Friday, October 30, 2020

मनो-Money: भाग १७ :भरल्यापोटी पुढचा घास नकोच ! .... - डॉ. रुपाली कुलकर्णी

 



भरल्यापोटी पुढचा घास नकोच !

राधा आज आई बाबांबरोबर एका रेस्तराँ मध्ये आलेली आहे. हे एका प्रख्यात महाविद्यालया जवळचे रेस्तराँ असल्याने तिथे तरुणवर्गाची खूपच वर्दळ दिसते आहे.

राधा : आई, इथे किती झकास वातावरण आहे. संगीतही किती छान वाजतेय इथे !

आई: हो खरंय, मस्तच आहे सगळे ! पण लक्ष देऊन ऐकले तरच. बघ ना, बहुतांश सगळ्यांच्या माना खाली आणि हातात महागडे मोबाईल्स ! हे सगळे एकमेकाना  विसरून गॅझेट्स मध्ये दंग झालेले दिसताहेत.

राधा: हे ग काय आई ? तू तर सारखीच टीका करत असते या मोबाईल युजर्सवर. बाबा, आपण आपल्या आवडीचे  डोसे मागवूयात हं.

बाबा : ते तर मी मागविलेत राधाताई ! पण आई म्हणतेय ते खरे आहे की नाही सांग बरे ? आपण अधिक वेळ एकत्र घालविण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, संवाद साधण्यासाठी असे बाहेर पडतो. मग तो सगळा वेळ, जर  मी आणि आई मोबाईल उघडून बसलो तर तू कंटाळशीलच की नाही ?

राधा: हो बाबा, खरे आहे आईचे सुद्धा. पण आता मोबाईल्स इतके प्रगत तंत्रज्ञानाचे येतात. शिवाय दादाने सांगितले की  ते शून्य टक्के व्याजदराने E. M. I.  वरही  मिळतात. मग ही कमाविती मंडळी, का नाही  घेणार असे मोबाईल्स?

बाबा: राधा ही  शून्य टक्के व्याजदराची कर्जे तशी फसवी असतात बरं का !  अशी कर्जे घेताना, केवळ व्याज द्यावे लागणार नाही म्हणून खूप लोक अनावश्यक कर्जे घेत सुटतात आणि मग आपलाच आर्थिक बोजा वाढवित रहातात.

आई: हो. अशा सुविधा गरजू लोकांसाठी असतील तर खरेच चांगले आहे. त्यातून अत्यावश्यक असेल तर घर, गाडी घेणे आपण समजू शकतो आपण. पण  असे शून्य टक्के व्याजदर बघून लोक अगदी  अनावश्यक खरेदी करताना दिसतात. ते मात्र चुकीचे आहे.

राधा: (डोस्यावर ताव मारता मारता) : म्हणजे मग असे नवनवीन सुविधा घेउन येणारी गॅझेट्स घ्यायचीच नाही का बाबा ? मग आपण प्रगत तंत्रज्ञान शिकणार कसे ?

बाबा: असे नाही राधा. मोबाईल असणे ही आज बहुतेकांची गरज झालेली आहे. आणि  गरज असल्यास खरेदी जरूर करावी. पण आज आपण कित्येक मंडळी अशी बघतो की  जी मोबाईल किंवा गॅझेट्स ची पुढची व्हर्जन्स आली रे आली की जुनी गॅझेट्स विकून, नवीन खरेदी करतात. मग त्यातील कित्येक नवीन फीचर्सची  आपल्याला गरज  आहे की नाही हा सारासार विचार फारसा कोणी करतच नाही. गरजेसाठी खरेदी आणि वारंवार चंगळ म्हणून खरेदी हा फरक ज्याला समजतो तोच खरा समजूतदार !

राधा: हो असे होते ह बाबा. साराच्या दादाने असे कित्येक मोबाईल्स बदलले आहेत. त्याला आता मी हे सगळे सांगणार आहे. आणि हो माझे पोट भरले बर का !

आई: नाही नाही, फ्री मिळतेय म्हणून एक पावभाजी अजून खा आता !

राधा (हसून दाद देत ) : नाही आई , पोटाची गरज संपली आहे तेव्हा पावभाजीची चंगळ नको ग . भरल्यापोटी पुढचा घास नकोच आता !

