Friday, May 28, 2021

फंडाचा ‘फंडा’..: निवृत्त जीवनासाठी नियोजन : श्री. भालचंद्र जोशी

 



सध्याचे सामाजिक संक्रमणच असे की, ज्येष्ठांना निवृत्तीपश्चात जीवनमानाचा खर्च भागविण्यासाठी कमावत्या वयातील बचतीवरच प्रामुख्याने अवलंबून राहावे लागेल. मुलांची कितीही इच्छा असली तरी त्यांना पालकांची काळजी घेणे शक्य होईलच असे नाही.

सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी नियोजन हे विशेषत: चाकरमान्यांच्या जीवनाचे महत्त्वपूर्ण वित्तीय ध्येय असते. सेवानिवृत्ती नियोजनाचे आर्थिक उद्दिष्ट प्रामुख्याने निवृत्तीनंतर तुमच्या आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजांची पुरेशी तरतूद करणे होय. पुरेशा अर्थसाक्षरतेच्या अभावामुळे बरेच चाकरमानी सेवानिवृत्तीच्या नियोजनाला प्राथमिकता देत नाहीत अथवा नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात विविध अल्पकालीन वित्तीय ध्येयांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या सेवानिवृत्ती नियोजनाची सुरुवात करतात. निवृत्तीनंतरचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल तर सेवानिवृत्ती नियोजनाचे महत्त्व जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

बदलत्या सामाजिक संक्रमणामुळे व त्यातून उद्भवलेल्या (एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे) आर्थिक अस्थिरतेमुळे आर्थिक स्रोत मर्यादित आणि केंद्रित झाले आहेत. जुन्या काळी एकत्रित कुटुंब पद्धतीत कुटुंबातील सदस्य ज्येष्ठांची संपूर्ण काळजी घेत असत. विभक्त कुटुंबांमध्ये ज्येष्ठ सदस्यांना त्यांचा निवृत्तीपश्चात जीवनमानाचा खर्च भागविण्यासाठी कमावत्या वयातील बचतीवर प्रामुख्याने अवलंबून राहावे लागणार आहे. जरी विभक्त कुटुंबातील मुलांना आपल्या पालकांची काळजी घ्यायची इच्छा असूनही ते शक्य होईलच असे नाही. उच्च शिक्षणासाठी काढलेले कर्ज, दोन वेगवेगळ्या घरांची देखभाल करण्यासाठी होणारा खर्च, बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला खर्च इत्यादीमुळे सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक स्वातंत्र्य जपण्यासाठी विभक्त कुटुंबांत निवृत्ती नियोजनाला प्राधान्य असले पाहिजे.

मुले कमावती होण्यापूर्वी त्यांचे उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमातील लांबलेले शिक्षण यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पालकांच्या होणाऱ्या खर्चात अतिशय वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक लोक शारीरिक क्षमतेमुळे ऐच्छिक किंवा अनैच्छिक सेवानिवृत्तीमुळे, अनारोग्यामुळे, आजारी असलेल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्यास भाग पडल्यामुळे नियोजित सेवानिवृत्तीपूर्वी, सेवामुक्त होण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. त्यामुळे खर्चाचे नियोजन करताना सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी करायची बचत हा अविभाज्य घटक असायला हवा. जे नोकरदार वित्तीय नियोजकाची मदत न घेता स्वत: हे करीत असतील त्यांना हे कळकळीने सांगणे की, दीर्घायुष्य व महागाई हे वित्तीय नियोजनातील प्रमुख घटक आहेत. सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे आपल्याला किंवा कुटुंबीयांना महागाईमुळे वाढणाऱ्या खर्चाची तरतूद ही पहिल्या पगारापासूनच करणे अत्यंत आवश्यक आहे. निवृत्ती नियोजनातील वेगवेगळ्या आव्हानांमुळे चाकरमान्यांना अगदी लहान वयापासूनच हे नियोजन काटेकोरपणे करावे लागते, अन्यथा ते त्यांच्या निवृत्ती कोषाचे लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही. तरुण वयातच तुम्ही निवृत्ती साठीच्या बचतीला सुरुवात करण्याचे बरेच फायदे आहेत. जसे की तरुण वयात कमी जबाबदाऱ्या असतात. वाढत्या वयासोबत कुटुंबातील वाढत्या सदस्यांबरोबर मुलांची शाळेची फी, गृह कर्ज, मुलांचे छंद वर्ग यामुळे एकूण मिळकतीतील बचतयोग्य रकमेचे असलेले प्रमाण घटते. जर तुम्ही या आधी सेवानिवृत्ती नियोजनाचा विचार केला नसेल तर आजच तुमचे सेवानिवृत्ती नियोजन करून घेण्याची योग्य वेळ आहे. लवकर निवृत्ती नियोजन केल्यास आपण केलेली गुंतवणूक वाढण्यास जास्त कालावधी हातात राहतो. निर्धारीत केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कमी बचत करावी लागते. वयानुसार जोखीम सहिष्णुता कमी होत जाते. जोखीम आणि परतावा यांच्यातील थेट संबंधांमुळे तरुण वयातच सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू केले तर साहजिकच अधिक परतावा देणाऱ्या मालमत्तांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे दीर्घकाळात उच्च संपत्ती निर्माण करण्याची क्षमता तयार होते.

वयाच्या ३० व्या वर्षी मासिक ३० हजार असलेला खर्च महागाई दर ५ टक्के जरी गृहीत धरला तरी लक्षणीयरीत्या वाढत जातो. निवृत्तीच्या नियोजनात आपल्या मासिक खर्चावर चलनवाढीच्या दराच्या परिणामांचा विचार केला नसेल तर तुमच्या निवृत्ती नियोजनाचे ध्येय गाठण्यासाठी लागणारी रक्कम अर्थातच कमी पडेल. असे समजा की, आपण ३० वर्षांचे आहात आणि आपला मासिक खर्च ३० हजार रुपये आहे. आपण वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हाल आणि महागाईचा दर ५ टक्के गृहीत धरल्यास, आपल्या गरजा फारशा बदलल्या नाहीत तरी वयाच्या ६० व्या वर्षीचा मासिक खर्च १.२३ लाख रुपये, ७०व्या वर्षी २.०१ लाख रुपये आणि ८० व्या वर्षी ३.१२ लाख रुपये असेल.

भारतातील आरोग्याच्या सेवेत सुधारणा झाल्याने सरासरी आयुर्मान वाढले असून वैद्यकीय खर्चही महागाईच्या सरासरी दरापेक्षा अधिक दराने वाढत आहेत. आपले सेवानिवृत्तीचे नियोजन करतानादेखील आरोग्याशी संबंधित खर्चाची पुरेशी तरतूद केलेली असणे अत्यंत गरजेचे असते, कारण वाढत्या वयाबरोबर आरोग्यासंबंधी गुंतागुंत आणि त्यावरील खर्च वाढत असतो. आपण कमावते झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात सेवानिवृत्तीचे नियोजन तातडीने सुरू करावे आणि ते लवकर प्रारंभ करण्याच्या प्रमुख फायद्यांविषयी आज आपण चर्चा केली. आपण आपल्या सेवानिवृत्तीच्या नियोजनात, गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाच्या रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंडांचा विचार नक्कीच करू शकता. आपल्यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यास आवश्यक असलेल्या बाबींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराची भेट लवकरात लवकर घ्यायला हवी.

- श्री.भालचंद्र जोशी bhalchandra.joshi@whiteoakindia.com

लेखक व्हाइट ओक कॅपिटल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी आहेत .

(लेख पूर्वप्रकाशित : लोकसत्ता, अर्थवृत्त  )

Tuesday, May 11, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग ९: ईच्छा तेथे .. शिक्षण !

