Friday, November 26, 2021

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

 

आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.

२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते. ‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे.  आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.


भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ३८ लाख ६१ हजार रुपये इतके आहे.‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. २८ एप्रिल २०१९ रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. तेच मुल्य २८ मे २०१९ रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.

हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या सत्तेत असणारं मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील एक विधेयक मांडणार आहे. या नवीन विधेयकानुसार भारतामध्ये सर्व खासगी आभासी चलनांवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये अनेक मोठ्या क्रिप्टोकरन्सीजचा दर सरासरी १५ टक्क्यांनी घसरल्याचं पहायला मिळत आहे. बिटकॉनचा दर १७ टक्क्यांहून अधिक घसरलाय. तर इथेरियमच्या दरात १५ टक्क्यांहून अधिक घट झालीय. थिथेरचा दरही जवळजवळ १८ टक्क्यांनी घसरलाय.

-- (संदर्भ : लोकसत्ता )