Tuesday, May 11, 2021

लॉकडाऊन गप्पा : भाग ८: सकारात्मक ऊर्जा अस्त्र !

 


प्रिय ग्राहकवर्ग / हितचिंतक , सस्नेह नमस्कार ! कोविड च्या या दुसऱ्या त्सुनामीत , आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे !  कोविड त्सुनामीची तीव्रता  यावेळी जरी अधिक भासत असली तरी अनेक निरीक्षणे आणि अनुभव यावरून असे लक्षत येते आहे की 'कोविड' विरुद्धचे हे युद्ध  आता केवळ  शारिरीक स्तरावर न राहता,  मानसिक स्तरावरही आघात करते आहे आणि सध्या तरी हे युद्ध शत्रू जिंकत आहे असे भासत आहे. आपल्या  सर्वांना आपापले मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी, अंधःकारमय झालेल्या मनाच्या कोठडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे ! त्यासाठी पुढे नमुद केलेले, विनोबा भावेंसारखे अनुकरण आपल्याला करता येईल का, याचा विचार करूयात ! सकारात्मक राहून, या कोविड शत्रूला दूर ठेवुयात !    

विनोबांना इंग्रजानी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली, ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊन येई. जिथे प्रकाशही नाही अशा या कोठडीत ते खचतील, त्यांची प्रकृती खालावेल आणि निराश होऊन ते माफी मागतील ही सरकारची अपेक्षा होती. पण जसजसे दिवसांमागून दिवस जायला लागले तसतसे विनोबा अजून तजेलदार, सशक्त दिसू लागले, हे पाहून तो जेलरही अचंबित झाला.

विनोबांनी काही संकल्प आणि त्यांचं २४ तासांचं नियोजन केलं होतं. आपल्या कोठडीची लांबी मोजून ते रोज जितके मैल चालत होते, तेवढे अंतर काढून खोलीतल्या खोलीत चालायला त्यांनी सुरुवात केली. याशिवाय त्यांनी नियमित ध्यानधारणेची वेळही वाढवली. जे पहारेकरी त्यांच्यासाठी रोज जेवण घेऊन यायचे, त्यांच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्यांना योग्य सल्ला द्यायचे. त्यामुळे त्या जेलमधले इतर पहारेकरीही आपापली गाऱ्हाणी घेऊन विनोबांकडे येऊ लागले. त्यांचा सायंकाळचा वेळ समस्या निवारणातच जाऊ लागला. जे काही कच्चं भरड अन्न मिळायचं तेही विनोबा समाधानाने व्यवस्थित चावून खायचे. रोजचा व्यायाम तर होताच. त्यांना झोपही शांत लागत होती.

सायंकाळी इतकी लोकं त्यांच्याकडे येत आहेत हे बघून इंग्रज जेलरही थक्क झाला. एकदा तर त्यानेच स्वतः विनोबांशी संवाद साधला आणि मग त्याने विनोबांना रोजच जेलमध्ये सभा घेता यावी म्हणून वेगळी स्वतंत्र जागा दिली. पुढे जाऊन विनोबांसाठी काही पुस्तकं मागावून घेतली. आणि नंतर जेलमध्येच कैद्यांसाठी विनोबांचे गीता प्रवचनांचे वर्ग सुरू झाले.

हे सगळं किती थक्क करणारं आहे...आज आपल्याला तर अंधारी कोठडीत नाही, घरात रहायचंय. आपल्याबरोबर आपले नातलग आहेत, मनोरंजनासाठी असंख्य साधनं आहेत, कित्येक पर्याय आहेत. विनोबांसारखं सकारात्मकतेने विचार करणारं फक्त मन हवं आहे, नाही का? सकारात्मक ऊर्जेचा अस्त्रासारखा वापर करून, या कोविड शत्रूला दूर ठेवुयात !   

भवतु सब्ब मंगलम् ! भवतु सब्ब मंगलम् !!

-      टीम SWS