Tuesday, March 19, 2019

मनो-Money: भाग ७: काय असते GST ? डॉ. रुपाली कुलकर्णी


   

दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक कर, तमुक कर असे  असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखीन एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून  समजावून  घेऊयात. ही संकल्पना आहे GST  (Goods and Service Tax) अर्थात  वस्तू आणि सेवा कर !!
आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन बालमैत्रिणी, राधा आणि तिच्याच शेजारी राहणारी, तिची वर्गमैत्रीण सारा !! तर झाले काय की, राधाचा वाढदिवस उद्यावर आल्याने, तिच्यासाठी बाबांनी, शाळेत वाटण्यासाठी चॉकलेटचा डबा घरात आणून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाची स्वारी, तयार होऊन शाळेत निघाली ! बाहेर आल्यावर, सारा आणि तिच्या आईने राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ! मग राधाने त्या दोघीना, हसून धन्यवाद दिले आणि  त्यांना एक-एक चॉकलेट काढून दिले. दोघी शाळेच्या व्हॅनमध्ये बसून, शाळेच्या गेटवर पोहोचल्या. गेटवर उभ्या असलेल्या  वॉचमन काकांनी, राधाच्या हातातील चॉकलेटचा डबा पाहिला आणि तिचा वाढदिवस असेल असे समजून त्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. आता राधाने त्यांनाही चॉकलेट दिले. मग  राधा आणि सारा आता वर्गात आल्या. पहिला तास सुरू होताचसगळ्या मुलांनी राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग राधाने सगळ्यांना चॉकलेटस वाटले.  वर्गात असलेल्या साराला पुन्हा चॉकलेट मिळाले म्हणून ती खूप खुश झाली.
मित्रांनो आता असे समजा की वाढदिवस म्हणजे आहे तुमचा व्यवसाय आणि चॉकलेट म्हणजे आहे त्यावर द्यावा लागणारा कर !! शेजारीच राहणाऱ्या सारा आणि तिच्या आईला चॉकलेट स्वरूपात जो  मिळाला  तो झाला स्थानिक कर (लोकल टॅक्स) आणि गेटवरच्या वॉचमन काकांना जो मिळाला तो झाला प्रवेश कर (एन्ट्री टॅक्स) ! वर्गातील सर्व  मुलांना जो  मिळाला त्याला म्हणूयात  सेवा कर (सर्व्हिस टॅक्स) आणि साराला दुसऱ्यांदा मिळालेले चॉकलेट हा झाला  अतिरिक्त कर (सरचार्ज) !! एकाच वस्तुवरच्या, अशा सगळ्या वेगवेगळ्या करांमुळे, व्यापारी, सामान्य नागरिक यांची कर भरताना दमछाक होत होती.  जसे राधाला लक्षपूर्वक सगळ्यांना, पण वेगवेगळ्या वेळी चॉकलेट द्यावे लागत होते.  याऐवजी जर तिने चॉकलेटचा डबा शाळेच्या ताईंकडे दिला असता तर त्यांनी सर्वच मुलांना, एकाच वेळी समानतेने चॉकलेट्स वाटली असती.  त्यात कोणी चुकून राहूनही  गेले नसते आणि कोणाला पुन्हा पुन्हा चॉकलेट मिळालेही नसते.  हिच जी एकछत्री, सोपी वाटपपद्धती झाली, त्याचप्रमाणेच काम करते  GST !! 1 जुलै 2017 रोजी, आपल्या देशात हा GST लागू करण्यात आला.  त्यामुळे देशांतर्गत सर्वत्र, एका वस्तूवर, एकच कर लागू झाला.  केंद्र सरकारला मिळणारे उत्पादन कर, सेवाकर हे रद्द झाले तसेच राज्य सरकारला मिळणारे  मूल्यवर्धन टॅक्स (व्हॅट)प्रवेश कर हे रद्द झाले.  याचा फायदा असा झाला की, देशात प्रत्येक वस्तूचा, एकच भाव  झाला.  त्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जाण्याची आवश्यकता उरली नाही आणि सर्व उद्योग हे एकाच करप्रणाली अंतर्गत समाविष्ट झाले. यामुळे कर भरण्याची पद्धतीही सुलभ झाली.  सारासारख्या अतिरिक्त लाभास मुकलेल्या व्यक्तींचा, या प्रणालीस  विरोध होणे स्वाभाविकच होते ! 

आहे ना सोपे मित्रांनो !! मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, यांनी हीच संकल्पना एका व्हीडीओ मार्फत विशद करुन सांगितलेली आहे. बघायचं का तुम्हाला ? मग उघडा युट्युब आणि टाईप करा "जीएसटी पल्लवी जोशी". तुम्ही समजावून घ्या आणि इतरांनाही समजावून सांगा !!