Wednesday, November 21, 2018

मेडिक्लेम पॉलिसी: घ्यावयाची काळजी : श्री. दीपक कुलकर्णी

आज मेडिक्लेम पॉलिसी असूनही, त्यात काळजीपूर्वक सुधारणा न केल्याने, आलेल्या अनुभवाबद्दल बोलूयात. सूर्यवंशी कुटुंब, आमचे बरेच जुने क्लाएंट आहेत. त्यांच्या सर्व इन्वेस्टमेंट, इन्शुरन्स आम्ही बरेच वर्षांपासून पाहतो. काकांचा मुलगा सचिन व्यवसायाने आर्किटेक्ट आहे आणि त्याची प्रॅक्टिस खूप जोरात चालते त्यामुळे एकदम तो अतिशय बिझी असतो. पण त्यांनी, सिंगल विंडो सर्व्हिसेस मार्फत, सुचविलेले सर्व आर्थिक नियोजन, म्हणजे सर्व प्रकारच्या गुंतवणूक, आरोग्य आणि अपघात विमा  इ. सांगितल्या प्रमाणे, अगदी तंतोतंत केलेले आहे.

      आज सूर्यवंशी काका ऑफिसला आले ते नाराज होउनच. त्याचे असे झाले की मागच्या आठवड्यात  सचिनची सरांची लहान मुलगी सारा, घरातच खेळता-खेळता पडली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. सचिन सर व्यवसायाच्या निमित्ताने नाशिकच्या बाहेर गेलेले होते. सूर्यवंशी काकांनी तिला ताबडतोब दवाखान्यात नेले आणि तिच्यावर उपचार चालू झाले. तीन-चार तासांनी काकांनी,  तिथल्या नर्स ला सांगितले की आमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे. त्यावर त्याना असे सांगण्यात आले की मेडिक्लेम पॉलिसी जर असेल तर साराला 24 तास, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागेल. मग सारा, तिची आई आणि आजोबा, याना तितकीशी आवश्यकता नसताना, त्या रात्री हॉस्पिटलमध्येच रहांवे लागले. त्यांनी हॉस्पिटलच्या वातवरणात, जागरण, जेवण यांचे हाल सहन करत रात्र काढली आणि सकाळी त्यांना धक्कादायक वृत्त समजले. क्लेमसाठी प्रयत्न करताना असे लक्षात आले की मेडिक्लेम पॉलिसीमध्ये, साराचे नावच नाहीये. धावपळ करून काकांनी पैसे काढून आणले, बिल भरले आणि डिस्चार्ज घेतला.

मेडिक्लेम पॉलिसी बाहेर काढलेली असून जुनीच होती आणि दरवर्षी तिचे रिन्यूअल केले जात होते. परन्तु साराच्या जन्मानंतर तिचे नाव, पॉलिसीमध्ये ॲड करायचे राहून गेले होते. दरवर्षी, मागील पानावरून पुढे, अशी मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू होत गेली होती. पॉलिसी बाहेर काढलेली असल्याने, हे आमच्या  लक्षात येण्याचे  कारण नव्हते.     

परंतु  “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, या उक्तीप्रमाणे जागे होण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला सर्वांना पुढील आवाहन करु इच्छितो.
·         मेडिक्लेम पॉलिसी मध्ये आपल्या सर्वच कुटुंबियांचा समावेश आहे किंवा नाही ते एकदा तपासून पहा. आपल्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती दाखल होताच, मेडिक्लेम पॉलिसी मध्ये सुधारणा करण्यास, आपल्या आर्थिक सल्लागारास, आवर्जून सांगा.
·         आता ज्येष्ठ नागरिकां साठी देखील, मेडिक्लेम पॉलिसी सुविधा उपलब्ध आहे. अगदी सत्तर वर्षाच्या व्यक्तीलासुद्धा मेडिक्लेम पॉलिसी मिळते. तेव्हा आपल्या आई-वडीलांच्या नावाचाही , मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समावेश करून घ्या.
·         मेडिक्लेम पॉलिसी जुनी असली तरी बऱ्याच वेळा इन्शुरन्स कंपनीकडूनही चुका होऊ शकतात आणि “नो‌ क्लेम बोनस”, पुढच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जात नाही. ही बाब देखील, तपासून घेतली पाहिजे.
·         बहुतेक सर्व मेडिक्लेम पॉलिसी कंपनी मार्फत, दर दोन वर्षांनी किंवा चार वर्षांनी “मेडिकल टेस्ट” साठी, सर्व खर्च दिला जातो. ह्या सुविधेचालाभ, आपण वेळचेवेळी घ्यायला पाहिजे.
·         कुठल्याही आजारपणामुळे जर हॉस्पिटलायझेशन झाले, तर 24 तास ऍडमिट असणे, गरजेचे असते. ॲक्सिडेंट केस मध्ये मात्र हे सक्तीचे नाही. अशावेळी, तुम्ही उपचार घेऊन घरी जाऊ शकता, फक्त कागदपत्रांची पूर्तता उपचारा दरम्यानच करावी लागते.
·         आपल्या आर्थिक सल्लागाराला, आपण  "अर्था " शी  निगडीत असलेल्या सर्व व्यवहारांची माहिती, पूर्णपणे द्या.