तिघेही हास्यकल्लोळात सामील होतात.  राधाला आजचा पाठ समजला म्हणून आई-बाबा एकमेकांना टाळी देतात !          

                       

-                 डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड

Friday, October 23, 2020

मनो-Money: भाग १६ :दानाचा अर्थ की अर्थाचे दान .... - डॉ. रुपाली कुलकर्णी

 

दानाचा अर्थ की अर्थाचे दान  ....

राधा आज एकदम खुश आहे. संध्याकाळी शाळा सुटल्यावर, अगदी धावत-पळत आई बाबांकडे येते आणि त्यांचा संवाद सुरु होतो.

राधा: आई, बाबा, आज मला कसल भारी वाटतंय म्हणून सांगू ! मी जाम खूष आहे बर का !!

आई: व्वा ! काय झाले असे शाळेत आज ?

राधा: अग, आमच्या शाळेत न आज, एका संस्थेची काही दिव्यांग मुले आली होती. सगळी आमच्याच तर वयाची होती. त्या सगळ्यांनी मिळून, एक तास भर इतका सुंदर, मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला की आम्ही अगदी आवक झालो. त्या कार्यक्रमाचा दर्जा बघता, ती मुले दिव्यांग असतील असे वाटत सुद्धा नव्हते.

बाबा: अच्छा, म्हणून स्वारी इतकी खूष आहे तर !

राधा: फक्त हेच कारण नाहीय बाबा. त्या कार्यक्रमानंतर, मी उत्स्फुर्तपणे वर्गातील सर्व मुलांना आवाहन करुन, आपापल्या खाऊचे पैसे एकत्र करण्यास सांगितले. आणि मग त्या संस्थेसाठी, जवळपास ५०० रु. देणगी आम्ही मदत म्हणून दिली. आणि या आमच्या तत्परतेबद्दल, सामाजिक भान दाखविल्या बद्दल सर्व शिक्षकवृंदाने वर्गाचे आणि वर्गप्रमुख म्हणून माझे जाहीर कौतुक केले!

आई: अच्छा असा मामला आहे तर ! राधा, तुझे खरच कौतुक आहे. पण राधाबाई, जरा विचार करुन सांगशील का की तुला नेमके कशामुळे आनंद झाला आहे ? दिव्यांग मुले, एक चांगला कार्यक्रम सादर करू शकली म्हणून की तुझे कौतुक झाले म्हणून ?

राधा: हे ग काय आई? मला अर्थातच त्या मुलांच्या कलाप्रदर्शनामुळे आनंद झालाय !  

आई: अरे वा राधा, आम्हाला विश्वास होताच, फक्त मी जरा स्पष्ट विचारून खात्री केली इतकेच!

बाबा: पण राधा, ह्या प्रश्नाकडे जरा दुसऱ्या दृष्टीकोनातून बघुयात. कित्येक दानी व्यक्ती विविध सामाजिक संस्थाना आर्थिक स्वरुपात मदत करित असतात. ह्या दानाचा अर्थ असा असतो की त्यांना सामाजिक दायित्वाचे भान आहे आणि त्यासाठी ते ही दानाची कृती ते करित आहेत.  पण त्यातील काही व्यक्ती, सोशल मिडीयाचा वापर करुन आपल्या सामाजिक कृतीचे सार्वजनिक प्रदर्शन, स्वतःच्या कौतुकासाठी करताना दिसतात. माझ्यामते मग मात्र, अशा दानाला अर्थ न रहाता ते केवळ ‘अर्थाचे दान’ होते नाही का ?

राधा(चिडून) : पण बाबा, मी असले काही केलेय का? तुम्ही मला का सांगताय असे? अशा सोशल मिडिया पोस्ट वाचण्यात आल्या की आपल्यालाही काही चांगले काम करण्याची उर्मी होतेच ना?

बाबा: अग हो, हो राधा! पण खूप कमी जणांना अशी साधक विचार करुन, व्यापक कारणास्तव कृती करताना आपण बघतो. इतरांना प्रेरणा मिळावी, हा निव्वळ उद्देश असेल तर चांगलीच गोष्ट आहे!

आई: आणि राधा, आपल्या दानाला अशा “सोशल मिडिया” पद्धतीने व्यापक करण्यापेक्षा, आपले दान अधिक व्यापक होण्यासाठी प्रयत्न करता येतात. म्हणजे तुम्ही आज जी मदत केली तिच्याकडे एका वेळेची आर्थिक मदत म्हणून न बघता त्या मुलांबरोबर वेळ घालविणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे असे काम करायला हवेय.

