Tuesday, December 11, 2018

मनो-Money : भाग ५ : शेअरिंग , शेअर्स बद्दल : डॉ. रुपाली कुलकर्णी




बालमित्रांनो , ह्या मागच्या काही  दिवसांत  तुम्ही  वर्तमानपत्रांमधून  "शेअर बाजार ", "स्टॉक  मार्केट"  हे  शब्द बरेचदा वाचले असतील.   कदाचीत  तुमच्या   घरातील  वडील मंडळींच्या  बोलण्यातून तुम्ही हेही  ऐकले असेल  की शेअर बाजार "वधारतो" किंवा "कोसळतो" !! तर आज मी तुमच्याबरोबर ह्या शेअर्स बद्दल थोडे शेअर करणार आहे !!   गडबडून जाऊ नका ! तुम्हाला हे काही किचकट प्रकरण वाटते आहे का ? काळजी करू नका. आपण गोष्टीरूपातून समजावून घेऊयात  न !
राधा , सारा आणि स्वराज ही  एकाच बिल्डिंग मध्ये राहणारी  आणि एकाच  शाळेत  शिकणारी दोस्तकंपनी !! एकदा  त्यांना शाळेत "खरी कमाई" हा प्रयोग करून बघण्यास सांगतात. म्हणजे काय, तर घरातील  मोठ्या मंडळींची मदत न घेता, लहान -मोठे काम करून , "आपल्या  खऱ्या कष्टाचे पैसे कमवायचे " !! स्वतः काम करून पैसे  मिळवण्याच्या विचाराने, तिघेही खूपच उत्साहित होतात. थंडीचे दिवस सुरु झाले असतात म्हणून ते  कॉफीचा  स्टॉल लावूयात, असे ठरवितात. राधा आणि सारा आपल्या पॉकेटमनीतून  प्रत्येकी ४० रु. तर स्वराज २० रु. देतो. जमलेल्या १०० रु. मधून, कॉफी पावडर, साखर, दुध, पेपरकप असे साहित्य आणले जाते. सगळे  मिळून मस्तगरमागरम कॉफी तयार करतात. किती ? १०० कप !!  प्रति कप  २ रु. असा भाव ठरवितात  आणि मग संध्याकाळी बिल्डिंगखाली ते आपला "फक्कड कॉफी स्टॉल " लावतात. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बिल्डिंगमधली सगळी दोस्तकंपनी आणि आजी -आजोबा मुलांच्या स्टॉलवर जाऊन झक्कपैकी कॉफीपान करतात. बघता बघता १०० कप कॉफी संपते आणि  एकूण  २०० रु. ची " खरी कमाई" केल्याचा आनंद तिघांनाही होतो !! आता प्रश्न उरतो, तो नफा वाटपाचा !! ही हुशार मुले आपले गणितातील गुणोत्तर वापरतात. राधा  म्हणते  "१०० रु  मधील, माझा  सहभाग  ४० रु. होता , तर २०० रु. मध्ये तो किती असेल? बरोबर ८० रु. !!".  मग राधा आणि साराला प्रत्येकी ८० रु. तर स्वराजला  ४० रु. मिळतात . दामदुप्पट !! मुले जाम खुश होतात.    
मित्रांनोशेअर्स हे  पैशांच्या गुंतवणुकीचे एक लोकप्रिय माध्यम आहे.  एखादी कंपनी (जशी  आपली "फक्कड कॉफी स्टॉल" !) जनतेला आपल्या कंपनीचे  शेअर्स देऊन, त्यांना आपल्या कंपनीच्या प्रगतीमध्ये सामील करून घेते आणि आपली मालकी अनेक समभागात वाटते. लोक हे  समभाग / शेअर   विकत घेऊन, कंपनीच्या नफ्यात भागीदार बनतात. (जसे "फक्कड कॉफी स्टॉल" कंपनी चे तीन भागीदार होते.) जेव्हा कंपनी नफा कमविते  तेव्हा हा  कंपनीच्या शेअर चा भाव वाढतो (वधारतो). याउलट  कंपनीला तोटा झाला तर हा भाव कमी होतो (कोसळतो ). झालेला नफा किंवा तोटा, यांच्या  प्रमाणात समभाग धारकांना (शेअर होल्डर्स ) परतावा मिळतो. (जसे राधा आणि सारा ला नफ्यातील ४०% आणि स्वराज ला २०% परतावा मिळाला). खऱ्या शेअर बाजारात, वैयक्तिक गुंतवणूकदारां प्रमाणेच  म्युच्युअल फंड, बँका, विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार सहभागी होतात आणि मोठ्या प्रमाणात समभागांची खरेदी किंवा विक्री चालते.  शेअर बाजारात पैसे  गुंतवून नफा कमविण्यासाठी , त्याचा नीट अभ्यास करणेवेगवेगळ्या कंपनींच्या प्रगतीविषयी  योग्य ज्ञान असणे गरजेचे असते. (कारण सगळ्याच कंपन्या आपल्या "फक्कड कॉफी स्टॉल" प्रमाणे नफा कमवीत नाहीत. आपल्या तिघा दोस्तमंडळींनी थंडीच्या दिवसात कॉफीचा स्टॉल लावला म्हणून सगळ्यांनी मिळून ती कॉफी संपली. पण त्या ऐवजी या तिघांनी कॉफी ऐवजी आईस्क्रीम चा स्टॉल लावला असता, तर त्यांना कदाचित तोटाही होऊ शकला असता.). "योग्य प्रगतीशील कंपनीमध्ये, दीर्घकालीन केलेली गुंतवनूक, अधिक परतावा देते", हे अनुभवांती सिद्ध झालेले आहे. मित्रानोमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की, वॉरेन बफे  यांनी  वयाच्या ११व्या वर्षी शेअर बाजारातून, आपला पहिला शेअर विकत घेतला होता आणि आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आहे !!  तेव्हा, तुम्हालाही असे करून बघायला आवडेल का?.  करा विचार आणि लागा कामाला !!            
- रुपाली दीपक कुलकर्णी,
SWS फायनानंशिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक,