Wednesday, November 21, 2018

स्थावर मालमत्तेचे नियोजन :भाग १ : श्री. रघुवीर अधिकारी




विशेष नोंद : ह्या लेखातील सर्व अनुभव हे सत्यघटने वर आधरित असून काल्पनिक नावे घेउन सादर केलेले आहेत.

ही कथा आहे श्री. करंदीकरांची ! श्री. करंदीकर हे केंद्र सरकारच्या, उच्यपदावरील नोकरीतून निवृत्त झालेले सनदी अधिकारी. त्यांचा एकुलता एक मुलगा, शिरीष हा उच्यविद्याविभूषित आणि अमेरिकेत नोकरी करून, आपल्या कुटुंबां बरोबर, कायमचा स्थाईक झालेला होता. आपल्या उमेदीच्या काळात श्री. करंदीकरांनी अनेक ठिकाणी, जागेत पैसे गुंतविले होते आणि शिवाय काही वाडीलोपार्जित जमीनही त्यांच्या नावे होती. परंतु कामाच्या दगदगीत आणि सुखसंपन्न आयुष्यात मश्गुल झालेल्या श्री. करंदीकरानी कधीही, आपल्या स्थावर संपतीची कागदपत्रे व्यवस्थित नोंद करुन ठेवली नाहीत. त्यांनी आयुष्यभर केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले आणि ती गोष्ट म्हणजे, भरपूर पैसा कमाविणे आणि तो विविध जागांमध्ये गुंतविणे. त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर, अचानकच त्यांच्या पत्नीस पार्किनसन्सची व्याधी उद्भवली.  तेव्हा आपल्या कामात गर्क असलेल्या शिरीषने, आई-वडीलांची व्यवस्था, पुण्यात लवासामधील आरोग्यकेंद्रात केली. आज पत्नीच्या आजारपणामुळे आणि शिरीषकडून, मुलगा म्हणून झालेल्या अपेक्षाभंगामुळे श्री. करंदीकर, मानसिक रित्या संपूर्णतः कोलमडून गेले आहेत. पुढील आयुष्य काढण्यासाठी त्यांच्या जवळ, जरी पुरेशी संपती असली, तरीही त्यांना, पुढे त्यांच्या अनुपस्थित/पश्चात पत्नीची काळजी आरोग्यकेंद्राच्या वतीनेच घेतली जावी असे वाटते. या उदेश्यपुर्तीसाठी, त्यांना आपली स्थावर मालमत्ता, त्या आरोग्यकेंद्राला दान करावयची आहे. परंतु झालेले मानसिक खच्चीकरण, आर्थिक कागदपत्रे व्यवस्थीत न करवून घेणे/सांभाळणे ह्यामुळे, आज त्यांच्या हे देखील स्मरणात नाही की त्यांनी नेमक्या किती ठिकाणी आणि कोणत्या जागेचे, खरेदीचे व्यवहार केलेले आहेत.

ही सर्व कथा समजुन घेतल्यानंतर, एक आर्थिक सल्लागार म्हणून, माझ्यापुढे पुढील प्रश्न उभे राहिले.

१)      एक उच्यपदस्थ, सुशिक्षित व्यक्ती असूनही श्री. करंदीकरांनी, आपल्या स्थावर संपतीची कागदपत्रे व्यवस्थित नोंद करुन का ठेवली नाहीत ? आज त्यांच्या विस्मरणामुळे अथवा कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे, जर त्यांची स्वतःची मालकीची जागा असूनही, त्यांना ती उपयोगात आणता येणार नसेल तर, त्यांच्या कष्टाने कमाविलेल्या संपतीच्या नुकसाना करिता जबाबदार कोण? 

२)      आपल्या स्वतःच्या आयष्यात व्यग्र असणाऱ्या आणि वैयक्तीकरित्या सुख संपन्न असणाऱ्या शिरीषने, भारतात येऊन, त्या स्थावर मालमत्तेवर हक्क सांगितला नाही तर, ती कष्टार्जित संपती अतिक्रमित होण्याची किंवा इतर कोणाकडून बळकावली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, उच्यविद्याविभूषित व्यक्तीस (शिरीष आणि श्री. करंदीकर दोघेही) आर्थिक साक्षर म्हणावे का?

वरील अनुभवावरून हेच उधृत होते की केवळ स्थावर संपती “असणे” आणि ती खरोखरीच आपल्या प्रियजनांसाठी/ इतर उद्देश्याकरिता “सुरक्षित असणे” हा मुलभूत फरक जी व्यक्ती ओळखू शकते, त्याच व्यक्तीस आर्थिक साक्षर म्हणावयास हवे.

तेव्हा आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल किंवा स्थावर मालमत्तेच्या असण्याबाबत भ्रामक कल्पना घेउन जगण्यापेक्षा, चला आर्थिक साक्षर होऊयात!! आपल्या आर्थिक व्यवव्हारांशी निगडीत, सर्वच कागदपत्रांची आवश्यक ती काळजी घेऊन आपल्या कुटुंबांवर “सजग प्रेम” करूयात !!
-    श्री. रघुवीर अधिकारी,
सि.ई.ओ.,
SWSFSPL.
अनुभव शब्दांकन: सौ. रुपाली कुलकर्णी