Hello बालदोस्तांनो, जून महिन्यामध्ये आपण,
पॉकेटमनी प्लानिंगचा SMART
फॉर्म्युला शिकलो!! आता त्याचे पुढचे थोडेसे !! “चक्रवाढ व्याज” हा गणिती शब्द
आपल्याला इयत्ता आठवीमध्ये गाठतो. हे नाव आणि त्याचा गणिती फॉर्म्युला वाचला ना की
बऱ्याच मुलाना धडकीच भरते बर का !! या संकल्पनेचा बागुलबुवा उभा ठाकतो समोर आणि मग
ह्या साध्या,
सोप्या संकल्पनेची भीतीच वाटायला लागते. तर आज आपण जरा,
याच बागुलबुवाचा समाचार घेउयात.
एक
गोष्ट सांगते तुम्हाला. एका गावात,
अतिशय उत्कृष्ट गायन करणारे दोन गायक रहात असत. त्यांची नावे होती वीरसेन आणि
तानसेन. त्या गावाच्या राजदरबारी,
राजगायक म्हणून कोणाची नियुक्ती करावी हे ठरविण्यासाठी, त्या
गावाच्या राजाने, या
दोघांच्यात गायन जुगलबंदीचे आयोजन केले. जो सरस ठरेल, तो
अर्थातच भावी राजगायक होणार होता! निर्णायक सभेमध्ये, दोघांनीही
उत्कृष्ट असे गायन सादर केले. राजा अतिशय प्रसन्न झाला. परंतु त्याला प्रश्न पडला
की शेवटी निवड कोणाची करावी? मग
त्याने एक युक्ती केली. दोघांनाही बक्षीशी मागायला सांगितली. वीरसेनने खुश होऊन
१०० पोती धान्य मागितले. राजाने ती मागणी तत्परतेने मान्य केली. वीरसेनचे कल्याण झाले
म्हणून सगळे दरबारी आनंदून गेले. तानसेन मात्र चतुर होता. तो राजास म्हणाला,
“मला आज तांदुळाचे फक्त दोन दाणे द्या. मात्र येणाऱ्या प्रत्येक दिवशी,
मागील दिवसाच्या दुप्पट दाणे,
माझ्या धान्य कोठारात जमा करण्यात यावे.” त्याची ही मागणी ऐकताच, दरबारी लोक त्याला हसू लागले !! त्यांना वाटले, की
मागून मागून काय मागितले तर तांदुळाचे फक्त दोन दाणे !! पण चाणाक्ष राजाने मात्र
खूष होऊन तीही मागणी मान्य केली आणि
मनोमनी तानसेनची,
राजगायक म्हणून नियुक्ती करुन टाकली. प्रजेच्याही लक्षात यावे,
म्हणून राजाने तानसेनच्या धान्य कोठारात, रोजचे
तांदूळ दाणे पोहचविण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी २, मग
४, मग
८, १६, ३२, ६४.....असे
होता होता, काही
काळातच, कोठारात
पोत्यांनी धान्य जमा व्हायला सुरुवात झाली !! आणि बघताबघता १०० हून अधिक पोती
धान्य जेव्हा जमा झाले,
तेव्हा तानसेनने हे दान थांबविण्याची विनंती केली!! हे सर्व प्रजेच्या लक्षात
येताच,
राजाने तानसेनच्या नियुक्तीची घोषणा केली
!!
दोस्तानो, राजाच्या
मते,
केवळ गुणाला महत्व नव्हते. तर राजाने गुण आणि चातुर्य यांचा पूरेपर वापर करणाऱ्या तानसेनला
नेमके हेरले. तानसेन चक्रवाढ व्याजाचा
फॉर्म्युला,
नुसता शिकलाच नव्हता तर त्याचा त्याने व्यवहारात अतिशय चतुरपणे वापरही केला. मूळ
बक्षिशीवर अधिक बक्षिशी तो मिळवत गेला. उदाहरणार्थ, मी जर १०० रु. चक्रवाढ व्याजाने गुंतविले आणि
त्यावर मला १०रु. चे व्याज मिळाले, तर
पुढल्या वेळी व्याज मिळताना मूळ मुद्दल १०० असे ठराविक न रहाता (जे वीरसेनने केले होते)
वाढीव मुद्दल,
म्हणजे ११० रु. वर व्याज मिळते. म्हणजेच बक्षिशीवर अधिक बक्षिशी,
नाही का ?
सर्व
बँक खात्यावरील बचतीवर,असे
चक्रवाढ व्याज काही
काळाने, ठराविक दराने मिळण्याची सुविधा उपलब्ध
असते (आपल्या गोष्टीतला दर होता दुपटीचा). मग तुम्ही जर तुमचा पोकेटमनी,
घरात पिगी बँकेत ठेवलात तर तुम्ही गेलात वीरसेनच्या गटात. त्याने मागितलेले १०० पोती
धान्य,
जसे वाढ न होता तेवढेच राहिले न कायम, तसाच तुमचा पोकेटमनीही कायम तितकाच राहील,
जितका तुम्हाला मिळाला होता. पण तुम्ही जर तो, बँक खात्यात ठेवलात, तर
त्याची वाढ मात्र चक्रवाढ पद्धतीने
होईल. बँकेत पोकेटमनी जमा करताना, ती
कितीही लहान रक्कम जरी असली (तानसेनच्या सुरुवातीच्या तांदुळाच्या
फक्त दोन दाण्याप्रमाणे), तरीही जेव्हा तिची चक्रवाढ पद्धतीने वाढ होईल,
तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की हा पर्याय, घरातील पिगी
बँकेपेक्षा तुम्हाला नक्कीच जास्त परतावा देतोय. शिवाय भविष्यात लागणाऱ्या
बँकेच्या व्यवहारांची तुम्हाला ओळखही होईल.