 



प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे !  कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत.  आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे.  पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना शैक्षणिक स्तरावरही बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.  ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पद्धती, माध्यमे , परिक्षां संबंधित बदल  आणि त्यायोगे उद्भवणाऱ्या मानसिक  ताणतणाव !  परंतु आता शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा मार्गी लागल्या आहेत आणि पुढील शैक्षणिक वर्षाआधी  विद्यार्थ्यांच्या  हाती बऱ्यापैकी रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे.

पुढे मिळणाऱ्या वेळाचे  जर चांगले नियोजन केले तर त्यातुन बऱ्याच गोष्टी साध्य करता येणार आहेत. जसे  तांत्रिक  किंवा  वैयक्तिक  पातळीवर नवीन गुणकौशल्ये  आत्मसात  करणे किंवा आधीपासून असणाऱ्या कौशाल्यांना अजून वरच्या पातळीवर नेणे ! आजच्या या तांत्रिक युगात, ऑनलाईन शिक्षणासाठी  अनेक  वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्म्स किंवा अँप्लिकेशन्स उपलब्ध आहेत आणि त्यांचा सुयोग्य वापर केल्यास  हे जमवणे शक्य आहे. परंतु कुठल्या ऑनलाइन गुरूजवळ कोणत्या प्रकारचे ज्ञानभांडार किंवा प्रशिक्षण उपलब्ध आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.  अशा ऑनलाईन संसाधनांविषयी जाणून घेऊयात.   

NPTEL:एनपीटीईएल  (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्व्हान्सड लर्निंग) हा भारतातील ज्ञानमहर्षी समजल्या जाणाऱ्या आयआयटी संस्थांच्या  पुढाकाराने उभा राहिलेला उपक्रम आहे ज्याद्वारे अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण मिळविणे शक्य होते. या   उपक्रमाच्या संकेतस्थळावर पाचशेहुन अधिक व्हिडीओ कोर्सेस उपलब्ध आहेत जे संबंधित शिक्षण साहित्याबरोबर विनामुल्य उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ कोर्स डाऊनलोड करता येतात जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळेप्रमाणे नवीन संकप्लना अथवा विषय समजणे शक्य होते.  संकेतस्थळ : http://nptel.ac.in

SWAYAM : स्वयंम (Study Webs of Active-Learning for Young Aspiring Minds) हा भारत सरकारचा उपक्रम असुन मानव संसाधन विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या सहकार्यातुन उभा राहिलेला आहे. या माध्यमातून २००० हुन अधिक विषयावर विनामुल्य कोर्सेस उपलब्ध आहेत. याद्वारे  अभियांत्रिकी, विज्ञान , गणित, भाषा, व्यवस्थापन,मानवता आदी अनेक विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ माध्यमातून शिक्षण उपलब्ध आहे. विविध संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी ऍनिमेटेड व्हिडीओज,  डाऊनलोड करता येण्यासारखी   डिजिटल पुस्तके, शंका-निरसनासाठी स्वतंत्र पोर्टल ही स्वयंमची वैशिष्टये !  काही ठराविक कोर्सेससाठी किंवा पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारले जाते. संकेतस्थळ : http://swayam.gov.in  

MOOC: मुक  (Massive Open Online Courses -MOOCs) जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयातील उच्चस्तरीय ज्ञान मिळवून देण्यासाठी  MOOC साहाय्यभूत ठरते आहे. अनुभवी प्राध्यपकांनी प्रमाणित केलेला अभ्यासक्रम तसेच शैक्षणिक साहित्य, व्याख्यानांचे व्हिडिओ, संदर्भ साहित्य येथे उपलब्ध आहे. विद्यार्थी यातील आवडत्या माध्यमाचा वापर करून, आपापल्या गतीने आणि भाषेतुन  विषयांचे ज्ञान मिळवू शकतात. संकेतस्थळ : https://www.mooc.org/