अशी सर्व काळजी,  आपण घेतली तर मेडिक्लेम पॉलिसी  मार्फत होणारे लाभ, आपणास मनस्तापा शिवाय घेता येतील. नाही का ?


श्री. दीपक कुलकर्णी,
    कार्यकारी संचालक

S.W.S.F.S.P.L
- 

Tuesday, November 20, 2018

मनो-Money: भाग 3: बचतीसाठी “ Sooner The Better ” फॉर्म्युला: डॉ. रुपाली कुलकर्णी





Hello बालदोस्तांनो, मागील महिन्यामध्ये आपण “चक्रवाढ व्याज” ह्या संकल्पनेला गोष्टीरूपातून समजावून घेतले. आता ह्या  संकल्पनेला अजून विस्तृतपणे समजावून घेऊयात. तुम्ही  अमेरिकन नागरिक, वॉरेन बफे  यांच्याबद्दल ऐकले आहे का ? त्यांना गुंतवणूक जगतातील गुरु मानले जाते. त्यांनी वयाच्या ११व्या वर्षी शेअर बाजारातून, आपला पहिला शेअर विकत घेतला होता आणि आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आहे !!  म्हणजेच काय, आपल्या आर्थिक श्रीमंतीसाठी, आपण पहिले पाऊल जितक्या लवकर उचलू तितके चांगले !! म्हणजेच फॉर्म्युला झाला Sooner The Better !! चला आता हे उदाहरणा द्वारे समजावून घेऊयात.

            राधा आणि सारा या दोन्ही बालमैत्रीणींना पॉकेटमनी मिळायचा. राधाने वयाच्या १० व्या वर्षा पासूनच बचत करण्याचे ठरविले. तिने बँकेमध्ये, दरवर्षी १०० रु, ८% व्याजदराने बचत करण्यास सुरुवात केली. तिने तेव्हाच सारालाही बचत करण्यासाठी सुचविले. परंतु सारा आपला पोकेटमनी नेहेमीच पूर्णपणे खर्च करून टाकत असे. पुढे कालौघात, साराला देखील राधाचे म्हणणे पटले आणि तिने १६ व्या वयवर्षापासून पुढे, दरवर्षी, त्याच व्याजदराने, तेवढ्याच रक्कमेची बचत करण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी राधाने मात्र, बँकेमधील आपली बचत थांबविली होती. त्या दोघींची बँकेमधील बचत, चक्रवाढ व्याज पद्धतीमध्ये कशी वाढत गेली, हे सगळे खालील टेबल मध्ये मांडले आहे.


वय
राधाची बचत
साराची बचत
१०
१००+ व्याज
१०८
०

११
१००+१०८ + व्याज  
२२५
०

१२
१००+२२५ + व्याज 
३५१
०

१३
१००+३५१ +व्याज  
४८७
०

१४
१००+४८७ + व्याज
६३४
०

१५
१००+६३४ + व्याज
७९२
०

१६
०+ ७९२ + व्याज
८५५
१००
१०८
१७
०+८५५+ व्याज
९२३
१००+१०८+व्याज
२२५
१८
०+९२३+ व्याज
९९७
१००+२२५+व्याज
३५१

याप्रमाणे पुढे २५ वर्षांपर्यंत

याप्रमाणे पुढे २५ वर्षांपर्यंत

२५

१७१०

१५६५
एकूण कालावधी ६ वर्षे, एकूण बचत ६०० रु.
एकूण परतावा १७१० रु. !!
एकूण कालावधी १० वर्षे, एकूण बचत १००० रु.
एकूण परतावा १५६५ रु.

