Wednesday, April 10, 2019

मनो-Money: भाग ८: नको तो काळा पैसा : डॉ. रुपाली कुलकर्णी




बालदोस्तांनो, आत्ता नुकत्याच देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. तेव्हापासून घरात, टीव्हीवर, वर्तमानपत्रात सगळीकडे निवडणुकीच्याच चर्चा सुरू आहेत. कुठला पक्ष काय उद्देश ठेवून निवडणूक लढविणार, कुठून कोणता उमदेवार उभा राहणार वगैरे, वगैरे ! या सगळ्या गदारोळात तुम्ही काळा पैसा हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल.  हा शब्द ऐकून तुम्ही कधी विचार केला आहे का, की काय असतो काळा पैसा ? सांगते, ऐका का किस्सा !

एकदा माधुरी काकूने घरात काम करणाऱ्या संगीता मावशींना शंभर रुपये देऊन, दोन किलो गहू आणून ठेवायला सांगितले. मावशींनी 40 रुपये किलो दराने दोन किलो गहू आणून ठेवले आणि माधुरी काकूला मात्र पन्नास रुपये किलो असा दर सांगूनसगळेच पैसे वापरल्याचे खोटेच सांगितलेम्हणजेच  संगीता मावशींनी वरचे वीस रुपये फुकटच लाटले ! संगीता मावशींनी हे पैसे गैरमार्गाने मिळविले.  असा अनधिकृत मार्गाने आलेला पैसा,  ज्या पैशावर आपला हक्क नाही, जो पैसा कमविण्यामागे असणारा उद्देश्य योग्य नाही, असा पैसा कुठून, कोणाकडून, केव्हा, कसा आला याची कुठेही नोंद नाही तो सर्व झाला काळा पैसा ! असा पैसा, संगीता मावशींच्या वीस रुपयाप्रमाणे , अयोग्य मार्गाने उपलब्ध झाल्याने रोकड स्वरूपात असतो.

दोस्तांनो, आपल्या सर्वांनाच देशात चांगल्या सुविधा असाव्यात, देश आर्थिक आणि तांत्रिक बाबतीत सशक्त असावा असे वाटत असते. ह्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सरकारला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा काळा पैसा, ज्याची कुठेही नोंदच नाही आणि म्हणून जो सरकारला वापरताच येणार नाही, देशाच्या प्रगतीसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक ठरत असतो. कारण, अशा पैशाच्या माध्यमातून लोकहिताची कुठलीही कामे करणे सरकारला शक्य नसते. आपल्या देशात जवळपास दोन तृतीयांश पैशाची ही अवस्था आहे !! आहे ना चक्रावून सोडणारी करणारी गोष्ट?  म्हणून काळा पैशाचा उद्गम आणि वापर रोखण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी म्हणून तुम्ही पुढील काही गोष्टी नक्कीच करू शकता. १) आपल्या घरातील जास्तीतजास्त व्यवहार हे बँक खात्याच्या मार्फत किंवा चेक/ क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड यामार्फत करू शकतो. यामुळे पैशाच्या आवक-जावकाचे कारण सुस्पष्ट राहते. 2) आपल्या आजूबाजूच्या, घरी कामे करण्यास येणाऱ्या सर्वजणांना आपण बँक खाते उघडण्यासाठी आणि त्याद्वारेच व्यवहार करण्यासाठी प्रेरित करू शकतो. 3) आपल्या घरी कामे करण्यास येणाऱ्या सर्वजणांचा पगार, आई-बाबांनी बँक खात्यातच जमा करावा असा आग्रह आपण धरू शकतो. ४) आपले किंवा इतरांचे कुठलेही काम चटकन किंवा प्रलोभने दाखवून करून देण्याऱ्या आणि त्यासाठी  पैसे मागणाऱ्या व्यक्तीला आपण स्पष्टपणे नाही म्हणू शकतो.     ५) इंटरनेट चा वापर करून, आपण नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, भीम किंवा तत्सम सुरक्षित पेमेंट अँप्लिकेशन्सच्या , कुशलतापूर्वक वापरासाठी, पालकांची / विश्वासू तज्ज्ञांची मदत घेऊन आवश्यक ते ज्ञान मिळवू शकतो.

मित्रानो, जरा जास्तीच वाटतेय का हे ? पण हे शक्य करून दाखविले आहे गुजरातमधील GNFC नामक वसाहतीने. पाच हजारावर सामान्य वस्ती असणाऱ्या या वसाहतीमध्ये, दुकानात पान घेण्यापासून ते सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासारखी छोटी कामेही कॅशलेस पद्धतीने म्हणजेच डिजिटल पैशांचा वापर करून केली जातात. GNFC या खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीने, पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांना, कॅशलेस पद्धतीने खतविक्री केली आहे आणि दिवसोंदिवस ही संख्या वाढतेच आहे. आहे ना हे प्रेरणादायी ?  आपल्यालाही हे शक्य आहे ! देशहितासाठी योगदान देताना, सीमेवर जाऊन लढाईच केली पाहिजे असे गरजेचे नाही. आपापल्या ठिकाणी राहून, उत्तम नागरिक बनूनही आपण देशासाठी योगदान देऊ शकतो. त्यासाठी तयारी हवी ठाम निर्धाराची आणि त्यादिशेने शिस्तबद्ध वाटचाल करण्याची !! मग, करा ठाम निर्धार, आपल्या आवाक्यातील काळ्या पैशाची निर्मिती रोखण्याचा !!