व्यावसायिक ऑनलाईन माध्यमे: वरील माध्यमां व्यतिरिक्त अनेक  व्यावसायिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे पर्यायही  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.  उदारणार्थ BYJU’s, UnAcademy, Udemy, Toppr, Vendantu  इ.  याद्वारे काही किमान शुल्क भरून वेगवेगळ्या विषयातील ज्ञान मिळविता येणे शक्य झाले आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, मुलाखती यांची तयारी करण्यासाठीही  ही माध्यमे उपयुक्त ठरतात. सराव वर्ग, सराव परिक्षा, स्वतंत्र वेळेत तज्ज्ञांची उपलब्धता, परीक्षां संदर्भांत समुपदेशन इ. वैशिष्टयांमुळे तरुण पिढी या ऑनलाईन गुरूंकडे आकर्षित होताना दिसते आहे. 

अर्थ साक्षरता /Financial Literacy: एका परीक्षणानुसार, सर्वसाधारणपणे केवळ २३% इतकेच भारतीय नागरिक, आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणुक आदी संदर्भात साक्षर असल्याचा अहवाल आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती, भारतातील तल्लख बुद्धिमत्तेला जगभरातून असणारी मागणी, अशी इतर क्षेत्रातील भारतीयांची होणारी नेत्रदीपक कामगिरी बघता, देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २३% आणि तेही केवळ शहरीभागात असणे, ही  आपल्या देशाच्या भावी  प्रगतीसाठी तशी क्लेशदायक, अडसर ठरू शकणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाचे रूपांतर, भविष्यातील "सबळ आर्थिक महासत्ता" व्हावे अशी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक साक्षर, सुजाण नागरिकाने स्वतःच्या आर्थिक साक्षरतेप्रति  सजग  होणे  तसेच त्यासंबंधित असणाऱ्या  सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून कार्यमग्न होणे ही अतिशय  निकडीची बाब आहे. अर्थ साक्षरते संबंधित अधिक जाणून घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाचा वापर करता येऊ  शकतो . संकेतस्थळ: https://swsfspl.blogspot.com/

अर्थात योग्य निवड करण्यासाठी आपल्याकडे असणारी डिजिटल  साधने, इंटरनेट कनेक्टिव्हिटी,  स्वानुभवातून आणि स्वयं अध्ययनातून  सलगपणे शिकण्याची,  कोर्स पूर्ण करण्याची तयारी, शिक्षणाचे शुल्क, लागणारा  कालावधी आणि  निवडलेल्या अभ्यासक्रमाला व्यावसायिक क्षेत्रात असणारी मान्यता  या सर्वांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील अनुभवी वर्गाचा, शिक्षकांचा सल्ला घेता येईल. शेवटी या विशाल ज्ञानभांडारातून, वेचावे तितके कण कमीच आहेत !! परंतु 'ईच्छा तेथे मार्ग' असतोच !  ज्ञानार्जनाची कास धरून या ज्ञानसागरात मारलेली उडी, अपेक्षित तीरावर तुमची नाव नक्कीच पोहोचवू शकते !!

डॉ. रुपाली कुलकर्णी,

ट्रेनिंग हेड,

SWS Financial Solutions Pvt. Ltd.

लॉकडाऊन गप्पा : भाग ८: सकारात्मक ऊर्जा अस्त्र !

 


प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे !  कोविड त्सुनामीची तीव्रता  यावेळी जरी अधिक भासत असली तरी अनेक निरीक्षणे आणि अनुभव यावरून असे लक्षत येते आहे की 'कोविड' विरुद्धचे हे युद्ध  आता केवळ  शारिरीक स्तरावर न राहता,  मानसिक स्तरावरही आघात करते आहे आणि सध्या तरी हे युद्ध शत्रू जिंकत आहे असे भासत आहे. आपल्या  सर्वांना आपापले मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी, अंधःकारमय झालेल्या मनाच्या कोठडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे ! त्यासाठी पुढे नमुद केलेले, विनोबा भावेंसारखे अनुकरण आपल्याला करता येईल का, याचा विचार करूयात ! सकारात्मक राहून, या कोविड शत्रूला दूर ठेवुयात !    

