Wednesday, November 21, 2018

मेडिक्लेम पॉलिसी: घ्यावयाची काळजी : श्री. दीपक कुलकर्णी

आज मेडिक्लेम पॉलिसी असूनही, त्यात काळजीपूर्वक सुधारणा न केल्याने, आलेल्या अनुभवाबद्दल बोलूयात. सूर्यवंशी कुटुंब, आमचे बरेच जुने क्लाएंट आहेत. त्यांच्या सर्व इन्वेस्टमेंट, इन्शुरन्स आम्ही बरेच वर्षांपासून पाहतो. काकांचा मुलगा सचिन व्यवसायाने आर्किटेक्ट आहे आणि त्याची प्रॅक्टिस खूप जोरात चालते त्यामुळे एकदम तो अतिशय बिझी असतो. पण त्यांनी, सिंगल विंडो सर्व्हिसेस मार्फत, सुचविलेले सर्व आर्थिक नियोजन, म्हणजे सर्व प्रकारच्या गुंतवणूक, आरोग्य आणि अपघात विमा  इ. सांगितल्या प्रमाणे, अगदी तंतोतंत केलेले आहे.

      आज सूर्यवंशी काका ऑफिसला आले ते नाराज होउनच. त्याचे असे झाले की मागच्या आठवड्यात  सचिनची सरांची लहान मुलगी सारा, घरातच खेळता-खेळता पडली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. सचिन सर व्यवसायाच्या निमित्ताने नाशिकच्या बाहेर गेलेले होते. सूर्यवंशी काकांनी तिला ताबडतोब दवाखान्यात नेले आणि तिच्यावर उपचार चालू झाले. तीन-चार तासांनी काकांनी,  तिथल्या नर्स ला सांगितले की आमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे. त्यावर त्याना असे सांगण्यात आले की मेडिक्लेम पॉलिसी जर असेल तर साराला 24 तास, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागेल. मग सारा, तिची आई आणि आजोबा, याना तितकीशी आवश्यकता नसताना, त्या रात्री हॉस्पिटलमध्येच रहांवे लागले. त्यांनी हॉस्पिटलच्या वातवरणात, जागरण, जेवण यांचे हाल सहन करत रात्र काढली आणि सकाळी त्यांना धक्कादायक वृत्त समजले. क्लेमसाठी प्रयत्न करताना असे लक्षात आले की मेडिक्लेम पॉलिसीमध्ये, साराचे नावच नाहीये. धावपळ करून काकांनी पैसे काढून आणले, बिल भरले आणि डिस्चार्ज घेतला.

मेडिक्लेम पॉलिसी बाहेर काढलेली असून जुनीच होती आणि दरवर्षी तिचे रिन्यूअल केले जात होते. परन्तु साराच्या जन्मानंतर तिचे नाव, पॉलिसीमध्ये ॲड करायचे राहून गेले होते. दरवर्षी, मागील पानावरून पुढे, अशी मेडिक्लेम पॉलिसी रिन्यू होत गेली होती. पॉलिसी बाहेर काढलेली असल्याने, हे आमच्या  लक्षात येण्याचे  कारण नव्हते.     

परंतु  “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, या उक्तीप्रमाणे जागे होण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला सर्वांना पुढील आवाहन करु इच्छितो.
·         मेडिक्लेम पॉलिसी मध्ये आपल्या सर्वच कुटुंबियांचा समावेश आहे किंवा नाही ते एकदा तपासून पहा. आपल्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती दाखल होताच, मेडिक्लेम पॉलिसी मध्ये सुधारणा करण्यास, आपल्या आर्थिक सल्लागारास, आवर्जून सांगा.
·         आता ज्येष्ठ नागरिकां साठी देखील, मेडिक्लेम पॉलिसी सुविधा उपलब्ध आहे. अगदी सत्तर वर्षाच्या व्यक्तीलासुद्धा मेडिक्लेम पॉलिसी मिळते. तेव्हा आपल्या आई-वडीलांच्या नावाचाही , मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समावेश करून घ्या.
·         मेडिक्लेम पॉलिसी जुनी असली तरी बऱ्याच वेळा इन्शुरन्स कंपनीकडूनही चुका होऊ शकतात आणि “नो‌ क्लेम बोनस”, पुढच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जात नाही. ही बाब देखील, तपासून घेतली पाहिजे.
·         बहुतेक सर्व मेडिक्लेम पॉलिसी कंपनी मार्फत, दर दोन वर्षांनी किंवा चार वर्षांनी “मेडिकल टेस्ट” साठी, सर्व खर्च दिला जातो. ह्या सुविधेचालाभ, आपण वेळचेवेळी घ्यायला पाहिजे.
·         कुठल्याही आजारपणामुळे जर हॉस्पिटलायझेशन झाले, तर 24 तास ऍडमिट असणे, गरजेचे असते. ॲक्सिडेंट केस मध्ये मात्र हे सक्तीचे नाही. अशावेळी, तुम्ही उपचार घेऊन घरी जाऊ शकता, फक्त कागदपत्रांची पूर्तता उपचारा दरम्यानच करावी लागते.
·         आपल्या आर्थिक सल्लागाराला, आपण  "अर्था " शी  निगडीत असलेल्या सर्व व्यवहारांची माहिती, पूर्णपणे द्या.

अशी सर्व काळजी,  आपण घेतली तर मेडिक्लेम पॉलिसी  मार्फत होणारे लाभ, आपणास मनस्तापा शिवाय घेता येतील. नाही का ?


श्री. दीपक कुलकर्णी,
    कार्यकारी संचालक

S.W.S.F.S.P.L
-