जेव्हा वयाच्या २५व्या वर्षी, या दोघींनी आपल्या बचतीची तुलना केली, तेव्हा काय लक्षात आले? राधाने, जास्त काळ-जास्त बचत करणाऱ्या साराला, कमी काळ-कमी बचत करूनही, एकूण परताव्याच्या बाबतीत मागेच टाकले. राधाने बचतीची लवकर सुरुवात केल्यामुळे, चक्रवाढ व्याज पद्धतीचा फायदा, तिला लवकर मिळण्यास सुरुवात झाली ! त्यामुळे Sooner The Better फॉर्म्युला प्रमाणे, राधा बचतीत सरस ठरली !! हा झाला, चक्रवाढ व्याजाचा महिमा !! आहे न भारी ?

दोस्तानो, गुंतवणुकीची सुरुवात लवकर करणाऱ्या वॉरेन बफे यांच्याकडे, आज इतकी संपत्ती जमा आहे की त्यांना गुंतवणुकीची साधने अक्षरशः कमी पडताहेत !! अर्थात हे सगळे झाले आर्थिक श्रीमंती विषयी ! बाकी आपली मोजता न येणारी वैचारिक, समाजिक, नात्यांमधील श्रीमंतीही अतिशय महत्वाची आहे बर का !! बघा मग, विचार करा !! कदाचित वॉरेन बफे यांचे पुढचे भारतीय वर्जन, तुम्हीच तर नाही ? भेटूच पुन्हा....तुमची रुपाली ताई !!                   

मनो-Money : भाग २ : चक्रवाढ व्याजाचा बागुलवुवा: डॉ. रुपाली कुलकर्णी





Hello बालदोस्तांनो, जून महिन्यामध्ये आपण, पॉकेटमनी प्लानिंगचा SMART फॉर्म्युला शिकलो!! आता त्याचे पुढचे थोडेसे !! “चक्रवाढ व्याज” हा गणिती शब्द आपल्याला इयत्ता आठवीमध्ये गाठतो. हे नाव आणि त्याचा गणिती फॉर्म्युला वाचला ना की बऱ्याच मुलाना धडकीच भरते बर का !! या संकल्पनेचा बागुलबुवा उभा ठाकतो समोर आणि मग ह्या साध्या, सोप्या संकल्पनेची भीतीच वाटायला लागते. तर आज आपण जरा, याच  बागुलबुवाचा समाचार घेउयात.

            एक गोष्ट सांगते तुम्हाला. एका गावात, अतिशय उत्कृष्ट गायन करणारे दोन गायक रहात असत. त्यांची नावे होती वीरसेन आणि तानसेन. त्या गावाच्या राजदरबारी, राजगायक म्हणून कोणाची नियुक्ती करावी हे ठरविण्यासाठी, त्या गावाच्या राजाने, या दोघांच्यात गायन जुगलबंदीचे आयोजन केले. जो सरस ठरेल, तो अर्थातच भावी राजगायक होणार होता! निर्णायक सभेमध्ये, दोघांनीही उत्कृष्ट असे गायन सादर केले. राजा अतिशय प्रसन्न झाला. परंतु त्याला प्रश्न पडला की शेवटी निवड कोणाची करावी? मग त्याने एक युक्ती केली. दोघांनाही बक्षीशी मागायला सांगितली. वीरसेनने खुश होऊन १०० पोती धान्य मागितले. राजाने ती मागणी तत्परतेने मान्य केली. वीरसेनचे कल्याण झाले म्हणून सगळे दरबारी आनंदून गेले. तानसेन मात्र चतुर होता. तो राजास म्हणाला, “मला आज तांदुळाचे फक्त दोन दाणे द्या. मात्र येणाऱ्या प्रत्येक दिवशी, मागील दिवसाच्या दुप्पट दाणे, माझ्या धान्य कोठारात जमा करण्यात यावे.” त्याची ही मागणी  ऐकताच, दरबारी लोक त्याला हसू लागले !! त्यांना वाटले, की मागून मागून काय मागितले तर तांदुळाचे फक्त दोन दाणे !! पण चाणाक्ष राजाने मात्र खूष होऊन तीही मागणी मान्य केली आणि  मनोमनी तानसेनची, राजगायक म्हणून नियुक्ती करुन टाकली. प्रजेच्याही लक्षात यावे, म्हणून राजाने तानसेनच्या धान्य कोठारात,  रोजचे तांदूळ दाणे पोहचविण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी २, मग ४, मग ८, १६, ३२, ६४.....असे होता होता, काही काळातच, कोठारात पोत्यांनी धान्य जमा व्हायला सुरुवात झाली !! आणि बघताबघता १०० हून अधिक पोती धान्य जेव्हा जमा झाले, तेव्हा तानसेनने हे दान थांबविण्याची विनंती केली!! हे सर्व प्रजेच्या लक्षात येताच, राजाने तानसेनच्या नियुक्तीची  घोषणा केली !!