विनोबांना इंग्रजानी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली, ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊन येई. जिथे प्रकाशही नाही अशा या कोठडीत ते खचतील, त्यांची प्रकृती खालावेल आणि निराश होऊन ते माफी मागतील ही सरकारची अपेक्षा होती. पण जसजसे दिवसांमागून दिवस जायला लागले तसतसे विनोबा अजून तजेलदार, सशक्त दिसू लागले, हे पाहून तो जेलरही अचंबित झाला.

विनोबांनी काही संकल्प आणि त्यांचं २४ तासांचं नियोजन केलं होतं. आपल्या कोठडीची लांबी मोजून ते रोज जितके मैल चालत होते, तेवढे अंतर काढून खोलीतल्या खोलीत चालायला त्यांनी सुरुवात केली. याशिवाय त्यांनी नियमित ध्यानधारणेची वेळही वाढवली. जे पहारेकरी त्यांच्यासाठी रोज जेवण घेऊन यायचे, त्यांच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्यांना योग्य सल्ला द्यायचे. त्यामुळे त्या जेलमधले इतर पहारेकरीही आपापली गाऱ्हाणी घेऊन विनोबांकडे येऊ लागले. त्यांचा सायंकाळचा वेळ समस्या निवारणातच जाऊ लागला. जे काही कच्चं भरड अन्न मिळायचं तेही विनोबा समाधानाने व्यवस्थित चावून खायचे. रोजचा व्यायाम तर होताच. त्यांना झोपही शांत लागत होती.

सायंकाळी इतकी लोकं त्यांच्याकडे येत आहेत हे बघून इंग्रज जेलरही थक्क झाला. एकदा तर त्यानेच स्वतः विनोबांशी संवाद साधला आणि मग त्याने विनोबांना रोजच जेलमध्ये सभा घेता यावी म्हणून वेगळी स्वतंत्र जागा दिली. पुढे जाऊन विनोबांसाठी काही पुस्तकं मागावून घेतली. आणि नंतर जेलमध्येच कैद्यांसाठी विनोबांचे गीता प्रवचनांचे वर्ग सुरू झाले.

हे सगळं किती थक्क करणारं आहे...आज आपल्याला तर अंधारी कोठडीत नाही, घरात रहायचंय. आपल्याबरोबर आपले नातलग आहेत, मनोरंजनासाठी असंख्य साधनं आहेत, कित्येक पर्याय आहेत. विनोबांसारखं सकारात्मकतेने विचार करणारं फक्त मन हवं आहे, नाही का? सकारात्मक ऊर्जेचा अस्त्रासारखा वापर करून, या कोविड शत्रूला दूर ठेवुयात !   

भवतु सब्ब मंगलम् ! भवतु सब्ब मंगलम् !!

-      टीम SWS


प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना





ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे.

वैशिष्ट्ये

) हप्ता-  जनेसाठी वार्षिक १२ रु + (सेवाकर )हप्ता असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल , हप्त्यासाठी आर्थिक वर्षे  १ जून ते ३0 मे असेल .

) वय पात्रता - १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात , लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे जरुरीचे आहे .

3) विमा लाभ - - लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रु . अर्थसाहाय्य मिळेल , लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रु व आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रु अर्थसाहाय्य दिले जाते.

 

Pradhan Mantri Jeevan Suraksha Yojana(PMJSY)

 

PMJSY is a Accident Insurance Policy that, provides a yearly Accident Insurance coverage of Rs. 2,00,000  at the most affordable premium rate of Rs. 12 per annum.

 PMJSY is available to people in the age group of 18 to 70 years having a savings bank account who give their consent to join and enable auto-debit.