राधा: आईं, बाबा किती चांगल्या गप्पा मारल्या आपण! आता मला दानाचा अर्थ आणि अर्थाचे दान यातला फरक समजला बरका! मी लवकरच माझ्या वर्ग मित्रांसोबत त्या संस्थेस भेटही देऊन येणार आहे आणि आणि त्यांच्यासाठी अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्नही करणार आहे !!

आई- बाबा समाधान पावतात आणि राधाला शाबासकी देतात !!

-   डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड

Friday, October 16, 2020

मनो-Money: भाग १५ :सुटता संयम !! - डॉ. रुपाली कुलकर्णी

 


सुटता संयम ....

राधा एकदम ऑफ मूडमध्ये बाबांकडे येते.

बाबा : काय झालेय मॅडम ? इतका का मूड खराब ?

राधा : बाबा, मी आईचे  ऐकले नाही आणि त्याचे मलाच खूप वाईट वाटतंय आता. मी आईच्या मागे लागून ऑनलाईन शॉपिंग साईट वरून माझ्यासाठी शाळेची बॅग मागविली आणि ती इतकी वेगळीच निघाली आहे  की आता परत करावी लागणार. आई मला सांगत होती की रविवारी आपण दुकानात जाऊन, चांगली बघून आणू. पण मलाच धीर निघाला नाही तेव्हा लगेच ऑनलाईन ऑर्डर केली होती.

बाबा: अच्छा.. असा मामला आहे तर !! राधा, रविवार पर्यंत थोडा धीर धरला असतास  तर अशी मनःस्तापाची वेळ आली नसती ना !

राधा: हो ना बाबा ! आता काय करू?

बाबा : आता ह्यातून आपण योग्य तो धडा घ्यायचा आणि पुढे खरेदी करतांना संयम बाळगायचा ! ऐक , एक गोष्ट सांगतो तुला. हा अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत घडलेला प्रसंग आहे. काही मानसशास्त्रज्ञ, संशोधक यांनी एक प्रयोग करायचे ठरविले . त्यासाठी त्यांनी काही  लहान मुलाना एका वर्गात एकत्र केले. त्या वर्गात  छुपे कॅमेरे लावलेले होते. मुलांना आत बोलावले गेले. त्यांच्या समोर छानश्या प्लेट मध्ये त्यांची आवडती मिठाई.... 'मार्शमेलो' ठेवली होती. मुले एकदम खुश झाली आणि कधी  एकदा ती मिठाई खाऊ असे त्यांना वाटू लागले. मग मात्र मुलांना  प्रयोगाची एक अट सांगण्यात आली. "जी मुले ही मिठाई  20 मिनिटे न खाता तशीच ठेवतील, त्यांना बक्षीस म्हणून दोन मार्शमेलो मिळतील !" आणि मग सर्व मोठी  मंडळी वर्गाच्या बाहेर गेली. अत्यंत आवडती वस्तू समोर असूनही त्याचा आस्वाद न घेता नुसतं पहात रहायचं ही मुलांच्या संयमाची परिक्षा बघणारी गोष्ट होती.  मुलांच्या हालचालींचे, हावभावांचे पूर्ण चित्रीकरण करण्यात येत होते. बरीच मुले नाही धीर धरू शकली आणि त्यांनी त्यांच्या वाट्याची मिठाई फस्त केली.  पण काहींनी, अगदी मोजक्या मुलांनी चांगला संयम दाखवत अजून दोन मार्शमेलो मिळवले आणि ते जिंकले!  पण, मानसशास्त्रज्ञ, संशोधक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे बरीच वर्षे या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीचा मागोवा घेतला. ते या सर्व मुलांच्या संपर्कात राहिले आणि त्यांना असे आढळून आले की, जी मुले स्वतःवर संयम ठेवू शकली, धीर धरू शकली  तीच  मुले पुढील आयुष्यात बाकी मुलांपेक्षा जास्त यशस्वी झाली.

राधा : बाबा, खरे आहे हो ! मी जरा रविवार पर्यंत धीर धरला असता तर मला कदाचित अजून चांगली बॅग मिळाली असती !

