Friday, December 16, 2022

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, असाही !!

 


सखाराम बनसोडे आज खूपच आनंदात होता.त्याला  जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत  होते. त्याचा मुलगा आदित्य आज पदवीधर होऊन चांगल्या कंपनीत नोकरीस लागला होता. पै, पै  जमा करून सखारामने, आदित्यचे  शिक्षण पूर्ण केले होते. अर्थात आदित्यला सुद्धा या सर्वाची जाणीव होती. रिक्षा चालवणारा,झोपड्पट्टीत राहणारा  सखाराम व घरोघरी धुणीभांडी करणारी  त्याची पत्नी रखमा, मुलगा  आदित्यवर जिवापाड प्रेम करत असत.  झोपडपट्टीतील नकोशा वातावरणापासून  त्याला दूर ठेवत असत. अवती- भवती मवाली, टारगट मुले असूनही आदित्यचे लक्ष त्यांनी जराही विचलित होऊ दिले नव्हते.  लहानपणापासूनच त्याला चांगल्या-वाईटाच्या पारखीची  समज दिली होती.

आज आदित्यच्या नोकरीला एक महिना पूर्ण झाला होता. महिन्याचा पहिला पगार घेऊन तो  घरी आला. मिळालेला पगार देवापुढे ठेवत म्हणाला, “आई, बाबा..  तुमचे कष्ट कमी करण्याचा  मी आता प्रयत्न करेल.”  दोघांनाही आनंदाश्रू शक्य झाले नाही.  

प्रथम मिळालेला पहिला पगार पार्टी करून खर्च करावा असे आदित्यला वाटले.  सहाजिक आहे. त्याचे सर्व मित्र त्याच्याकडे पार्टी मागत होते. काय करावे ? या संभ्रमात तो होता. त्याच्या जीवाची होणारी घालमेल रखमाच्या लक्षात आली. ती  म्हणाली, "अरे पहिल्यापासूनच मर्यादित खर्च करण्याची सवय असलेली चांगली. हौस मौज सर्व काही करावे पण विचारपूर्वक, मर्यादा ओळखून. आज जे हे एवढे पैसे दिसत आहेत, त्यासाठी तुला महिनाभर कष्ट करावे लागले आहेत. खरे पहिले तर होणाऱ्या  हॉटेलच्या बिलात आपण पुरेसा  किराणा आणून, घरीच सर्वजण समाधानाने  जेवू शकतो, नाही का ?".   आता विचार करण्याची वेळ आदित्यवर आली होती. तो ही विचारात पडला की आपण महिन्याभराचा पगार मित्रांच्या पार्टीवर खर्च का करायचा ? नाही म्हटले तरी मित्र नाराज होतील. हो म्हटलं तर पैसा खर्च होईल. काय करावे?  त्याची द्विधा मनस्थिती जात होती. रखमा मोठी हुशार होती. ती आदित्यला म्हणाली “आपण सर्वांना बोलावू..येउ दे तुझे मित्र घरी !!" तिने छानसी सत्यनारायणाची पूजा घातली. प्रत्येकाच्या हातावर प्रसाद दिला आणि चहापान करून सर्वांना हसत मुखाने रवाना केले.आदित्य खूपच आनंद होत होता. तो आईला म्हणाला, "आई तुला कसे ग हे सर्व जमते?".  रखमाने उत्तर दिले, "अरे आम्हाला शिक्षण नाही पण अनुभव आहे बरका बाळा. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा थोडा पैसा राखून ठेवावा लागतो. अरे तुझ्या शिक्षणासाठी वह्यापुस्तकांसाठी मी पाटील बाईंकडे काम करायची आणि त्यांच्याकडून मिळणारा पगार बाजूला ठेवायची. या बचतीमधील सातत्यामुळेच मला तुझे शिक्षण नीट चालविता आले". 

 कंपनीत आदल्याच दिवशी एस. आय. पी. (SIP) विषयी ऐकून आलेल्या आदित्यला आठवले,  SIP म्हणजे हेच की !! सिस्टीमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन, तर आईला केव्हाच समजला होता आणि तिने तो कित्येक वर्षे राबविलाही होता. त्यामुळे मिळालेले परिणाम आज सुखकारक झालेले होते. तो आईला म्हणाला,  "हो आई, आता मीसुद्धा या पहिल्या पगारापासूनच एस. आय. पी.  सुरू करतो. आपण आपल्या नव्या घरासाठी पैसे जमा करूयात."