            दोस्तानो, राजाच्या मते, केवळ गुणाला महत्व नव्हते. तर राजाने गुण आणि चातुर्य यांचा पूरेपर वापर करणाऱ्या तानसेनला नेमके हेरले.  तानसेन चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला, नुसता शिकलाच नव्हता तर त्याचा त्याने व्यवहारात अतिशय चतुरपणे वापरही केला. मूळ बक्षिशीवर अधिक बक्षिशी तो मिळवत गेला. उदाहरणार्थ, मी जर १०० रु. चक्रवाढ व्याजाने गुंतविले आणि त्यावर मला १०रु. चे व्याज मिळाले, तर पुढल्या वेळी व्याज मिळताना मूळ मुद्दल १०० असे ठराविक न रहाता (जे वीरसेनने केले होते) वाढीव मुद्दल, म्हणजे ११० रु. वर व्याज मिळते. म्हणजेच बक्षिशीवर अधिक बक्षिशी, नाही का ?

       सर्व बँक खात्यावरील बचतीवर,असे चक्रवाढ व्याज काही काळाने, ठराविक दराने मिळण्याची सुविधा उपलब्ध असते (आपल्या गोष्टीतला दर होता दुपटीचा). मग तुम्ही जर तुमचा पोकेटमनी, घरात पिगी बँकेत ठेवलात तर तुम्ही गेलात वीरसेनच्या गटात. त्याने मागितलेले १०० पोती धान्य, जसे वाढ न होता तेवढेच राहिले न कायम, तसाच तुमचा पोकेटमनीही कायम तितकाच राहील, जितका तुम्हाला मिळाला होता. पण तुम्ही जर तो, बँक खात्यात ठेवलात, तर त्याची वाढ मात्र  चक्रवाढ पद्धतीने होईल. बँकेत  पोकेटमनी जमा करताना, ती कितीही लहान रक्कम जरी असली (तानसेनच्या सुरुवातीच्या तांदुळाच्या फक्त दोन दाण्याप्रमाणे), तरीही जेव्हा तिची  चक्रवाढ पद्धतीने वाढ होईल, तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की हा पर्याय, घरातील  पिगी बँकेपेक्षा तुम्हाला नक्कीच जास्त परतावा देतोय. शिवाय भविष्यात लागणाऱ्या बँकेच्या व्यवहारांची तुम्हाला ओळखही होईल.

पटले का मग,  आपण शाळेत ज्या संकल्पना शिकतो त्याचा वापर आपल्याला व्यवहारातही करता आला पाहिजे. असे झाले तरच आपण खरे शिक्षण घेऊ शकलो असे समजावे.  नाहीतर चक्रवाढ व्याजाचा लक्षात रहातो तो नुसता फॉर्म्युला आणि मग वाटतो त्याचा बागुलबुवा. पळवा आता ह्या बागुलबुवाला आणि कळवा काही अडचणी आल्याच तर .. भेटूच पुन्हा....तुमची रुपाली ताई !!                                                            

मनो-Money : भाग १ : प्लानिंग पॉकेटमनीचे : डॉ. रुपाली कुलकर्णी



Hello बालदोस्तांनो, मी तुमची रुपाली ताई! आता वयम मधून, तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी भेटणार आहे बर का!! बरे, आजचा आपला गप्पांचा विषय पण एकदम तुमच्या आवडीचा आहे. कोणता? अरे....पॉकेटमनी !! मला खात्री आहे की आई-बाबा, आजी-आजोबा तुम्हाला खाऊचे पैसे नक्कीच देत असणार आणि तेही डोळसपणेच. हो, आम्ही त्याला खाऊचे पैसे म्हणायचो, तुम्ही मात्र त्याला स्मार्ट शब्द वापरता, पॉकेटमनी!! मला सांगा, हा पॉकेटमनी, खरोखरच पॉकेट मध्ये रहातो का की कितीही नाही म्हंटले तरी खर्चच होऊन जातो? तुम्ही म्हणाल, “छट ! पॉकेटमनी कधी साठवून ठेवायचा असतो का? तो तर देतातच आम्हाला खर्च करण्यासाठी. कधी खाऊ, कधी खेळणी तर कधी पिक्चर ला जाण्यासाठी, आम्ही तो खर्चून टाकतो.” पण तुमच्यातलेच काही बालदोस्त नक्कीच असेही असणार, जे आपल्या, पुढील काही  गम्माडीजमतीसाठी पॉकेटमनी साठवून ठेवत असतील. म्हणजेच पॉकेटमनी चे प्लानिंग करत असतील. तर हे प्लानिंग प्रभावीपणे कसे करता येईल, ते आपण बघू.

       मग, आपली तर सगळी स्मार्ट gang आहे ना!! तर चला, पॉकेटमनी चे प्लानिंगही आपण स्मार्टपणे करूयात. तर ह्या SMART शब्दाला आपण जरा असे वाचूयात: S-Specific, M-Measurable, A:Achievable, R: Realistic आणि T:Time-bound. म्हणजेच जी काही गम्माडीजम्मत आपल्याला भविष्यात घ्यायची आहे ना, ती नक्की काय आहे (Specific), किती किमतीची आणि संख्येने किती घेणे आहे (Measurable), जवळ असणाऱ्या पॉकेटमनीतून ती नक्की घेता येणार आहे का (Achievable), ती वास्तववादी अथवा घेण्यासारखी आहे का (Realistic) आणि ती नक्की केव्हा विकत घ्यायची आहे (Time-bound). हे सगळे मुद्दे आपल्या प्लानिंगमध्ये आलेच पाहिजे. आता उदाहरणार्थ, आपण राधा आणि स्वराज या दोघांनी केलेले पॉकेटमनी चे प्लानिंग बघूयात. समजा या दोघांनाही टेबलटेनिस खेळण्याची आवड आहे आणि आपल्या पॉकेटमनीतून, इतर काही गोष्टींबरोबरच त्यांना टेबलटेनिस ची रॅकेट विकत घायची आहे. आता ह्या दोघांनी केलेले प्लानिंग पहा.


SMART
राधा
स्वराज
Specific
मला पॉकेटमनी तून रॅकेट घायची आहे.
मला पॉकेटमनी तून बिगिनर्स ची रॅकेट  घायची आहे.
Measurable
मला पॉकेटमनीतून काही पैसे लागतील
मला त्यासाठी एकूण १००० रु. ची आवश्यकता आहे
Achievable
मला स्वतःला च सगळे पैसे जमवावे लागतील. जमेल का मला?
कधी जर मला कमी पॉकेटमनी मिळाला, तर अधिक लागणारी रक्कम बाबांकडे मागीन.
Realistic
मला रॅकेट कोणीतरी गिफ्ट देईल
मला मिळणारा पॉकेटमनी, रॅकेट घेण्यास नक्कीच पुरेसा आहे.
Time-bound
बघू, कधीतरी पॉकेटमनीतून पैसे बाजूस ठेवू.
मी त्यासाठी पॉकेटमनीतून १० महिने, १०० रु.बाजूस ठेवणार आहे.
 मग, कोणाचे प्लांनिंग तुम्हाला बरोबर वाटते ? कोण ठरविल्या प्रमाणे, टेबलटेनिस ची रॅकेट वेळेवर घेऊन शकेन? नक्कीच स्वराज ने आपला SMART फॉर्म्युला वापरून, अधिक प्रभावी प्लानिंग केले आहे आणि त्याला स्वतःच्याच प्लांनिंग आणि  पॉकेटमनीतून रॅकेट खरेदी करण्याचा आनंद मिळणार आहे.


मग बालदोस्तांनो, पटला का माझा फंडा ? तुम्ही काय, होच म्हणाल !! मला कसे समजणार की तुम्हाला नक्की काय आणि किती उमगलाय हा SMART फॉर्म्युला? तर मग, https://goo.gl/8WiqzW ह्या लिंक वर जा आणि तिकडे हा फॉर्म्युला वापरून दाखवा बरे ! काही अडचण आलीच, तर मला बिनधास्त खालील नंबरवर फोन करा. वाट बघतेय ह्न..तुमच्या प्रतिसादाची!! आणि हो, आई-बाबांकडे पॉकेटमनी मागू मात्र नका ह्न..ते तर देतील तुम्हाला आवश्यकता असेल तर!  भेटूच पुन्हा लवकर..... बाय फॉर नाऊ ....तुमची रुपाली ताई !!
-