बाबा : राधा, बऱ्याचदा आपल्याला जवळ असलेले पैसे, चांगली वस्तू दिसली की खर्च करायचा मोह होतो. त्यावेळी आपली विवेकबुद्धी आपण वापरायला हवी आणि विचार करायला हवा की 'खरोखरच ह्या गोष्टीची मला आवश्यकता आहे का ? असेल तर तातडीने आवश्यकता आहे की अजून चांगले पर्याय शोधण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे ?' असा विचार करायला शिकणे गरजेचे आहे. नाहीतर आपण असणाऱ्या साधनांचे, वेळेचे , पैशांचे  चांगले नियोजन करण्यात अयशस्वी होतो. आपण पेपरमध्ये अशा कित्येक बातम्या वाचतो की आमिषाला भुलून किंवा गुंतवणूक पर्यायांचा योग्य तो अभयास न करता, कित्येक जण अयोग्य ठिकाणी पैसे गुंतवतात आणि ते  गमवितात. तेव्हा मोठी मंडळीही अशा चुका करतात !! म्हणून म्हणतो राधा, संयम ठेवण्याची, अभ्यासपूर्वक आपला वेळ, साधने आणि पैसा वापरायची सवय आपण जितक्या लवकर लावू तितके चांगले ! त्या वेळेत कदाचित आपल्याला अजून उत्तम पर्याय, वस्तू, साधने मिळू शकतात . हो की नाही ?

राधा : खरे आहे बाबा , मी नक्की आता अशी सवय लावण्याचा प्रयत्न करीन.

बाबा: चलो, व्हेरी गुड !! इस बातपे हम दोनो भी दो-दो मार्शमेलो खा लेते हे !!

 

... आणि मग दोघेही हसत हसत मिठाई फस्त करतात !!    

-   डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड

Sunday, October 4, 2020

SWS अर्थवाणी - चरण २: आयुर्विमा (Insurance)

 


आयुर्विमा (Insurance)


जो वाही उत्पन्नाचा भार 💰

त्याने करावा आयुर्विमा  स्वीकार,🪂

जीवनांती जो बने आधार,😇

कुटुंबियास ll १  ll 👨‍👩‍👧‍👧


जैसी उत्पन्नाची सीमा, 💹

त्यायोगे घ्यावा विमा, ❎

आर्थिक आघात करावा  धीमा, 😊

या मार्गे ll २  ll 🪂


दायित्वे वाढता जीवनात, 👶🏻👧🏻

वाढ करावी संरक्षणात,😎

अतिरिक्त लाभ प्राप्तीकरात,💰

नियोजने  ll ३ ll 🎯


भरावा हफ्ता वेळेवार,⏳

टाळावा संभाव्य अधिभार, 💵

नेमता सुयोग्य सल्लागार,😎

चिंता मिटे ll ४  ll 😇


करिता विमा कवच धारण, 🪂

अर्थसंकटा न जीवन शरण, 👨‍👩‍👧‍👧

चिंतेचे मिटते कारण 😇

SWS वाणी ll ५ ll 💰

   - डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  


SWS अर्थवाणी - चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning)

 


मालमत्ता नियोजन (Estate Panning)

होता जीवनाचा आरंभ I👶🏻 

निश्चित होतसे  अंत I ✝️

करावा तो सुखांत I 🆓

विवेकबुद्धे II १  II  😇


धनसंपदा, गृह ,भूप्रदेश I 💰

विभागून द्यावा विना क्लेशI 🔡

वाद-विवाद ना उरो शेष I 🤬 

नियोजने II २  II 📝 


वाटता क्लिष्टता फार I 🙁

नेमावा योग्य सल्लागार I 😎 

नियोजना जो देई आकार I 😊 

तुमच्या इच्छे II  II 🤗


असावे असे नियोजन I 📝 

उपभोग घेतील प्रियजन I 👨‍👩‍👦‍👦

करा समाजासाठी ही दान I💝

SWS अर्थवाणी II  II 😀

 

   - डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  


 

 

 

 


Friday, October 2, 2020

मनो-Money: भाग १४ ब्लू बुक !! - डॉ. रुपाली कुलकर्णी

 

राधा आणि बाबा दोघेही कॅरम खेळता खेळता गप्पा मारत असतात.

राधा: बाबा, आज एक गंमत झाली ! मी या शाळेत डबा न्यायची विसरले आणि माझ्याकडे पैसे असतानादेखील मी सारा कडून पैसे घेऊन कॅन्टीनमध्ये जाऊन जेवले !!

बाबा: अरेच्चा !  असे कसे काय झाले आज ?

राधा: अहो, आईने माझ्या दप्तरात “इमर्जन्सी फंड” म्हणून कायम पन्नास रुपये ठेवलेले असतात म्हणे... पण ती हे मला सांगायचे विसरूनच गेली बाबा !!

बाबा: अरे खरंच गंमत झाली की ! पण राधा पैशांच्या बाबतीत अशा चुका बरीच मोठी मंडळीही करत असतात बर का !

राधा: ते हो कसे काय बाबा?

बाबा:  अगं,  बऱ्याच घरांमध्ये कुटुंबासाठी घेतलेले आर्थिक निर्णय, केलेली गुंतवणूक किंवा बचत ही कुटुंबातील सदस्यांना सांगितलीच जात नाही आणि मग अडचणीच्या काळामध्ये, कर्त्या व्यक्तीच्या अभावी, पैसे असूनही, कुटुंबीयांना त्याचा योग्य प्रकारे लाभ घेता येत नाही.

राधा: खरेच हो बाबा, आज आईने माझ्याचसाठी पैसे ठेवलेले असताना देखील मला केवळ माहिती न दिल्याने ते मला वापरता आले नाही.

बाबा: राधा, अगं ही किरकोळ रक्कमेबाबतची गोष्ट आई विसरली तर ठीक आहे. परंतु बऱ्याच घरांमध्ये सगळ्यांसाठी घेतलेले आर्थिक निर्णयही घरात शेअर होत नाहीत. परिणामतः कुटुंबातील सदस्यांना घरातील आर्थिक चित्राची जाणीवच होत नाही. आपल्या शिंदेकाकांच्या घरातीलच किस्सा बघ ना ! काकांनी घरासाठी, मुलांसाठी, काकुंसाठी, आजी -आजोबांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारे पैसा जमेस ठेवला होता. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर मात्र असा पैसा त्यांच्या कुटुंबियांनाच माहीत होण्यास किती अडचणी आल्या.

राधा: मग तर घरातील प्रत्येक कर्त्या-कमवित्या व्यक्तींनी आपले आर्थिक निर्णय, कुटुंबियांना वेळीच कळविले पाहिजेत.

बाबा: अग घरातील अशा आर्थिक निर्णयांचा लेखाजोखा असणारे पुस्तक किंवा नोंदवहीस आम्ही ब्लू-बुक म्हणतो. यात कुटुंबा संबंधित असलेल्या सर्व आर्थिक नोंदी केलेल्या असतात. म्हणजे घरातील सर्व बचत खाती, गुंतवणूक, विमा, स्थावर मालमत्ता, आयकर, दिलेली आणि घेतलेली कर्जे अशासंबंधी सर्व माहिती या ब्लू-बुक मध्ये नोंद केलेली असावी. तसेच हे ब्लू-बुक कर्त्या व्यक्तीने घरातील सर्वांनी दाखवायला, समजवायला हवे.  म्हणजे मग अडचणीतल्या काळात, दुर्दैवी घटनेच्या वेळी, कुटुंबाला आपल्यासाठी असणारी आर्थिक सुविधा लक्षात येते. आणि केलेल्या बचत, विमा, गुंतवणुकीचा त्यांना आवश्यकता असताना लाभ घेता येतो.

राधा: बाबा, खरंच किती महत्त्वाचे आहे हे ब्लू-बुक !  

बाबा: हो अशा नोंदी ठेवणे किवा करणे हे “आर्थिक साक्षर” असल्याचे प्रतीक आहे.

राधा: मला तर फारच आवडली ही सुज्ञता ! ब्लू-बुकमुळे घरातील सगळ्यांनाच आपल्या आर्थिक परिस्थितीचे नेमके ज्ञान होते. आपल्यासाठी घरातील व्यक्ती किती करतात याची जाणीव असणे, ही सुरक्षिततेची भावना वाढवणारी बाब आहे बाबा !!

बाबा: बरोबर राधा ! लागणार का मग कामाला !! तुझ्या जवळचा मित्रवर्गालाही यासंबंधी सांग सांगशील ना?

राधा: हो बाबा ! नक्कीच !!

-   डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड