आजकाल सगळ्या
"स्मार्ट" गोष्टींची
चलती आहे !! म्हणजे स्मार्टफोन , स्मार्टकार , स्मार्टस्पीकर वगैरे .म्हणजेच
इंटरनेटचा वापर करून, आपले दैनंदिन काम सोपे करणाऱ्या गोष्टी !! मग
आजकालची ही स्मार्ट पिढी ,
स्मार्ट गुंतवणुकीकडे नाही वळली तरच नवल !! स्मार्ट गुंतवणुक म्हणजे ऑनलाइन गुंतवणुक प्लॅटफॉर्मचा वापर करून, तिथून
मिळालेल्या (स्मार्ट??) सल्ल्यानुसार आपली गुंतवणुक करणे. असा सल्ला देणाऱ्या अनेकविध फ्री वेबसाईट तसेच
फ्री मोबाईल आप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. मग काही जणांना त्यातून असे वाटू शकते
की, "हे सगळे इतके सहज, सोपे आणि हातासरशी (की बोटांसरशी) उपलब्ध असताना आर्थिक
सल्लागाराची आवश्यकताच काय ? गुंतवणूकदारांना आर्थिक बाबींवर तज्ञ
मार्गदर्शनाची गरज खरंच आहे का?" याचबद्दलच जरा मुद्देसूद बोलूयात. माझ्यामते, गुंतवणूकदारांनी आर्थिक सल्लागाराच्या मदतीविना केलेल्या गुंतवुकीबाबत
बरेचदा चुका होऊ शकतात किंबहुना होतातच !
या चर्चेदरम्यान आपण फ्री ऑनलाइन
इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मला OIP असे
संबोधूयात. आता खालील मुद्द्यांचा विचार करू.
१)
सहृदयी मित्र की यंत्रवत सेवा ?
तुमच्या आर्थिक सल्लागाराला तुमच्याविषयी सर्व आर्थिक माहिती असते. तुमच्या कुटुंबातील सदस्य
संख्या. एकूण मिळकत, गरजा, तुमचे दायित्व (कर्जे आणि कर), अडचणी, तुमची स्वप्ने, तुमच्या बचत अथवा गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये इत्यांदीबाबत, तुमच्या आर्थिक सल्लागाराला संपूर्ण माहिती असते. तुम्ही दिलेल्या
माहितीच्या आधारे, हुशारीने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचारलेली आवश्यक ती आणि इतर पूरक माहिती, आर्थिक सल्लागाराला विदित असते, त्यामुळे तो तुम्हाला सर्वमावेशक सल्ला देऊ
शकतो. तुमच्या आर्थिक उद्दिष्टयाना गवसणी घालण्याचा प्रवासात,
तुमचा
आर्थिक सल्लागार तुमचा एक कौटुंबिक,सहृदय
मित्र बनलेला असतो. तुमच्या आर्थिक ध्येयांबाबत तो सतत जागरूक असतो. याउलट OIP ही एक यंत्रवत सेवा आहे (Mechanical Service ). इथे
तुमच्या आर्थिक तसेच कौटुंबिक
परिस्थिती बद्दल असणारी "जाणीव", "संवेदनशीलता" यांचा पुर्णतः आभाव असतो !! तुम्ही
निवडलेली OIP, केवळ तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या
आधारे तुम्हाला गुंतवणुकीची योजना (Scheme) सुचविते. आर्थिक सल्ला देताना आवश्यक असणारी
"सर्वसमावेशकता" याचा कोणताही विचार OIP सेवा करत नसल्या कारणाने, अशी
सेवा कोठल्या दर्जाचा सल्ला तुम्हाला देते, हे
उघडच आहे !!
२) हेतुशुद्धता की हेतुपुर्वकता? तुमच्या आर्थिक सल्लागाराचा एकमेव हेतू हा तुम्हाला, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबाबत सर्वसामावेशक असा सल्ला देणे असा सरळ असतो.
तुमच्या गरजेनुसार विविध आर्थिक योजनांमधून, तुमच्यासाठी
योग्य असणारी आर्थिक योजना किंवा आराखडा तुम्हाला देणे असे आर्थिक सल्लागाराचे काम
असते. यात कुठल्याही एकाच योजनेचा (Product or
Scheme) विचार होत नाही .परंतु बव्हतांशी OIP सेवा मात्र केवळ विशिष्ट आर्थिक योजनांबाबतच
सल्ला देताना दिसतात. या अशा योजना असतात ज्यामध्ये मिळणारे
आकर्षक कमिशन हा एक, तुम्हाला न दिसणारा अदृश्य घटक असतो. अशा केवळ
काही संस्थाना समर्पित असणारी OIP सेवा , तुमच्या
आर्थिक उद्दिष्टांची चिंता करत असावी का?
