नमस्कार ! आज तुमच्यासमोर आमचा असा एक अनुभव मांडत आहे , ज्याद्वारे सुयोग्य आर्थिक नियोजन करणे किती महत्वाचे हे पुनः सुस्पष्ट होते आहे. (नोंद : या लेखातील नाव बदललेले आहे. )
नाशिकमधील प्रसाद हा नोकरीनिमित्त दुबई राहणारा तरुण व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहे. आजतागायत बारा वर्षांपासून तो दुबईत कार्यरत आहे आणि आपल्या कुटुंबासोबत तो दुबईतच स्थायिक झालेला आहे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी योग्य ती मेहनत करून व सचोटीने काम करून प्रसादने पुष्कळ पैसा कमाविला आणि त्याद्वारे तसेच काही गृहकर्जाची मदत घेऊन, भारतातील भविष्यातील वास्तव्यासाठी, त्याने ठाणे येथे एक फ्लॅट खरेदी केला. नियमित पगार चालू असल्यामुळे ह्या कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले जात होते व सर्व काही सुरळीत चालले होते. अशातच एकेदिवशी त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाला. डॉक्टरांनी वडिलांची बायपास सर्जरी करण्यास सुचविले. प्रसादने डॉक्टरांच्या सल्य्यानुसार, वडिलांचे ऑपरेशन करवून घेतले. त्यावेळी, वडिलांचा कुठलाही आरोग्य विमा केलेला नसल्याने प्रसादला आपल्या गुंतवणुकीतून पैसे द्यावे लागले व यात प्रसादची सर्व गुंतवणूक संपली. दुर्दैव इथेच थांबले नाही. त्यानंतर प्रसादची नोकरीही गेली. नवीन नोकरीच्या शोधात असताना पुढील सहा महिने निघून गेले. परिवाराचा भार, जीवनावश्यक वस्तू आदीसाठी प्रसादला क्रेडिट कार्डचा वापर करावा लागला. दुबईतील महागाईचा सामना करताना क्रेडिट कार्ड चा वापर इतका जास्त होत गेला की त्याला क्रेडिट कार्डवर कर्ज घ्यावे लागले. पुढे सर्व बचतही संपुष्टात आल्यावर क्रेडिट कार्ड कर्जाचे हफ्ते थकले. तसेच ठाणे इथल्या फ्लॅटच्या गृहकर्जाचे हफ्तेही थकले व प्रसाद "डिफॉल्टर" झाला .डिफॉल्टर झाल्यामुळे त्याचे सिव्हील रेकॉर्ड खराब झाले. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याने इतरत्र कुठे नवीन कर्ज घेण्याचा प्रयत्न केला परंतु डिफॉल्टरचा शिक्का बसल्यामुळे प्रसादला नवीन कर्जही मिळेनासे झाले. शेवटचा पर्याय म्हणून नातेवाईकांकडे पैसे मागण्याची वेळ प्रसादवर आली. सुदैवाने नंतर त्याला इजिप्तमधून एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि काही महिन्यांच्या कालावधीनंतर प्रसाद आर्थिक संकटातून बाहेर आला. परंतु या सर्व प्रकारात झालेला मानसिक त्रास, पैशनिगडीत आलेले आपल्याच माणसांचे वाईट अनुभव त्याच्या आणि कुटुंबाच्या खच्चीकरणास कारणीभूत ठरले.
आता आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून प्रसादच्या काय चुका झाल्या ते बघुयात.
१) आपली नोकरी / व्यवसाय कसाही असला तरी पुढील कमीतकमी सहा महिन्यांपर्यतच्या दैनंदिन खर्चाचा विचार करून, आपण तेवढी रक्कम बचत खात्यात कायम राहील याचा विचार केलाच पाहिजे. प्रसादच्या बाबतीत हे होत नव्हते. पुष्कळ पगार आणि दुबईतील वास्तव्यचा पुष्कळ खर्च यांचा तोल न सांभाळता आल्याने, कोठल्याही नियमित / अनियमित / अतार्कीक खर्चासाठी कुठलीही आर्थिक व्यवस्था त्याने केलेली नव्हती.
२) कुटुंबातील सर्व सदस्यांच्या योग्य तो आरोग्य , जीवन तसेच अपघाती विमा हा अत्यावश्यक आहे. तो नसल्यास, काही दुर्दैवी प्रसंगामुळे आतापर्यंत केलेली सर्व बचत किंवा गुंतवणुक संपुष्टात येऊ शकते. प्रसादच्या वडिलांचा आरोग्य विमा नसल्याने, त्यांच्या उपचारादरम्यान , त्याने केलेली सर्व बचत तसेच गुंतवणूक पूर्णपणे वापरली गेली आणि त्यात नोकरीही गेल्याने आर्थिक संकट उभे ठाकले.
३) आपण करीत असलेली गुंतवणुक , ही महागाईचा दर विचारात धरूनच केलेली असली पाहिजे. ते न झाल्यास अशा गुंतवणुकीचा उपयोग , महागाईचा सामना करताना होतच नाही. प्रसादने केलेल्या बचत आणि गुंतवुकीच्या प्रकारात हा विचार झालाच नव्ह्ता.
या सर्वातून, एक गोष्ट लक्षात घेण्यासरखी आहे की पैसा कमावणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे व्यवस्थापनही !! सर्व प्रकारचा सुयोग्य विमा, अत्यावश्यक खर्चासाठी तरतूद, गरजांप्रमाणे सुयोग्य गुंतवणुकीचे माध्यम हे सर्वच "आर्थिक नियोजनाचे" महत्वाचे घटक आहेत. असे नियोजन हे आर्थिक, कौटुंबिक, परिवारातील सदस्य संख्या, विशिष्ठ गरजा, घेतलेले कर्ज आदी बऱ्याच बाबींवर अवलंबून असते आणि म्हणून ते करण्यासाठी योग्य, तज्ञ् आर्थिक सल्लागाराची मदत घेणे केव्हाही चांगले !!
या अनुभवातून शिकून तुम्हीही, ऐनवेळी च्या आर्थिक संकटाचे नियोजन केलेले आहे, हे तपासून बघाल ना ? मदतीस आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत !! कधीही हाक घाला....धन्यवाद !!
ऋषभ भरत सोनवणे.
SWSFSPL