रखमाच्या कामाचे, शिकवणीचे आज चीज झाले होते !!

                                                                                                                       - लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी.


Friday, December 9, 2022

लाडक्या कुटुंबियांसाठी...


माझी दोन वर्षाची नात खेळ खेळत माझ्याजवळ आली. मी तिला प्रेमाने उचलून घेतले आणि  तिला एक चॉकलेट दिले. लगेच  तिने दुसरा गाल पुढे केला आणि दुसरा हातही !! तिच्या नजरेत या हुशारीची चमक दिसत होती. मग मीही तिला दुसरे चॉकलेट दिले !! त्यानंतर तिने दोन्ही चॉकलेट बराच वेळ घट्ट धरून ठेवले. थोड्या वेळाने हळूच एक चॉकलेट खाल्ले.आणि दुसरे नंतर खाण्यासाठी सांभाळून ठेवले.तिची ही कृती बरेच काही सांगून गेली.

हे तिचे नियोजन किती अर्थपूर्ण होते? एवढीशी चिमुरडीसुद्धा तिच्या आवडत्या वस्तूचे नियोजन करू शकते. मग असे नियोजन सर्वांनाच किती आवश्यक आहे असे वाटत नाही का? आर्थिक नियोजन, व्यवस्थापन याबाबतीत आपण असे विचार करू शकतो. भविष्याची तरतूद कशी करावी? का करावी? कोणासाठी करावी? कुठे  करावी? इ. अनेक प्रश्नांची उकल वेळीच करायला हवी. प्रत्येक व्यक्तीसाठी असे नियोजन आवश्यक आहे. ही गोष्ट न चुकवता येणारी आहे. भविष्याची तरतूद कशी करावी हे ज्ञान, योग्य सल्लागाराकडून, मार्गदर्शकांकडून घेतल्यास आयुष्य नक्कीच सुलभ होते. वानगीदाखल एक प्रसंग सांगते. 

माझी सर्वात धाकटी नणंद अनिता हिच्या यजमानांवर, ध्यानीमनी नसताना, किरकोळ आजाराचे कारण होऊन काळाने घाव घातला. सुखाचा संसार क्षणात दु: खाच्या काळोखात झाकोळून गेला.तिचे सासूबाई - सासरे किंबहुना सर्वच कुटुंब सैरभैर झाले. कोणालाही काहीच सुचेना. मानसिक धक्कयाबरोबरच झालेला आर्थिक आघातही मोठा होता.  तो कसा सहन कसा करायचा? मुलांचे शिक्षण पुढे कसे होणार? घरखर्च कसा भागणार? वयस्कर सासू सासरे यांची आजारपणे किंवा बाकीचा खर्च कसा निभावणार? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. यावर तोडगा काढण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करित होता. अचानकच अनिताच्या सासूबाईंनी फर्मान काढले, 'पेपर बंद करा, दूध कमी घेऊ, कामवाली मावशी बंद करू ' इ. त्यांच्यापरिने त्या विचार करत होत्या की काटकसरीने राहू. परंतु नेहेमीच्या जीवनशैलीची सवय झालेल्या मुलांना, अनिताला हे सगळे जमविणे खूपच कठीण जात होते.  

तेव्हा विचार आला कि घरातील कर्ती व्यक्ती या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी, आर्थिक नियोजन  का करत नाही ? आपल्याजवळ किती पैसा आहे, तो कशा पद्धतीने वापरला किंवा गुंतविला पाहिजे म्हणजे कुटुंबाचे भावी आयुष्यमान व्यावस्थित राहील, यासाठी वेळीच नियोजन करणे गरजेचे असते. परंतु बरेचजण हे नियोजन करत नाहीत किंवा केलेल्या नियोजनाबद्दल घरात कल्पना देत नाहीत. त्याबाबत  आपल्या कुटुंबीयांशी कधी चर्चा करत नाही. अगदी मोठमोठ्या नामांकित ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आणि शिकलेल्या व्यक्तीही अशा चुका करताना दिसतात आपल्या कुटुंबावर आपले निस्सीम प्रेम असते. त्यांच्यासाठी आपण अविरत कष्ट करत असतो. मग त्यांच्याचसाठी कमाविलेल्या संपत्तीचे नियोजन करावे, त्यांना विश्वासात घेऊन ते समजावून सांगावे ही आवश्यक बाब दुर्लक्षित का होते?  घरातील सर्वानाच,  प्रत्येक वयात आपण आर्थिक नियोजनाचे योग्य ते धडे देऊ शकतो. कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात त्यांनाही समाविष्ट करून घेऊ शकतो.   

तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. मित्रांनो, आर्थिक नियोजन करा व त्याचे व्यवस्थापन या विषयात साक्षरतेचे धडे घ्या !! तुमच्यासाठी आणि तुमच्या लाडक्या कुटुंबियांसाठी !!

                                                                                                            - लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी.



Friday, December 2, 2022

गरज, अर्थसाक्षर होण्याची :सौ. रत्ना दिपक कुलकर्णी



आज सुनील खूप खुश होता.ऑफिसची कामे आवरत होता.घरी जायची त्याला घाई होती.कारण ही तसेच होते.त्याच्या छकुल्याचा, सुधांशुचाचा आज चौथा वाढदिवस होता.घरी स्मिताचे आई वडील आले होते.त्यांना सर्वांना बाहेर जेवायला जायचे होते.आताशा चिमुकला सुधांशु रोज खेळताना वाढदिवसाचा खेळ खेळत असे.त्यात  केक कापणे, चॉकलेट वाटणे आणि मित्रांना बोलवून त्यांच्याशी मनसोक्त खेळणे असेच असे ! आजही बाबा  येईल आणि माझ्या मित्रांना घेऊन आपण बाहेर जाऊ खूप खेळू आणि केक नंतर कापू, असा प्रोग्राम सुधांशुने आखला होता.

आज सुनीलला लवकर जायचे होते. त्याचे सारखे लक्ष  सारखे घड्याळाकडे जात होते.कधी पाच वाजतात आणि घरी पळतो असे त्याला झाले होते.साहेबांची परवानगीसुद्धा त्याने आधीच घेतली होती. त्याने महत्त्वाची सर्व कामे उरकली. ऑफिसबॉयने आणलेली कागदपत्रे व काही पाकीटे त्याने उद्या बघू म्हणून त्याच्या टेबल ड्रॉव्हरमध्ये ठेवून दिली. मनाने तो घरी पोहोचला होता.लाडकी स्मिता तयार होऊन वाट पाहत असेल, आईबाबा सर्वजण वाट पाहत असतील, या विचारात त्याने गाडीला किक मारली.अवघ्या १० ते १५ मिनिटाचा प्रवास होता. त्यामुळे त्याने हेल्मेट घालणे टाळले.अगदी थोड्या अंतरावर गाडीने तो गेला असेल.रस्त्यात गर्दी खूप होती.समोरून एक वयस्कर जोडपे रस्ता क्रॉस करीत होते.त्यांना धक्का लागू नये म्हणून त्याने गाडी साइडला घेतली आणि मागून येणाऱ्या भरधाव गाडीने त्याच्या गाडीला ठोकले ! सुनील पडला आणि गाडीचे चाक त्याच्या अंगावरून गेले. जे घडू नये ते घडले.सुनीलचा जीवनाचा प्रवास संपला ! एक हसता खेळता संसार संपला !!

काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरे. घरात येणारे आर्थिक उत्पन्न अचानक बंद झाल्याने, स्मितावर आर्थिक अडचणींचा डोंगर कोसळला.सुधांशुचे  शिक्षण आणि तिच्या संसाराचा  पुढील पूर्ण उदरनिर्वाह याची चिंता तिला भेडसावू लागली. काळजीतून सावरण्यासाठी ती घरगुती शिकवण्या घेऊ लागली.या कालावधीत तिला आर्थिक मदत किंवा सल्ला द्यायला तर दूरच पण साधी विचारपूस करायलाही कोणी फिरकले नाही.   

ऑफिसमध्ये सुनीलचे टेबल,महिन्यापासून  अद्यापही रिकामेच होते.नवीन माणसाची, धनंजयची त्याच्या जागी  नियुक्ती झाली होती.पण सुनील बाबत घडलेली घटना पाहता, अद्यापही धनंजय त्या टेबलचा वापर करण्याबाबत उदासीन होता. एक दिवस साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे धनंजयनी त्या टेबल-खुर्चीचा ताबा घेतला. टेबलचे ड्रॉव्हर उघडले आणि आश्चर्यचकित झाला.सुनीलचे घर गाठले. सुनीलने ड्रॉवरमध्ये ठेवलेली जीवन विमा  पॉलिसी स्मिताच्या हातात देत म्हणाला, "वहिनी सुनील खूप ग्रेट होता, त्याने तुमच्या कुटुंबासाठी खूपच विचार आणि नियोजन केले होते. त्याने हे तुमच्यासाठी  गिफ्ट ठेवले आहे.”

स्मिताने पॉलिसी पेपर वाचले.  तीही ती पॉलिसी बघून आश्चर्यचकित झाली. सुनील आपल्याशी याबाबतीत काहीच कसे बोलला नाही, याचा  तिला विस्मय वाटला. अजूनही असे काही कागदपत्र घरात  असतील का असे  वाटून तिने  मग घरातील सुनीलचे कपाटही धुंडाळले. आयुर्विमा आणि अपघात विमा मिळून त्याचे रु  25,00,000 चे सुरक्षा कवच होते. कालांतराने हे पैसे स्मिताच्या अकाउंट मध्ये जमा झाले. त्या दिवशी घरी आल्यावर स्मिता अश्रुपूर्ण नजरेने सुनीलच्या तसबिरीकडे बघत होती. नजरेतून जणू सुनील स्मिताला म्हणत होता.”अगं मी तुला या विम्याबद्दल आधीच सांगायला हवे होते. मला क्षमा कर.माझं खरोखरच आपल्या कुटुंबावर अतोनात प्रेम होते आणि तुम्हा सर्वांची, माझ्या पश्चातही  हेळसांड होऊ नये याची आर्थिक तजवीजही  मी केली होती. फक्त तुला वेळेवर सांगायचे राहिले ! मला क्षमा कर ".   

वाचकहो, सुनीलने केलेली चूक अजून कोणी करू नये ! आपल्या कुटुंबियांसाठी केलेले सर्व आर्थिक व्यवहार त्यांना वेळेवर सांगणे महत्वाचे आहे. दुर्दैवी घटना घडली तर आर्थिक बाबींबाबत असणाऱ्या अनागोंदींमुळे कुटुंबातील सदस्यांवर अमाप मानसिक दडपण येऊ  शकते आणि कुटुंबप्रमुखाने  केलेले आर्थिक नियोजन कोलमडू शकते. आपला विमा सल्लागार, गुंतवणूक सल्लगार आपल्या कुटुंबाला ओळखणारा असावा. त्याला आपल्या कुटुंबाविषयी आस्था असावी  हे बघणेही आपले काम आहे ! प्रत्येकाने जीवनातील भावी अनिश्चिततेसाठी तयार असले पाहिजे आणि आपल्या प्रियजनांना त्यासाठी मदतही  केली पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक बाबींबाबत साक्षर, जागरूक करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात त्यांनाही समाविष्ट करून घेणे हे खूप महत्वाचे आहे.

- लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी,




Friday, November 25, 2022

SWS अर्थवाणी - चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )

 


SWS अर्थवाणी - चरण ५: आपत्कालीन निधी  ( Emergency Fund  )

 

आपत्कालीन परिस्थिती येते, 😞

दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨

शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰

पातळींवरती ताणून धरते  😖 ।। ।।

 

पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘

संकटे कधी येती नैसर्गिक,🌊

घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷

होतो आपण अगदीच  अगतिक 😟  ।। ।।

 

होतो  खर्च आपत्कालीन, 💰

गड्बडते आर्थिक नियोजन, 📉

विशेष हेतुस्तव जपलेली, 👨🎓

पुंजी खर्ची घालतो आपण 0  ।। ३ ।।

 

का न करावे थोडे नियोजन ? 🛄

आपत्कालीन निधी उभारून, 💰

सहा महिन्यांचे आपुले वेतन , 💸

ठेवावे बाजूला सारून 💰।। ४ ।।

 

आजारपणी ठरतो सहाय्यक, 🩼

आरोग्य विमा तो उपकारक,🏥

रुग्नालयीण खर्चांची जावक, 💵

मग न वाटतसे जाचक 🙂।। ५ ।।

 

उत्पन्न बंद होई नोकरी जाता,🥹

खर्चाना न तुम्ही थांबवू शकता, 💸

बचत पुंजी संपे पाहता पाहता, 💰

टळे हे सर्व, योग्य नियोजन करता ।। ६ ।। 📈

 

घर कर्त्याच्या मृत्यू समयी,😔

आर्थिक संकटे दुःखदायी ,😣

आपत्कालीन निधी फलदायी, 💰

अशा प्रसंगी जरूर होई 🙂 ।। ७ ।।

 

न कोणाच्या येवो जीवनी, 😇

संकटदायी अशी कहाणी , 🙂

सर्वांसाठी होवो कल्याणी,  😇

अशी ही  SWS अर्थवाणी  😇 ।। ८ ।।


 डॉ. रुपाली कुलकर्णीट्रेनिंग हेड,  SWS

Friday, November 18, 2022

तरतूद इमर्जन्सी फंड / आपत्कालीन पुंजीची…


 

 

इमर्जन्सी / आपत्कालीन परिस्थिती कधीही दत्त म्ह्णून समोर उभी ठाकू शकते. मग ती  परिस्थिती पूर, भूकंप.सुनामी, मृत्यु सारखी नैसर्गिक संकटे असू देत किंवा चोरी.आग लागणे.लूटमार, आजारपण.अपघात असू देत.  अशावेळी  मानसिक, शारिरीक तसेच आर्थिक बाबींवर होणारी ओढाताण इतकी तणावग्रस्त परिस्थिती उभी करते की  त्याची कल्पनाही केलेली बरी !  अशावेळी घरात किंवा भोवताली असणारे मनुष्यबळ, त्या क्षेत्रातील तात्काळ मिळणारे विश्वासाहार्य कौश्यल्य (उदा. डॉक्टर्स, वकील) , सुविधा आणि व्यवस्थेची  (उदा. ऍम्ब्युलन्स किंवा सरकारी खाती)  वेळेवर असणारी उपलब्धता  इत्यादी घटाकांबरोबरच आपत्कालीन  परिस्थितीसाठी केलेली पैशांची तरदूत ही अत्यंत महत्वाची ठरते. बरेचजण 'मला काही होत नाही' च्या भ्रमात अशा इमर्जन्सी फ़ंडासाठी नियोजन करत नाहीत आणि मग वेळेवर होणारा मनस्ताप, धावपळ आणि पैशासंबधीत येणारे कटू अनुभव यांचा सामना त्यांना करावा लागतो. हे सर्व टाळता येऊ शकते का? एक उदाहरण बघुयात !  ही आमच्या परिचितांसोबत झालेली  सत्यघटना असून त्यात पात्रांची नावे बदलली आहेत.

"नमस्कार मी चित्रा ! माझासोबत घडलेली ही घटना साधारणतः 30 वर्षांपूर्वीची आहे.त्यावेळी माझे यजमान, नोकरीच्या निमित्ताने  इंडोनेशियाला कार्यरत होते.मी स्वतः कल्याण.टेलीफोनमध्ये नोकरीस होते. मोठा मुलगा पाच वर्षांचा व लहान काही महिन्यांचाच होता.घरात एक नणंद बाळंतपणासाठी आलेली होती तर दूसरी कॉलेजात जात होती.माझे सासरे निवृत्त झाले होते आणि सासूबाई गृहिणीं होत्या. येथे मुद्दामच सदस्यांचे सविस्तर वर्णन केले आहे जेणेकरून आमच्या सात सदस्यीय, आबालवुद्धांचा वावर असणाऱ्या घरातील त्यावेळेची कर्ती, जबाबदार मीच होते हे लक्षात यावे. साहजिकच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मी वाहत होते. 

एके दिवशी अचानक सासूबाईंची प्रकृती बिघडली.त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला आणि त्यांना ताबडतोब के. . एम. हॉस्पिटलमध्ये मध्ये नेण्यात आले. तिथे गेल्यागेल्या  लगेचच  डिपॉझिटची मागणी झाली तसेच  सहा बाटल्या रक्त ताबडतोब जमा करा असे सांगितले गेले. अंदाजे खर्चाचा आकडा पाहिल्यावर डोळ्यासमोर काजवे चमकले !! डोक्यात विचार सुरु झाले, आपण तात्काळ एवढे पैसे कोठून आणणार? कल्याणला ऑफिसमध्ये जाऊन  ऍडव्हान्स पगार घ्यायलासुद्धा  वेळ नव्हता. आमच्याकडील संपत्तीची ठेवयोजनेत केलेली गुंतवणूक मोडणे किंवा नातेवाईकांकडून जाऊन पैसे जमा करणे एवढाच पर्याय माझ्याकडे शिल्लक होता. पण त्यासाठीदेखील बँकेत जाणे किंवा वेळ साधता यावी म्हणून नातेवाईकांकडे धाव घेणे क्रमप्राप्त होते. सासूबाईंची  बिघडणारी परिस्थिती  आणि धावपळ करण्यासाठी असणारी मी एकटी हे पाहता, माझा खूपच गोधळ उडाला. वृद्ध सासरे, गरोदर नणंद आणि लांब अंतरावर कॉलेजात असणारी नणंद यांची काही मदत घेता येणे शक्य नव्हते !! शेवटी हॉस्पिटलमध्येच उभ्या दिसलेल्या परिचितांकडे साऊबाईंना ताब्यात देऊन मलाच बाहेर जाऊन  पैसे उभे करावे लागले ज्यात महत्वाचा दीड तास मोडला. नशिबाने साऊबाईंवर नंतर लगेच उपचार सुरु झाले !! "

