्व लेखांमधून, आपण “अर्थ” म्हणजेच पैसा यासंबंधी बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना, गोष्टीरुपांतून समजून घेतल्या. आता यावेळी त्यातून थोडा ब्रेक घेउया !! यावेळी मी तुम्हाला मराठी साहित्या मधील सुपरिचित लेखक श्री. आचार्य अत्रे यांच्या एका कथेचा संदर्भ घेऊन, आजच्या काळाशी सुसंगत अशी गोष्ट सांगणार आहे. तिही अर्थातच “अर्था”विषयी म्हणजेच पैश्याविषयी !

तर आपल्या गोष्टीत आहे एक छोटासा मुलगा नंदू !! नंदू आपल्या आई-बाबा आणि आजी-आजोबांसोबत रहात असतो. एकदा शेजारील अक्षयदादाकडे आलेली नवीन, महागडी सायकल बघून “मला सुद्धा अशीच सायकल हवी”, असा हट्ट नंदू करतो. तेव्हा बाबा त्याला समजाऊन सांगतात, “अरे अक्षय दादा कॉलेज सांभाळून एके ठिकाणी काम करतो आणि पैसे कमावितो. असे करून त्याने जमविलेल्या पैशामधून आपली सायकल विकत घेतली आहे”. आजोबापण नंदूला सांगतात, “नंदू, पैसे कमविण्यासाठी काम करणे गरजेचे असते पण त्यासाठी अजून तू लहान आहेस. शिवाय तुला तशा सायकलची आत्ता आवश्यकताही नाहीये.” मग नंदू विचारात पडतो की ‘मीही खरे म्हणजे घरातील किती कामे करतो मग मीही पैसे कमवू शकतोच की !! लहान असलो म्हणून काय झालं ? घरातील व्यक्तींनी सांगितलेल्या प्रत्येक कामाचा मी मोबदला मागू शकतो आणि पैसे कमावू शकतो’. झालं, तेव्हापासून नंदू त्यालासांगितलेल्या कामांची यादीच लिहायला सुरू करतो. एकदा आई त्याला दळण आणून द्यायला सांगते तेव्हा नंदू आपल्या यादीमध्ये लिहितो “दळण आणले- पाच रुपये”. एकदा आजोबा त्याला चष्म्याच्या दुकानातून त्यांचा चष्मा आणून द्यायला सांगतात. तेव्हा नंदू यादीमध्ये लिहितो, “चष्मा आणला, दहा रुपये”. असे होता होता, नंदूच्या मनातील मदतीची भावना कमी होत जाते आणि तो कोण आपल्याला कधी काम सांगतो, याचीच वाट बघायला लागतो. असाच महिना उलटल्यानंतर, नंदू त्याच्या कामांच्या यादीतल्या सर्व मोबदल्याची बेरीज करतो आणि ती यादी, आईला दिसेल अशी, साखरेच्या डब्यात ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी चहा करताना आईला ती यादी सापडते. घर कामासाठी केलेल्या मदतीचा, नंदूला मोबदला हवा आहे, हे समजल्यावर तिला वाईट वाटते. पण नंदूला न दुखवता त्याला मदतीचे महत्व समजावून द्यायला पाहिजे म्हणून ती एक युक्ती करते. नंदूप्रमाणे तीही एका कागदावर नंदूसारखीच यादी बनविते. त्यात लिहिलेले असते “नंदूची लहानपणापासून सर्व आजारपणे केली, शून्य रुपये ! नंदूला रोज शाळेसाठी डबा बनवून देते, शून्य रुपये ! बाबा नंदूला रोज शाळेत सोडतो, शून्य रुपये !, आजी नंदूला रोज गोष्ट सांगते, शून्य रुपये !”. आईने केलेली ही लांबलचक यादी, ती नंदूला दिसेल अशी त्याच्या दप्तरात ठेवून देते. नंदू जेव्हा गृहपाठ करायला दप्तर उघडतो तेव्हा त्याला ती यादी मिळते आणि ती वाचल्यानंतर  नंदूला जाणीव होते की ‘आई आणि घरातील प्रत्येकजण, खरोखरच आपल्यासाठी किती काम करतात आणि त्याचा तर काहीसुद्धा मोबदला घेत नाहीत. असे असूनसुद्धा ती सगळी आपल्यावर किती प्रेम करतात’. तो धावत जाऊन आईला मिठी मारतो आणि म्हणतो “आई, मला समजले !! कुठ्ल्याही मदतीचा मोबदला पैशात होऊ शकत नाही !! तुम्ही सगळेचजण माझ्यासाठी खरे म्हणजे किती किती करता!! त्याचा मोबदला मी असा पैशात करायला नको हवा होता !”  नंदूला आपली चूक उमगली याचे आईला समाधान वाटते आणि ती नंदूला जवळ घेते.

समजले का बालदोस्तांनो? घरकामात केलेली मदत किंवा कुणाला अडचणीत केलेली मदत याचा मोबदला पैशात कधीच होऊ शकत नाही. प्रेम, करूणा, दयाभावना हे पैशापेक्षा कितीतरी मोठे सद्गुण आहेत !! पैशाचे जीवनात महत्त्व तर आहेच पण ते केव्हा आणि किती द्यायचे हे ठरविता आले पाहिजे. प्रेमाचा मोबदला पैशात होऊ शकत नाही आणि पैशासंबंधी निर्णय हे कोणत्याही भावनेपोटी घ्यायचे नाहीत हाच काय तो “अर्था”चा अर्थ !! आणि हेच आजच्या मनोमनी लेखाचे फलित !!  भेटूच पुन्हा !! तुमची रूपालीताई.