३) प्रक्रिया की प्रासंगिकता ? "गुंतवणुकीबाबत आर्थिक सल्ला" ही
एक सतत चालणारी प्रक्रिया आहे (Process) केवळ
एक प्रासंगिकता (Event) नव्हे. तुमचा आर्थिक सल्लागार, आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तुमची सोबत करणारा मार्गदर्शक असतो. बदलते
कायदे, नियम, मिळकती, बाजारातील चढ उतार असे आर्थिक मुद्दे
असोत किंवा घरातील बदलती परिस्थिती जसे नवीन सदस्याचा घरात प्रवेश किंवा घरातील
कोणाचे लग्न, शिक्षण किंवा मृत्यू आदी कारणाने
निर्गमन अशा कौटुंबिक बाबी असोत, आर्थिक
सल्लागार अशा बदलत्या आयामांनुसार, तुमच्या
आर्थिक नियोजनामध्ये सक्रियतेने बदल करित असतो (Active Management). आता OIP चा विचार करू. अशी सेवा वापरून केलेली गुंतवणुक
ही एक प्रासंगिकता असते. त्या गुंतणवुक-प्रसंगाशी निगडीत असणाऱ्या आर्थिक बाबी
सोडल्या, तर तुमच्याशी निगडीत असणाऱ्या
बदललेल्या आर्थिक किंवा कौटुंबिक बाबी, अशी सेवा लक्षात घेत नाही. अपुऱ्या किंवा दुर्लक्षित माहितीच्या आधारे
दिला जाणारा, असा OIP सल्ला कितपत योग्य असेल? हे तर तुमच्या आर्थिक नियोजनाचे "प्रासंगिकीकरण " (Passive Management) झाले.
४) माहितीची गोपनीयता की हस्तांतरण ? एक विश्वासाहार्य आर्थिक सल्लागार, तुमच्या बाबतीतली सर्व आर्थिक,कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली माहिती त्याच्याच
पुरती मर्यादित ठेवीत असतो. यात तुमची एकमेकांप्रती असलेली निष्ठा आणि संवेदना (Sensitivity) यांची भावनिक जोड कारणीभूत आहे. परंतु OIP सेवेमार्फत
केलेल्या गुंतवणुकीच्या गोपनीयतेचे काय ? अशा
सेवेला तुम्ही पुरवलेली माहिती, ही केवळ त्याच
सेवेपुरती वापरली जाते (Data Privacy) आणि
इतर कोणालाही ती पुरविली जात नाही असे
तुम्ही ठामपणे म्हणू शकता का ? किंबहुना
अशी माहिती पुरविल्यानंतर तुम्हाला, इतर तत्सम
उत्पादनांबाबत अनेक जाहिरातपर (Promotional) इमेल्स, मेसेज येणे सुरु होते.म्हणजेच तुम्ही OIP सेवेला
पुरविलेली माहिती ही इतर अनेक संस्थाना पुरवली जात असण्याची शक्यता असते. तुम्हाला
तुमच्याच अशा खाजगी माहितीचे हस्तांतरण होणे आवडेल का ?
५) आराखड्यावर काम की प्रलोभने ? तुमच्याशी सर्व बाबतीत चर्चा करून, योग्य असा आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करणे (Financial Plan) आणि शिस्तबद्धरीत्या (Disciplined Active Management) तो अंमलात आणणे (Execution) , हे तुमच्या आर्थिक सल्लागाराचे काम आहे. यात
तुम्हाला कुठल्याही प्रकारची आमिषे दाखविणे, सवलती
देणे अशा संबंध नसलेल्या कोठल्याही कृतीचा समावेश कधीच केला जात नाही. परंतु OIP सेवेबाबत
हे ठामपणे लागू होत नाही. अमुक एक आर्थिक योजना घेतली तर तमुक एका योजनेत सवलत (Discount) , एखादे सवलत कुपन, जोड योजना इ. आमिषे दाखवून तुम्हाला आर्थिक योजना पुरविणारी अशी OIP सेवा, आर्थिक नियोजनाशी निगडीत नसणारे असे सगळे उद्योग का करीत असावी ? त्यात त्यांचा काही वैयक्तिक फायदा असल्याशिवाय अशा अनावश्यक सुविधा
पुरविणारी OIP सेवा कितपत विश्वासाहार्य वाटते ?
वरील सर्व मुद्द्यांचा उहापोह झाल्यावर, या स्मार्ट गेझेटच्या युगातही , तज्ञ् , आर्थिक
सल्लागाराची भूमिका ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट
प्लॅटफॉर्म करूच शकत नाहीत हे आपल्या लक्षात आलेच असेल. शेवटी पैसा हा भावनेशी
निगडीत असतो म्हणूनच आर्थिक सल्लागार खरे पाहता तुमची पैशां मागची Emotional Management च करीत असतो. आणि म्हणूनच हे
करण्याकरिता भावना जाणणारा,
जपणारा "माणूस" तेथे आवश्यक
असतो. त्याची जागा कोणतेही यंत्र अथवा यांत्रिक सेवा घेऊच शकत नाहीत.
- रुपाली कुलकर्णी
SWSFSPL