 

मला ही परिस्थिती समजल्यावर ती टाळण्यासाठी काय करता येऊ शकले असते असा विचार आला आणि तोच तुमच्यासमोर मांडते आहे. अशी तणावग्रस्त परिस्थिती टाळण्यासाठी आपण पुढीलपैकी काही उपाययोजना करू शकतो का याचा विचार करूयात !

) इमर्जन्सी / आपत्कालीन फ़ंड या  तरतुदीचा   विसरता आपल्या आर्थिक नियोजनात समावेश केला पाहिजे. त्यासाठी सोप्या  बचत / गुंतवणुकीचे माध्यम निवडावे.

) आपल्या कमीत कमी पुढील सहा महिन्यांच वेतन इमर्जन्सी / आपत्कालीन फ़ंड म्हणून योजावे.  तसेच ते  अशा ठिकाणी असले पाहिजे जिथून आपल्याला मानसिक, शारिरीक धावपळ टाळून ते लगेच हातात पाडता येईल.

) त्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे पासबुक/ ATM कार्ड यांची माहिती  घरातील सर्वाना हवी.

) घरातील कर्त्याच्या आपत्कालात घरचे पूर्ण  उत्पन्न बंद होऊ शकते. त्यामुळे घरातील सर्व कमवित्या व्यक्तींचा योग्य असा (उत्पनांच्या अनुरूप) अपघाती विमा ( Accident Insurance) आणि आरोग्य विमा    (Mediclaim / Health Insurance) असणे आवश्यक आहे. याद्वारे हॉस्पिटलचा खर्च , ऍडमिट कालावधीतील उत्पन्नाची हानी यांच्यासाठी विमा मिळतो.

) कर्त्याच्या  मृत्यू सारख्या दुर्दैवी घटनेत,  त्याचा योग्य प्रमाणात असणारा जीवन विमा  (Life Insurance) कुटुंबाचे आर्थिक पडझड कमी करू शकतो. असा विमा  वेळेवर उतरवावा आणि उत्पन्ना अनुरूप  वाढवावा.  

) घराचे आर्थिक चित्र  ( जसे मिळकती, विमा, बचत तसेच गुंतवणुकी, इतर उत्पन्ने, कर्जे, टॅक्स, इतर आर्थिक दायित्वे . ) कुटुंबियांना सुस्पष्ट असणे खूप महत्वाचे आहे. त्यांना योग्य माहिती नसल्यास, कष्टार्जित पुंजी बेनामी म्हणून पडून राहू शकते किंवा गैरमार्गाने लाटली जाऊ शकते. म्हणून घराचा आर्थिक लेखाजोखा तयार करावा आणि तो वेळोवेळी अद्ययावत करावा. त्यासंबंधी घरातील व्यक्तींना साक्षर करावे. यामुळे घरातील प्रत्येकालाच  अर्थभान ही येते. 

) घरातील सर्व सदस्यांसाठी असणारे सल्लागार ( उदा.डॉक्टर्स, वकील, आर्थिक तसेच विमा सल्लागार .) यांची संपर्क माहिती  जसे पत्ते, फोन नंबर घरातील सर्वाना ठावूक हवेत.        

      अशा काही तरतुदी केल्यास, काही सवयी लावल्यास, कुटुंबियांनाही आर्थिक निर्णय घ्याव्या लागणाऱ्या बाबतीत सामायिक करून घेतल्यास, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास आपण सक्षम होऊ शकतो.    

- लेखिका: सौ. रत्ना दिपक कुलकर्णी,


शब्दांकन सहाय्य्य :
डॉरुपाली कुलकर्णी